सीजेपी; झुरळांचा धडा!!
सीजेपी; झुरळांचा धडा!!
“अंधत्वाचे सर्वात धोकादायक स्वरूप म्हणजे तुमचा दृष्टिकोन हेच केवळ वास्तव आहे असा विचार करणे ” ... फेड्रिक निशे.
“नियम लहान मुलांसाठी असतात. हे युद्ध आहे, व युद्धातील एकमेव गुन्हा म्हणजे पराभूत होणे.”..जो. ॲबरक्रोम्बी
“तुम्ही नेतृत्व करत असलेल्या तरुण लोकांना जे सर्वोत्तम आहे त्यावर विश्वास द्या, व त्यांना बुद्धिने दिशा द्या, भीतीने नव्हे.” … टिम एल्मोर
"एखादा नेता करू शकतो अशी सर्वात मोठी चूक म्हणजे, जनतेला गृहित धरणे "… मी.
मला लेखाचा विषय समजून सांगण्याची गरज नाही कारण तुमच्यापैकी बहुतेकांना अवतरणांवरून पुरेशी कल्पना आली असेल, मानवी वर्तनाविषयी बोलायचे झाल्यास त्याचे नेमके वर्णन करण्यात कुणीही निशे यांचा हात धरू शकणार नाही, ॲबरक्रोम्बी व एल्मोर आपल्याला तरुणांना कसे हाताळायचे याविषयी सांगतात व माझे शब्द या सगळ्यांचा काय परिणाम होतो याचा सारांश सांगतो. होय, हा लेख सीजेपीविषयी आहे (गूगल करण्याचीही गरज नाही) व तो आपल्या देशातील समाजाच्या सध्याच्या परिस्थितीविषयी आहे व त्याहीपेक्षा जास्त त्यातून समाजाला किंवा बूमर्सना (तुम्ही हे गूगल करू शकता) काय धडा मिळाला याविषयी हे आहे. सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे (इशारा क्र. एक), मी श्री. अभिजीत दिपके याचे समर्थनही करत नाही तसेच त्याचा टीकाकारही नाही. त्याच्या किंवा सीजेपीच्या सगळ्या मागण्या किंवा पद्धती मला पटतात असेही नाही तरीही त्या योग्यप्रकारे मांडणे आवश्यक आहे. त्याचवेळी, मी सध्याचे शासनकर्ते किंवा विरोधक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाविषयी बोलत नाही कारण “मुझे तो सभी पॉलिटीकल लोगोंकी शक्ल एक जैसी लगती है” (सलीम जावेद व बच्चन यांची कृपा, शोले पाहा)! या संपूर्ण घडामोडींमधून मला काय आकलन झाले केवळ त्याविषयी हा लेख लिहीला आहे (होय कारण श्री. दिपके यानी म्हटल्याप्रमाणे ही सुरुवात आहे, आणखी अनेक अशा घटना होणार आहेत) व मी स्वतः यातून काय शिकणे आवश्यक आहे व तसेच समाज म्हणून आपण यातून काय शिकू शकतो, कारण त्यातून स्वतः काय निष्कर्ष काढायचा हा निर्णय वाचकांचा असेल!
16मे 26 रोजी, एका तरुणाने एक ट्विट केले (एक्स या समाजमाध्यमावर) जो अमेरिकेमध्ये होता व त्याचे असे म्हणणे होते की आम्ही सीजेपीची म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. ही घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय सरन्यायाधीशांनी आपल्या देशातील बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली होती त्याला प्रतिसाद म्हणून करण्यात आली होती. एका दिवसात, या खात्याचे फॉलोअर्स जगातील बहुतेक अतिप्रसिद्ध व्यक्तींपेक्षाही जास्त झाले, हे सामान्य आहे कारण ही नवीन पिढी किंवा आजचे जग हे असे आहे. ज्याप्रमाणे पुण्यामध्ये, कोणतेही नवीन रेस्तराँ किंवा उपाहारगृहामध्ये पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी होते, समाज माध्यमांमधील खात्यांचेही असेच होते. या पोस्टनंतर घडले तेही स्वाभाविक होते कारण आपल्या मायबाप सरकारला या समाज माध्यमांवरील पक्षाचा अतिशय राग आला व त्यांची खाती बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण नावाप्रमाणेच सीजेपीची खाती वेगवेगळी ओळख घेऊन डोके वर काढत राहीली. त्यानंतर नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली (कृपया नीटविषयी गूगल करा). दिपके यांनी या पेपरफुटीवरून, समाज माध्यमांवर सीजीपीच्यावतीने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचाच राजीनामा मागितला, यामुळे मायबाप सरकार आणखी चिडले. जून महिन्यामध्ये श्री. दिपके यांनी जाहीर केले की ते त्यांच्या भारतात परत येणार आहेत व सीजेपीच्यावतीने वास्तविक जगात निदर्शने करायला सुरुवात करणार आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये कार्यकर्ते व निदर्शकांचे केंद्रस्थान असलेल्या जंतरमंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाला सुरुवात केली. हेदेखील थोडे स्वाभाविक होते परंतु जो देश सामान्य माणसांच्या आंदोलनांमधून घडला आहे त्यांच्यासाठी हे नॉर्मल होते. दरम्यानच्या काळात नीटच्या पेपर फुटीच्या गुन्ह्याची चौकशी सुरू होती व अनेक लोकांना अटक झाली. नीटची नवीन तारीख जाहीर करण्यात आली, पुन्हा लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले व उत्तीर्ण झाले, त्यामुळे सरकारला तसेच माध्यमांना वाटले की मूळ कारणच संपल्याने राजीनाम्याचा मुद्दा संपला आहे. दिपके व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी तसेच नीट रद्द झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे जीव गमावला त्यांना नुकसानभरपाई दिली जावी यासाठी आंदोलन सुरूच ठेवले. हळूहळू या मुद्द्यातील माध्यमांचा रसही मावळला. त्यानंतर श्री. वांगचुक हे लडाखमधील एक सामान्य माणूस व सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले व त्यांनी पाठिंबा म्हणून या तरुणांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषणाची घोषणा केली. हेदेखील सामान्य होते, कारण अलिकडच्या काळात सरकारकडून आपापल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेक सामाजिक लोकांनी उपोषण केलेले आहे, तर अशाप्रकारे उपोषण सुरू राहिले. जेव्हा श्री. वांगचुक यांची तब्येत खालावली, न्यायालयाने हस्तक्षेप केला, व सरकारने पावले उचलण्याचा व हे उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला कारण शेवटी श्री. वांगचुक यांची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. तसेच सरकार त्यांची बदनामी मग ती बरोबर असो किंवा चूक अशा एका व्यक्तीच्या उपोषणामुळे होऊ देऊ शकत नाही, विशेषतः जेव्हा आपले पंतप्रधान संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाची प्रतिमा सर्वोत्तम समाज व जगाला जीवनाच्या योग्य मार्गावर घेऊन जाणारा देश म्हणून रेखाटण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच सरकारने श्री वांगचुक यांचे उपोषण येन केन प्रकारेण थांबवण्याचा निर्णय घेतला व हे प्रकरण हाताळण्यासाठी जबाबदार असलेल्या नोकरशहांचीही बदली झाली, व हेदेखील सामान्य आहे कारण सरकार अशाचप्रकारे काम करते!
म्हणूनच, पोलीस जंतर मंतरला पोहोचले, त्यांनी वांगचुक यांना उचलले (अक्षरशः), त्यांना व्हॅनमध्ये घातले व त्यांचे उपोषण मोडण्यासाठी रुग्णालयात घेऊन गेले व त्यांना असे वाटले की नेहमीप्रमाणे हे काम झालेले आहे! मात्र त्यानंतर जे काही झाले ते केवळ असामान्यच नव्हते तर त्सुनामी होती, हा माझ्या लेखाचा विषय आहे. सरकारची ही कृती एखाद्या फटाक्यांनी भरलेल्या दुकानामध्ये काडेपेटीतील पेटती काडी टाकावी त्याप्रमाणे होती व क्षणार्धात फटाके फुटायला सुरुवात झाली, ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. तुम्ही कधी अशाप्रकारे आग लागल्याचे पाहिले आहे का ज्यामध्ये फटाक्यांच्या दुकानामध्ये किंवा गोदामामध्ये आग लागून फटाके फुटायला सुरुवात होते, कारण हे फटाके फुटण्याचे कोणतेही निश्चित स्वरूप नसते, कोणताही फटाका कोणत्याही मार्गाने जातो व आपल्या पद्धतीने फुटतो. तुम्हाला असे वाटत असेल की अतिशय विचित्र तुलना आहे तर इस्टाग्राम किंवा कोणतेही समाज माध्यम पाहा व गेल्या आठवड्यात केवळ जंतर मंतरच नव्हे तर सगळीकडे काय झाले ते पाहा, आग सर्व शहरांमध्ये व गावांमध्ये पसरली कारण प्रत्येक तरुण निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता, वांगचुक यांना सोडावे व शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी होती. या पिढीला आपण निकामी, आळशी, आभासी जगात बुडून गेलेली, वास्तवाची जाणीव नसलेली (हिंदीमध्ये निकम्मे) व आणखी काय काय दूषणे देऊन हिणवले होते. ही तरुण पिढी निर्भयपणे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून, कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा किंवा सामाजित संस्थेपेक्षा अधिक आक्रमकपणे आंदोलन करू शकेल असा कुणालाही विश्वास नव्हता, सरकारला तर निश्चितच नव्हता. लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे, त्यांच्यापैकी कुणीही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते, त्यांच्यापैकी अनेकांना केंद्रीय मंत्री म्हणजे काय व केंद्र सरकारची ताकद किती असते हेच माहिती नव्हते, अर्थाच त्यांना त्याची फिकीरही नव्हती व हेच समजून घेण्यात सरकार अपयशी ठरले. काहीवेळा, जेव्हा तुम्हाला तुमच्या शत्रूची ताकद माहिती नसते व तरीही तुम्ही त्याच्याशी लढण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देता तेव्हा ती चांगली गोष्ट असते कारण तेव्हा तुम्ही निर्भयपणे लढता तर शत्रू आश्चर्यचकित होऊन जातो. आणि कोणत्याही युद्धामध्ये आश्चर्याचा धक्का हे सर्वात प्रभावी शस्त्र असते जे जंतर मंतरवर झाले, हा माझ्या लेखाचा विषय आहे.
पोलीस बळाचा वापर करणे, इंटरनेट बंद करणे, रस्ते अडवणे व सार्वजनिक वाहतूक बंद करणे अशाप्रकारच्या सरकारने वापरलेल्या क्लुप्त्या जुन्यापुराण्या होत्या. या पिढी त्याला बळी पडली नाही व त्यांनी सरकारला प्रत्येक आघाडीवर मात देण्याचा मार्ग शोधला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकारला शेवटपर्यंत समजले नाही की प्रत्यक्षात ते कुणाविरुद्ध लढत आहे. कारण वांगचुक हूपर्सचे (कृपया गूगल करा) प्रतिनिधीत्व करतात, त्यांच्यासाठी जे लढत होते ते त्यांच्या नातवंडांच्या वयाचे आहेत. खरेतर, या वर्गातील पालक बहुतेक सत्तेत असलेल्या सरकारचे समर्थक आहेत, ही सगळी शिकलेली मुले होती (बहुतेक) व तरीही त्यांना सरकारप्रति नाराजी (राग नाही) दर्शवली, यामागचे कारण म्हणजे ते कोणत्याही पक्षाचे समर्थक किंवा विरोधक आहेत हे नव्हते तर सिस्टम (यंत्रणा) त्यांच्या भविष्याची काळजी करत नाही, हे होते. सध्या सत्तेवर असलेल्या सरकारने व भविष्यात सत्तेवर येणाऱ्या सरकारने याची दखल घेतली पाहिजे, कारण जेव्हा नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंका यासारख्या शेजारी देशांमध्ये तरुणाईच्या असंतोषाचा उद्रेक झाला, तेव्हा आपले नेते व समाजातील ज्येष्ठही म्हणाले की, या देशांच्या लहान आकारामुळे असे झाले. ज्या देशांमध्ये तरुणांची संख्या जवळपास पन्नास कोटींहून अधिक आहे तिथे अशी निदर्शने शक्य नाहीत. परंतु, इथेच आपण निसर्ग नियम समजून घेण्यात कमी पडलो की आपण कुणालाही किंवा कशालाही संख्या, वय, संपत्ती किंवा शिक्षण यासारख्या गोष्टींनी वर्गीकरण करून गृहित धरू शकत नाही. यापैकी बहुतेक निदर्शक एखाद्या मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे काय फरक पडेल असा विचारही करत नव्हते कारण आता ती समस्याच नव्हती, त्यांना केवळ सरकार नावाच्या यंत्रणेने त्यांचा टाहो ऐकावा अशी इच्छा होती व हा टाहो थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मंत्र्यांचा राजीनामा. जेव्हा एखादे लहान मूल एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करते व त्याला जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत तुम्ही काही केले तरीही मूल आपला हट्ट सोडत नाही, त्याचप्रकारे हे होते, सरकार हेच समजून घेण्यात अपयशी ठरले कारण त्याचा आत्तापर्यंत सामना अशा प्रतिस्पर्ध्याविरुद्ध झाला नव्हता.
हा धोक्याचा इशारा आहे, कारण आंदोलन व मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडून त्याचा यशस्वी शेवट झाल्यामुळे आता या मुलांना माहिती आहे की त्यांनी पूर्ण जोर लावून विरोध केला तर पालकांनाही (मायबाप सरकार) हात टेकावे लागतात व मुलांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात, मग त्या कितीही विचित्र असतील. राजीनामा योग्य होता किंवा अयोग्य याविषयी मी काहीही मतप्रदर्शन करत नाही. एक गोष्ट मात्र नक्की, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडले पाहिजेत कारण एकीकडे खाजगी नोकरीमध्ये हजारो पदे रिक्त आहेत व दुसरीकडे लाखो तरूण बेरोजगार आहेत, म्हणजेच निश्चितच काहीतरी चुकत आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तीला असे वाटते की त्याला अतिशय कमी मोबदला मिळत आहे व नोकरी देणारा विचार करत असतो की उमेदवार ज्या पगाराची अपेक्षा करत आहे, तो किंवा ती त्यासाठी योग्य नाही, अशी परिस्थिती आहे. त्याचवेळी सरकारी शाळा पुरेशी विद्यार्थी संख्या मिळावी यासाठी झगडत आहेत व दुसरीकडे बक्कळ फी आकारणारी नवीन शाळा रोज उघडत आहे, अगदी लहान गावांमध्येही अशी परिस्थिती आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची शुल्के अगदी उच्च उत्पन्न गटातील पालकांच्याही आवाक्याबाहेरची व्हायला लागली आहेत असे विद्यार्थ्यांना वाटू लागले आहे, तर दुसरीकडे नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात-आकड्यांच्यावर गेली आहे. तुम्ही डॉक्टर झालाच, तरीही लगेच चांगले उत्पन्न मिळू लागणे काही दृष्टिपथात दिसत नाही. प्रत्येक व्यवसायाचीही ही कथा आहे, पाश्चात्य देश बाहेरील देशातून येणाऱ्यांसाठी नोकऱ्यांकरता त्यांचा फास आवळत आहेत (विशेषतः भारतीयांसाठी), त्यामुळे हा पर्यायही आता सोपा राहिलेला नाही व हे सर्व नैराश्य किंबहुना भीती, जंतर मंतरवर दिसून आली व सध्याच्या व पूर्वीच्या सरकारांनी एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी जी अनास्था दाखवली त्याचाच हा परिणाम आहे असे मला वाटते. वैयक्तिक आघाडीवर, मीदेखील माझा धडा शिकलो (ज्याची किंमत सरकारला मोजावी लागली), की तुम्ही कितीही आरामात असला तरी कधीही तुमच्या व्यवसायाच्या कोणत्याही घटकाविषयी अनभिज्ञ राहू नका, मग तो ग्राहक असेल, बाजार असेल किंवा नशीब, नेहमी दक्ष राहा व कधीही तुमचा अहंकार तुमच्या व्यवसायाच्या आड येऊ देऊ नका. झुरळांचा पुढील प्रवास अधिक अवघड असेल कारण जेन झीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, सातत्याचा अभाव व एकाग्रता किंवा संयम नसल्यामुळे ते समाज माध्यमांवर वीस सेकंदही वाट पाहात नाहीत. या मुलांना गुंतवून ठेवणे व बराच काळ योग्य मार्गावर ठेवणे हे सोपे काम नाही व एक सुनियोजित रचना असल्याखेरीज ते शक्य नाही, असे मला वाटते, जे सीजेपीसाठी खरे आव्हान असेल.
आता या कथेच्या नायकाविषयी (किंवा खलनायकाविषयी, तुम्ही त्याला काहीही म्हणा) म्हणजे अभिजीत दिपके याच्याविषयी जो स्वतः जेन झी नाही परंतु तुम्ही मला विचारलत की अभिजीत आणि भगिरथ, गौतम बुद्ध, सर आयझॅक न्यूटन, शिवाजी महाराज, सावरकर व महात्मा गांधी या सगळ्यांमध्ये समान धागा काय आहे माहिती आहे? या सगळ्यांनी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याचे धाडस दाखवले, समाजाच्या विश्वासाला आव्हान दिले, कुणीतरी येऊन पुढाकार घेईल अशी वाट ते पाहात बसले नाहीत व आपणहून नेतृत्व केले, एकोणतीस वर्षांच्या अभिजीत दिपकेनही हेच केले व म्हणूनच तो माझ्यासाठी विशेष आहे. मी कदाचित त्याची विधाने किंवा विचारांशी सहमत नसेन परंतु मी त्याच्या धाडसाचा आदर करतो कारण किती लोक कुणाचाही पाठिंबा नसताना अमेरिकेतील आराम सोडून दिल्लीतील रस्त्यांवर येऊन बसतील (अक्षरशः) व केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतील, एकही नाही, मी खरोखरच सांगतोय एकानेही असे केले नसते, म्हणून तो विशेष आहे. तुम्ही माझ्याशी असहमत असाल तर, अभिजीत व त्याच्या सहकाऱ्यांनी काय केले ते पाहा, त्यांनी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याव्यतिरिक्त, देशातील प्रत्येक विरोधी पक्षाला सीजेपीला पाठिंबा देण्यास भाग पाडले कारण सीजेपीने असे काहीतरी करून दाखवले जे हे सगळे पक्ष एकत्रितपणेही करू शकले नव्हते, व ते म्हणजे, तरुणांना संघटित करणे व कोणताही आर्थिक लाभ नसताना रस्त्यावर उतरवणे. आजकालच्या जगामध्ये सत्ताधारी पक्षाच्या तिकीटावर लोकसभेची जागा लढवतानाही प्रचारासाठी कार्यकर्ते गोळा करताना पैसे लागतात व इथे, लाखो लोकांनी कोणताही आर्थिक लाभ नसताना, तो कोणत्याही स्वरूपात मागितला जात नसताना आंदोलन केले, दिपकेने हे करून दाखवले व म्हणूनच तो विशेष आहे. त्याचा व सीजेपीचा पुढचा प्रवास अधिक रोचक असणार आहे कारण आज शिक्षण व्यवस्थेतील नीटसारख्या एखाद्या भागासाठी आंदोलन करण्यात आले परंतु ते केवळ हिमनगाचे एक टोक आहे, अजून बऱ्याच सुधारणा होण्याची गरज आहे व त्यासाठी केवळ निदर्शने पुरेशी नाहीत. अभिजीत, कधीकाळी जर हा लेख तुझ्या वाचनात आला तर लक्षात ठेव, तुझे आदर्श बाबासाहेब आंबेडकरही सरकारमध्ये सहभागी होऊनच दलितांचे भविष्य बदलू शकले, केवळ निदर्शने करून नव्हे. व्यवस्था बदलण्यासाठी तुम्ही व्यवस्थेचा भाग होणे हाच योग्य मार्ग आहे. शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अभिजीतच्या पालकांचे कौतुक, कारण त्यांचा तरुण मुलगा एकटाच अख्ख्या भारत सरकारच्या विरोधात उभा ठाकला असताना, त्यांना कशातून जावे लागले असेल विचार करा. जे आज, शिवाजी महाराज, श्रीराम व आंबेडकर यांचे फलक उभारतात, त्यांच्यापैकी किती जण ज्या मार्गावर या व्यक्ती चालल्या त्यावर त्यांचा मुलगा किंवा मुलगी चालताना पाहू शकतील, आपल्यापैकी कुणी हे करू शकते का, हा प्रश्न स्वतःला विचारा. या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आणखी अभिजीत होवोत, कारण त्यानंतरच थोडी आशा असेल, एवढे बोलून निरोप घेतो!
संजय देशपांडे
www.junglebelles.in
www.sanjeevanideve.com











टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा