बोर WLS, निसर्गाचा अनमोल ठेवा!

 


























बोर WLS, निसर्गाचा अनमोल ठेवा!

 

“मी जंगलांमध्ये जो वेळ घालवलाय त्याने मला निखळ आनंद दिलाय, व मी तो आनंद अत्यंत खुशीने इतरांना देतोय. सर्व वन्यजीवन हे त्याच्या नैसर्गिक वातावरणात आनंदी असते, त्यातूनच मलाही आनंद मिळतो असे मला वाटते. निसर्गात कधीही दुःख नसते, अथवा तक्रार नसते. एखाद्या थव्यातील पक्षी, किंवा एखाद्या कळपातल्या प्राण्याला एखादा ससाणा किंवा एखादे हिंस्र श्वापद उचलून घेऊन जाते व जे उरतात ते यामध्ये आनंद मानतात की आज त्यांचा दिवस नव्हता, जंगलात उद्याचा विचार नसतो.”— जिम कॉर्बेट.

 “मी प्रत्येक वेळी जंगलाला भेट दिली, तेव्हा जंगलाने मला जीवनाविषयी काहीतरी नवीन शिकवले आहे” … मी.

जेव्हा विषय जंगल व वन्यजीवन असतो तेव्हा, ज्यांचे नाव एका अभयरण्याला देण्यात आल्याने अजरामर झाले आहे त्यांच्याव्यतिरिक्त मला इतर कुणाच्याही शब्दांची गरज भासत नाही. त्यांच्या शब्दांनी मला प्रत्येक क्षणाला अधिक सुजाण बनवले आहे आणि माझ्या जंगलामध्ये घालवलेल्या प्रत्येक क्षणाला त्यांचे शब्द अधिक आनंदी बनवत आहेत. तुम्हाला जिम कॉर्बेट यांच्याविषयी माहिती नसेल तर कृपया गूगल करू नका किंवा विकीपेडिया पाहू नका, तर त्यांची पुस्तके वाचा व ती बहुतेक भाषांमध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्ही त्यांचे एखादे पुस्तक वाचून झाले की, कोणत्याही जंगलाला भेट द्या व त्या जंगलामध्ये जिम यांच्या दृष्टिकोनातून राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही त्यांना अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेऊ शकाल कारण गूगल किंवा विकिपीडिया वर फक्त व्यक्तीची माहिती मिळते समज नाही!हा लेख अशा एका जंगलाविषयी आहे (ताडोबाविषयी नाही) जिथे माझे जाणे योगायोगाने झाले, मी खरेतर ताडोबा व उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यामध्ये (हे तुम्ही गूगल करू शकता) कामाच्या निमित्ताने तसेच तिथल्या दोन सुपर मॉमना पाहण्यासाठी जंगलात भटकंती करण्यासाठी गेलो असल्यामुळे गडबडीत होतो. या दोन्हींविषयी नंतर सविस्तर लिहीनच, परंतु मार्व्हलच्या चित्रपटांमध्ये ज्याप्रमाणे बरेचदा पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध अधिक उत्कंठावर्धक असतो, माझ्या या सफारीचा उत्तरार्ध अधिक उत्कंठावर्धक होता. त्यामुळे मी जिथे सर्वात शेवटी गेलो त्याविषयी सर्वात पहिल्यांदा लिहीण्यास सुरूवात करत आहे. निमित्त होते, वन्यजीवन सप्ताहाचे (आपल्या राज्यात तो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो) व नागपूरला परत येताना मी वाघांच्या राजधानीपासून जेमतेम 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला भेट देणे अपेक्षित होते. गंमत म्हणजे नागपूरपासून कोठल्याही अभयारण्याचे हे सर्वात जवळचे प्रवेशद्वार आहे व मी इथे साधारण 15 वर्षांपूर्वी आलो होतो. या दौऱ्यात, माझा उद्देश येथील तरुण आरएफओ श्रीमती अर्चना व श्री नितीन बोरकर (त्याचप्रमाणे माझी श्री देशमुख आयएफएस, एसीएफ यांच्याशीही भेट झाली) यांच्याशी स्थानिक तरुणांसाठी क्रेडाईच्या (कृपया गूगल करा) संयुक्त विद्यमाने कौशल्य विकासाविषयी चर्चा करणे, त्याचप्रमाणे काही देणगी देणे किंवा योगदान देणे (हे घेणाऱ्याच्या दृष्टीकोनातून अधिक सन्मानजनक वाटते) व पुणे शहरातील लोकांनी दिलेले वापरता येतील असे कपडे (जंगल बेल्सच्या सौजन्याने) या दोन्ही आरएफओना सुपूर्त करणे हा होता, हे कपडे नंतर गरजूंना वाटले जातील. अशा लहान कृतींमधून वन विभागाचे स्थानिकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतात, जेव्हा काहीतरी दुःखद घटना घडते म्हणजे एखाद्या जनावराचा मृत्यू किंवा एखाद्या वन्य प्राण्यामुळे माणसाचा जीव जाणे अशा घटना घडतात तेव्हा या संबंधांचा फॉरेस्ट डिपार्टमेंटला चांगला उपयोग होतो. मी तिथे असताना, मी केवळ ती जागा किंवा अधिवासाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी एक सफारी घेण्याचा विचार केला. मी दुपारच्या सफारीसाठी गेलो, तेव्हा मी अतिशय दमलेलो होतो, कारण चार दिवसात तीन जागी प्रवास झाला होता व दररोज पहाटे 4.30 वाजता उठणे हे आता मी वयाची 57 वर्ष पूर्ण केल्यानंतर  सहजपणे करू शकत नाही, परंतु तरीही ही  सफारी पूर्ण करण्याचा मी विचार केला. आणि त्यानंतरच्या चार तासात जे झाले त्याची तुलना क्रिकेटच्या अशा एखाद्या सामन्याशी केली जाऊ शकते ज्यामध्ये फलंदाजाची शेवटची जोडी (जे सामान्यपणे गोलंदाज असतात) खेळपट्टी येते व जेव्हा सगळे जण डाव काही मिनिटात गुंडाळला जाण्याची अपेक्षा करत असतात तेव्हा ते चौकार व षटकार मारायला सुरुवात करतात, त्याच्याशीच होऊ शकते.

तुमची उत्सुकता आणखी ताणत नाही, मी बोर वन्यजीव अभयारण्याविषयी बोलत आहे, मी तिथला निसर्गरम्य परिसर, जैवविविधतेमुळे अक्षरशः थक्क झालो व वाघ, बिबट्या व अस्वल यांचे एकाच वेळी दिसणे हे म्हणजे दुग्ध शर्करा योगच होता. कोणत्याही जंगलामध्ये हे प्राणी दिसण्यासाठी नशीबही असावे लागते परंतु ज्या सहजतेने किंवा आरामात हे प्राणी त्यांच्या अधिवासात वावरत असतात त्यावर या जागेच्या जैवविविधतेची समृद्धता तुम्हाला समजते, ती तुम्हाला सांगता येणार नाही तर ती अनुभवावीच लागेल, जे मला बोरमधल्या अगदी पहिल्या सफारीतून जाणवले, जे माझ्या लेखाचे कारण आहे. हे अभयारण्य अगदी छोटे आहे, याला केवळ दोन प्रवेशद्वारे व बफर क्षेत्र असून, त्याच्या भौगोलिक ठिकाणामुळे बोर अतिशय महत्त्वाची जागा किंवा जंगलाचा पट्टा ठरला आहे. ते ताडोबा व उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्याच्या ईशान्य दिशेला आहे, यामुळे तो मेळघाट व सातपुडा या मध्यभारतील दोन जंगलांमध्ये स्थलांतर करणाऱ्या वाघांसाठी अतिशय उत्तम मार्ग किंवा विश्रांती घेण्याची जागा झाला आहे. बोर धरणाच्या पाण्याभोवती हे पसरलेले आहे, यामुळे येथे वर्षभर पाणी उपलब्ध असते, जे या जंगलासाठी सर्वात मोठे वरदान आहे. सफारीचा मार्ग बहुतांश तलावाच्या एका बाजूभोवतीच फिरतो, तरीही संपूर्ण तलावाभोवती डोंगरांवर बरेच वन्यजीवन आहे. एक सुंदर गोष्ट म्हणजे तिथे सागवानाच्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असली तरीही हे जंगल अनेक प्रजातींची झाडे, झुडुपे, व वन्य फुलांनी समृद्ध आहे. यावर्षी वरुण देवता आपल्या राज्यावर रुसली आहे, तरीही जो काही थोडाफार पाऊस झाला, त्यावर जंगल रानटी फुलांनी बहरलेले होते व त्यावर फुलपाखरे बागडत होती. इथे शिकरीसाठी सावजही विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, आपल्याला भोवताली अनेक चितळ व सांबर दिसले, जे आमच्याकडे कुतुहलाने पाहात होते.

मी नमूद केल्याप्रमाणे मी जवळपास 15 वर्षांपूर्वी इथे आलो होतो, जेव्हा इथे कोणत्याही पायाभूत सुविधा नव्हत्या (आज देखील, हे ठिकाण आपल्या तथाकथित विकासापासून तुटलेले आहे) परंतु सुदैवाने इथली नैसर्गिक समृद्धी आजही टिकून आहे व त्यासाठी वनविभागाचे श्री. श्रीनिवासा रेड्डी व इतरांसारख्या काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे आभार, आज बोर डब्ल्यूएलएसने वन्यजीवन पर्यटनाच्या मार्गावरील आपला प्रवास सुरू केला आहे. माझ्या मदतीला शुभम नावाचा एक तरुण स्थानिक मुलगा होता व सारंग हा आमचा जिप्सी चालक होता. दोघेही जण आम्हाला हा परिसर दाखवण्यासाठी अतिशय उत्सुक होते व त्या दोघांना जेव्हा हे कळले की ते कदाचित प्राथमिक शाळेत असताना मी इथे येऊन गेलो होतो तेव्हा ते ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला तसेच गंमतही वाटली. इथली विशेष बाब म्हणजे हे जंगल अतिशय घनदाट आहे, तुम्ही नेहमी वाघ पाहण्यासाठी हरिण किंवा सांबराने दिलेल्या इशाऱ्यांवर अवलंबून राहू शकत नाही, अशावेळी रानकोंबडी, मोराने दिलेल्या इशाऱ्यांचीही अतिशय मदत होते, परंतु इतर मोठ्या जंगलातील गाईडना याचा माग घेण्याची सवय नसते. इथे आम्ही डोंगर माथ्यावर सांबराच्या इशाऱ्याची वाट पाहात बसलो होतो, परंतु सांबराने हा इशारा का दिला होता हे आम्हाला पाहता आले नाही व आम्ही वाट पाहून व त्या जागेला बरेचदा फेरी मारल्यानंतर तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. तरीही मोराचे इशारे येत होते व ते सातत्याने येत होते. आमच्यासोबत आणखी एक जिप्सी होती व आम्ही एकत्रितपणे आणखी एकदा त्या जागी शोध घेण्याचा निर्णय घेतला, आठ डोळे बारकाईने त्या जागी शोध घेत होते. अचानक दुसऱ्या जिप्सीतून शिट्टीचा आवाज ऐकू आला, ते एका कडुनिंबाच्या झाडाकडे बोट दाखवत होते, ते झाड दाट गवताळ पट्ट्यात एकटेच उभे होते. एक देखणा नर बिबट्या कडुनिंबाच्या वृक्षाच्या फांद्यांच्या बेचक्यात शांतपणे बसला होता व आम्हाला त्याच्या हिरव्या डोळ्यांनी न्याहाळत होता. यामुळेच सांबराने इशारा देणे थांबवले होते व मोर इशारे देत होतात कारण दुसऱ्या झाडावर बसून तो हे बघू शकत होता व आम्ही जमीनीवर एखादे श्वापद दिसेल याची वाट पाहात बसलो होतो. बिबट्याने त्याची शेपटी हलवल्यामुळेच, जिप्सीतील गाईडच्या तीक्ष्ण नजरेने त्याला हेरले व आम्हाला कॉल केला, तर हे बोर जंगल असे आहे.

त्यानंतर ओम नावाचा एक तरुण नर वाघ दिसला, जो आमच्या समोरून, साधारण एखाद किलोमीटर अंतरावर एखाद्या होऊ घातलेल्या राजासारखा चालत गेला. इथेही तो गवतात छान पहुडला होता व उभा राहून जवळच असलेल्या पाण्यामध्ये त्याने पोहायला सुरुवात केली. मी लगेच माझ्या चालकाला गाडी उलट दिशेस घेण्यास व ज्या  दिशेने वाघाने पोहायला सुरुवात केली होती, ज्यामुळे इतर वाहने वाघाची पाण्यातील छायाचित्रे घेण्यात गर्क होते, त्या रस्त्यावर अगदी पुढे घेऊन जाण्यास सांगितले. आश्चर्य म्हणजे (मी माझ्याच पाठीवर स्वतःला शाबासकी दिली) वाघ त्या रस्त्यालगत असलेल्या गवतातून थेट आमच्या जिप्सीपुढे आला ज्यामुळे आम्हाला जवळपास एक किलोमीटर मागे जावे लागले, जे आम्ही आनंदाने केले. स्वतःच्याच धुंदीत चाललेल्या, क्वचितप्रसंगी आपल्या नारंगी डोळ्यांनी तुमच्याकडे रोखून पाहणाऱ्या तरुण नर वाघाला पाहण्यासारखी दृश्ये अतिशय विशेष असतात, ती पाहत असताना तुम्ही जेव्हा तुमच्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून रोखून पाहात असता, तेव्हा उत्तेजनाने तुमच्या मानेवरचे केस उभे राहिल्याचे तुम्हाला जाणवू शकते. तो जेमतेम दोन वर्षांचा होता व आजूबाजूला काही जिप्सी असूनही तो आत्मविश्वासाने, बेधडकपणे चालत होता, वन्यजीवन पर्यटनाची भरभराट होण्यासाठी आणखी काय हवे, बरोबर?

याचा परिणाम असा झाला की, माझा सगळा थकवा व शीण बाजूला ठेवून मी पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळची सफारी करायचे ठरवले, केवळ बोर अभयारण्य अधिक सखोल न्याहाळता यावे म्हणून. एक लक्षात ठेवा ते म्हणजे बोरमध्ये राहण्यासाठी चांगले ठिकाण नाही (माफ करा, एमटीडीसीचे रिसॉर्ट अतिशय उत्तम ठिकाणी आहे परंतु तिथली व्यवस्था अजिबात चांगली नाही) म्हणून आम्ही वर्ध्याला राहिलो होतो, जेथे गाडीने जाण्यासाठी जवळपास 40 मिनिटे लागतात व आम्ही ratri 8 वाजून गेल्यानंतर जेव्हा हॉटेलवर पोहोचलो तेव्हा व्यवस्थापकाने आमच्याकडे शंकेने पाहिले, कारण आमचे कपडे व बॅगा लाल धुळीने माखल्या होत्या. आमचा काही अपघात वगैरे झाला का असे त्याने आम्हाला विचारले. विनोद म्हणजे, वर्ध्याच्या इतक्या जवळ एखादे वन्यजीव अभयारण्य असेल याची त्याला कल्पनाही नव्हती, जेथून आम्ही आलो होतो. बोरने यासंदर्भात काहीतरी केले पाहिजे व हे ठिकाण बाहेरील जगाला माहिती व्हावे यासाठी काहीतरी केले पाहिजे. काही इन्स्टाग्राम पेजेस वगैरे आहे, परंतु तरीही अधिक गांभिर्याने प्रयत्न झाले पाहिजेत. पर्यावरणवाद्यांना पर्यटक म्हणजे डोकेदुखी असे वाटू शकते (जी काहीवेळा असते) परंतु हे ठिकाण व्यवहारिक दृष्टीने  टिकण्यासाठी  त्याची गरज असते व त्यासाठी आपल्याला बोरमध्ये राहण्यासाठीही चांगली निवासी (म्हणजे योग्य) जागा पाहिजेतच. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पहाटे 4 वाजता प्रवेशद्वारावर जाण्यासाठी निघालो, तेव्हा परत हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना आम्ही वेडे आहोत असेच वाटले (ते आम्ही आहोतच) व एकदा अभयारण्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर, तुम्ही वेगळ्याच जगात जाता. सकाळी वाऱ्याची प्रसन्न झुळूक, जंगली फुलांचा गंध, बोर धरणाच्या जलाशयावर पाण्यावर तरंगणारे धुके व एका झाडाच्या वाळलेल्या फांदीवर बसलेला  ऑस्प्रे शिकारी पक्षी आणि नखामध्ये त्याने शिकार केलेला मासा पकडला आहे, हे दृश्य दीर्घकाळ माझ्या स्मरणात राहील. आमची गाडी पुढे जात असताना, आम्हाला वाटेत भेटलेल्या जिप्सीतील लोकांनी सांगितले की एक बिबट्या नुकताच रस्ता ओलांडून, ओढ्याच्या  वरच्या अंगाला गेला आहे व आम्ही ती जागा तपासण्याचा निर्णय घेतला, कारण बिबटे हे अतिशय समजून घेण्यास अवघड प्राणी असतात व त्यांचा कोणताही एक निश्चित मार्ग नसतो. आम्ही पुढे गेलो व बिबट्याची वाट पाहात ओढ्यापाशी थांबलो. प्रवाहाच्या उलट दिशेला मोराचे इशारे ऐकू आले व हे इशारे वरच्या दिशेने येत होते, त्यामुळे आम्ही असा अंदाज बांधला की बिबट्या प्रवाहाच्या वरच्या दिशेनेच चालत असावा. आम्ही मागे वळालो व जेथून तो ओढा उगम पावला होता त्या डोंगरावर चालत गेलो, आणि काय आश्चर्य, समोरच घोस्ट ऑफ फॉरेस्ट ( बिबट्याचे  टोपण नाव) रस्त्यावर बसून, आमच्याकडे पाहात होते. मी चालकाला आम्ही जिथे आहोत तिथेच थांबायला सांगितले व काही छायाचित्रे काढली, दहा मिनिटे बिबट्या आमच्याकडे पाहात होता व तेव्हा त्याला जाणीव झाली की आम्ही पुढेही जात नाही व आमच्याकडून कसलाही धोका नाही तेव्हा तो उठला व त्याने रस्त्यावर आमच्यापासून लांब जायला सुरुवात केली. आम्ही ज्या क्षणी त्याच्या मागे जाण्यासाठी जिप्सी सुरू केली, त्याने मागे वळून पाहिले व जंगलातील झुडुपांमध्ये तो नाहीसा झाला. चालकाला यातून धडा मिळाला, जो भविष्यात अशाप्रकारे बिबट्या व अस्वल दिसल्यानंतर तो अमलात आणेल की ते अतिशय लाजाळू प्राणी असतात व तुम्हाला त्यांच्यापैकी कुणीही दिसले तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे इंजिन बंद करणे व थांबणे व तुम्ही जवळपास असताना त्यांना आरामदायक वाटावे यासाठी त्यांना वेळ देणे, कारण त्यानंतर तुम्ही त्यांना निवांतपणे पाहू शकता अशीही एक शक्यता असते.

अशा सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर व अनुभल्यानंतर, मी जंगलातून बाहेर पडलो व बोर येथे आरएफओ असलेल्या श्रीमती अर्चना यांना भेटलो, ज्या स्थानिक तरुणांच्या प्रशिक्षणासाठीही काम करताहेत. त्यांनी नंतर स्थानिकांना कपडे वाटप केले व ते फोटो आम्हाला पाठवले, भोवतालचा अंधार त्या आनंदी चेहऱ्यांनी उजळून निघाला होता, हे नक्की. मित्रांनो, केवळ वाघ किंवा बिबटे दिसतात म्हणून एखादे जंगल उत्तम किंवा विशेष ठरत नाही, तुम्हाला ते कोणत्याही जंगलामध्ये दिसू शकतात; तिथल्या परिसराचा चित्रफलक, अधिवास व त्या चित्रफलकावर उलगडत जाणाऱ्या कहाण्या, यामुळे ते जंगल विशेष ठरते व मी बोरमधील दोन सफारींमध्ये जे अनुभवले त्यातून हे  जंगल अतिविशेष होण्याच्या मार्गावर आहे हे निश्चित. लवकरच येथे परत येण्याचे आश्वासन देऊन, मी बोर वन्यजीव अभयारण्याचा निरोप घेतला!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

www.junglebelles.in

www.sanjeevanideve.com 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जुनाबाई वाघिणीचा संयमाचा धडा आणि ताडोबाची शाळा!!🐾

शेअरिंगवाली दिवाळी !

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड