कचरा, समाज आणि शहर!

























































कचरा,  समाज आणि शहर!


“जर तुमच्या डोक्यात(विचारात) कचरा असेल, तर कितीही सफाई कर्मचारी तुमची मदत करू शकत नाहीत.” ― टॅमरलान कुझगोव्ह.

“आपण जेवढा कचरा करतो त्यातून आपल्याला इतरांबद्दल किती आदर आहे हे समजते.” ― स्ट्युअर्ट स्टॅफोर्ड.

“आपण आपल्या कचऱ्याचे काय करतो यावरून आपण खरे कोण आहोत, हे ठरते” --- मी

    मला खात्री आहे की कुझगोव्ह व स्टॅफोर्ड यांची अवतरणे व त्यातून मी काढलेला निष्कर्ष यावरून तुम्हाला लेखाचा विषय व लेखातून काय मांडणार आहे याची पुरेशी कल्पना आली असेल, जर तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल (म्हणजे अजून वाचत असाल) व इराण युध्द व झुरळ आंदोलन या शिवाय आपल्याभोवती काय सुरू आहे याचा माग ठेवत असाल तर तुम्हालालक्षात येईलच, हा लेख कचऱ्याविषयी आहे, याविषयी लिहीण्याचे कारण म्हणजे कचरा आपल्या आरोग्यासाठी घातक आहे हे आपण सर्वजण जाणतो परंतु आता ज्याप्रमाणे  समुद्र किंवा नदीचे पाणी किंवा आग त्यांच्या मार्गात जे काही येईल त्याला गिळंकृत करते त्याप्रमाणे कचऱ्यामुळे आता माणसांचा खरोखरच जीव जातोय. अशा दुर्दैवी घटनांनंतर जर आपण त्याकडे आपले डोळे व कान (व नाकही) बंद करून बसणार असू तर आज कचऱ्यामुळे बळी पडून आठ गरीब लोकांचा जीव गेला (आणि त्यांच्या परिवाराचा पण), उद्या संपूर्ण शहर त्याला बळी पडू शकते, हा माझ्या लेखाचा विषय आहे. आपल्या सगळ्यांनाच कचरा अजिबात आवडत नाही व आपल्याकडे जो काही कचरा असतो तो आपण नजरेआड फेकून देतो व आपल्या स्वच्छतेची सामान्यपणे हीच कल्पना आहे (म्हणजे बहुतेक भारतीयांची). मी अशा अनेक बायका (आणि पुरुषही) पाहिल्या आहेत, ज्या त्यांच्या स्वच्छतेविषयीच्या प्रेमाच्या फुशारक्या मारत असतात, त्यात चूक काहीच नाही. परंतु मी जेव्हा त्यांना विचारतो की ते पसारा (कचरा) किंवा त्यांना नको असलेल्या गोष्टी कुठे ठेवतात, त्यावर त्यांचे उत्तर असते, ते कचऱ्यात टाकतात किंवा पोटमाळ्यावर टाकून देतात व काही ठिकाणी ते त्यांच्यासाठी निरुपयोगी आहे ते देऊन टाकतात. म्हणजे आपण आपल्या घरातील कचऱ्याचे तीन वर्गवाऱ्यांमध्ये वर्गीकरण करू शकतो, पहिली म्हणजे जे आपल्यासाठी खरोखरच काहीही उपयोगाचे नाही व ते आपण आपल्या कचरा पेट्यांमध्ये टाकून देतो, दुसरी म्हणजे, आपल्या असे वाटत असते की ती आत्ता उपयोगाची नाही परंतु कधीतरी तिचा उपयोग होईल व ती आपण आपल्या नजरेआड ठेवतो व माळ्यावर टाकून देतो व तिसरी म्हणजे (त्याचे प्रमाण अगदी लहान असले तरीही) कुणीतरी तिचा वापर करू शकले असे आपल्याला वाटते म्हणजे चांगल्या दर्जाचे कपडे किंवा शूज किंवा भांडी इत्यादी व ती आपण गरजू लोकांना देतो (मी जाणीवपूर्वक या लोकांच्या कामाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी त्यांची वर्गवारी नमूद करत नाहीये)! परंतु एक गोष्ट सामाईक असते, आपल्याला या गोष्टी आपल्या आजूबाजूला नको असतात व त्या बाजूला करणे ही आपल्याकडे कचऱ्यावरील एकमेव उपाययोजना असते!

     या सगळ्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड/पुणे परिसरामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली (मी तिला अपघात म्हणणार नाही), तिथे कचरा डेपोच्याजागेवरील कित्येक टन कचऱ्याचा ढीग जवळच असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर पडला, जवळपास वीसहून अधिक कर्मचारी त्यामध्ये अडकले होते. जवळपास तीन दिवस बचावकार्य सुरू होते, यातून अकरा लोकांना वाचवण्यात आले परंतु नऊ लोकांना आपला जीव गमावला. मृत्यू जर अचानक झाला नाही तर तो किती दुर्दैवी असू शकतो याची मी कल्पना करू शकतो, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली, पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे भोवताली सगळीकडे दुर्गंध पसरलेला असताना, इजा झालेल्या असताना आलेला मृत्यू हा निश्चितपणे अतिशय वाईट, अर्थात कोणताही अकाली मृत्यू हा वाईटच जो वरील दुर्घटनेतील लोकांना आला. मी काही निवाडा करत नाहीये किंवा सदर इमारतीच्या वैधतेविषयी किंवा कुणाचा दोष होता याविषयी बोलण्यासाठी मी काही कुणी अधिकारी नाही. परंतु एक गोष्ट नक्की अभियंता म्हणून मी या घटनेला अपघात म्हणू शकत नाही, कारण तुम्ही सर्वतोपरी खबरदारी घेऊनही जो होतो अपघात व कचऱ्याचा ढीग इमारतीवर पडून ती कोसळून झालेले मृत्यू हे निश्चितच अपघात या वर्गावारीमध्ये मोडणार नाहीत. नेहमीप्रमाणे चौकशी समिती स्थापित केली जाईल, अधिकाऱ्यांचे निलंबन होईल, पोलीस प्राथमिक तपासणी अहवाल दाखल करतील,  सगळे सिस्टमचे सोपस्कार केले जातील,पण मुद्दा असा आहे की या कचऱ्याच्या दुर्घनेसाठी मुख्य दोषी कोण व आपण त्यासंदर्भात काय करणार आहोत, हा माझ्या लेखाचा विषय आहे!

     मी पुढे जाण्यापूर्वी, एक प्रश्न विचारतो (ज्यांना वाचण्याएवढा संयम असेल त्यांनी कृपया उत्तर द्यावे), तुमच्यापैकी किती जणांना कचरा डेपो म्हणजे काय हे माहिती आहे व तुमच्यापैकी किती जणांनी एखाद्या कचरा डेपोला प्रत्यक्ष भेट दिली आहे? तुम्हाला माझे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर कचरा डेपो ही संपूर्ण शहरातून किंवा शहराच्या काही भागांमधून गोळा केलेला कचरा टाकण्यासाठी राखून ठेवलेली जागा असते. मी पुणे शहरातील कचरा डेपोला बरेचदा भेट दिली आहे पूर्वी तो पौड रस्ता, कोथरुड या भागात होता व एक मोठा डेपो पुण्याच्या फुरसुंगी या पूर्व उपनगरात आहे. मी खरोखरच सांगतो की या भेटी तासाभरापेक्षाही कमी होत्या परंतु तिथला दुर्गंध माझ्या फुफ्फुसांमध्ये (माझ्या डोक्यामध्ये जास्त) नंतरही कित्येक तास राहिला. तिथे पाहिलेली दृश्ये अनेक वर्षांनंतरही माझ्या स्मरणात आहेत, इतकी ती जागा भयानक होती. आता जे लोक त्यांच्या उपजीविकेसाठी तिथे काम करतात व त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यांचा विचार करा, हा सगळा कचरा कुठून येतो याचा आपण विचार केला आहे का. त्यामध्ये वापरलेल्या कपडे, रक्ताने माखलेल्या पट्ट्या, कुजलेले अन्न ते अगदी पाळीव प्राण्यांच्या मृतदेहांपर्यंत काहीही असते, यात आणखीनही अनेक गोष्टी असतात ज्यांचे मी वर्णनही करू शकत नाही. आपण केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी माणसे इथे काम करतात, केवळ आपल्याला आपला परिसर स्वच्छ हवा असतो म्हणून आपण तो कचरा दुसरीकडे कुठेतरी टाकून देतो. तो कुठेतरी टाकून दिलेला कचरा शेवटी कचरा डेपोमध्ये येतो. तुम्हाला माहिती आहे का केवळ पुणे शहरामध्ये दररोज किती कचरा तयार होतो, जवळपास 2300 टन, ही आकडेवारी संकलित केलेल्या कचऱ्याची आहे, व त्यापैकी जवळपास निम्मा कचरा संकलितही केला जात नाही, म्हणजे आपण दररोज जवळपास 3000 टन कचरा तयार करतो. कचारा डेपोवरची परिस्थिती कितीही वाईट असली तरीही, तो किमान एका जागी संकलित केला जात आहे. परंतु अशा कचरा डेपो पर्यंत न पोहोचणारा कचरा अधिक धोकादायक असतो, कारण एकतर तो जाळला जातो ज्यामुळे आपण ज्या हवेत श्वास घेतो ती प्रदूषित होते किंवा आपले नैसर्गिक स्रोत म्हणजे ओढे, टेकड्या किंवा खुल्या जागांवर तो टाकला जातो त्यामुळे त्या प्रदूषित होतात किंवा पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या वाहिन्यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये जाऊन त्यात अडथळा येतो. याच कारणाने पुण्यामध्ये आता ताज्या पाण्याचे झरेच उरलेले नाहीत, आहेत ते फक्त नाले किंवा उघडी गटारे व आपल्या बहुतेक उघड्या जमीनींवर आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या माणसांनीच केलेला कचरा टाकलेला असतो. एक लक्षात ठेवा, माणसे वगळली तर कुठलीही प्रजाती या पृथ्वीवर कचरा करत नाही, त्यामुळेच आपण जो कचरा तयार करतो त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही आपलीच आहे, आपण आपली जबाबदारी (म्हणजे पापे) इतर कुणावर झटकून मोकळे होऊ शकत नाही! जे लोक जमीनीवर पडणाऱ्या झाडांच्या पालापाचोळ्याला कचरा म्हणतात ते मूर्ख आहेत कारण तो निसर्गचक्राचा एक भाग आहे, आपण काँक्रिटीकरण करून जमीनीचे आच्छादनच काढून टाकले आहे, म्हणूनच ही पाने मातीत मिसळून त्यांचे सेंद्रिय खत तयार होऊ शकत नाही, व आपण सोयिस्करपणे त्यांना कचऱ्याचे नाव देतो.

    आता मुख्य मुद्द्याविषयी बोलू, मी यासंदर्भात काय करता येईल? इतरांना दोष देणे सोपे आहे, परंतु पुढे येऊन, जबाबदारी घेणे अवघड, जर आपल्याला कचरा नावाचा मारेकरी नियंत्रणात ठेवायाचा असेल तर ही काळाची गरज आहे हा माझ्या लेखाचा विषय आहे. तर सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या दैनंदिन कामाचे नियोजन करा, ज्या गोष्टींमुळे कचरा तयार होतो, त्यांची एक यादी बनवा, मग त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन व्यापारी पोर्टलवरून काहीतरी मागवता ज्याच्या पॅकेजिंगमुळे सर्वात जास्त कचरा तयार होतो, त्याचप्रमाणे तुमच्या घराच्या साफसफाईच्या सवयी, प्रत्येक गोष्ट लिहून काढा. कारण तुम्ही जोपर्यंत कचरा कसा तयार होतो ते लिहीत नाही तोपर्यंत तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे वस्तू कमीत कमी ऑनलाईन मागवा किंवा तुमच्या गरजेच्या सगळ्या वस्तू एकाचवेळी मागवा, कारण तीन वेळा वस्तु मागवणे म्हणजे तीन पॅकेज म्हणजे तिप्पट कचरा. हे कदाचित ऐकायला मजेशीर वाटेल किंवा अतिरेकी वाटेल परंतु ही वस्तुस्थिती आहे. मला स्वतःला ऑनलाईन खरेदी कधीच आवडत नाही व सगळेजण माझ्यासारखे जगू शकत नाहीत हे मान्य असले तरीही, तुम्ही तुमच्या खरेदीच्या सवयी सुधारू शकता, बरोबर? त्यानंतर यतो जेवण मागवण्याचा मुद्दा, त्याच्या पॅकेजिंगमुळे व उरलेल्या अन्नामुळेही कचरा होतो. कारण हॉटेलमध्ये तुम्हाला खुल्या ताटलीमध्ये वाढले जाते, तर उरलेले अन्न गोळा केले जाते किंवा रस्त्यावर जगणाऱ्या लोकांना (भिकाऱ्यांना, मी हा शब्द वापरणार नाही) देण्यासाठीही वापरले जाते. म्हणूनच, बाहेरून शक्य तितके कमी अन्न मागवा, याचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल (lol). त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणीही, तुम्ही कागदाच्या प्रत्येक तुकड्याचा कसा पुरेपूर वापर करू शकता ते पाहा व ज्याला कचरा ठरवले जाते त्याचे योग्यप्रकारे वर्गीकरण करा व त्यावर पुनर्प्रक्रिया/फेरवापर तुम्हाला जे शक्य आहे ते करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही जे काही कचरा म्हणून टाकून देत आहात ते कमीत कमी असावे व पुढील प्रक्रियेसाठी योग्य हातांमध्ये पडावे याची खात्री करा.

    शहराच्या पातळीवर, सरकारला सर्व काही माहिती असले तरीही ते काहीही करत नाही, कारण किती सोसायट्यांमध्ये कोरडा व ओल्या कचऱ्याचे वर्गीकरण करणारी यंत्रणा आहे व किती ओल्या कचऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया केली जाते याचे काही मोजमापच नाही, जे करणे खरेतर सर्व नव्या इमारतींसाठी बंधनकारक आहे. त्याच वेळी नियमांचे पालन न करणाऱ्या व चुकीच्या पद्धतीने कचरा करणाऱ्या किंवा त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सोसायट्या व नागरिकांविरुद्ध कडक करवाई करा, याकडे महानगरपालिका नेहमी काणाडोळा करतात, याचे कारण स्वाभाविक असते ते म्हणजे त्यांना त्यांच्या मतदारांचा रोष पत्करायचा नसतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरणाच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करणे हादेखील एक प्रभावी मार्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे, आपण केवळ “स्वच्छ सोसायटी” किंवा “स्वच्छ शाळा” अशाच स्पर्धा नव्हे तर “शून्य कचरा सोसायटी” किंवा “शून्य कचरा शाळा” अशा स्पर्धा आयोजित करू शकतो व कचऱ्याची निर्मिती कमी करणे व मूळ स्रोतापाशीच त्यावर योग्यप्रकारे प्रक्रिया करण्याचे महत्त्व याचा प्रसार करू शकतो. शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने (म्हणजे सर्व राजकीय नेते व धोरण निर्मात्यांनी) त्यांच्या मतदारांच्या चुकीच्या मागण्या स्वीकारून त्यांची खुशामत करणे थांबवले पाहिजे, कारण साधआरण दहा वर्षांपूर्वी पिंपरी-चिचंवड महानगरपालिकेच्या हद्दीतील पुनावळे उपनगरातून कचरा डेपोचे आरक्षण रद्द करण्यातच आले, ज्यामुळे मोशी कचरा डेपोवर कचऱ्याचा अतिरिक्त ताण आला, जे दुर्घटनेसाठीचे मुख्य कारण आहे. दुर्घटनेविरुद्ध आज आरडाओरड करणारे तथाकथित सर्व नेते व कार्यकर्ते कचरा डेपोचे आरक्षण रद्द केल्याबद्दल एकतर गप्प होते किंवा त्यासाठी त्यांचा आग्रह होता,कारण कुणालाही त्यांच्या मतदारांना दुखवायचे नव्हते व म्हणूनच आपण त्या नऊ जीवांच्या मृत्यूसाठी दोषी आहोत. ही तथाकथित मोठ्या शहरांमधली घटना किंवा परिस्थिती नाही, तुम्ही राज्यातील किंवा राष्ट्रीय महामार्गांवर कुठेही जा तुम्हाला लहान गावांच्या आधी व नंतर रस्त्यालगत कचऱ्याचे लहान ढीग दिसतील, कारण या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये त्यांच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा किंवा त्याची विल्हेवाट लावण्याचा कोणताही मार्ग नाही व ही कचऱ्याची निर्मिती सतत सुरूच असते. सरकार मात्र आपल्या विकासाच्या किंवा शहरीकरणाच्या या उपउत्पादनाकडे काणाडोळा करत असते. यासंदर्भात अदर पूनावाला फाउंडेशनचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो जे शहरातील कचऱ्याच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सढळहस्ते यंत्रसामग्री व मनुष्यबळ पुरवत आहे. यामध्ये योगदान देण्यासाठी आणखी कंपन्या, संघटनांनी पुढे आले पाहिजे, असे मला सांगावेसे वाटते.

    लोकहो, मोशी कचरा डेपोची दुर्घटना हा कचरा नावाच्या मूक मारेकऱ्याविरुद्ध सुप्त इशारा आहे, कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे आज केवळ एका इमारतीला अपाय झाला, उद्या हा कचरा संपूर्ण शहर गिळंकृत करेल व त्या दिवशी या मूक मारेकऱ्याच्या सुप्त इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आपणच दोषी असू, एवढे सांगून निरोप घेतो!


संजय देशपांडे 

www.sanjeevanideve.com

www.junglebelles.in





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

हनुमान अंश; प्रवास, श्रद्धा आणि आशेचा!

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??