माननीय पंतप्रधान, सार्वजनिक वाहतूक आणि जनता..!!



















































































माननीय पंतप्रधान, सार्वजनिक वाहतूक आणि जनता..!!

पंतप्रधानांना खुले पत्र.

“तुम्ही एखादे शहर तिथली सार्वजनिक वाहतूक यंत्रणा वापरल्याशिवाय समजून घेऊ शकत नाही.” ― इरोल ओझान

“शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी चांगली वाहतूक यंत्रणा, तसेच चांगले रस्ते आवश्यक आहेत.” ― लैला गिफ्टी अकिता

"शक्य असेल तिथे, पेट्रोल व डिझेलचा वापर कमी करा. मेट्रोचा, इलेक्ट्रिक बसचा व सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करा, कारचा सामूहिक वापर करण्यास चालना द्या." ...

मा. नरेंद्र मोदीजी.

"   खर म्हणजे 
मला स्वतःला गाडी चालवायाला अजिबात आवडत नाही, मला ड्रायव्हर 
ठेवणे परवडू शकते आणि आपल्या रस्त्यांवरून प्रवास करायला खूप जास्त वेळ लागत असला तरीही मला तो प्रवास आवडतो" … मी.

माननीय पंतप्रधान सर,

        माझ्या पत्राच्या सुरुवातीलाच (पत्राचा सूर ठरवण्यासाठी) पंतप्रधान वगळता इतर वाचकांसाठी काही प्रश्न विचारत आहे; तुम्हाला मे महिन्यामध्ये वर्तमान पत्र वाचताना (म्हणजे तुम्ही वाचत असाल तर) काही वेगळे लक्षात आले आहे का? या काळात आपल्या शाळांना अधिकृतपणे सुट्ट्या असतात व पर्यटन सर्वाधिक असण्याचा काळ असतो? तुम्हाला 2025 या वर्षात रस्त्यावरील अपघातामध्ये किती भारतीयांना आपला जीव गमावावा लागला आहे हे माहिती आहे का? तुमच्यापैकी किती जणांनी रेल्वे किंवा राज्य परिवहन मंडळाच्या बसने शेवटचा प्रवास केला आहे, किंवा खाजगी बसने रात्रभराचा प्रवास केला आहे? तुमच्यापैकी किती जणांनी मुंबई किंवा नागपूरसाठी रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे (हा प्रश्न पुण्याच्या लोकांसाठी आहे)? तुमच्या मते भारतामध्ये खाजगी वाहनाने रस्त्यावरून प्रवास करताना सर्वोत्तम भाग म्हणजे व सर्वात वाईट भाग कोणता आहे? मी, बुमरापेक्षाही अधिक वेगाने व आर अश्विनच्या क्षमतेने प्रश्नांची सरबत्ती करू शकतो (कृपया नावांसाठी गूगल करा). परंतु या लेखातून केवळ प्रश्न विचारणे हा उद्देश नाही तर काही उत्तरेही मिळणेही अपेक्षित आहे, नाहीतर ती केवळ टीका ठरेल, जी मी करत नाहीये, त्यामुळे असो. तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की हे पत्र सुट्टीतल्या सहलीविषयी आहे तर तुम्ही अंशतः बरोबर आहात (म्हणजे प्रवासाविषयी), तर आपल्या रस्त्यावरून तसेच रेल्वेने केलेल्या प्रवासाविषयी आहे. विशेष म्हणजे आपल्या सार्वजनिक वाहतुकीविषयी आहे.  माननीय पंतप्रधान मोदीजी नुकतेच  आपण जनतेने प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे त्याविषयी तसेच रस्त्यावर होणाऱ्या अपघातांविषयीही हे पत्र आहे. 
        तर सर्वप्रथम वरील अवतरणांविषयी, रस्ते हे शहराच्या आरशासारखे असतात व या रस्त्यांवरील माणसे तसेच त्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्थिती यावर तुम्ही केवळ एक नजर टाकली तर त्या शहरातील जीवन कसे आहे हे तुम्ही सांगू शकता. ओझान यांनी त्यांच्या अवतरणामध्ये रस्त्यांविषयीचा हा पैलू अगदी नेमकेपणाने मांडला आहे. अकिता यांच्या अवतरणाविषयी बोलायचे तर, त्यांचे शब्द रस्त्यांच्या चांगल्या परिस्थितीच्या महत्त्वाविषयी व त्यासोबत पायाभूत सुविधांविषयी बोलतात, जे कोणत्याही शहरामध्ये किंवा देशामध्ये पर्यटनाची (रस्त्यावरील प्रवास) वाढ होण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. त्यानंतर आपल्या मोदीजींचे शब्द जे आपल्या सामान्य जनतेला/नागरिकांना केलेले आवाहन आहे, जो एकप्रकारे सातत्याने वाढत्या इंधनाच्या दरांवरचा तोडगा आहे. शेवटचे, वाहन चालवणे किंवा रस्त्यांवरील सहलींविषयी माझे स्वतःचे शब्द आहेत. आता प्रश्नांविषयी बोलू व मी माझे वैयक्तिक मत मांडत आहे, मी वर्तमानपत्रे वाचतो व माझ्या दैनंदिन जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे. मे महिन्यामध्ये दररोज रस्त्यांवरील अपघाताच्या, प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये येत होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अपघातातील बहुतेक पीडित खाजगी वाहनांमधील होते, हे माझे निरीक्षण नाही तर वास्तव. आपल्या देशामध्ये अंदाजे दीड लाख लोक दरवर्षी रस्त्यावरील अपघातामध्ये मरण पावतात व 2025 हे वर्षं त्याला अपवाद नव्हते. तसेच या अपघातांमध्ये यापेक्षाही दुप्पट संख्येने लोक कायस्वरूपी अपंग होतात, यामुळे अपघात पीडितांची संख्या वर्षाला जवळपास पाच लाख होते. मी रेल्वेने शेवटचा प्रवास जवळपास पाच वर्षांपूर्वी, मुंबईहून मध्यप्रदेशातील जबलपूरपर्यंत केला होता, तो रात्रभऱ प्रवास होता. मला गेल्या दहा वर्षात एसटी बसने (जिचे लाल डब्बा हे नाव लोकप्रिय आहे) किंवा कोणत्याही बसने प्रवास केल्याचे आठवत नाही. मी पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्याचा असंख्यवेळा प्रयत्न केला आहे, परंतु मी कधीच आरक्षित वेळेत तिकीट मिळवण्यात यशस्वी झालो नाही. भारतामध्ये रस्त्याने प्रवास करण्याचा सर्वोत्तम भाग म्हणजे, तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा रस्त्यातच कुठेही थांबू शकता, बाथरूमला जाऊ शकता किंवा तुमचे जेवण गाडीत घेऊ शकता किंवा नुसताच एखादा सेल्फी घेऊ शकता. यातला सर्वात वाईट भाग म्हणजे तुम्हाला बाथरूमला कुठेही उतरून थांबावे लागते कारण तुम्हाला रस्त्यावर कुठेही पब्लिक टॉयलेटस दिसली तरीही ती स्वच्छ नसतात! लोकहो, ही उत्तरे कुठल्याही प्रकारची चेष्टा किंवा मस्करी नाही परंतु वरील प्रश्नांना तुमची उत्तरे लिहून पाठवा कारण लेखाच्या विषयासाठी ती अतिशय महत्त्वाची आहेत.
       खरोखरच, मला शंभर टक्के खात्री आहे की, नव्वद टक्के वाचकांचे उत्तर मग त्यांनी मला पत्राचे उत्तर लिहून पाठवो किंवा न पाठवो, माझ्या उत्तरांशीच मिळता जुळता असेल व उर्वरित दहा टक्क्यांविषयी बोलायचे तर प्रत्येक नियमाला अपवाद असतो, त्यामुळे असो. सर्वप्रथम, माननीय पंतप्रधान आपले आभार, इंधन टंचाई किंवा कोणतेही कारण असो तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केल्याने अनेक समस्यांना तोंड फुटू  शकते किंवा फुटले आहे (या पत्रा प्रमाणे). यातील पहिला प्रश्न म्हणजे या देशामध्ये सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे कुठे ? रेल्वेविषयी पूर्णपणे आदर आहे जे खरेतर जगातील रेल्वेचे सर्वात मोठे जाळे आहे व दररोज जास्तीत जास्त लोकांची ने-आण करते. परंतु याचे श्रेय दिडशे कोटीहून अधिक जनतेला द्यावे लागेल व त्यापैकी ऐंशी टक्के लोकांना खाजगी वाहतूक परवडत नाही. तरीही मी आपल्या देशाच्या रेल्वे व्यवस्थापनाला योग्य ते श्रेय देईन कारण इतक्या लोकांसाठी एवढ्या कमी पायाभूत सुविधांमध्ये काम करणे काही सोपे नसते. परंतु तरीही प्रश्न उरतोच, तुम्ही रेल्वेला प्रभावी यशस्वी सार्वजनिक वाहूतक म्हणाल का व त्यासाठी आधी आपल्याला सार्वजनिक वाहतूक या शब्दाची व्याख्या करावी लागेल, बरोबर? त्यानंतर आपण जेव्हा म्हणतो, प्रभावी सार्वजनिक वाहतूक तेव्हा त्याचे चार मार्ग आहेत; पहिला रस्ते, दुसरा रेल्वे, तिसरा आहे (होता) जलमार्ग किंवा नाव व चौथा म्हणजे हवाई मार्ग. सध्या बहुतेक लोकांना यातील सर्वात शेवटचा पर्याय निवडणे भाग पडते (तुम्ही बरोबर वाचले, भाग पडते), जो खरं म्हणजे सगळ्यात महाग पर्याय आहे कारण पहिले तीन पर्याय परिणामकारक नाहीत हा माझ्या पत्राचा विषय आहे.  केवळ दोन/तीन दशकांपूर्वी हवाई वाहतूक केवळ अतिश्रीमंत किंवा एखाद्या व्यवसायाच्या बॉस लोकांपुरतीच मर्यादित होती व आता बरेचजण म्हणतील की आपल्या देशाच्या नेतृत्वाचे (सध्याच्या व पूर्वीच्या) आभार, आता तथाकथित मध्यमवर्गीय कुटुंबांना विमान प्रवास करणे शक्य झाले आहे. परंतु ते हे स्वेच्छेने करत आहेत का, हा प्रश्न आहे, कारण साध्या पुणे-नागपूर प्रवासाचे उदाहरण घ्या, हे अंतर अंदाजे 800 किमी आहे. प्रति तास 60 किमी सरासरी वेगानेही हा प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 13 तास लागतात, मात्र या प्रवासासाठी रस्त्याने जवळपास 15 तास लागतात. परंतु याच प्रवासासाठी रेल्वेने जवळपास 16 तास लागतात. आता, सुट्टीच्या हंगामात म्हणजे महिन्यामध्ये राज्य परिवहन मंडळाच्या जेमतेम चार ते पाच बस असतात व त्यापैकी केवळ 2 एसी कोच आहेत. आपण प्रत्येक बसमध्ये 50 प्रवासी असा हिशेब केला तरीही दररोज केवळ शंभर प्रवासीच होतात. बस हा पुण्याहून नागपूरला जाण्यासाठी सर्वात स्वस्त पर्याय आहे, प्रति व्यक्तीमागे तिकीटाचा सरासरी दर 1200 रुपये आहे. चार जणांच्या कुटुंबासाठी जाण्यासाठी 5000 रुपये खर्च होतो. आता, शयनयान श्रेणी बिगर-एसी रेल्वे कोचचे तिकीट प्रति व्यक्ती 1500 रुपये आहे, म्हणजे एका कुटुंबाला एका वेळच्या प्रवासावर जवळपास 6000 रुपये खर्च करावे लागतात. पुण्याहून, नागपूरला जाण्यासाठी जलमार्ग उपलब्ध नाही (सुदैवाने), त्यामुळे त्यासाठी बोटीचा पर्याय नाही. तर आता हवाई वाहतुकीचा पर्याय पाहू, अतिशय जास्त मागणी असलेल्या काळात अनेक महिने आधी आरक्षण करून, त्यांचा दर 4500 रुपये प्रति व्यक्ती असतो, याचा अर्थ चार जणांच्या एका कुटुंबाला एका वेळच्या जाण्यासाठी 18000 रुपये खर्च होतो. तसेच तुम्हाला विमानतळावर किमान दोन तास आधी पोहोचावे लागते, तो वेळ धरा.
        पुणे-नागपूर प्रवासामध्ये रस्ते व रेल्वेच्या प्रवासातील कोणती आव्हाने( अडचणी) आहेत ते पाहू, राज्य परिवहन महामंडळाच्या रात्री प्रवास करणाऱ्या फारशा बस नाहीत, त्यामुळे लोकांना संपूर्ण दिवस प्रवासात घालवावा लागतो किंवा वाहतुकीच्या खाजगी बसेसचा आधार घ्यावा. इथेही सुट्टीच्या हंगामामध्ये दर विमान प्रवासाएवढेच असतात कारण दरवाढीवर सरकारचे काहीही नियंत्रण नाही, म्हणजे एका कुटुंबाला एका वेळेसाठी जळपास 10,000 रुपये खर्च करावे लागतात, यामुळे हा पर्याय सुद्धा अतिशय महाग होतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून प्रवास करण्याचा पर्याय तुम्ही एकवेळ मान्य केला तरीही यातला सर्वात वाईट भाग म्हणजे या प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा निकृष्ट असतात उदाहरणार्थ उपाहारगृहे व प्रसाधनगृहांची भयंकर स्थिती. या खाजगी बस सुरक्षिततेच्या नियमांचे क्वचितच पालन करतात, चालक तरूण, अननुभवी, निष्काळजी व बरेचदा दारु प्यायलेलेही असतात. त्यामुळेच रात्रीच्या वेळी होणारे बरेचसे अपघात हे खाजगी बसचे असतात यात काही आश्चर्य नाही, म्हणूनच बहुतेक लोक हा पर्याय टाळतात. आता रेल्वेचे आरक्षण, माझ्या माहितीप्रमाणे पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या दहा ट्रेन आहेत व ट्रेनची प्रवासी वाहतुकीची क्षमता प्रति कोच 60 एवढी असली आणि 15 डब्बे धरले, तरीही आपण फक्त 9000 प्रवाशांविषयीच बोलत आहोत. माझ्या ढोबळ अंदाजानुसार आपली गरज जवळपास 25,000 प्रवाश्यांची दररोज आहे. पुण्यामध्ये नागपूरच्या प्रदेशातले जवळपास पाच लाख लोक राहतात, व आपण सुमारे पन्नास टक्के लोकांविषयीच बोलत आहोत. आकडेवारी पाहिले तर लक्षात येईल की यामध्ये दररोज किंवा नियमितपणे प्रवास करणाऱ्यांचा समावेश नाही, त्याचप्रमाणे यामध्ये नागपूरच्या पलिकडे जाणाऱ्या ट्रेन व अशाप्रकारच्या प्रवाशांचा समावेश नाही. यामुळेच, तुम्ही वर्षातल्या कोणत्याही दिवशी पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या रेल्वेच्या आरक्षणाचा तक्ता तपासा, तो नेहमी भरलेलाच दिसून येतो {*हे मी केवळ नागपूर शहराचे सांगतोय. ताडोबाचेच उदाहरण घ्या जे आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय वन्यजीवन पर्यटनस्थळ आहे. ते नागपूरहून केवळ 90 किलोमीटर अंतरावर आहे. नागपूरहून ताडोबापर्यंत जाण्यासाठी सफारीच्या वेळा लक्षात घेऊन सार्वजनिक परिवहनाचे कोणतेही साधन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. यामुळेच नागपूर ते ताडोबा टॅक्सी चालकांची चलती होते, यामुळे पर्यटक व देशाच्या खिशालाही इंधनाचा भार सहन करावा लागतो!}
यामुळेच पुण्याहून नागपूरपर्यंत प्रवास करण्यासाठी केवळ दोन पर्याय उपलब्ध आहेत, एक म्हणजे विमानाची तिकीटे ज्या दराने उपलब्ध असतील त्या दराने ती खरेदी करणे व त्यातही त्याच्या वेळाही विचित्र असतात उदाहरणार्थ पहाटे पाच म्हणजे तुम्हाला पहाटे दोन वाजता उठावे लागते किंवा दुसरा पर्याय म्हणजे नागपूरपर्यंत स्वतःच्या खाजगी कारने जा, माननीय पंतप्रधान साहेब माझ्या लेखातून मी हाच मुद्दा मांडत आहे. इथेही पुन्हा बहुतेक लोकांना ड्रायव्हर परवडत नाही व त्यांना इतक्या लांब गाडी चालवण्याचे प्रशिक्षण नसते. त्याचप्रमाणे दिवसाचा वेळ वाचवण्यासाठी ते रात्री वाहन चालवतात. अशा लोकांचेच रस्त्यावर अपघात घडतात व याचा सर्व दोष यंत्रणेला जातो जी सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे इंधनावर होणारा खर्चही वाढतो, हा माझ्या लेखाचा विषय आहे. हे प्रवासी मजा म्हणून कारने प्रवास करत नाहीत, त्यांच्याकडे बचत करायला व प्रवासासासाठी ज्याला तुम्ही सार्वजनिक वाहतूक म्हणता अशा प्रवासाच्या इतर कोणत्याही साधनांच्या अनुपलब्धतेमुळे इतर काहीच पर्याय नसतो. पंतप्रधान साहेब, सर्वप्रथम या कटू सत्याचा स्वीकार करू, यासाठी मी तुम्हाला हे पत्र लिहीत आहे, कारण मी तुम्हाला केवळ दोनच शहरांमधील दळणवळणाचे उदाहरण दिले, ते म्हणजे पुणे व नागपूर. परंतु देशभरात सर्वत्र सार्वजनिक वाहतुकीच्या आघाडीवर अशीच परिस्थिती आहे. आता यावर उपाय म्हणजे आणखी रस्ते किंवा द्रुतगती महामार्ग बांधणे किंवा काही निवडक मार्गांवर वंदे-मातरम रेल्वे सुरू करणे हा नाही तर आपण सार्वजनिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले पाहिजे जे दळणवळणासाठी आणखी सक्षम पर्याय तयार करण्यावर लक्ष केंद्रित करेल. त्यासाठी योग्य त्या पायाभूत सुविधा उभारेल व जनतेसाठी (म्हणजेच लोकांसाठी) खर्चावर नियंत्रण ठेवेल. दळणवळणाच्या सर्व माध्यमांचा या मंत्रालयांतर्गत समावेश होईल व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी असेल उदाहरणार्थ सार्वजनिक केंद्रीय रस्ते परिवहन सेवा (अमेरिकेमध्ये ग्रे हाउंड बस  सेवा आहे) व टॅक्सी सेवेचा विचार करा जी  आपल्याकडे अस्तित्वात नाही. त्यासाठी आपल्या सार्वजनिक वाहतुकीच्या नेमक्या किती साधनांची, कोणत्या स्वरूपातील साधनांची व कोणत्या मार्गांवर गरज आहे याविषयीच्या आकडेवारीवर काम करायला सुरुवात करा. त्या वेळेपर्यंत या मंत्रालयांतर्गत विभाग तयार करा आणि त्यांच्या पथकांना सार्वजनिक वाहतुकीच्या सध्याच्या पायाभूत सुविधा चेक करायला सांगा व त्यांच्या वाईट स्थितीसाठी सध्याच्या जबाबदार मंत्रालयाकडे पाठपुरावा घेऊन त्यावर कारवाई करा. किमान पहिल्या वर्षासाठी तुमच्या पंतप्रधान कार्यालयाला या विभागावर नियंत्रण  करण्यास सांगा. पंतप्रधान साहेब, तुम्हाला सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक  निर्बंध असतात हे मला माहिती आहे, परंतु कृपया तुमचे वरिष्ठ बाबू (अधिकारी), मंत्री, आमदार व खासदारांना आपल्या देशातील सार्वजनिक परिवहन यंत्रणेचे तिकीट, एक सामान्य नागरिक म्हणून आरक्षित करायला सांगा, आणि प्रवासासाठी ती तिकीटे मिळण्याइतपत ते सुदैवी असतील तर त्यांना त्यांच्या सरकारी ओळखपत्राशिवाय प्रवास करायला सांगा व त्यानंतर त्यांना आमच्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेविषयी यांचे काय अनुभ आहेत हे विचारा, त्यानंतर त्यांना माझे वरील सर्व शब्द केवळ टीका वाटत असेल, तुम्ही माझे पत्र फाडून  फेकून द्या!! मोदी सर, डिझेल व पेट्रोलचे सध्याचे दर पाहता, कुणालाही कार तर सोडाच पण साधी बाईकही वापराविशी वाटत नाही (मी सामान्य माणसांबद्दल बोलतोय), म्हणूनच तुम्ही त्यांना सार्वजनिक परिवहन वापरण्याचे आवाहन करायची गरज नाही. त्यांना केवळ सार्वजनिक वाहतुकीचा योग्य पर्याय द्या व ते तुम्हाला नेहमी किती आशीर्वाद देतील ते पाहा, माझ्या लेखाच्या समारोपाला मी इतकेच म्हणू शकतो. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल आपले अतिशय आभार, त्यांचा काही उपयोग झाला तर अतिशय आनंद होईल, एवढे बोलून निरोप घेतो!

  संजय  देशपांडे
 www.sanjeevanideve.com 
 www.junglebelles.in


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!