बांधवगड टु गुंजेवाही(ताडोबा); वाघ आणि मनुष्य !!






































































































बांधवगड  टु गुंजेवाही(ताडोबा); वाघ आणि मनुष्य !!

“आपल्याकडे कोक विरुद्ध पेप्सी एवढीच जैवविविधता शिल्लक राहणार आहे” … चुक पलाहनिउक.
“आपल्याकडे आता जैवविविधता वाचवण्याचे सर्वात स्वार्थी कारण आहे – ते म्हणजे आपले स्वतःचे कल्याण.” … डॅन सॅलॅडिनो

“आम्हाला वाघ नको आहेत, तुम्हाला वाघ आवडत असतील तर आमच्या गावातून सगळे वाघ घेऊन जा व त्यांना तुमच्या शहरातच ठेवा” … ताडोबाजवळ 22 मे 26 रोजी एका वाघीणीने केलेल्या हल्ल्याविषयी इन्स्टाग्रामच्या पोस्टवर अशी टिप्पणी करण्यात आली होती.

“वाघाला निसर्गाचा असा शाप आहे की, इतर सर्व प्रजाती एकतर त्याचे सावज असतात किंवा शत्रू” … मी.
 
       माझ्या सर्वात आवडत्या जंगलांपैकी एक असलेल्या बांधवगढ अभयारण्याविषयीचा हा लेख मी आधी संजय दुबरी अभयारण्याविषयीच्या लेखासोबतच जोडणार होतो. परंतु तो लेख अतिशय मोठा (धुरंधर  सारखा) झाला व लोकांना एवढा मोठा लेख एकाचवेळी वाचायला लावणे म्हणजे मोठी शिक्षा ठरली असती. दुसरे म्हणजे मी जेव्हा माझ्या बांधवगढच्या दौऱ्याविषयी लिहायला सुरुवात केली तेव्हा वन्यजीवनातील दोन अतिशय दुःखद बातम्या आल्या. त्यातली एक म्हणजे पुजारी नावाचा वाघ बांधवगढमध्ये सीमेवरून झालेल्या संघर्षात मारला गेला, व ताडोबाजवळच्या गावांमध्ये एका वाघीणीने चार महिलांना ठार केले (माफ करा हा चुकीचा शब्द आहे, कारण ठार करणे यातून काय परिणाम झाला हे दिसून येते मात्र हेतू दिसून येत नाही पण भाषा माणसाने माणसांसाठी बनविली आहे,  असो) व मला बांधवगढविषयी माझे विचार लिहावेसे वाटले (म्हणजे भावना). मी काही फार  भावनाप्रधान व्यक्तीन नाही, त्याचप्रमाणे मला जंगलातील वास्तवाचे व वन्यजीवनाचे भान आहे. तिथे भावना बाजूला ठेवाव्या लागतात, तरीही आपण सजीव आहोत व तथाकथितपणे सर्वात प्रगल्भ आहोत. आपल्याला भाव-भावना आहेत, समाज माध्यमांच्या अल्गोरिदमच्या व एआय ट्रॅकिंगच्या कृपेने, माझ्या सेलवर या दोन्ही घटनांविषयीची छायाचित्रे व पोस्टचा महापूर आला होता. हा एवढा मारा होता की त्यामुळे माझी काही रात्रींची झोप उडाली. मला वाईट वाटले तरीही मला माहिती होते की हे दुःख पुजारी किंवा ताडोबातील वाघीणीसाठी व तिच्या बछड्यांसाठी तसेच ज्या महिलांनी त्यांचे आयुष्य गमावले त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही यामुळे आलेली निराशा किंवा असहाय्यतेतून आलेले आहे, म्हणूनच हा लेख लिहीत आहे.
      ठीक आहे, तर सर्वप्रथम काही चांगल्या गोष्टी कारण बांधवगढला भेट देणे हा नेहमीच अतिशय आनंद देणारा अनुभव असतो व ही जंगलातील आमच्या फॉरेस्टर ग्रुपची ट्रीप होती (वन्यजीवनाविषयीच्या माझ्या समविचारी मित्रांचा गट). आम्ही हॉटेल टायगर डेनमध्ये राहात होतो जे बांधवगढ शहरातील (आता ते गाव राहिलेले नाही) अगदी मुख्य रस्त्यावर आहे. मला वीस वर्षांपूर्वीचा येथील मुख्य रस्ता आठवतोय, त्यावर जेवणासाठी थोडेफार ढाबे व काही किराणा सामानाची दुकाने होती. सूर्य मावळल्यावर गाव पूर्णपणे शांत होत असे. तेव्हा या रस्त्यावर प्राण्यांचे इशारा देणारे आवाज ऐकू येत, कारण जंगलाच्या डाव्या बाजूला (उमरियाच्या दिशेने जाणाऱ्या) साधारण दोनशे मीटरवर कोअर क्षेत्राची सुरुवात होते. इथे आता आधुनिक उपाहारगृहे, उंची सुखसोयींनी युक्त दुकाने, सलोन व दारुची दुकाने सुद्धा आहेत. द टायगर डेनला जुन्या काळाचा रुबाब आहे कारण हे सर्वात जुन्या रिसॉर्टपैकी एक असून, अगदी मुख्य रस्त्यावर आहे. हॉटेलच्या चमूने माझे सुहास्य वदनाने स्वागत केले. तेथे दोन ऑल्सेशियन कुत्री होती जी कॉटेजच्या छतांवरून उड्या मारणाऱ्या माकडांना हुसकवायला ठेवली होती. या रिसॉर्टमध्ये अनेक जुनी झाडे आहेत जी वर्षानुवर्षे पक्षी व माकडांचे घर आहेत व खरेतर आम्हीच त्यामध्ये घुसखोर आहोत. अवती-भोवती उड्या मारणारे करड्या रंगाचे लंगूर, त्यांना हुसकवण्यासाठी भुंकणारी कुत्री पाहून मला विदर्भाच्या खामगावातील माझ्या गावाची आठवण झाली. अगदी पुण्याच्या कोथरुड भागात सुद्धा मी 90च्या दशकाच्या सुरुवातीला झाडांवर माकडे पाहिली आहेत. आता सगळी गाणी माकडे गेली आहेत व बहुतेक जुनी झाडेही. त्यामुळे टायगर डेनमध्ये माकडे पाहून खरोखरच आनंद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आम्ही बांधवगढमध्ये फिरायला सुरुवात केली. प्रत्येक तासाला तापमानचा पारा वाढत होता तरी, इथल्या मगधी व ताला विभागातल्या हिरव्या पट्ट्यांमुळे, इथला उन्हाळा ताडोबापेक्षा अधिक चांगला असतो (म्हणजे सुसह्य) असतो. मी बांधवगढमध्ये दिसलेले वाघांची संख्या नमूद करणे किंवा ती मोजणे थांबवले आहे कारण एक म्हणजे येथे जंगलात वाघ पाहण्यापेक्षाही बरेच काही अनुभवायला मिळते व दुसरे म्हणजे कोअर क्षेत्राचा अपवाद वगळता वाघांची हालचाल बदलत असते. म्हणजे, बांधवगढच्या सर्व चारही बाजूंनी जंगले व गावे आहेत, त्यामुळे आपपली सीमा राखू शकणारे प्रभावशाली वाघ वगळले, तर इतर वाघ पर्यटन क्षेत्राच्या आत-बाहेर ये-जा करत असतात, ज्यामुळे ते दिसल्यानंतरही त्यांना मोजणे अवघड होते. अलिकडच्या काळात, कोव्हिडनंतर, अनेक जंगली हत्तींनीही मगधी विभागाला त्यांचे घर बनवल्यामुळे इथली परिस्थिती अतिशय खडतर आहे. झाडांच्या तुटलेल्या फांद्या, वाळलेले गवताचे पट्टे व जंगलातील चौकींभोवती खणून ठेवलेले खड्डे (हत्तींनी रात्री या चौकींवर हल्ला करू नये यासाठी), आम्हाला यावेळी फारसे हत्ती दिसले नाहीत परंतु त्यांचे अस्तित्व अशाप्रकारे सर्वत्र जाणवत होते.
      वाघांच्या वाढलेल्या संख्येमुळे होणारी मुख्य समस्या म्हणजे, वाघीणी त्यांचे बछडे जेमतेम अठरा किंवा वीस महिन्यांचे असताना त्यांना लवकर सोडून जातात. याच कारणामुळे भारतामध्ये महत्त्वाच्या जंगलांमध्ये व भोवती माणसांवरील हल्ले किंवा वाघांचे मृत्यू वाढले आहेत व बांधवगढही या प्रकाराला अपवाद नाही. वन विभाग वाघांचे अभयारण्यांमध्ये संरक्षण करू शकतो परंतु संरक्षित जंगलांबाहेर त्याचे काही चालत नाही (दात व पंजे नसलेल्या वाघासारखे) व इथेही बहुतेकवेळा परिस्थिती तणावाची असते. दर दुसऱ्या दिवशी बिबटे किंवा वाघ मानवी वसाहतींमध्ये शिरल्याची, किंवा माणसांवर हल्ले केल्याची किंवा ते मारले गेल्याची दैनंकांमध्ये बातमी असते. प्रत्येकाच्या जगण्यासाठीची ही स्पर्धा असते ज्यामध्ये वाघांचे पराभूत होणे ठरलेले असते, जोपर्यंत आपण एकत्र बसून, त्यावर काही तोडगा काढत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे पर्यटनाच्यादृष्टीने अभयारण्यातील सुविधा, आपल्याला पर्यटन हवे असते परंतु आपण उद्यानाच्या आतमध्ये स्वच्छ प्रसाधनगृहांसारख्या सुविधा देत नाही. वरिष्ठ अधिकारी निधी देऊन, प्रसाधनगृहांसारख्या सुविधा बांधून देऊ शकतात, परंतु त्यांची देखभाल कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी करणे आवश्यक आहे जे दुर्दैवाने होताना दिसत नाही. यामुळे जागतिक पर्यटनाच्या नकाशामध्ये आपल्या देशाची अतिशय वाईट (म्हणजे खराब) प्रतिमा तयार होते. खितौली विभागामध्ये अतिशय सुंदर प्रसाधनगृहे बांधण्यात आली परंतु तिथे पाणी पुरवठा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कुलूप लावण्यात आले होते. दुसरीकडे पाणी पुरवठा होता परंतु टाक्या भरलेल्या नव्हत्या, परिणामी जंगलातील सर्व प्रसाधनगृहे अतिशय वाईट परिस्थितीमध्ये होती. आपण स्थानिक हॉटेल व्यावसायिकांना या प्रसाधनगृहांच्या देखभालीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आवाहन करू शकतो. यासाठी वन विभाग ज्याप्रमाणे सौर उर्जेवर चालणाऱ्या पाण्याच्या पंपांसाठी सौर पॅनलच्या देखभालीकरता परवाने देतो, त्याप्रमाणे या व्यक्तींनाही द्यावेत. सफारींशी संबंधित सर्व घटकांबाबत सेवा देण्यासाठी हा अतिशय मोठा सकारात्मक मुद्दा ठरू शकतो. सुदैवाने, हा लेख अशा कुणापर्यंततरी पोहोचेल जे त्यावर काही कारवाई करतील. मी जे पाहिले त्यानुसार जवळपास चाळीस टक्के पर्यटक विदेशी होते, जे आधीच आपल्या देशाला स्वच्छतेच्या बाबतीत नावे ठेवतात. मला असे वाटते प्रत्येक अभयारण्यामध्ये सर्व भागधारकांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक समिती असावी व काही ठराविक कार्यक्रम व मुद्द्यांवर दर महिन्याला तिची एक बैठक व्हावी, ज्यामध्ये जंगल/वन्यजीवनाच्या व्यापक कल्याणाचा समावेश होतो, ज्याद्वारे अनेक धोरणे तसेच समस्यांचे निराकरण करता येईल. त्याचवेळी अभयारण्याच्या व्यवस्थापनाने पर्यटकांशी त्यांच्या अनुभवांविषयी तसेच सूचनांविषयी नियमितपणे संवाद साधला पाहिजे, कारण यापैकी अनेक पर्यटकांना जगभरात सर्वत्र प्रवासाचा अनुभव असतो व यांनी दिलेल्या योग्य सूचनांवर विचार करून अंमलबजावणी करता येऊ शकते. मध्यप्रदेशातील अनेक जंगलांना भेट देण्याचा आणखी एक मुद्दा (म्हणजे अडथळा) म्हणजे दळणवळणाची सोय, कारण जंगले ही वन्यजीवनासाठी वरदान असली तरीही इथे विकास होण्यामध्ये ती अडथळा आहेत व त्यामुळे हवाई वाहतुकीसारख्या दळणवळणाच्या वेगवान माध्यमांवर परिणाम होतो. मध्यप्रदेश सरकारने हे ठिकाण व जंगलांच्या जवळपास असलेली ठिकाणे विमानाने जोडण्यासाठी हवाई कंपन्यांसोबत करार केले पाहिजेत (जे अतिशय महत्वाचे आहे), देशातील महत्त्वाच्या शहरांपासून पन्ना किंवा बांधवगढपर्यंत रस्त्याने ये-जा करण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो व यामुळेच अनेक पर्यटक या ठिकाणांना भेट देणे टाळतात. त्याचप्रमाणे हा यंत्रणेचाच भाग असला पाहिजे, केवळ एखाद्या अधिकाऱ्याला या सर्व गोष्टींमध्ये रस आहे म्हणून हे होऊ नये जी आपल्या शासकीय नोकरशाहीची मुख्य समस्या आहे. 
      माझ्यासाठी केवळ बांधवगढमध्ये असणे व तिथल्या विस्तीर्ण जंगलात फेरफटका मारणे एका निखळ आनंद असतो जो अशा अडथळ्यांमुळे कमी होत नाही, ज्याचा मी पुरेपूर आनंद घेतला. यातील सर्वोत्तम भाग म्हणजे रा नावाची वाघीण व तिच्या जवळपास वयात आलेल्या बछड्यांना पाहण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता आला. एक आई तिच्या वाढत्या बछड्यांची देखभाल घेताना, तसेच त्यांच्यापासून अंतर राखून राहताना, त्यांना स्वतः जगायला शिकवताना पाहणे विलक्षण अनुभव असतो. मी कधीही एखाद्या जलाशयाला लागून असलेला एखादा बंधारा पाहायचो, तेव्हा मला असे वाटायचे की एकेदिवशी मला अशा बंधाऱ्यावर उभ्या असलेल्या वाघाचे छायाचित्र घेता येईल, या चौकटीमध्ये जंगल पाठीशी असेल व पाणी पुढे असेल परंतु प्रत्येक वेळी वाघ आधीच पाण्यात शिरलेला असे किंवा पाण्यातून बाहेर पडलेला असे. या दौऱ्यापर्यंत मला असे छायाचित्र कधीच काढता आले नव्हते. आम्ही जलाशयावर वाट पाहात असताना रा वाघीणीचा एक किशोरवयीन बछडा बंधाऱ्याच्या मागून आला. एखादा मोठा वाघ असेल तर तो सामान्यपणे बंधाऱ्यावर रेंगाळत नाही व तातडीने पाण्यामध्ये प्रवेश करतो. परंतु हा किशोरवयीन वाघ होता व त्याच्या आईने त्याला नेहमीच सावध राहण्यास शिकवले असावे, त्यामुळे तो बंधाऱ्यावर वाट पाहात उभा राहिला त्यामुळे मला त्याचे छायाचित्र टिपण्याची पूर्ण संधी मिळाली व त्यानंतर तो सावकाश जलाशयात शिरला. जंगल प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या प्रकारे मला माझ्या इच्छेप्रमाणे छायाचित्र काढण्याची संधी कशी देऊ करते याचा विचार करून मी स्वतःशीच हसलो. अशा अनेक घटनांचा अनुभव घेऊन मी बांधवगढमधून बाहेर पडलो, हो आम्ही बांधवगढमध्ये असताना आणखी एक रोचक घटना घडली जी नेहमीप्रमाणे वृत्त माध्यमे व समाज माध्यमे यामध्ये चर्चिली गेली. एक इनोव्हा कार ज्याला राष्ट्रीय अभयारण्यामध्ये प्रवेश करण्याचा परवाना नाही त्या कारने थेट ताला विभागामध्ये प्रवेश केला व जेथे वाघ दिसत होता तिथपर्यंत पोहोचली. या घटनेमुळे अभयारण्याच्या व्यवस्थापनामध्ये, तसेच माध्यमांमध्ये भरपूर गदारोळ झाला. सकृतदर्शनी, कारच्या चालकाने गूगल लोकेशनमध्ये विष्णू मंदिर असे घातले होते, जे जंगलाच्या आतमध्ये आहे व त्याला प्रवेशाच्या नियमांविषयी माहिती नव्हती. प्रवेशद्वारापाशी सुरक्षा रक्षक एक महिला होतीस तिची वनविभागामध्ये नवीनच नियुक्ती झाली होती, तिला कदाचित हे सरकारी वाहन असावे असे वाटले असावे व तिने नोंद करून त्याला आत येऊ दिले. अशा गोष्टी होत असतात, परंतु समाज माध्यमांवर बांधवगढसारख्या अभयारण्यांविषयी अतिशय चर्चा होते, त्यांना तो वन्यजीवनासाठी धोका वगैरे वाटतो व या घटनेमुळे त्या बिचाऱ्या सुरक्षा रक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आले. मला असे वाटते संवेदनशील असणे चांगले आहे परंतु त्याचा अतिरेक करणे चुकीचे आहे, विशेषतः वन्यजीवनाच्या बाबतीत, तर्कशुद्ध व व्यवहार्य विचार करणे आवश्यक आहे कारण यातूनच संवधर्नाचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे मला वाटते.

      आता या लेखाच्या दुःखद भागाविषयी, बांधवगढमधील एक अतिशय देखणा व मोठा नर वाघ पुजारी याच्या मृत्यूविषयी. तो वाघांच्या सीमेवरून झालेल्या संघर्षात मारला गेला व एखादा म्हणेल की हा नैसर्गिक मृत्यू आहे, तो आहे. परंतु आजकाल सीमेवरून होणाऱ्या संघर्षांमध्ये होणाऱ्या वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण फार वाढले आहे हा मुद्दा मला मांडायचा आहे. त्यानंतर माणसांविरुद्ध प्राणी अशा संघर्षामध्ये एका अतिशय धक्कादायक घटनेमध्ये एका वाघीणीने महाराष्ट्रातील ताडोबाच्या जंगलाजवळच्या गावातील तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या महिलांच्या एका गटावर हल्ला केला व त्यापैकी चौघींना जागीच ठार केले. बरोबर वर्षभरापूर्वी अगदी याच ठिकाणापासून अतिशय जवळ म्हणजे गुजेवाही तालुका सिंदेवाहीजवळ, तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या तीन महिला मारल्या गेल्या होत्या, परंतु आपण त्यातून काही शिकत नाही असे दिसते. गुंजेवाहीच्या गावकऱ्यांना वाटणारी भीती, त्यांचे दुःख यांची आपण कल्पनाही करू शकत नाही, ज्यामध्ये एकाच झटक्यात चार माणसे मारली जातात व आपण ते टाळू शकलो असतो. पुजारी नामक वाघाचा सीमेवरून झालेल्या संघर्षामध्ये मृत्यू व ताडोबाजवळ गुंजेवाहीमध्ये चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू यात एक सामायिक दुवा आहे, तो म्हणजे वाघांची संख्या वाढवण्यात आपल्याला आलेले यश व त्याचवेळेस वाघांना त्यांच्या हक्काची जागा देण्यात आपल्याला आलेले अपयश, हा माझ्या लेखाचा खरा विषय आहे.
लोकांच्या आक्रोशाला प्रतिसाद देत, सरकारी यंत्रणा हलली व आजपर्यंत त्या भागातील वाघीणीला तिच्या बछड्यासोबत ताब्यात घेण्यात आले आहे, कारण ती तिच्या बछड्यांसोबत होती व तिने तिच्या संरक्षणासाठी हल्ला केला व इतर तीन बछड्यांचा शोध सुरू आहे, देव त्यांचे भले करो!  
मी माझे विचार मांडून तुम्हाला आणखी त्रास देणार नाही, परंतु या दोन्ही घटनांविषयी माझ्या इन्स्टाग्रामवरच्या पोस्ट देत आहे व तुम्ही सर्वांनी (वाचकांनी) कृती करावी, आवाज उठवावा, तुमच्या भावना व्यक्त कराव्यात असे आवाहन करत आहे, कारण तरच वाघांसाठी व त्यांच्याभोवती राहणाऱ्या माणसांसाठी काही आशा आहे असा इशारा देऊन निरोप घेतो! …असो, एक रोचक बाब म्हणजे (खरे तर वाईट) वाघीणीच्या हल्ल्यामध्ये गुंजेवाही गावातील चार तार महिला ठार झाल्या त्या दिवशी म्हणजे 22 मे रोजी आपण जागतिक जैवविविधता दिवस साजरा करण्यामध्ये व्यग्र होतो.
माझ्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट …

https://www.instagram.com/p/DYmNnRpCn4R/?igsh=dDB0cjdqdzBuMnFw

   *थ्यूसीडायडसचा सापळा, पुजारी व डी१...
      जेव्हा एखादी उदयोन्मुख महासत्ता विद्यमान महासत्तेला धमकी देते किंवा विस्थापित करते, तेव्हा त्याला थ्यूसीडायडसचा सापळ असे म्हणतात. इथे उदयोन्मुख सत्ता होती डी1 नावाचा नर वाघ तर विद्यमान महासत्ता होता पुजारी, व ज्या क्षेत्रावरील (प्रदेश) वर्चस्वासाठी दोघांमध्ये संघर्ष सुरू होता ते होते बांधवगढ जंगलातील खितौली विभाग. पुजारीकडे एकदा पाहिल्यानंतर या आकाराच्या वाघाला कुणी ठार करू शकेल विशेषतः त्याच्या फक्त 3/4  असलेला डी1 ठार करू शकेल असा कुणालाही विश्वास बसणार नाही. मी काही कुणी वाघांचा तज्ज्ञ नाही, परंतु मी हे दोन्ही वाघ पाहिले आहेत व हा संघर्ष फार काळ चालला नसावा, नाहीतर पुजारीने डी1 ला निश्चिपणे गंभीर जखमी केले असते. त्याचप्रमाणे, जर मोठा आकार वर्चस्व गाजवण्याचे साधन असतो त्याचप्रमाणे जीवघेण्या संघर्षामध्ये ती तुमची कमतरताही होऊ शकते. डी1 ने थेट पुजारीचा गळा धरला व त्याच्यावर बेसावध असताना चपळाईने हल्ला केला. त्याला माहिती असले पाहिजे की की पुजारीला प्रति हल्ला करण्याची एकही संधी मिळाली असती तर 250 किलोहून अधिक वजनाच्या या टॅन्कने त्याला तोफेसारखा उडवला असता, त्याने युद्ध जिंकले असते परंतु मोठे नुकसान झाले असते जे विजेत्यासाठीही जीवघेणे ठरू शकले असते. ताडोबामध्ये सीएम म्हणजेच छोटा मटका व तरुण ब्रह्माच्या बाबतीत जे झाले तसेच झाले असते. ब्रह्मा ठार झाला परंतु छोटा मटकाही गंभीर जखमी झाला त्याच्या कारकिर्दीचा अशाप्रकारे बंदि होऊन शेवट झाला. डी1 व पुजारी यांच्यामध्ये काय झाले हे केवळ त्या दोघांनाच व भोवतालच्या जंगलाला माहिती आहे, ज्यांनी त्यांचा संघर्ष पाहिला, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, सीमेवरून नर वाघांमध्ये वारंवार होणारा संघर्ष जंगलाचे क्षेत्र कमी होत चालल्याचा परिणाम आहे, ज्यामुळे दोन किंवा अधिक वाघांना एकच क्षेत्र व त्यातील वाघीणी वाटून घ्याव्या लागतात. ते जंगलाचे गाभा क्षेत्र होते, परंतु जर अन्नासाठी व समागमासाठी पुरेसे क्षेत्र उपलब्ध असेल तर असा संघर्ष कमी होईल ही वस्तुस्थिती आहे. वाघ विशेषतः नर हे स्वतंत्रपणे जगणारे प्राणी असतात व त्यांना भोवतालच्या भागावर वर्चस्व हवे असते, तरीही आपण त्यांना त्यांच्या हक्काची जागा देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. भविष्यात आपल्याला निश्चितपणे असे थ्यूसीडायडसचे सापळे आणखी दिसतील मग ते वाघ असोत किंवा अमेरिका व चायना. पुजारी आम्हाला माफ कर, आम्ही तुला तुझी जागा देऊ शकलो नाही व आम्ही तुला वाचवू शकलो नाही, भावपूर्ण आदरांजली;
 #थ्यूसीडायडस #पुजारी #वाघ #बांधवगढ
#वन्यजीवन

*आम्हाला माफ कर...!!
        आम्ही वाघीण व आई असलेल्या तुझे व त्यासोबतच तुझ्या बछड्यांचे स्वातंत्र्य हिरावल्याबद्दल तुझी माफी मागतो. आम्ही चारही महिलांची माफी मागतो कारण आम्हाला तुमचाही जीव वाचवता आला नाही व आम्हाला आमच्या जंगलांभोवती राहणाऱ्या गावकऱ्यांसाठीही अतिशय वाईट वाटते, कारण आम्ही तुम्हाला वाघ, अस्वल व तत्सम प्राण्यांच्या भीतीखाली जगायला भाग पाडतो. गावकाऱ्यांनो आम्ही तुम्हाला स्वयंपूर्ण बनवू शकलो नाही म्हणून तुमची माफी मागतो नाहीतर तुम्हाला काही रुपयांसाठी वाघ असलेल्या जंगलांमध्ये राहावे लागले नसते. आम्ही सगळ्या वाघांची माफी मागतो कारण आम्ही तुमच्या जंगलांमध्ये माणसांना येऊ दिले, आम्ही त्या प्रत्येक गोष्टीसाठी माफी मागतो जी माणसाचा व वाघाचा जीव गमावणे टाळण्यासाठी करता आली असती, परंतु आम्ही ती केली नाही. तरीही, आम्ही हार मानणार नाही, आम्ही वाघ व माणसे एकत्र राहू शकतील असा समतोल साधण्याचा प्रयत्न करू, कारण त्यानंतरही अपघात होतील, जे आपल्या आरामदायक काँक्रिटच्या जंगलांमध्येही होतात, परंतु आपण जगणे सोडत नाही, बरोबर?? वाघांना अपघाताने माणसांच्या समोर यावे लागू नये व माणसांना अपघाताने एखाद्या वाघीणीला तोंड द्यावे लागू नये जिला माणसे म्हणजे तिच्या बछड्यांचा शत्रू वाटून ती त्यांच्यावर हल्ला करेल! आम्ही ही शपथ घेतो, कारण हाच एकमेव योग्य मार्ग आहे...
टीम संजीवनी व जंगल बेल्स 
 #गुंजेवाही #चंद्रपूर #वाघीण #savemyhome
 
*अनिश्चिततेचे बळी!!
        4 माणसे जिवानिशी गेली, व त्या जिवांसोबत एका वाघाचे कुटुंबही गेले, आई असलेल्या एका वाघीणीला, तिच्या एका बछड्यासोबत ताब्यात घेण्यात आले व तिच्या इतर 3 बछड्यांचे भवितव्य अनिश्चित आहे. माझी ज्या 4 महिलांनी आपला जीव गमावला त्यांच्याबद्दल पूर्णपणे सहानुभूती आहे, कारण त्यांची मुलेही त्यांची आई घरी येईल म्हणून वाट पाहात असतील, ज्याप्रमाणे वाघीणीचे बछडे त्यांच्या आईची वाट पाहात होते. यातील एकमेव फरक म्हणजे, माणूस म्हणून आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी बाकी कुटुंब असते, तर या बछड्यांना त्यांच्या इतर भावंडांसोबत त्यांचे उर्वरित आयुष्य बंदिवासात घालवावे लागेल, केवळ ते पकडले जाण्याएवढे सुदैवी असतील तर, अन्यथा जंगल त्यांचाही जीव त्यांच्याकडून हिरावून घेईल...!! आपल्याला हा समतोल कधी साधता येईल व दोन्ही बाजूंकडचे आणखी किती जीव आपल्याला गमवायचे आहेत? आपल्याला वाघ हवे आहेत, परंतु आपण त्यांना त्यांची जागा देत नाही, सर्व जंगले पर्यटनासाठी खुली करणे हाच त्यावरील एकमेव मार्ग आहे कारण त्यानंतरच स्थानिकांना वाघांची जाणीव असेल व त्यांना त्यामुळे थोडेफार पैसेही कमावता येतील. नाहीतर ही वन्यजीवन व माणसे यांच्यातील मूक संघर्षाची नुसती सुरुवात आहे, ज्याचा केवळ एकमेव अंत आहे, तो म्हणजे माणूस वगळता इतर सर्व प्रजातींचा मृत्यू...
#ताडोबा #सहजीवन #माझेघरवाचवा #चंद्रपूर #मोदी 
 
*वन्यपर्यटन वन्यजीवनासाठी जाचक आहे का याविषयीची बातमी! 
        पर्यटनाविषयी मूर्खपणाच्या बातम्या या वन्यजीवनासाठी त्रासदायकच ठरतात, किंबहुना केवळ पर्यटनच आता वन्यजीव व माणसांनाही वाचवू शकते... सिंदेवाही विभागामध्ये जर पर्यटन असते, तर ज्या वाघाने किंवा वाघांनी हल्ला केला व त्यामध्ये ४ दुर्दैवी महिला ठार झाल्या त्यांना या भागामध्ये वाघांची ये-जा आहे, त्यांचे बछडे आहेत किंवा त्यांचा समागम सुरू आहे हे लक्षात आले असते व स्थानिक इशारा देऊ शकले असते व त्यांनी खबरदारी घेतली असती किंवा जंगलाचा तो भाग टाळला असता! किंबहुना सर्व जंगले पर्यटनासाठी खुली झाली पाहिजेत, म्हणजे आपण स्थानिकांना रोजगार देऊ शकू व वाघांवर व तत्सम इतर प्राण्यांवरही लक्ष ठेवू शकू..!
 
संजय देशपांडे
 www.sanjeevanideve.com 
www.junglebelles.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!