मा. नरेंद्र मोदीजी, अमितजी शाह, यांना ताडोबामधील वाघांचे विनंती पत्र !
माननीय श्री. नरेंद्र मोदीजी व श्री. अमितजी शहा,
ताडोबातल्या वाघांचा सप्रेम नमस्कार!!
“वन्यप्राणी हे हिंसक कमी व या जगातल्या अनेक माणसांपेक्षाही अधिक सहृदयी आहेत” ― मुनिया खान.
“समृद्ध वनराई व सातत्याने विस्तारत चाललेले रस्त्यांचे जाळे यातील प्रत्येक वळणावर, रस्त्यावरील अपघातातील प्राण्यांचे मृत्यू ही नित्याची बाब आहे, वन्यजीवांची सातत्याने वाढत्या मानवी हस्तक्षेपामध्ये जगण्यासाठी सुरू असलेली धडपड यातून अधोरेखित होते.” ― रोव्ह माँट्यूक्स.
‘हा देश विश्वासावर जगतो. केवळ दोन माणसे काही म्हणाली, म्हणून सगळे लोक झुकत नाहीत”…. अमितजी शहा, केंद्रीय गृहमंत्री, भारत.
“माझा असा ठाम विश्वास आहे की सर्व प्रश्नांवर संवादातून तोडागा काढता येतो” … श्री. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत.
“वाघांच्याबाबतीत एकमेव दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यांना माणसांच्या इलेक्शनमध्ये मतदान करता येत नाही” … मी.
माननीय मोदीजी आणि अमित शाह महोदय,
आमचे काही शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी आम्ही केवळ आशा करू शकतो (व प्रार्थनाही) कारण ज्या प्रजातीने आमच्यावर तुम्हाला हे पत्र लिहीण्याची जबाबदारी सोपवली आहे, त्या एका प्रजातीवर हजारो प्रजातींचे भवितव्य अवलंबून आहे. होय, आम्ही वाघांच्यावतीने, किंबहुना ताडोबाच्या जंगलाजवळ राहणाऱ्या वाघांच्या समूहाच्यावतीने आम्ही हे लिहीत आहोत. सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण (वाघांसोबत) अशा एका आघाडीवर उल्लेखनीय यश मिळवले ज्यामध्ये जगातील कुठल्याही देशाला यश आलेले नाही व ते म्हणजे, वाघांच्या संख्येत वाढ, विशेषतः महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात. याचे श्रेय सरकारी यंत्रणेतील सर्वोच्च पदावरील तुम्हा दोघांना दिलेच पाहिजे. परंतु मराठीमध्ये एक म्हण आहे, “युद्धात जिंकले व तहात गमावले” म्हणजे तुम्ही युद्ध जिंकलात परंतु युद्धानंतर केलेल्या तहात ते गमावले ( हे आपले मित्र ट्रम्प अधिक चांगल्याप्रकारे समजून सांगू शकतील, उपरोधिकपणासाठी माफ करा) पण ही म्हण संपूर्ण देशामध्ये सध्या वाघांच्या संवर्धनाच्या आघाडीवर काय सुरू आहे याचे वर्णन करते. जिथे लोकसंख्या जास्त असते तिथे इतरही समस्या आ वासून उभ्या असतात उदाहरणार्थ अपुऱ्या पायाभूत सुविधांची समस्या, ज्यात पाण्याची कमतरता, वायू प्रदूषण, वाहतुकीची कोंडी (ही काही उदाहरणे झाली) बंगलुरू, पुणे, मुंबई यासारख्या शहरांमध्ये अतिशय वाईट आहे, कारण या शहरांमध्ये किंवा प्रदेशांमध्ये माणसांची लोकसंख्या अधिक आहे (म्हणजे केंद्रित झाली आहे). याच तर्काने विचार केला तर चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण जगामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे, आणि इथे वाघांच्या समस्या सुद्धा सर्वाधिक आहेत ज्या केवळ तुम्हीच सोडवू शकता हा या पत्राचा विषय आहे.
याचप्रमाणे, वाघांनाही जागेची समस्या भेडसावतेय, तुमच्याकडे माणसांच्या सुखसोयींची काळजी घेण्यासाठी रोडकरीजी उर्फ गडकरीजी यांच्यासारखे कार्यक्षम मंत्री आहेत, इतरही मंत्री मानवी गरजांची( मतदारांची) काळजी घेतात. परंतु वाघ जरी म्हणायला जंगलाचा राजा असला तरीही, त्यांच्यासाठी अशाप्रकारची कोणतीही तरतूद नाही. म्हणूनच आम्ही माणसांच्या राजाला व त्याच्या प्रधानांना म्हणजेच तुम्हाला दोघांना हे पत्र लिहीत आहोत! वाघांना भेडसावणाऱ्या समस्यांची यादी खूप मोठी आहे परंतु हे पत्र आम्ही बल्लारशाह ते गोंदियाला जोडणाऱ्या व ताडोबाच्या जंगलातल्या मोठ्या भागातील रेल्वेचा मार्ग निर्माण करत असलेल्या समस्यांसाठी हे लिहीत आहोत. या रेल्वे मार्गावर गेल्या पाच वर्षात अनेक अस्वले, बिबटे, हरिण व इतर प्राण्यांसह डझनभरापेक्षाही अधिक वाघांना आपला जीव गमवावा लागला आहे, हे सर्व प्राणी आपण वन्यजीवनाची जी साखळी म्हणतो तिचा एक भाग आहेत. अगदी अलिकडचे म्हणजे, 28 मे 2025 रोजी सिंदेवाही/ब्रह्मपुरीजवळ, या रेल्वे मार्गावर एक तरुण वाघीण मारली गेली. आदरणीय मोदीजी व शहा साहेब, माणसांसाठी रेल्वेमार्ग महत्त्वाचे आहेत व आपल्याला आरामात जगता यावे यासाठी ते अतिशय ते चांगली सेवा देतात. परंतु दुर्दैवाने आपण माणसांप्रमाणे वाघांना हे रेल्वेमार्ग काळजीपूर्वक कसे ओलांडावेत हे शिकवू शकत नाही, जो अगदी त्यांच्या घराच्या म्हणजेच जंगलाच्या मधोमध होऊन जातो. कल्पना करा, अगदी आपल्या घरामध्येही पॅसेजमध्ये आपण एखादा दोर आडवा बांधला व तिथे एक पाटी लावली, “दोर बांधलेला आहे, काळजी घ्या”! तरीही मला खात्री आहे की दर दुसऱ्या दिवशी कुटुंबातील एखाद-दुसरा सदस्य त्या दोरा मुळे अडखळून नक्कीच पडेल व इथे तर आपण रेल्वे मार्गाविषयी बोलत आहोत ज्यावर दिवसंरात्र भरधाव वेगाने रेल्वे धावत असतात व वाघांच्या घरामध्ये म्हणजेच जंगलामध्ये तो पॅसेजमध्ये बांधलेल्या दोरासारखा आहे, विचार करा इथे काय परिस्थिती असेल.
वेळोवेळी वन्यजीवप्रेमी व अगदी वन विभागानेही दिल्लीतील संबंधित अधिकाऱ्यांना वाघांच्या व इतर वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या तरतूदी करण्याची विनंती केली आहे, कारण त्यांना त्या रेल्वेमार्गामुळे वन्यजीवनाला थेट धोका निर्माण झाला आहे, परंतु काहीही करण्यात आलेले नाही. परिणामी या मार्गावर गेल्या आठवड्यात वरील बातमीतील तरूण वाघीणीने आपला जीव गमावला. मोदीजी, तुम्ही कधी जंगलामध्ये रेल्वेखाली येऊन वाघाचा मृत्यू झाल्याचे किंवा रस्त्यावर त्याला ट्रकची धडक लागल्याचे दृश्य पाहिले आहे का, माझी खात्री आहे तुम्ही पाहिलेले नसेल. अर्थात, या देशामध्ये दीड लाख लोक दरवर्षी रस्त्यावरील अपघातात मरण पावतात, तिथे काही वाघांचा रस्ता किंवा रेल्वेखाली मृत्यू होणे ही फार काही मोठी गोष्ट नाही. परंतु महत्त्वाचा फरक असा आहे की, माणसांनी त्यांच्या सोयीसाठी रस्ते बांधले, रेल्वेमार्ग बांधले ज्यावर रेल्वे धावू लागल्या, कारही तयार केल्या, त्यामुळे त्यांनी आपल्या सुरक्षिततेसाठी सोयी केल्या व वाहतुकीचे नियमही तयार केले. तरीही जेव्हा त्याकडे माणसे दुर्लक्ष करतात तेव्हाच अपघात होतात व वाघांकडे अशाप्रकारच्या कोणत्याही तरतुदी नाहीत. इथेही, हा गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्ग, वाघांनी बांधलेला नाही म्हणूनच तो सुरक्षितपणे कसा ओलांडायचा हे त्यांना माहिती नाही. ट्रेन कोणत्या वेळेले येते, त्यानुसार हा मार्ग ओलांडणे टाळले पाहिजे हे त्यांना माहिती नसते. कल्पना करा, जंगलाचा राजा आनंदाने किंवा अभिमानाने जंगलात भटकंती करत आहे, व एक रेल्वे मार्ग त्याच्या वाटेत येतो व एखाद्या लहानशा ओढ्याप्रमाणे किंवा मार्गातील अडथळ्याप्रमाणे तो त्याला ओलांडण्याचा प्रयत्न करतो व अचानक एक अतिशय मोठी धूर ओकणारी वस्तू वाघाच्या दिशेने येते व त्याला अक्षरशः चिरडून टाकते. भरधाव वेगाने आलेल्या रेल्वे इंजिनाखाली तो मृत्यूला सामोरे जातोय हे कळल्यानंतर वाघ काय विचार करत असेल, आपण कशामुळे व का मृत्यू पावलो हे त्याला कदाचित कधीच कळणारही नाही. दुर्दैवाने “रस्त्यावरील अपघातात मरण पावलेल्या” (ज्यासाठी इंग्रजीमध्ये रोड किल्स हा शब्द वापरतात) बहुतेक वन्य प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये मला हेच भाव पाहायला मिळाले. ते सगळे डोळे झोपेत सुद्धा माझा पाठलाग करतात, माणसांनो माझी काय चूक होती, असाच प्रश्न जणू ते विचारत असतात. माननीय मोदीजी, जर एखाद्या वाघीणीचा मृत्यू झाला, तर त्यामुळे तिचे बछडे एकटे पडतात, आपण कधी कल्पना केली आहे का या बछड्यांचे काय होत असेल. कोणताही मृत्यू हा वाईटच, मग तो माणसाचा का असेना. माणसांमधेसुद्धा आईचा मृत्यू झाल्यानंतर लहान मुले मागे राहतात. परंतु आपण सामाजिक प्राणी आहोत व बहुतेक प्रकरणांमध्ये आपल्याकडे अशा मुलांची काळजी घेण्यासाठी कुणीतरी असते. परंतु जेव्हा तुम्हाला वाघ म्हणून जगण्याचा अभिशाप असतो तेव्हा अशाप्रकारे कोणाहीकडुन कोणतीही मदत पिल्लांना मिळत नाही. वाघीण बाहेर पडताना नेहमी बछड्यांना एकट्याने उघड्यावर न येण्याची किंवा सामान्यपणे अन्नाच्या शोधात बाहेर पडल्यावर भटकंती करून परत येईपर्यंत त्यांच्या जागेवरून न हालण्याची सूचना देऊन जाते. जेव्हा अशा एखाद्या वाघीणीचा रेल्वे इंजिनाची धडक लागून मृत्यू होतो, तेव्हा बिचारे बछडे त्यांच्या आईची अतिशय आतूरतेने वाट पाहात असतात, ती आता परत कधीच येणार नाही हे त्यांना सांगायला कुणीच नसते, त्यांना खाणे भरवायला कुणीच नसते. बहुतेकवेळा अशा बछड्यांचा उपाशी राहिल्याने मृत्यू होतो, कारण त्यांच्या आईने ती परत येईपर्यंत तिथून हलू नकोस असे त्यांना सांगितलेले असते. या बछड्यांच्या नशीबाने ती वन विभागाला सापडली तरीही आपणहून ती जंगलात जगू शकत नाहीत व त्यांना त्यांचे उर्वरित आयुष्य बंदिस्तपणे एखाद्या झू मध्ये जगावे लागते, केवळ त्यांच्या आईला रेल्वे मार्ग किंवा महामार्ग कसा ओलांडायचा हे माहिती नसल्यामुळे.
तर, माननीय मोदीजी व शहा सर, या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने (5 जून 2026) एक शपथ घेऊ, इथून पुढे रेल्वे मार्ग किंवा महामार्गावर एकाही वाघाचा मृत्यू होऊ द्यायचे नाहीत. चंद्रपूरच्या सिंदेवाही-मूल भागामध्ये या विशिष्ट रेल्वेमार्गावर, अशाप्रकारच्या सोयी करून सुरूवात करावी, ही आमची तुम्हाला अतिशय मनःपूर्वक नम्र विनंती आहे. हे काही रॉकेट विज्ञान नाही, हे मान्य असले तरीही हा मार्ग आधीपासून अस्तित्वात आहे, म्हणूनच आधी या संपूर्ण मार्गावर चेन लिंक सारखे कुंपण लावून घ्या, त्यानंतर जंगलाच्या संपूर्ण टप्प्यात दर एक किलोमीटरच्या मार्गावर केवळ 30 ते 40 फूट रुंद वरून जाता येईल असा व भुयारी मार्ग तयार करा. तो केवळ प्राण्यांचे वजन उचलेल एवढाच असावा, अवजड भार उचलणारा नसावा. वन्यप्राणी हे माणसांपेक्षा हुशार असतात, त्यांना सुरक्षितता आपल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे कळते व ते हळूहळू हा वरून जाणारा व भुयारी मार्ग वापरू लागतील. त्याचप्रमाणे आपण यासंदर्भात तज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेऊ शकतो व तोपर्यंत किमान या मार्गावरून जाणाऱ्या ट्रेनच्या वेगावर मर्यादा घाला, एवढे तुम्ही निश्चितच करू शकता. त्याचवेळी पर्यायी काही सोय होईपर्यंत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सातत्याने जागरुकता मोहीम राबवा ज्यामध्ये इंजिन चालकांचाही समावेश होतो व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. व तुमच्या कडक देखरेखीखाली तिचे निरीक्षण करणारी एक यंत्रणा राबवा. समाज माध्यमांवरील सर्वात लोकप्रिय हॅशटॅग म्हणजे #modihaitomumkinhai, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, वाघांचे समाज माध्यमांवर अकौंट नसते व मन-की-बातमध्ये ते त्यांची कळकळीची विनंती मांडू शकत नाहीत, म्हणूनच आम्ही हे त्यांच्यासाठी करत आहोत. हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचावेत एवढीच आशा आम्ही करू शकतो. म्हणूनच आम्ही हे त्यांच्यासाठी करत आहोत व हा बदल ब्रह्मपुरी-चंद्रपूर टप्प्यातील रेल्वे-मार्गावरून सुरू व्हावा ही अपेक्षा ! आदरणीय मोदीजी व शहा साहेब, मोदीजींनी त्यांच्या एका भाषणात म्हटले आहे, “प्रत्येक समस्या संवादातून सोडवली जाऊ शकते”, म्हणूनच कृपया हे पत्र म्हणजे ताडोबाच्या वाघांनी त्यांना रेल्वे-मार्गाविषयी असलेल्या समस्या कळवण्यासाठी साधलेला संवाद आहे असे समजा, एवढेच आम्ही म्हणू शकतो; तुम्ही याकडे लक्ष द्यावे व कायमस्वरूपी कारवाई करावी यासाठी वाट पाहतोय, तुमचे अॅडव्हान्स आभार मानतो …!!🐾🙏🏻
-
हेमांगी वर्तक (09823558588), अनुज खरे, विनोद बारटक्के, संजय देशपांडे, अनेक वन्यप्रेमी व ताडोबातील वाघ.
जंगल बेल्स, नेचर वॉक व टीम संजीवनी
www.junglebelles.in






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा