शेअरिंगवाली दिवाळी !

 
























शेअरिंगवाली दिवाळी ! 

"मनातला घनदाट अंधार दूर केल्याशिवाय, घराबाहेरील दिवा कधीच उजळू शकत नाही." ― कपिल राज

"मी भारतीय आहे आणि आम्ही सर्व धर्माचे, सर्व प्रदेशांतील सण उत्साहाने एकत्र साजरे करतो. म्हणूनच तर या देशाला "इन्क्रेडिबल इंडिया"(अतुल्य भारत) म्हणतात!" ― विनायक मुरलीधरन.

"वाटणे (शेअरिंग) ही गमतीशीर गोष्ट आहे, जसे की वाटल्याने आनंद वाढतो, मात्र वाटल्याने दुःख कमी होतं." ― मी.

    "सण", हा शब्द कानावर पडला तरी मनात एक वेगळीच जादू निर्माण होते! लहान मुलांसाठी जशी 'डिझनी'ची जगत्प्रसिद्ध दुनिया असते ना, तसंच माझ्यासाठी आपलं 'ताडोबा'! (हसू नका, काळजी करू नका, आजची गोष्ट जंगलाची नाही, तर आपल्या माणसांची आहे!) 150 कोटींहून अधिक जनता, 33 कोटी देव-देवता, 10 हून अधिक धर्म, ४० हून अधिक प्रमुख भाषा आणि 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेश... ((जातींबद्दल तर मी बोलतच नाही कारण माझा त्यावर विश्वास नाही). अशा अथांग आणि विविधतेने नटलेल्या देशात दररोज कुठे ना कुठे कसला ना कसला उत्सव साजरा होत असतो ! आपले बहुतेक सगळे सण हे निसर्गाच्या चक्राशी आणि ऋतूंशी जोडलेले आहेत. पिढ्यानपिढ्या आपला देश शेतीप्रधान राहिला आहे, त्यामुळे पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या निसर्गाच्या प्रत्येक टप्प्याला आपण एका सणाचं रूप दिलं. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र यावं, सुख-दुःख वाटून घ्यावं आणि एकमेकांच्या जवळ यावं — हाच तर आपल्या सणांचा खरा आत्मा आहे ! खरं सांगायचं तर, "सण साजरे करणे" हीच एक गोष्ट आहे जी माणसाला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं ठरवते. कारण निसर्गातला कोणताही प्राणी असा कॅलेंडर बघून सण साजरा करत नाही; त्यांच्यासाठी तर उजाडणारा प्रत्येक दिवस हाच एक उत्सव असतो!

    आज एकीकडे इंटरनेट, 5-जी, एआय आणि सॅटेलाइटच्या वापरामुळे जगाच्या सीमा पुसल्या जात आहेत. तंत्रज्ञानाने आपल्याला जगाशी जोडलं खरं, पण दुर्दैवाने आपल्या घरातल्या माणसांपासून मात्र दुरावलं! आपण शेकडो मैल दूर बसलेल्यांशी तासन् तास मोबाईल वर चॅट करतो, पण घरातल्या एका खोलीत राहणाऱ्या माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरतो. रोज सकाळी जगभरातल्या शेकडो लोकांना 'गुड मॉर्निंग'चे मेसेज पाठवतो, पण समोर राहणाऱ्या शेजाऱ्याकडे बघून एक आपुलकीचं हास्यही देण्याची तसदी घेत नाही. अशा या तंत्रज्ञानाच्या आभासी दुनियेत, माणसाला माणसाशी प्रत्यक्ष जोडणारा आणि नात्यांमध्ये माणुसकीचा ओलावा टिकवणारा एकमेव धागा म्हणजे — आपले सण ! आणि "दिवाळी" तर या सगळ्या सणांचा जणु  बॉस! आजच्या "तुमचा सण आणि आमचा सण" अशा द्वेषाच्या भिंती घालणाऱ्या सामाजिक वातावरणात, दिवाळी हा खऱ्या अर्थाने "आपला सर्वांचा" सण आहे, जो देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात उत्साहाने साजरा होतो. दिवाळीत नवीन कपडे, खरेदी, रोषणाई, फटाके आणि फराळ,  हे सगळे आपल्यासाठी अगदी नॉर्मल आहे. पण कधी त्या लाखो लोकांचा विचार केलाय का, ज्यांच्या नशिबी हा आनंद नाही? ज्यांच्यासाठी फराळ तर दूरच, पण "आजचा दिवस सुखरूप जावा",  हाच रोजचा एक लढा असतो !

   आज जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात काही लोकांच्या हव्यासामुळे आणि अहंकारामुळे युद्ध पेटलेलं आहे, ज्यात लाखो निष्पाप भरडले जात आहेत. त्यात  भर म्हणजे यावर्षी आपल्या राज्यावर कोरड्या दुष्काळाचं सावट आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबे अन्न-पाण्याच्या चिंतेत आहेत. अशा या अवघड काळात, आपल्यासारख्या जास्त सुदैवी लोकांनी आपल्या सुखाचा, आपल्या भाग्याचा एक छोटासा वाटा या कमी  भाग्यवान लोकांसोबत वाटून घेतला, तरच त्यांच्या अंधारलेल्या आयुष्यात दिवाळीचा खरा प्रकाश पडू शकेल! आणि हे वाटून घेण्यासाठी फार काही मोठं करायची गरज नसते,  नवीन वस्तु खरेदी करताना आपल्याकडच्या चांगल्या जुन्या गोष्टी गरजूंपर्यंत पोहोचवून, स्थानिक कारागीर किंवा ग्रामीण भागातील हातांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करून, किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेच्या (NGO) माध्यमातून अनोळखी चेहऱ्यांवर हास्य फुलवून आपण हे साध्य करू शकतो !

कारण आनंद वाटण्याला जात, धर्म, भाषा किंवा प्रदेशाच्या सीमा कधीच नसतात!

    म्हणूनच चला, या दिवाळीत केवळ मजा म्हणुन खरेदी नका करू, तर कुणाचं तरी आयुष्य उजळवून टाका! एका साध्या आपुलकीच्या स्पर्शाने आणि 'शेअरिंग'ने ही दिवाळी साजरी करुयात, "शेअरिंगवाली दिवाळी"!

    जसे की आम्ही  टीम संजीवनी आणि जंगल बेल्सच्या माध्यमातून वर्षभर एक उपक्रम राबवतो. आपण वापरलेले पण अगदी चांगल्या स्थितीत असलेले कपडे, शूज, चादरी/ब्लँकेट आम्ही एकत्र करतो आणि देशाच्या कानाकोपऱ्यात, विशेषतः जंगलांच्या आसपास राहणाऱ्या अतिशय गरजू आणि दुर्गम भागातील ते लोकांपर्यंत पोहोचवतो.या शिवाय अजुनही अनेक गोष्टींद्वारे तुम्ही शेअरिंग करू शकता!समाजातील या चेहऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा एक दिवा लावण्याची तुमचीही इच्छा असेल, तर या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा किंवा मेसेज करा.

तुम्हा सर्वांना शेअरिंगवाल्या दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

…

Below is something I wrote to my team, you can also go through as, right & wrong is not for some group, but for everybody & share if you find worth…

 

दिवाळी, बोनस आणि जबाबदारी!!

 

डिअर टीम संजीवनी,

 सर्वप्रथम दिवाळीच्या शुभेच्छा  आणि माझं हे पत्र तुमच्या साठी आहे,  दुसरं पत्र पण तुमच्या साठीच आहे पण ते तुम्ही फॅमिली आणि मित्रांसोबत जरूर शेअर करा,  म्हणजे त्यांना पण तुमची कंपनी काय फिलॉसॉफीने काम करते ते कळेल!!

तर थोडं आपल्या बाबत,  बोनस ही ट्रिकी गोष्ट आहे,  किती रक्कम किंवा कोणती वस्तु आपल्याला हॅप्पी करू शकते,  तर ते पूर्णपणे आपल्या परिस्थिती वर अवलंबुन आहे! जसे की एखाद्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍याला चाऱ्याची गोणी किंवा 100 रुपये खुश करु शकतात आणि एखाद्या श्रीमंताला काही लाख रुपये किंवा मारुतीची कार पण आनंदी करु शकत नाही कारण ते त्याच्याकडे ऑलरेडी आहे!

मी फिलॉसॉफी झाडत  नाहिये किंवा दिलेल्या बोनसच समर्थन करत नाहिये,  फक्त  हे सांगतोय की कोणतीही गोष्ट आयुष्यात फ्री येत किंवा मिळत नाही,  त्याची एक योग्य किम्मत असते आणि ती चुकवली  तरच त्या गोष्टीचा खरा आनंद मिळतो आणि ती गोष्ट आपल्यापाशी  टिकते,  हा माझा अनुभव आहे आणि हे पैश्याच्या  बाबतीतही लागु आहे! आणि बरेचदा ही किम्मत दिसणारा प्राईस टॅग किंवा क्युआर कोड लावुन येत नाही तर समजावून घ्यावी लागते, ज्याला जबाबदारी म्हणतात! तुम्हाला कल्पना आहे का,  गेल्या वर्षात आपण किती फ्लॅट विकले,  आपली रिकव्हरी किती आहे, आणि किती फ्लॅट्स बाकी  आहेत, कल्पना नसल्यास अकौंटसच्या टीम सोबत बसा आणि जाणुन घ्या! दिवस कठीण आहेत आणि होत जाणार आहेत, आपला  पेशन्स आणि स्वतःवरचा विश्वास ही आपली खरी ताकद आह़े! तरीही मी कधीच फ्लॅट विक्री सोबत टीमचा बोनस किंवा पगार टॅग करत नाही पण याचा अर्थ आपली काहीच जबाबदारी नाही असही नक्कीच नाही! आपण सगळे आपआपले काम किती  जबाबदारीने (इमानदारीने म्हणत नाही, कारण तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे) करतो, ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण त्या नंतर विक्री हा नशीबाचा सुध्धा पार्ट आहे पण त्याआधी आपला जबाबदारीवाला पार्ट परफेक्ट करतोय का हे आपण कधी बघतो का, एवढंच मला सांगायचे आहे! या दिवाळी निमित्ताने मजा करा,  सुट्टी घ्या पण एक जबाबदार टीम मेंबर म्हणुन मी स्वतःमध्ये काय बदल घडवून आणू शकतो यावर पण विचार करा,  आणि अंमलात आणा; वाचा, छंद  जोपासा, फिटनेस रुटीन सुरु करा, काहीही करा पण स्वतःसाठी  करा, कारण ती तुम्ही स्वतःला दिलेली अशी दिवाळी गिफ्ट असेल जी कोणीच दुसरा तुम्हाला गिफ्ट किंवा बोनस म्हणुन देऊ शकणार नाही आणि ती जन्मभर टिकणारी गिफ्ट असेल!! परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा!!

.. संजय देशपांडे

 

संजय देशपांडे , टीम  संजीवनी आणि जंगल बेल्स !

नोव्हेंबर २०२६

smd156812@gmail.com

www.junglebelles.in

www.sanjeevanideve.com 












टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जुनाबाई वाघिणीचा संयमाचा धडा आणि ताडोबाची शाळा!!🐾

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड