मी गाईड आहो, मी ताडोबा आहो !!

 




















































मी गाईड आहो, मी ताडोबा आहो !!

“मधमाशा नेहमी गोड फुलांच्या शोधात असतात, म्हणूनच सगळ्यांना गोड माणसासोबत राहणे आवडते.”

“लक्षात ठेवा तुम्ही काही बोलण्याआधी किंवा काही करण्याआधी हावभाव बरेच काही सांगून जातात, तुम्ही स्वतःला कसे सादर करता हेच  लोकं पहातात ”
… नोझिफो एन माफूमुलो.

"तुम्ही काय दाखवता ते नाही, तर तुम्ही ते कसे दाखवता, यावरून तुम्ही चांगले गाईड ठरता"… मी


     नोझिफो एन. माफूमुलो हे दक्षिण आफ्रिकी लेखक आहेत व प्रेरणादायी व काव्यात्मक अभिव्यक्तिसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणूनच मी त्यांची एकाचवेळी दोन अवतरणे वापरू शकलो व त्यातून स्वतःचा काही निष्कर्ष काढू शकलो. तर या लेखाचा विषय गाईडविषयी आहे (होय यामध्ये जंगल आहे व ताडोबाही आहे) व तो वन्यजीवनाविषयी व वाघांविषयी असला तरीही ते दाखविण्याविषयी किंवा गाईडमार्फत ते समजून घेण्याविषयी आहे. असो, आता आणखी कोडी घालून (म्हणजे अवघड भाषा) तुमचे वाचन पुढे थांबवत नाही. मला नशीबाने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (ताडोबाच्या वन व्यवस्थापनाने) ताडोबाच्या बफर क्षेत्रातील गाईडसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला अनुज खरे (नेचर वॉक) यांच्या चमूचा एक भाग होण्याची संधी मिळाली, आमच्यासोबत विनोद बारटक्के (वन्यप्रेमी) व हेमांगी वर्तक (जंगल बेल्स) हेदेखील होते. जे आत्तापर्यंत जंगलातील सफारींसाठी गेले नसतील, त्यांच्यासाठी सांगतो तुम्ही ताडोबा, पेंच किंवा उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य यासारख्या अभयारण्यांमध्ये खाजगी किंवा स्वतःच्या वाहनांनी प्रवेश करू शकत नाही. तुम्हाला इथे विशेष परवानाप्राप्त वाहनांमधून (ज्या बहुतेकवेळा जिप्सी असतात) प्रवेश करावा लागतो व तुमच्यासोबत नेहमी एक प्रशिक्षित व्यक्ती असली पाहिजे ज्याला आपण गाईड असे म्हणतो. आता त्यातली मेख अशी आहे की ही व्यक्ती वन विभागाची कर्मचारी नसते तशीच ती पूर्णतया खाजगी सुद्धा नसते, त्याला (किंवा तिला) वनविभागातर्फे संबंधित जंगलातील मार्गदर्शक/गाईड म्हणून वन विभागातर्फे परवाना दिला जातो व पर्यटक सदर उद्यान किंवा अभयारण्याला सफारीचे शुल्क म्हणून जे पैसे देतात त्यातून प्रत्येक सफारीसाठी त्या गाईडला काही पैसे मिळतात. सामान्यपणे हे स्थानिक किंवा जंगलातील मूळ रहिवासी असतात ज्यांना शहरातील लोकांपेक्षा जंगलाविषयी अधिक माहिती असते कारण ते जंगलातच वाढले असतात व त्यांना वन्यजीवनाविषयी, विशेषतः स्थानिक वन्यजीवनाविषयी अनेक गोष्टी माहिती असतात. आरक्षित जंगलामध्ये व त्याच्या अवती-भोवती शेती किंवा इतर कोणतेही व्यवसाय करण्यावर बरेच निर्बंध असल्यामुळे, गाईड म्हणून काम करणे स्थानिकांसाठी उत्पन्नाचा एक चांगला स्रोत असतो, हा त्यामागील तर्क आहे, पण!
    पण, इथे एक लहानशी अडचण अशी आहे की, या लोकांचे शालेय शिक्षण झालेले नसल्यामुळे, तसेच त्यांचा बाहेरील जगाशी अतिशय कमी संपर्क असल्यामुळे त्यांना वन्यजीवनाविषयी जी माहिती असते ती त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये असते किंवा त्या ज्ञानातून मिळालेली असते. ही माहिती पर्यटकांना समजून सांगण्याचे कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित झालेले नसते, त्याचप्रमाणे त्यांना विविध प्रजातींसाठी वन्यजीवन संज्ञांमध्ये झालेले बदल किंवा त्यामागची कारणे हे नव्याने जाणून घेण्याची गरज असते. नेमक्या याच कारणासाठी वन विभाग त्यांच्यासाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करतो. ताडोबाच्या, कोलारा रेंजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अशाच एका कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. ताडोबाच्या बफर क्षेत्रात 18 पेक्षा अधिक प्रवेशद्वार  आहेत व या सत्रासाठी कोलारा रेंजमधील मदनापूर (इथेच प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते), पळसगाव अलिझांझा, कोलारा बफर, बेलारा व शिरखेडा अशा सहा प्रवेशद्वारांच्या क्षेत्रातील एकूण 80 गाईड हजर होते. मला इथे अगदी नुकतेच मिसरूड फुटलेले तरूण ते अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले अनुभवी चेहरे दिसले व त्यापैकी काहीजण मला आधीपासून ओळखत होते. अर्थात ते मला प्रशिक्षक किंवा वक्ता म्हणून ओळखत नव्हते कारण बफर क्षेत्रातील गाईडना संबोधित करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. अनुजने मला दोन मुख्य मुद्द्यांचा समावेश करायला सांगितले होते, की पर्यटकांना त्यांच्या गाईडकडून काय हवे असते व व्यक्तिमत्व विकास व त्याचसोबत त्यांना प्रोत्साहन देणे. मी दोन गोष्टींसाठी हे आव्हान स्वीकारले, एक म्हणजे मला या लोकांशी संवाद साधायचा होता जे दररोज जंगलात असतात व त्यामुळे एकप्रकारे हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे होते व दुसरे म्हणजे आता वन्यजीव पर्यटनाकडे व्यवसायिक  तळमळीने पाहिले जात नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याकडे इतर कोणत्याही सेवा उद्योगाप्रमाणे पाहिले जावे, जर तुम्हाला ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवायचे असेल व ज्या व्यक्ती जंगलामध्ये त्यांच्या ग्राहकांसोबत म्हणजेच पर्यटकांसोबत वेळ घालवतात त्यांच्याशी संवाद साधण्याव्यतिरिक्त दुसरी चांगली संधी कोणती असू शकते. (एक उत्तम गोष्ट म्हणजे मी विदर्भातला असल्यामुळे मी त्यांच्याशी वैदर्भीय मराठी/हिंदीमध्ये संवाद साधू शकलो, जसे की, "मी गाईड आहे" नाही म्हणत, "मी गाईड आहो" असं म्हणतात बोलीभाषेत येथे) हे दोन दिवसांचे सत्र होते व पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या सत्राला मी त्यांना संकल्पनेविषयी थोडक्यात माहिती दिली होती व त्यांना एक गोष्ट सांगितली होती जी सत्यघटना होती. मी अनेक वर्षांपूर्वी एमएसईडीएल (एमएसईबी) ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी सहज गप्पा मारत होतो व लोकांच्या मनात एमएसईबीविषयी जी प्रतिमा आहे त्यासंदर्भात आमचे बोलणे सुरू होते. ते अधिकारी मला म्हणाले, सोपे आहे की एखाद्या दुर्गम खेड्यामध्ये जर रात्री वीज कापली गेली व वायरमन जो या व्यवस्थेतील शेवटाचा दुवा असतो तो प्यायलेला असेल व बिघाड दुरुस्त करू शकत नसेल व त्या गावाला संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली तर ते एमएसईबीला भ्रष्टाचार करण्यासाठी व बेकार संस्था असल्याबद्दल दूषणे देतील. परंतु जर तो लाईनमन जागा असेल व शुद्धीत असेल व रात्रीत विजेचा बिघाड दुरुस्त करून त्याने खंडित झालेला पुरवठा दुरुस्त केला, तर गावकरी एमएसईबीचे तिच्या कार्यक्षमतेसाठी कौतुक करतील. थोडक्यात, या यंत्रणेतील सर्वात शेवटची व्यक्ती जी ग्राहक व व्यवस्थेतील दुवा आहे ती महत्त्वाची असते, वन्यजीव पर्यटन व जंगलांमध्ये ही व्यक्ती म्हणजेच गाईड. पर्यटकांना असे वाटत असते की तेच वन विभाग आहेत परंतु ते खरेतर नसतात, तरीही पुढील चार तासात पर्यटक जंगलामध्ये जे काही पाहणार असतात, ऐकणार असतात किंवा अनुभवणार असतात, त्यामध्ये गाईड पर्यटकांशी कसा वागतो यातून त्यांचे जंगलाविषयी व एकूणच वन्यजीवनाविषयी मत तयार होणार असते. दुसऱ्या दिवशी, मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला माझ्याकडे कुतुहलाने पाहणारे, उत्साही चेहरे दिसले. मी त्यांना पुन्हा सांगितले की, मी या सत्रात वन्यजीवनाविषयी एक शब्दही बोलणार नाही, तर मला ग्राहकाला सेवा देण्याविषयी व त्याचे वैयक्तिक तसेच एकूणच संघटनात्मक फायदे काय आहेत हे समजले आहे ते सांगण्याचा प्रयत्न करेन. मी त्यांना हेदेखील सांगितले की मी त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करेन व त्यासाठी परस्पर संवाद महत्त्वाचा आहे, म्हणून मी त्यांना दोन प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितली (होय लिहायला), एक म्हणजे, “माझे काम काय?” व दुसरे म्हणजे, “एखाद्या पर्यटकाने तुम्हाला सफारीदरम्यान विचारलेला सर्वात अवघड प्रश्न कोणता?” मी त्यांना सांगितले की मी त्यांना पाच मिनिटे देईन ज्यामध्ये त्यांना या दोन प्रश्नांची उत्तरे तीन किंवा चार ओळींमध्ये लिहायची आहेत व त्यांचे नाव व कोणते प्रवेशद्वार यासह ती सादर करायची आहेत.
        हे कदाचित सकृतदर्शनी सोपे वाटू शकते, परंतु यापैकी बहुतेक गाईडची अगदी थोडेफार लिहीण्याची सवयही मोडलेली असते, जे माझ्यासाठी पुढच्या सत्राची जाणीव करून देण्यासाठी महत्त्वाचे होते. माझा असा ठाम विश्वास आहे की, तुम्ही जेव्हा काहीतरी लिहीता, तेव्हा तुम्ही केवळ बोलताना असता त्यापेक्षा कितीतरी अधिक एकाग्र असता, जे त्यांनी असावे अशी माझी इच्छा होते. दहा मिनिटांमध्ये, माझ्याकडे जवळपास पन्नास एक कागद जमले व जे लिहू शकले नाहीत त्यांना मी सक्ती केली नाही व त्यांनी आपले चेहरे लपवण्याची काही गरज नाही, काही हरकत नाही असेही सांगितले, अगदी पन्नास कागदही माझ्या अपेक्षेपेक्षा बरेच जास्त होते. त्यानंतर मी विषयावर पुढे बोलायला सुरुवात केली व माझ्या पहिल्या प्रश्नाबद्दल बोलू लागलो. माझे काम काय आहे, व 90% लोकांची उत्तरे जवळपास सारखीच होती, की मी गाईड आहे, मी पर्यटकांना जंगल दाखवणे, त्यांना जंगलाविषयी समजून सांगणे अपेक्षित आहे, वगैरे वगैरे उत्तरे होती. दुसऱ्या प्रश्नाची जवळपास 70% वेगवेगळी उत्तरे होती, म्हणजे पर्यटकांनी प्रत्येक गाईडला वेगवेगणे प्रश्न विचारले होते, ज्यांची उत्तरे देणे त्यांना अवघड गेले. हा एक खेळ आहे, असे मी त्यांना सांगितले, कारण पहिल्या प्रश्नासाठी मला सगळी उत्तरे जवळपास सारखी मिळाली, कारण तो तुमच्याविषयीचा होता. परंतु दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरावर तुमचे नियंत्रण नव्हते. त्यानंतर क्षणार्धात 10वीच्या परीक्षेसाठीच्या 21 अपेक्षित प्रश्नसंचाप्रमाणे (कृपया 21 अपेक्षित गूगल करा), त्यांना जे सर्वात अवघड प्रश्न विचारले जातात व त्यांच्यापैकी कुणालाही उद्या जे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व प्रश्न आमच्याकडे गोळा झाले होते. ही देवाणघेवाणीची ताकद आहे, हे मी त्यांना समजावून सांगितले, त्यानंतर मी गाईडपैकी एकाला विचारले तेव्हा त्याने एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न सांगितला, जो होता वाघिणींच्या मासिक पाळीविषयी. तो म्हणाला त्याने पर्यटकांना उत्तर दिले की, त्याला याविषयी माहिती नाही, पण तो  माहिती घेईल व त्यांना देईल. मी त्याला तात्काळ म्हणालो, की यासाठी 50% गुण, पण त्याने त्या पर्यटकांचा संपर्क क्रमांक घेतला का व त्यांना उत्तर सांगण्यासाठी पुन्हा संपर्क केला का? गाईडने लाजून केलेल्या स्मितहास्यातून मला उत्तर मिळाले(नाही घेतला)व हाच एक चांगला गाईड व इतरांमधला फरक असतो, मी त्यांना चूक ठरवले नाही.
     मी त्यांना सांगितले की या जगात फक्त दोनच प्रकारचे लोक असतात ते म्हणजे लायक व नालायक. आपण सगळे नालायक म्हणून जन्माला येतो परंतु आपण जे ज्ञान मिळवतो त्यामुळे आपण लायक होतो व ते ज्ञान आपण कसे वापरतो यावरून आपण खरोखरच लायक आहोत किंवा नाही हे ठरते. इथे मी झेनची आणखी एक गोष्ट सांगितली, जी चार मूर्तीकारांविषयी होती, ते एका मंदिरामध्ये आपली छन्नी आणि हातोडा घेऊन काम करत असतात व त्यांच्या हातात काय काम आहे याविषयी त्यांना स्पष्ट कल्पना होती. पहिल्याने सांगितले की तो दगड फोडण्याचे काम करत आहे कारण त्याला त्यासाठी पैसे मिळत आहेत, तर शेवटचा म्हणाला, इथे बांधल्या जात असलेल्या मंदिराच्या पायऱ्या तयार करण्याचे काम तो करत आहे व त्याचे काम त्यासाठी पायरीचा पाया रचणे हे आहे. म्हणजे त्याला त्याच्या कामाविषयी पूर्णपणे स्पष्टता होती, यामुळेच तो अतिशय लायक मूर्तिकार होता. त्यानंतर मी गाईडच्या कामातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे किंवा आव्हानाकडे वळलो ते म्हणजे वाघ दिसणे. मी त्यांना विचारले की अगदी अभयारण्याचा क्षेत्र संचालकही तुमच्या जिप्सीत बसले व त्यांनी तुम्हाला त्यांना वाघ दाखवायला सांगितला तर तुम्हाला ते करता येईल का; क्षेत्र संचालकाने त्यांच्या जिप्सीत बसणे या नुसत्या विचारानेच सगळे हसले. मी म्हणालो, नाही, हेच उत्तर असेल जे तुम्ही सगळे जाणता व अगदी क्षेत्र संचालकांना पण हे माहिती आहे, परंतु बहुसंख्य पर्यटक वाघ पहायलाच येतात ही वस्तुस्थिती आहे मग तुम्ही स्वीकारा किंवा स्वीकारू नका. ते आपण कसे हाताळायचे यासंदर्भात मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी त्यांना माझ्या स्वतःच्या कार्यालयाचे उदाहरण दिले, कारण आमच्या कार्यालयाच्या कॉन्फरन्स रूममध्ये माझा सेल्स टीम घराची चौकशी करणाऱ्या ग्राहकांना भेटते, तेथील टीव्हीवर आमच्या प्रकल्पाच्या छायाचित्रांऐवजी वन्यजीवांच्या व आमच्या संवर्धनाविषयीच्या प्रयत्नांची छायाचित्रे दाखवली जात असतात. ही संपूर्ण चर्चा प्रकल्पाच्या दराऐवजी वेगळ्याच विषयावर सुरू होते व शेवटी ग्राहकाने सदनिका खरेदी करो अथवा नाही ती सकारात्मक संभाषणावर संपते. पर्यटकांनाही वाघ दिवसण्यासंदर्भात हेच तत्व लागू होते, कारण आपण पर्यटकांचे लक्ष वाघ पाहण्यावरून दुसरीकडे वळवले तर तिथेच निम्मी लढाई जिंकलेली असते, व एक उत्तम गाईड व इतरांमध्ये हाच फरक असतो, कारण कोणतेच गाईड वाईट नसतात, याची मी त्यांना जाणिव करून दिली. हे करण्यासाठी, अशी प्रशिक्षणे आवश्यक असतात तसेच त्यांनी काही गोष्टी विकसित करणे आवश्यक असते म्हणजे ते पर्यटकांना वाघाव्यतिरिक्त इतर गोष्टींविषयी बोलायला भाग पाडतील. त्यासाठी वाचन अत्यावश्यक आहे, तसेच केवळ वन्यजीवनाविषयीच नव्हे तर आपल्या देशाविषयी, लोकांविषयी ज्ञान संकलित केले पाहिजे, तरच तुम्ही पर्यटकांशी मुक्त संवाद साधू शकाल, जो महत्त्वाचा असतो. पर्यटकांना त्याच्या किंवा तिच्या आवडत्या गोष्टीबद्दल बोलते करा उदाहरणार्थ बंगाली पर्यटकांना तुम्ही ममता दीदी किंवा तिथल्या स्थानिक राजकारणाविषयी किंवा झालमुढीविषयी (कृपया गूगल करा) किंवा रोशोगुल्लाविषयी विचारा, म्हणजे थोडक्यात वाघ सोडून इतर कशाविषयीही विचारा व परिणाम पाहा. त्याचवेळी, मी त्यांना वॉट्सॲपवर गाईडचे ग्रूप तयार करायला, व विविध प्रवेशद्वारांच्या परिसरातली वन्यजीवनाविषयीची माहिती एकमेकांना द्यायला, क्वचितप्रसंगी स्वतःचे मेळावे स्वतःच आयोजित करण्याचा सल्ला दिला. हे सगळे करण्यासाठी त्यांना वनविभागाची काय गरज आहे, ते स्वतःच त्यांच्यासाठी अशाप्रकारचे प्रशिक्षण का आयोजित करू शकत नाहीत अशे मी विचारले? शेवटचा, परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तंदुरुस्ती, कारण गाईड म्हणून काम करणे खडतर असते, जिप्सीने ओबडधोबड रस्त्यांवरून प्रवास व हवामानाची तीव्र स्थिती, या सगळ्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. म्हणून तुम्हाला दीर्घकाळ या व्यवसायात टिकून राहायचे असेल तर व्यायाम, शिस्त व गुटख्यासारख्या व्यसनांपासून लांब राहणे आवश्यक असते. समारोप करताना, मी गाईडना तीन गोष्टींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला म्हणजे तुम्हाला वर्तमानपत्रामधून किंवा गूगल न्यूजवर जे काही मिळेल ते वाचा, दुसरे म्हणजे त्यांनी जंगलात दररोज काय पाहिले त्याविषयी काही ओळी लिहून काढा व शेवटचे म्हणजे पर्यटकांनी प्रश्न विचारण्याची वाट पाहण्याऐवजी त्यांच्याशी बोला व त्यानंतर आयुष्यात काय फरक पडतो ते पाहा.
तर हे झाले गाईडना दिलेल्या प्रशिक्षणाविषयी, प्रशिक्षक म्हणून योग्य व्यक्तिंपर्यंत कसे पोहोचायचे यासंदर्भात माझ्या वन विभागासाठीही काही सूचना आहेत…
     सर्वप्रथम, गाईडचे प्रशिक्षण घेणे हा खरोखरच अतिशय उत्तम उपक्रम आहे परंतु तो अधिक सुसूत्र हवा व कधीतरी अचानक घेण्याऐवजी नियमितपणे वेळोवेळी घ्यायला हवा. अभयारण्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आधी प्रशिक्षकांसोबत बसावे व प्रशिक्षणासाठी नेमके कोणते मुद्दे असतील याचे नियोजन करावे. सर्व गाईडना प्रशिक्षण मिळेल असे पाहावे कारण यावेळी केवळ निम्मेच गाईड प्रशिक्षण घेऊ शकले, उर्वरित निम्म्या गाईडना त्यांचे प्रशिक्षण कधी होईल याविषयी स्पष्ट कल्पना नाही. अशाच प्रकारचे प्रशिक्षण वन विभागातील क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठीही आवश्यक आहे. जिप्सी चालकही पर्यटनाचा महत्त्वाचा घटक आहेत व त्यांचे प्रशिक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे अशाचप्रकारच्या सर्व सत्रांचे ध्वनी-चित्र मुद्रण(video) करून ठेवावे, कारण हा अतिशय सुंदर दस्तऐवज आहे व तो इतरांसोबत सामायिक केल्यामुळे इतर अनेक गाईडनाही मदत होईल. शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा, प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचा, पूर्णपणे आदर राखून मला सांगावेसे वाटते की मला सूत्रांकडून मानधनाची जी रक्कम समजली ती अतिशय कमी आहे व जर पुरेसे मानधन दिले नाही तर प्रशिक्षण देण्याचा उत्साहदेखील मावळू लागतो. सुदैवाने आमची उपजीविका या प्रशिक्षणावर अवलंबून नाही, परंतु जर आपल्याला दर्जेदार प्रशिक्षण हवे असेल तर आपल्याला त्यासाठी पैसेही मोजावे लागतील हा त्यामागचा तर्क, बरोबर? लोकहो, गाईड वन्यजीवन व त्याबाहेरील जगाच्या दरम्यानचा महत्त्वाचा दुवा असतात, जर आपण तो दुवा सुरळीत ठेवला तरच वन्यजीवनासाठी काही आशा आहे, एवढेच सांगून निरोप घेतो!

संजय देशपांडे 

smd156812@gmail.com 

www.junglebelles.in 

www.sanjeevanideve.com

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

हनुमान अंश; प्रवास, श्रद्धा आणि आशेचा!

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??