एमपीएससी, निट, जेईई नामक शर्यती आणि समाज!!

 
































एमपीएससी, निट, जेईई नामक शर्यती आणि समाज!!

“मी माझ्या शालेय शिक्षणाला माझ्या शिकण्यामध्ये कधीच हस्तक्षेप करू दिला नाही.”― मार्क ट्वेन.

“तुम्हाला खऱ्या अर्थाने स्पर्धा कुणाशी आहे हे शोधायचे असेल, तर फक्त आरशात पाहा. काही वेळाने तुम्हाला तुमचे शत्रू दुसऱ्या स्थानासाठी चढाओढ करताना दिसतील.” ― क्रिस जॅमी
 

“आयुष्य नेहमी तुमच्या आरामदायक स्थितीच्या एक पाऊल बाहेर खरे आयुष्य सुरू होते.” ― शेनॉन एल. अल्डर.


"
आयुष  म्हणजे फक्त सरकारी नोकरी किंवा आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण् नाही, तर त्यापेक्षा  बरेच  काही मोठे गोल साध्य करण्यासाठी पण आहे" … मी.

मी आधीच स्पष्ट करतो की हा लेख अशा एका गोष्टीविषयी आहे ज्याबद्दल मला शून्य अनुभव आहे ते म्हणजे एमपीएससी किंवा लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा व आयआयटी किंवा वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एंट्री एक्झाम (जेईई/नीट). याची दोन कारणे आहेत एक म्हणजे मी अतिशय सुदैवी वयोगटातील आहे जेव्हा अशा कोणत्याही प्रवेश परीक्षा नव्हत्या. आमच्या वेळी 12वीच्या किंवा पदविकेच्या गुणांवरून आमचे भवितव्य ठरत असे. तेव्हाही फक्त आयआयटीसाठी प्रवेश परीक्षा होती परंतु माझ्या मते 12वीचे गुणही महत्त्वाचे असत. दुसरे म्हणजे मी खाजगी क्षेत्रात शिरलो (व तेथे आनंदाने खुप परिश्रम केले), अर्थात माझ्या कुटुंबातील बहुतेक सदस्य वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये होते व त्यांना कोणतीही सरकारी परीक्षा मरमर करुन द्यावी लागली नाही वा त्याचा  बाऊ करण्याची गरज जाणवली नाही. परंतु आता रोजगार देताना, विविध भूमिकांमध्ये काम करताना (पाहुणा व्याख्याता म्हणूनही)  व अनेकदा गाईडन्स म्हणून अनुभव  शेअर करताना (माझ्या स्वतःच्या मुलांचा अपवाद सोडून, lol) माझा तरुणांशी थोडाफार संबंध येतो. त्याचप्रमाणे माझे कामाचे क्षेत्र रिअल इस्टेट असल्यामुळे माझा विविध सरकारी विभागांशी सुद्धा (म्हणजे अधिकाऱ्यांशी) संबंध येतो. त्यानंतर मी जेव्हा नीटपासून ते एमपीएससीपर्यंत अशा अनेक परीक्षा विविध कारणांमुळे (प्रामुख्याने प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे) रद्द झाल्याविषयी वाचतो, तेव्हा या विषयी मी माझे विचार मांडावेत व ते इतरांनाही सांगावेत असे मला वाटले, कारण  त्यामुळे कदाचित काही लोकांना मदत देखील होऊ शकेल.

सर्वप्रथम, नीट/जेईईपासून सुरुवात करू कारण एखादा उमेदवार एमपीएससी देण्याच्या बरेच आधी या परीक्षा देतो, परंतु त्यापूर्वी या संपूर्ण स्पर्धा परीक्षांच्या संपूर्ण व्यवस्थेविषयी थोडे समजून घेऊ. आपल्या शैक्षणिक यंत्रणेमध्ये आजकाल सगळे काही एखादी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अवतीभोवती फिरत असते. आपण हेच मुळात बदलण्याची वेळ आली आहे, कारण आता प्रवेश परीक्षांच्या यंत्रणेची गरजच काय याचे मूल्यमापन करण्याची वेळ आली आहे. जवळपास चार दशके वैद्यकीय/अभियांत्रिकीचे प्रवेश 12वीच्या गुणांवर होत असत. इंजिनियर पदविकेसाठी(डिप्लोमा) आजही 10वीच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो व आत्तापर्यंत सर्वकाही आलेबेल होते. पेपर फुटीच्या दृष्टीकोनातूनही विचार केला तर ही व्यवस्था सर्वसमावेशक होती, कारण एखादा पेपर फोडणे सोपे असल्यामुळे ती जेईई/नीटसारखी परीक्षा उत्तीर्ण होण्याची गुरुकिल्ली असू शकते. परंतु तुम्ही जेव्हा 12वीच्या पीसीबी/पीसीएम ( याच्या अर्थासाठी गूगल करा ) गुणांचा विचार करता तेव्हा प्रवेशासाठी तिन्ही विषयांमधील गुणांचा विचार केला जात असल्यामुळे या तिन्ही विषयांचे पेपर फोडणे कोणत्याही गुन्हेगारासाठी वा अशा प्रवृत्तीच्या लोकांसाठी थोडे अवघड आहे. तसेच पेपर फोडण्याच्या या प्रवृत्तीविषयी मी थोडेसे बोलणार आहे (लिहीणार आहे), जी सहजपणे नाहीशी होणार नाही. त्याचवेळी एकाच परीक्षेमुळे जी जणू सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी परवानच असते, त्यामुळे अचानक ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या विविध संस्था/वर्गांचे (कोचिंग क्लास) पेव फुटले. हेच पेपर फुटण्याचे एक प्रमुख कारण आहे. मी हे केवळ तर्काच्या आधारे म्हणतो आहे कारण मला फर्ग्युसन कॉलेजसारखी प्रख्यात महाविद्यालये माहिती आहेत (मी जाणीवपूर्वक महाविद्यालयाचे नाव घेत आहे) जेथे 12वी विज्ञान शाखेची मुले त्यांनी केवळ गुणांच्या आधारे प्रवेश घेतला असला तरीही महाविद्यालयात जातच नाहीत. ते निट साठी नामांकित महाविद्यालयामध्ये हमखास प्रवेश मिळवून देणाऱ्या एखाद्या कोचिंग क्लासमध्ये जातात. तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तुमच्या ओळखीच्या कुणाही विद्यार्थ्याला विचारा किंवा आजूबाजूला चौकशी करा म्हणजे व माझे म्हणणे चुकीचे असेल तर मी माफी मागेन व हा मजकूर काढून टाकेन! हे केवळ एखाद्या फर्ग्युसन सारख्या महाविद्यालयासंबंधात नाही, तर प्रत्येक महत्त्वाच्या महाविद्यालयाची हीच स्थिती आहे, जिथे प्रवेश मिळवणे हे एकेकाळी विद्यार्थ्यांचे स्वप्न असे. आणखी एक गोष्ट म्हणजे अनेक नावापुरती ( जुनियर कॉलेजेस) महाविद्यालये आहेत जिथे तुम्ही फक्त प्रवेश घ्यायचा व कधीच महाविद्यालयामध्ये तुमचे तोंड दाखवायचे नाही. त्यानंतर तुम्ही संपूर्ण दिवस पुण्यामध्ये किंवा बाहेरगावीही कोचिंग क्लासेसना जाऊ शकता (म्हणजे कोटा किंवा लातूर). अशी महाविद्यालये तुमची हजेरी तर लावेलच तसेच प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत गुणांचीही काळजी घेईल. विचार करा जर विज्ञान शाखेची ही परिस्थिती असेल तर कला व वाणिज्य शाखांची काय परिस्थिती असेल व हे सगळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या म्हणजे 11वी व 12वीच्या पातळीवर होत आहे! आता, जर मूलभूत महाविद्यालये किंवा शिक्षणाची अशी परिस्थिती असेल की एखाद्या जेईई किंवा नीट नावाच्या परीक्षेमुळे विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये जाणेच टाळत आहेत, जिथे त्यांनी त्या विषयाची मूलभूत तत्वे सखोल शिकणे व त्यानंतर परीक्षेसाठी तयारी करणे अपेक्षित आहे, ज्या या विषयांवर आधारित आहेत, अशावेळी उच्च शिक्षणाविषयीच्या आपल्या दृष्टीकोनातच काहीतरी गंभीर चूक आहे असे वाटत नाही का, हा माझ्या लेखाचा विषय आहे. हे झाले जेईई/नीटचे त्यानंतर अगदी सिम्बायसिसपासून (व तत्सम संस्था ज्या पूर्णपणे खाजगी आहेत) प्रत्येक संस्थेची प्रवेशासाठी स्वतःची प्रवेश परीक्षा असते, मग ती एमबीए असो बीबीए, बीकॉम किंवा कोणत्याही तत्सम अभ्यासक्रम. परिणामी, आपण विद्यार्थ्यांना फक्त कुठल्याही एका परीक्षेसाठी घोकमपट्टी करून तयार करत असतो. यामुळेच अशा परीक्षांमध्ये पेपर फुटणे सोपे असते, कारण जेव्हा मी हे विद्यार्थी एक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना पाहतो व त्यांचे पालकही या स्पर्धेत सहभागी होतात तेव्हा पाण्यात भुकेले शार्क जेव्हा शिकारीच्या शोधात फिरत असतात तेव्हासारखी परिस्थिती दिसते व अशाच समुद्रामध्ये काही हुशार (म्हणजे गुन्हेगारी) डोक्याचे लोक पेपर फोडण्यासारखी प्रलोभने टाकत असतात व आपल्या समाजात (म्हणजे व्यवस्थेत) असे अनेक आहेत. कोचिंग क्लासचे मालक, खाजगी कनिष्ठ महाविद्यालयांचे साटेलोटे असते यात काहीच आश्चर्य नाही, जी पेपर बनवणाऱ्यांपुढे पैशाच्या पिशव्या रित्या करू शकतात जे दुर्दैवाने शिक्षकी पेशात असतात. आपण सगळे जण जाणतो आपल्या व्यवस्थेमध्ये  शिक्षकांना किती पैसे त्यांच्या कामाचा मोबदला म्हणजेच पगार म्हणुन दिले जातात. त्यामुळे अशा पैशांच्या थैल्या त्यांना त्यांच्या उदात्त व्यवसायाची नैतिकता व मूल्यांकडे डोळेझाक करायला (व कान झाकायला) पुरेशा असतात. आपण हेच ओळखले पाहिजे व समूळ नष्ट केले पाहिजे हा माझ्या लेखाचा विषय आहे.

आपण पुन्हा एकदा मूलभूत गोष्टींकडे वळायला पाहिजे व सर्वप्रथम विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचा सर्वांगीण अभ्यास करायला लावला पाहिजे. त्याचशिवाय त्यांना उच्च शिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना महाविद्यालयात हजर राहणेही तितकेच महत्त्वाचे केले पाहिजे. ही एकल परीक्षा पद्धत बदलली पाहिजे, थोड्या-थोड्या कालावधीने किंवा काळाने परीक्षांची मालिका घ्या ज्यामध्ये तुमचे विषयाचे ज्ञान तपासणे हा उद्देश असला पाहिजे केवळ घोकमपट्टी केलेली माहिती नव्हे जी तुम्ही एखाद्या डेटा मशीनसारखी  तीन तासांच्या परीक्षेमध्ये उतरवून काढणे नव्हे! यामुळे प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांनाच अवघड जाईल असे नाही तर विद्यार्थ्यांनाही केवळ काही प्रश्नांच्या काही उत्तरांचा अभ्यास करण्यापेक्षाही संपूर्ण विषयाचा अभ्यास करण्याचे महत्त्व समजेल.

त्यानंतर मुद्दा येतो पालकांचा, ही संपूर्ण यंत्रणा अपयशी ठरण्यातील मुख्य गोची तिथे आहे. प्रत्येक पालकाला त्यांच्या अपत्याने आयआयटी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षाच उत्तीर्ण व्हावी असे वाटते (व आपल्या मुलांनाही ते असाच विचार करायला लावतात) कारण त्यामुळेच तुम्हाला आरामदायकपणे आयुष्य जगता येईल असे त्यांना वाटत असते. उत्तर भारतात अशी प्रसिद्ध वाक्य आहे, “बस एक बार मेरा बेटा जेईई क्रॅक कर जाए, मै पुरे मुहल्ले में लड्डू बाटूंगा”, म्हणजे जर माझा मुलगा जेईई प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाला तर मी सगळ्या परिसरात मिठाई वाटेन, जणू काही आई किंवा वडिलांसाठी दुसरे काही आयुष्यात दुसरे काही ध्येयच उरले नसावे. लोकहो, मी वर्तमानपत्रामध्ये आशियाई खेळांच्या बातम्या वाचत होतो, जे जपानमध्ये सुरू होते, त्यामध्ये अशा अनेक खेळाडूंच्या गोष्टी होत्या ज्यांनी कुठलाही प्रवेश परीक्षा दिली नसली तरीही एकाच खेळासाठी त्यांनी कित्येक तास सराव केला, त्यांच्या आई-वडिलांनी आपले सोने-नाणे विकले, कर्ज घेतले व आज त्यांच्या मुलाने किंवा मुलीने देशासाठी पदक जिंकले. ते देखील करिअरच आहे व अभियंता किंवा डॉक्टर बनण्यापेक्षाही कितीतरी मोठे व यशस्वी आहे. इथे प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार नाहीत किंवा पास होण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. दुर्दैवाने, आपले पालक आपल्या मुलाला आरामात आयुष्य जगता यावे यासाठी असे सोईचे मार्ग पत्करण्याचेच प्रशिक्षण देतात. परिणामी जेईई/नीटसाठी  रस्सीखेच सुरू असते, मग त्यासाठी काहीही किंमत मोजायची तयारी असते मग प्रश्नपत्रिका फोडणे सुद्धा का असेना. हे काहीजणांसाठी चांगले असू शकते परंतु इतर लाखो लोकांसाठी शाप असू शकते कारण त्यांच्या हाती परीक्षेआधीच कोणतीही प्रश्नपत्रिका पडली नसते व ते प्रामाणिकपणे मेहनत करत असतात पण पेपरफुटीचा बळी  मात्र  हे निरपराध विद्यार्थी आणि त्यांचे  पालक होतात!

एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जर ही परिस्थिती असेल (म्हणजे दृष्टिकोन असेल) तर विचार करा सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी लोक काय करत असतील, तिथे एमपीएससीचा मुद्दा येतो. जे लोक अनभिज्ञ आहेत त्यांना सांगतो एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ही  संस्था राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये उमेदवारांची भरती करण्यासाठी परीक्षा आयोजित करते किंवा प्रवेश नियंत्रित करते. आता इथे किती प्रलोभने असतील याची तुम्ही कल्पना करू शकता कारण एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांना लाखो रुपयांची लालूच दिली जाते, इथे तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार असते जी आरामदायक आयुष्याची हमीच असते. ज्या काही पालकांनी (म्हणजे मानसिकतेने) त्यांच्या मुलाला भ्रष्ट मार्गांनी (किंवा चुकीच्या मार्गांनी) एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन दिला असेल, ते आपल्या पदवीधर मुलाला ही नोकरी मिळावी यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात, बरोबर?  तर, एमपीएससीचे मुख्य काम आहे योग्य लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश देणे व त्यासाठी योग्य मार्ग (म्हणजे परीक्षा किंवा मुलाखतींची यंत्रणा) तयार करणे. सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याची (एमपीएससी) नियुक्ती केली जाऊ नये, याला केवळ काही सर्वोच्च पदाधिकाऱ्यांचा अपवाद असू शकतो जे केंद्र सरकारने पारपत्र (पासपोर्ट ऑफिस) कार्यालयामध्ये केले आहे व येथील काम टीआयएससी किंवा टीआयएफएस (दोन्ही टाटांच्या संस्था आहेत, कृपया त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी गूगल करा) सारख्या संस्थांना सुपूर्त केले  आहे, असेच  करावे व त्यांना त्यांच्या  पद्धतीने  परीक्षा सिस्टीम मॅनेज करण्याची मोकळीक द्या. एखाद्या विशिष्ट विभागासाठी किंवा काही पदांसाठी हे करून पाहा व काय. फरक पडतो ते पाहा. कारण एमपीएससीच्या कोणत्याही रिक्त पदांसाठी प्रश्नपत्रिका फुटत असेल तर नोकऱ्यांचीही संख्या कमी व नोकरी न मिळणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त  असते, त्यामुळे गैरप्रकार झाल्याची ओरड होणार हे ओघाने आलेच. अशा उमेदवारांना पाठिंबा देणारे विरोधी पक्षाचे नेते/पक्ष नेहमीच असतील हे लक्षात ठेवा. शेवटी तुम्ही किती परीक्षा पुन्हा घ्याल व एमपीएससीच्या व्यवस्थेतून तुम्ही किती कर्मचाऱ्यांना बडतर्फ कराल, सरकारने याविषयी विचार केला आहे का? माझा प्रश्न एकच आहे की सरकार सरकारी नोकऱ्यांसाठीच्या प्रवेश परीक्षांवर स्वतःचेच नियंत्रण ठेवण्यासाठी इतके अडून का आहे, यातच आपल्या संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

त्याचवेळी, भारतीय नागरिकांना, इतर विकसनशील देशांप्रमाणे सरकारी यंत्रणेचे फायदे व त्यातून व्यक्तीला मिळणारा आराम (म्हणजे सुरक्षितता) माहिती असतो व म्हणूनच लोक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. म्हणूनच, एमपीएससीच्या परीक्षा यंत्रणेची समस्या हे या रोगाचे  मूळच नाहीये तर सरकारी नोकरीबाबत समाजाच्या दृष्टीकोनाचा खरा प्रॉब्लेम आहे. त्यासाठी सरकारने एमपीएससीमध्ये सुधारणा करण्याआधी त्याच्या स्वतःच्या घराची स्वच्छता करणे आवश्यक आहे. इथे (म्हणजे सरकारमध्ये) कुणालाही कशासाठीही कायमस्वरूपी शिक्षा होतच नाही, कारण एखादा भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग (कृपया गूगल करा) असतो व तात्पुरते निलंबन केले जाऊ शकते व तथाकथित निवडून आलेले राजकीय लोक सरकारी सेवकांवर नियंत्रण ठेवतात, परंतु आपल्या सगळ्यांनाच या उपाययोजनांचा काहीही उपयोग होत नाही हे माहिती आहे व सरतेशेवटी सरकारी नोकरी नावाच्या छत्रीखाली सगळ्यांचे सर्वकाही आलबेल असते, हे चित्र आधी बदलले पाहिजे, हा माझ्या लेखाचा विषय व उद्देश आहे. शेवटचे परंतु महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही अशी एक यंत्रणा तयार करता जी बिनचूक आहे असे तुम्हाला वाटत असते, पण ती नसते हे आपण सगळे जाणतो, अशावेळी प्रश्नपत्रिका फुटण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. योजना असली पाहिजे ज्यामुळे तुम्ही प्रश्नपत्रिका फुटली तर ती हाताळण्यासाठी सज्ज राहू शकाल व उर्वरित हजारो जणांना काही व्यक्तींच्या हव्यासामुळे त्रास सहन करावा लागणार नाही, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वतंत्र टास्क फोर्स  स्थापन करा किंवा कोणत्याही प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित गुन्ह्यांचा तपास अशा शाखा करतील. हा गुन्हा राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याच्या पातळीवरचा करा व कुणाही दोषी व्यक्तीची हयगय केली जाणार. माझ्यावर विश्वास ठेवा, एमपीएससी किंवा नीटच्या परीक्षांची प्रश्नपत्रिका फुटणे हे वरकरणी दिसते त्याहून अधिक गंभीर आहे, कारण त्यामुळे होतकरू उमेदवारांकडून एखाद्या कॉलेज मधील प्रवेश किंवा नोकरीच हिरावून घेतली जात नाही तर त्यासोबत त्या मुलाचा संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वासच संपतो. आणि  आपल्या देशासाठी हा परिणाम सर्वात धोकादायक आहे.

कोणत्याही सरकारी विभागामध्ये कनिष्ठ अभियंत्याची जरी नोकरी असेल तेव्हा लोक कंपनीविषयी (म्हणजे मालकाविषयी) प्रश्न का विचारत नाहीत व ज्याचा पगार एखाद्या खाजगी संस्थेमध्ये (तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही) कमी-श्रेणीच्या नोकरीमधील पगारापेक्षाही कमी असतो, याचे कारण काय याचा कधी आपण विचार केला आहे का? याचे उत्तर सोपे आहे, सर्वप्रथम तुम्हाला खाजगी नोकरीत ढोर मेहनत करावी लागते, तर सरकारी नोकरीत तुम्हाला काम करावे लागत नाही कारण कुणीच कुणाला उत्तरदायी नसते (बहुतेकवेळा). खाजगी नोकरीमध्ये अकार्यक्षमतेसाठी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले जाईल मग तुम्ही कोणत्याही पदावर काम करत का असेना, जे सरकारी नोकरीत कधीच होत नाही, म्हणजे अकार्यक्षम व्यक्तींनाही इथे सुरक्षितता असते. मी टेबलाखालून होणाऱ्या पैशांच्या देवाण-घेवाणीच्या मुद्द्याला अजून स्पर्शही केलेला नाही, जर आपण पहिल्या दोन गोष्टी योग्यप्रकारे हाताळल्या तर भ्रष्टाचाराला थाराच असणार नाही. माझ्यामते भ्रष्टाचार ही कुण्या सरकारी किंवा खाजगी कंपनीची मक्तेदारी नाही, तो एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक दृष्टिकोन असतो व मालक ते रोखण्यासाठी काय करतो यावर अवलंबून असतो, तर सरकारमध्ये मालक कुणीच नसते, आपल्याला याच समस्येला तोंड द्यायचे  आहे व त्यानंतरच आपण ही एमपीएससी नावाची यंत्रणा सुधारू शकू. सरकारी यंत्रणेमध्ये अनेक चांगले अधिकारी आहेत, परंतु समस्या ही जबाबदारी घेण्याविषयी आहे व दुर्दैवाने ती आपण ज्याला आपले प्रतिनिधी (सरकार) म्हणून निवडतो त्यांची ती आहे व अलिकडे त्यांना त्यांच्या मालकीच्या कंपनीचे भले करण्यामधे (म्हणजे समाज किंवा राज्य) इंटरेस्टच नसतो, तर त्यांच्या फक्त स्वतःच्या कुटुंबाच्या भल्यामध्ये इंटरेस्ट असतो हे कटू सत्य आहे.

शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा, एकीकडे सरकारी कार्यालयातील अगदी एका शिपायाच्या चतुर्थ श्रेणीच्या पदासाठी हजारो अर्ज येतात ज्यात अभियंते,  एमबीए सुद्धा असतात, परंतु खाजगी कंपन्यांमध्ये बांधकाम स्थळावरील अभियंता किंवा विक्री अधिकारी यासारख्या पदांसाठीसुद्धा पुरेसे अर्ज येत नाहीत, कारण लोकांना पैसा हवा असतो पण त्यासाठी कष्ट करायचे नसतात किंवा तो योग्य मार्गाने मिळवायचा नसतो. आयआयटी किंवा वैद्यकीय महाविद्यालयांनाही (सरकारी) हेच लॉजिक लागू होते, तुमच्याकडे खाजगी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पैसे नसतील पण आयआयटीमध्ये प्रवेश घ्यावासा वाटतो, त्यात चूक काहीच नाही, परंतु केवळ आयआयटीच अभियंते घडवते का, कारण कोणत्याही अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम (मी स्वतः एक स्थापत्य अभियंता आहे) तुम्ही कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश घेतला तरीही सगळीकडे सारखाच असतो. तर, तुम्हाला काय व्हायचे आहे, एक योग्य अभियंता व्हायचे आहे का एखाद्या विशिष्ट महाविद्यालयातला अभियंताच व्हायचे आहे व केवळ एखाद्या विशिष्ट संस्थेमध्येच नोकरी करायची आहे, हे सगळे संस्थेवर अवलंबून नसते, तर तुमच्या अभ्यासक्रमाविषयीच्या किंवा तुम्ही निवडलेल्या क्षेत्राविषयीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते; आपल्या तरुणांनी हे समजून घेण्याची व कोणत्याही शिक्षणाचा मूलमंत्र आत्मसात करण्याची वेळ आली आहे. तोपर्यंत प्रवेश परीक्षांच्या व त्यामध्ये होणाऱ्या प्रश्नपत्रिका फुटीच्या या दुष्टचक्रात भरडले जाण्यावाचून गत्यंतर नाही, एवढा इशारा देऊन निरोप घेतो!


संजय देशपांडे

smd156812@gmail.com

www.junglebelles.in

www.sanjeevanideve.com 

 

                


















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जुनाबाई वाघिणीचा संयमाचा धडा आणि ताडोबाची शाळा!!🐾

शेअरिंगवाली दिवाळी !

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड