आग दुर्घटना आणि समाज!!
आग दुर्घटना आणि समाज!!
“प्राण्यांना अन्न, पाणी व निवारा लागतो. माणसांनाही या सगळ्या गोष्टी लागतात, परंतु त्याचसोबत आपल्याला विस्तव(आग) सुद्धा लागतो.” ― रिचर्ड डब्ल्यू राँगहॅम
“तुम्ही जोपर्यंत आग नियंत्रणात ठेवू शकता तोपर्यंतच तुमची तिच्याशी मैत्री असते! तिच्यावर नियंत्रण नसेल, तर तुमच्यासमोर एक सशक्त शत्रू आहे!” ― मेहमत मूरत इल्दान
"मला आगीविषयी एक गोष्ट निश्चितपणे माहिती आहे, आग निष्ठुर असते”… मी.
राँगहॅम यांनी इतर सर्व प्राणी व माणसांमधील फरक किती नेमक्या शब्दात मांडला आहे, आपण आपले आयुष्य अधिक सुखकर बनवण्यासाठी आगीचा वापर करतो तर इतर सर्व सजीव प्रजाती आगीपासून दूरच राहणेच पसंत करतात, ही गोष्ट आपल्या कधीही लक्षात येत नाही किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मेहमत, यांचे विद्वत्तापूर्ण शब्द म्हणजे जणू पॉवर प्लेमधील षटकेच असतात (कृपया गूगल करा), त्यातून त्यांनी आपल्या अज्ञानाबद्दल आपल्याला नेमक्या शब्दात इशारा दिला आहे. मी केवळ त्यांच्या ज्ञानातून काढलेला निष्कर्ष मांडला आहे, म्हणजे आग एकच गोष्ट जाणत, जवळ आलेली गोष्ट जाळून टाकणे! तुम्ही जर विचार करत असाल की ही आगीची गाडी कोणत्या दिशेने चालला आहे (माफ करा, हा वाईट विनोद होता), तर गेल्या महिन्यात दिल्लीतील एका हॉटेलमध्ये आग लागून दुर्घटना झाल्याची बातमी होती (तुम्ही ताजी किंवा अगदी अलिकडची बातमी म्हणून शकता), ज्यामध्ये जवळपास वीस लोक मृत्यूमुखी पडले. मी कोणत्याही दुर्घटनेची बातमी अतिशय काळजीपूर्वक वाचतो, विशेषतः जेव्हा ती इमारतींशी संबंधित असते कारण तो माझ्या व्यवसायाचा भाग आहे (बांधकाम व्यावसायिक/स्थापत्य अभियंता). मी त्या घटनेविषयी सर्व वर्तमानपत्रांमध्ये वाचले व त्याविषयी (लेख) लिहीण्याचे ठरवले. परंतु माझ्या जिव्हाळ्याच्या (वाघ, क्रिकेट) इतर काही विषयांमुळे, आगीचा मुद्दा मागे पडला. त्यानंतर मागच्या आठवड्यात म्हणजे जून महिन्यात आगीच्याच एका घटनेचा मथळा होता, ती दुर्घटना होती हे वेगळे सांगायची गरज नाही. ही लखनऊमधील व्यवसायिक कारणांसाठी वापरली जाणारी इमारत होती ज्यामध्ये गेमिंग स्टुडिओ, प्राण्यांचा दवाखाना होता, या दुर्घनेतही अनेकांचा जीव गेला. म्हणून मी इतर सर्व विषय बाजूला सारले (सुदैवाने राजकारणाविषयी मी फारसे लिहीत नाही व मला फुटबॉल आवडत असला तरीही मी त्याचा निस्सीम चाहता नाही) व लेख लिहीताना मेहमत व राँगहॅम यांची मदत घेतली.
तर आता तुम्हाला अंदाज आला असेल की हा लेख आग लागून झालेल्या अपघातांविषयी (हा योग्य शब्द आहे असे मला वाटत नाही) दुर्घटनांविषयी व आपल्या त्याबाबतच्या दृष्टिकोनाविषयी आहे. मी सुरुवात करण्यापूर्वी, मी तुम्हाला एक काही साधे प्रश्न विचारतो, तुम्ही महिन्यातून किती वेळा चित्रपट बघायला किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता? तुमच्यापैकी किती जण कोठल्याही कार्यालयात कामाला जातात? तुम्ही आठवड्यातून किती वेळा कोणत्याही व्यावसायिक आस्थापनेला कामासाठी किंवा सहज भेट देता? तुमच्यापैकी किती जणांचे उत्तम गृहसजावट केलेले घर आहे? आणि हो, तुम्ही किती वेळा बाहेरगावी प्रवास करता व अशा प्रवासांमध्ये तुम्ही कुठे राहता? मला खात्री आहे की याची उत्तरे, महिन्यातून एकदा आम्ही चित्रपट पाहायला जातो, आठवड्यातून एकदा आम्ही बाहेर खायला जातो, आपल्यापैकी बहुतेक जण कोणत्यातरी कार्यालयात काम करतात, व आपल्यापैकी बहुतेकांनी थोडीफार गृहसजावट म्हणजे कपाटे, भिंतींचे पॅनलिंग, फॉल्स सिलिंग वगैरे करून घेतलेले आहे. आपल्यापैकी बरेच जण कामामुळे प्रवास करतात व आपल्यापैकी काही जण नशीबवान लोक पर्यटक म्हणून प्रवास करतात, मग ते वन्यजीवन असो किंवा साहसी सफर किंवा सहज विरंगुळ्यासाठी व मौजमजेसाठी केलेली भटकंती, बहुतेकवेळा आम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये राहतो अशी उत्तरे मला मिळतील व अगदी काही वर्षांपूर्वी माझेही हेच उत्तर असले असते.
आता, दुसरे काही प्रश्न, तुम्ही कोणत्याही चित्रपटगृहात किंवा उपाहारगृहात जाताना आधी किंवा किमान एकदा तरी काय पाहता? दररोज तुम्ही कामावर येता तेव्हा तुम्ही सर्वप्रथम कुठल्या गोष्टीचा विचार करता व तुम्ही कार्यालयातून बाहेर पडताना सर्वात शेवटी कोणती गोष्ट तपासता? तुमच्या घराची अंतर्गत सजावट करताना तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करता? तुम्ही जेव्हा कामासाठी किंवा मजेसाठी एखादे हॉटेल आरक्षित करता तेव्हा आरक्षण करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टी तपासता व हॉटेलमध्ये प्रत्यक्ष प्रवेश करताना तुम्ही काय तपासता?
याचे उत्तर असेल, आम्ही जेव्हा कुठल्याही चित्रपटगृहामध्ये किंवा हॉटेलमध्ये जातो, आम्ही हॉटेलची वातानुकूलन यंत्रणा व्यवस्थित काम करत आहे का हे तपासतो, सजावट, स्वच्छ, प्रसाधनगृहांची स्थिती तपासतो, तसेच हॉटेल मधले एकंदर वातावरण, एवढेच काय काटे-चमचेही बघतो. कोणत्याही व्यावसायिक इमारतीला आपण जेव्हा कामासाठी भेट देतो, तेव्हा आपण अंतर्गत रचना/सजावट व लॉबी तपासतो, त्याचप्रमाणे अंतर्गत सजावटीसाठी किती खर्च करण्यात आला आहे हे जाणून घेतो जेणेकरून त्या जागेच्या मालकाची अभिरुची जाणून घेता यावी. जेव्हा आपण आपल्या कार्यालयात येतो आधी आपले इंटरनेट/वाय-फाय सुरू आहे का हे आपण तपासतो व जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा तेव्हा आपली वातानुकूलन यंत्रणा, तसेच दिवे बंद आहेत का हे तपासतो. आपण जेव्हा कोणतेही हॉटेल कामाचा दौरा किंवा विरंगुळ्यासाठी आरक्षित करतो तेव्हा आपण ठिकाण, खोल्यांचा आकार, अंतर्गत सजावट, ब्रेकफास्टसाठीचे विविध पदार्थ, मोफत वायफाय, टीव्ही तपासतो. आपण जेव्हा या गोष्टी प्रत्यक्ष तपासतो तेव्हा आपण संकेतस्थळावर जे पाहिले आहे व जे प्रत्यक्ष दिसत आहे त्याची तुलना करतो, बस्स! मला अशाच प्रकारची उत्तरे मिळतील (जर कुणी उत्तर लिहीण्याची तसदी घेतली तर) व मी सुद्धा काही वर्षांपूर्वी हेच केले असते. तुम्ही विचार करत असाल की आग दुर्घटनेशी याचा काय संबंध आहे, तर वरील सर्व प्रश्न नेमके यासंदर्भातच विचारण्यात आले आहेत व मला खात्री आहे या संभाव्य उत्तरांमध्ये या ठिकाणी असण्यातील सर्वात महत्त्वाचा भाग समाविष्ट असणार नाही व तो म्हणजे त्या जागेची अग्नि सुरक्षा, ज्याविषयी आपण अनभिज्ञ आहोत, निष्कळजी आहोत किंवा आपल्यामध्ये अति आत्मविश्वास आहे, माझ्या लेखाचा हाच विषय आहे.
सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे (म्हणजे भारतीय) आपल्यामध्ये अतिआत्मविश्वास ठासून भरला आहे, ज्याला आपण आपली हुशारी समजतो व आपण पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो मग, त्यासाठी आपल्याला आपल्या जीवाची किंमत मोजावी लागली तरी आपली हरकत नसते. म्हणूनच वर उल्लेख केल्याप्रमाणे घर, कार्यालय, हॉटेल, सिनेमा, उपाहारगृह, व्यावसायिक जागा या ठिकाणी अग्नि सुरक्षा हे आपल्या प्राधान्य यादीत नसते. मी विचारलेल्या वरील सर्व प्रश्नांना एकच योग्य उत्तर असले पाहिजे, ते म्हणजे एखाद्या जागेला भेट देताना किंवा ती आरक्षित करताना योग्य अग्नि सुरक्षा असली पाहिजे व जर आग लागली किंवा तशाच प्रकारची काही आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर काय करायचे याची माहिती असली पाहिजे. दुसरे उत्तर असले पाहिजे, मी अशा जागेची वैधता तपासेन, मग ते हॉटेल असो किंवा ॲनिमेशनचा प्रशिक्षण वर्ग किंवा एखादे उपाहारगृह किंवा चित्रपटगृह असो. हे कुणीही तपासत नाही कारण आपण जन्मतःच अग्निरोधक आहोत आपण जिथे बसलेलो आहोत, जेवत आहोत, काम करत आहोत किंवा झोपलेलो आहोत तिथे असे काहीही होणार नाही असे आपल्याला वाटते. नेमक्या याच दृष्टीकोनामुळे दिल्लीच्या हॉटेलमधील दुर्घटना, लखनऊच्या ॲनिमेशन स्टुडिओतली व प्राण्यांच्या दवाखान्यात लागलेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये पीडितांचे जीव गेले. मला माहिती आहे मृतांचे नातेवाईक, तसेच अनेक वाचकही माझ्या लेखातून काय निष्पन्न होणार आहे म्हणून माझ्या नावाने बोटे मोडतील. परंतु तुमच्या भावनांविषयी पूर्णपणे आदर राखत असे सांगावेसे वाटते की एक म्हणजे हा लेख काही कायदा नाही किंवा निष्कर्षही नाही, जर आणखी दुर्घटना होऊ नयेत असे आपल्याला वाटत असेल ज्या आपल्या अज्ञानामुळे होतात तर हे अनेक तथ्यांपैकी केवळ एक तथ्य आहे. तुम्ही म्हणाल की सरकार काय करत होते, आग भडकेपर्यंत अग्नि सुरक्षा दल काय करत होते, जेथे अग्नि सुरक्षेच्या कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नाही अशा इमारतींना परवानगीच का दिली जाते, अशी ही यादी लांबलचक आहे. परंतु माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला अशा अवैध हॉटेलमध्ये खोली आरक्षित करायला किंवा अशाच एका क्लासमधे स्वतःची नावनोंदणी करायला कुणी सक्ती केली आहे, जेथे अग्नि सुरक्षिततेचे कोणतेही नियम अस्तित्वात नाहीत हा माझा प्रश्न आहे. मी हा प्रश्न का विचारतो आहे कारण हा तुमचा जीव आहे जो आग लागल्यामुळे जाऊ शकतो, त्यात हॉटेलचा मालक किंवा चित्रपटगृहाचा मालक, प्रशिक्षण वर्गाचा मालक, इमारतीचा मालक किंवा सरकार या कुणाचाही जीव जाणार नाहीये, अर्थात स्वतःचे काम न केल्याबद्दल त्यांना शिक्षा मिळू शकते. केवळ तुम्ही घाम गाळून मिळवलेला तुमचा कष्टाचा पैसा ज्या जागी तुम्ही खर्च करणार आहात, त्या संबंधित जागेचे अग्नि सुरक्षा निकष तपासण्याची तसदी न घेतल्यामुळे, आगीची सर्वाधिक किंमत कुणी मोजली तुम्ही किंवा जागेच्या मालकाने किंवा सरकारने, त्यानंतर तुम्हाला अग्नि दुर्घटना व त्यामध्ये गमावलेले जीव याविषयी माझा दृष्टिकोन समजेल.
मी जेव्हा, वर उल्लेख केलेल्या अशा कोणत्याही जागेमध्ये प्रवेश करतो, विशेषतः गर्दीच्या जागी उदाहरणार्थ चित्रपटगृह किंवा पब, सर्वप्रथम मी अग्निशामक साधनांची जागा म्हणजे आग विझवण्यासाठी पाण्याची वाहिनी, अग्निशामक यंत्र इत्यादी. त्यानंतर मी आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग व तिथपर्यंत कसे पोहोचायचे हे पाहतो व त्यानंतर एखादे उपाहारगृह असेल तर कुठे बसायचे याचा निर्णय मी घेतो. हे ऐकायला विचित्र वाटेल व मला भयगंडाने पछाडल्यासारखे वाटेल परंतु तुम्ही अगदी दररोज विमानाने प्रवास करत असला तरीही ते तुम्हाला सुरक्षा प्रात्यक्षिक बघायला लावतात तसेच बाहेर पडण्याचे आपत्कालीन मार्ग व त्यांचा वापर कसा करायचा ते दाखवतात, बरोबर? म्हणूनच, एखादा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यावसायिक त्याच्या जागेवर अग्नी सुरक्षेसाठी सोयी करण्यात अपयशी ठरला म्हणून तुम्हाला या मूलभूत गोष्टी तपासण्यापासून कुणी रोखले आहे, ज्यामुळे तुमचा जीव वाचू शकतो, हा प्रश्न मला तुम्हाला सर्वांना विचारावासा वाटतो.
तुम्ही थोडेसे तपासले तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटणार नाही की ज्या अग्नि दुर्घटनांमध्ये लोकांचे जीव गेले अशा बहुतेक इमारती किंवा जागा अवैध होत्या, म्हणजे स्थानिक सक्षम प्राधिकरणाकडून, उदाहरणार्थ पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेकडून योग्य त्या परवानगीशिवाय बांधलेल्या होत्या किंवा उभ्या होत्या. त्यांच्याकडे आगीसाठी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र नव्हती, आग लागल्यास अग्निशामक यंत्रणा नव्हती यात काही आश्चर्य नाही. तसेच जी व्यक्ती त्यांच्या इमारतीसाठी कोणत्याही परवानग्या घेण्याची तसदी घेत नाही, ती कोणत्या दर्जाचे काम करत असेल. कोणत्याही इमारतीमध्ये आपोआप आग लागत नाही. सामान्यपणे, खराब दर्जाच्या तारांमुळे शॉर्ट सर्किट होते जे आगीला कारणीभूत ठरते व अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित नसेल किंवा धूर शोधणारी यंत्रे नसतील किंवा तत्सम उपाययोजना नसतील तर आग लागली आहे याची तुम्हाला जाणीव होईपर्यंत अशा इमारतीमधील रहिवाशांना फार उशीर झालेला असतो. तुमच्यामध्ये थोड्या संयम असेल व स्वतः जीव पणाला लावून थोडे जास्त पैसे वाचवण्याची तुमची हाव नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असेल तर हे सगळे टाळता आले असते. त्याऐवजी सरकारला खडे बोल सुनावणे किंवा अशा अवैध इमारती अस्तित्वा कशा आल्या असे प्रश्न विचारणे, कारण तुमचा जीव गेल्यानंतर अशा प्रश्नांचे व त्यांच्या उत्तरांचे काही मोल नसते, बरोबर?
काही अनोळखी लोकांच्या अवैध इमारतींना का दोष द्यायचा, अगदी आजही आपल्या स्वतःच्या घरामध्ये व्यवस्थित अग्निशमन यंत्रणा आहे का हे किती जणांनी तपासले आहे, एकानेही नाही, हे माझे उत्तर आहे. आपण उंची गृह सजावटीवर लाखो रुपये खर्च करतो, परंतु आपण प्रत्येक खोलीमध्ये एक अग्नि शामक यंत्र ठेवायला विसरतो. अनेक सदनिकांमध्ये मी पाहिले आहे की पाणी फवारण्यासाठीच्या पाईपच्या तोट्या झाकून टाकलेल्या असतात कारण अंतर्गत सजावट करणाऱ्याच्या मते त्या दिसायला खराब दिसतात. इमारतीच्या नियमांनुसार 24 मीटरपेक्षा अधिक उंची असलेल्या प्रत्येक इमारतीमध्ये, तिचा आकार व उंचीनुसार अग्नि शमन यंत्रणा असली पाहिजे. परंतु अगदी दुमजली इमारतीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकतात व त्यासाठी तुम्ही कुणाला दोष द्याल, स्वतःलाच, बरोबर? किंबहुना, माझ्या लेखाचे हेच कारण आहे की जबाबदार नागरिक व माणूस म्हणून आपण काही मूलभूत काळजी व खबरदारी घ्यायला सुरुवात केली, तर आग लागली तरीही तुम्ही त्यात बळी पडणार नाही. त्यासाठी मग ती इतरांची इमारत असो किंवा तुमचे स्वतःचे घर किंवा कार्यालय तुम्ही जबाबदारी घेणे व त्यानुसार पावले उचलणे आवश्यक आहे. तर यासंदर्भातल्या काही सूचना आहे ज्या तुम्ही “आगीसंदर्भात 10 आज्ञा” म्हणून आत्मसात कराव्यात, तुम्ही त्यांचे पालन केले तुमचे आयुष्य अधिक चांगले व दीर्घ होईल हे नक्की, तर या आज्ञा अशा आहे …
1. तुम्ही कामासाठी किंवा मनोरंजनासाठी कुठल्याही जागी भेट देताना किंवा राहताना (हॉटेलची खोली), तिची वैधता व परवानग्या तपासा.
2. त्या जागेमध्ये पाळल्या जात असलेल्या अग्नि रोधक नियमांविषयी प्रश्न विचारा व त्यानंतरच हॉटेलची खोली आरक्षित करा.
3. चित्रपटगृह किंवा उपाहारगृह यासारख्या गर्दीच्या बंदिस्त जागांना भेट देताना, अग्निशामक यंत्रणा, आग लागल्यास बाहेर पडण्याच्या मार्गाची सोय पाहा व तुम्ही त्या जागी असताना नेहमी लक्षात ठेवा.
4. नेहमी आगीसाठी आपत्कालीन मार्ग जेथे असेल ज्याच्याजवळ बसण्याची जागा निवडा व तुमच्या पर्समध्ये किंवा बॅगमध्ये ओले टिश्यू ठेवा, जर आग लागली तर अशा गोष्टी फार कामात येतात.
5. तुमच्या सेल फोनमध्ये नेहमी आणीबाणीच्या काळात संपर्क करायचे क्रमांक एकदा स्पर्श करून कॉल करण्यासाठी साठवून ठेवा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या लोकेशनचे सेटिंग सुरू ठेवा. म्हणजे आग लागली तर तुम्ही नेमके कुठे आहात याचा लोकांना माग काढता येईल.
6. तुम्ही कार्यालयामध्ये काम करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर वेळोवेळी अग्नि लेखापरीक्षण व अग्निशमन कवायती करा म्हणजे तुम्ही तसेच तुमचे सहकारी अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी सज्ज असाल व आग लागल्यास काय करायचे हे तुम्हाला माहिती असेल,
7. तुमच्या निवासी इमारतीमध्येही वेळोवेळी अग्नि लेखापरीक्षण करून घ्या, जर तुमची सोसायटी ते करत नसेल तर त्यांना त्याविषयी लेखी जाब विचारा व सोसायटी अशा दृष्टिकोनाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना कळवा.
8. तुमच्या सदनिकेमध्ये बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या अग्नि सुरक्षेच्या सोयींमध्ये काहीही फेरबदल करू नका, जर त्याने त्या दिलेल्या नसतील तर सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी त्याला त्या मागा.
9. बांधकामाच्या नियमांनुसार तुमच्या घरासाठी विशेष अग्निशमन तरतुदी आवश्यक नसल्या तरीही, आगीच्या धोक्याविषयी, प्रत्येक खोलीमध्ये फायर अलार्म/सेन्सर लावून घेण्याविषयी एखाद्या तज्ज्ञाचे मार्गदर्शन घ्या. एक लक्षात ठेवा कोणतीही आग इशारा देऊन किंवा नियोजित वेळी सुरू होत नाही, त्यामुळे ती वेगाने नियंत्रणात आणण्यासाठी ती कधी सुरू होते हे तुम्हाला माहिती असले पाहिजे.
11. आगीसाठी विमा काढून ठेवा कारण अशा सर्व खबरदाऱ्या घेतल्यानंतरही, अपघात होऊ शकतात व आगीचा विमा हा आगीमुळे होणारे काही नुकसान भरून काढण्याचा योग्य मार्ग आहे. त्याचप्रमाणे आगीच्या विम्यातील अटी व शर्ती तपासून घ्या कारण हा किचकट दस्तऐवज असतो, त्यामुळेच तुम्ही जेव्हा नुकसान झाल्यानंतर नुकसानभरपाईचा दावा करता तेव्हा शब्दातील एक लहानशी चूकही तुम्हाला अतिशय महागात पडू शकते.
मी जाणीवपूर्वक अग्नि दुर्घटनेसंदर्भात, अशा घटना थांबवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हे सरकारला सांगत नाहीये, कारण ते म्हणजे एखाद्या चेहऱ्या नसलेल्या व्यक्तीशी बोलण्यासारखे आहे. सरकारमध्ये प्रत्येकाला काय केले पाहिजे हे माहिती आहे व अग्नि सुरक्षिततेसंदर्भात पुरेसे नियम आहेत, परंतु तरीही कुणीही जबाबदारी घेत नाही व त्यावर पावले उचलत नाही, त्यामुळे असो. मित्रांनो, अग्नि हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे व आपल्या सगळ्यांसाठी तो आवश्यक आहे परंतु त्यासाठी आपल्याला तो योग्यप्रकारे नियंत्रणात ठेवता आला पाहिजे. नाहीतर तो केवळ एकच गोष्ट जाणतो ती म्हणजे, आपल्या मार्गात जे काही येते ते भस्मसात करणे व आपल्याला निश्चितच अशा अनियंत्रित आगीच्या मार्गात यायचे नाही, एवढा इशारा देऊन निरोप घेतो!
-
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा