आयपीएल, थरार का थरथर !!









































































आयपीएल, थरार का थरथर !!

“जगातला कोणताही क्रिकेट संघ एका किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून नसतो. संघ नेहमी जिंकण्यासाठी खेळतो’... विराट कोहली. 

“कोणत्याही प्रकारे विचार करता क्रिकेट म्हणजे काही सर्वस्व नाही, परंतु मी जो कुणी आहे त्याचा तो एक मोठा भाग आहे नक्कीच  आहे"... एमएस धोनी. 
“क्रिकेटमध्ये काहीही सोपे नसते. कदाचित जेव्हा तुम्ही टीव्ही पाहता, तेव्हा ते सोपे दिसते. परंतु ते तसे नसते. तुम्हाला तुमचे डोके वापरावे लागते व प्रत्येक  बॉलची नेमकी वेळ साधावी लागते’… रोहित शर्मा 
“आता हे गृहित धरले जाते आहे ब्रँड व खेळाचे हित इतके एकमेकांच्या आड येते की त्यामध्ये क्रिकेटच्या गरजांचा उल्लेख करायची गरज नसते.” ― गेडन हाय.
“क्रिकेट सभ्य माणसांचा खेळ म्हणून ओळखला जात असेल परंतु तो आता व्यापाऱ्यांचा  खेळ झाला आहे” … मी.

भारतीय क्रिकेटमधील (व आयपीएलदेखील) तीन सर्वात महान नावांची वरील तीन अवतरणे आहेत, तर गेडन हाय हा क्रीडा समीक्षक आहे. आणि या लेखासाठी वातावरणनिर्मिती करण्यासाठी, या महान लोकांच्या ज्ञानातून मला जे शिकायला मिळाले ते माझ्या मी माझ्या शब्दात मांडले आहे, ते क्रिकेटविषयी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
गेल्यावर्षी या महिन्यात (आयपीएलचा महिना) माझ्या पाहण्यात एक मीम आले ज्यामध्ये एका आयपीएल सामन्याचा स्क्रीनशॉट टाकलेला होता व चौकटीमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांची एक जाहिरात होती व त्यावर ओळी होत्या, “रणवीर दीपिका के ॲडसे टाईम मिले तो बीच बीच में आयपीएल का मॅच देख लेता हूँ!” या मीममध्ये आयपीएलच्या सामन्यांमध्ये जाहिरातींचे ब्रेकस (जे वारंवार येतात किंवा यायचे) किती महत्त्वाचे आहेत हे दिसून येते व या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएलच्या प्रेक्षकवर्गात कशी घट झाली आहे व या कार्यक्रमाची (याला स्पर्धा म्हणू शकत नाही) लोकप्रियता कशी उतरणीला लागली आहे असे अहवाल, कुजबूज व लेख येत आहेत. हा माध्यमांधील युद्धाचा भाग असू शकतो जे आयपीएलचे प्रायोजक नाहीत किंवा त्याचे लाभार्थी नाहीत परंतु तुम्ही सतत सर्व लोकांना मूर्ख बनवू शकत नाही, हे देशातील सर्वात मोठ्या खेळाच्या कार्यक्रमालाही लागू होते हेदेखील तितकेच खरे आहे. या सर्व माध्यमांच्या युद्धामध्ये क्रिकेट नावाचा एक खेळ आहे ज्याला सर्व धर्म व जातींद्वारे त्याला पूजले जाते, हा माझ्या लेखाचा विषय आहे. मी क्रिकेटविषयी व त्यातील व्यक्तीमत्वांविषयी बरेच लिहीले आहे, परंतु आयपीएलविषयी मी क्वचितच माझे मत व्यक्त केले आहे. याचे कारण म्हणजे अनेक जण त्याला गांभिर्याने घेत नाहीत, तर ही केवळ एक मनोरंजन करणारी स्पर्धा आहे ही वस्तुस्थिती आहे, आपण कितीही नाकारले तरीही! तुम्ही आयपीएलला एक व्यवसायीक खेळ किंवा  क्रीडा स्पर्धा म्हणाल तर तुम्ही एखाद्या क्लबमधल्या गायकाची तुलना रफी किंवा लता (कृपया गूगल करा) यांच्या सांगितिक कार्यक्रमांशी केल्यासारखी होईल. मी काही कुणा कलेचा अनादर करत नाही किंवा क्लबमधील गायकाचाही नाही, तर तुम्हाला केवळ फरक सांगतोय. खरोखरच रफी, लता जिथे होते तिथे एखाद्या क्लबमधील गायकाने प्रमाणिकपणे प्रयत्न केले व गाणे म्हणून आपले मनोरंजन केले तरीही तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही ही गोष्ट सामाईक आहे.

अर्थात आयपीएल म्हणजे काय हेच तुम्हाला माहिती नसेल तर काही हरकत नाही तुम्ही त्याचे वाचन करणे इथे थांबवू शकता अर्थात त्याची व्यावसायिक बाजू जाणून घेण्यासाठी तसेच आयपीएल (क्रिकेट) कसे खेळतात व त्यामुळे आपापल्या क्षेत्रात आपल्याला कशी मदत होऊ शकते हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचू शकता.

 कल्पना करा कसोटी क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये चार स्लिप्स, सिली पॉईंट, गली, मिड-ऑन, मिडविकेट व सीमारेषेवर एक किंवा दोन क्षेत्ररक्षक असतात. गोलंदाज 140 किमी/तास एवढ्या वेगाने धावत आक्रमकपणे फलंदाजाच्या डोक्याचा वेध घेणाऱ्या चेंडूंचा मारा करतो व फलंदाज हडबडून चेंडूच्या मार्गातून दूर होण्याचा प्रयत्न करतो. या प्रक्रियेत चेंडू बॅटच्या कडेला लागतो व जवळच असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात पोहोचतो. किंवा, बॅट्समनभोवती क्षेत्ररक्षकांची अशाप्रकारे व्यूहरचना केलेली असते की तुम्ही केवळ अगदी पुढून पाहिले तरच तो तुम्हाला दिसू शकेल, अन्यथा नाही. फिरकी गोलंदाज अशाप्रकारे चेंडूचा मारा करतो की शेवटपर्यंत तुम्हाला चेंडू कुठल्या दिशेने वळेल हे माहितीच नसते, यामुळे फलंदाजाला बचावात्मक पवित्रा घ्यायचा की आक्रमक याची खात्री नसते. परिणामी जवळ असलेल्या एकमेव क्षेत्ररक्षकाच्या किंवा सीमारेषेवर असलेल्या एकमेव क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल जातो. आता हेच आयपीएल सामन्यात काय घडते  ते पाहा, जगातले सर्वोत्तम गोलंदाज एका नवख्या फलंदाजावर गोलंदाजीचा मारा करत असतात, स्लिप मध्ये कुणी नसते कारण मैदानाच्या मर्यादा असतात. इथे धावा वाचवणे हा उद्देश असतो व फलंदाज निडरपणे (किंवा अधीरपणे) बॅट फिरवत असतात. चेंडू कसाही जमीनीवर पडून कोणत्या दिशेने षटकार ठोकला गेलाय हे अगदी फलंदाजालाही माहिती नसते. सर्वोत्तम फिरकीपटूच्या बाबतीतही असेच होते, जवळपास कुणीही क्षेत्ररक्षक नसतात ज्यामुळे फलंदाजाला कसे खेळायचे याचा विचार करत बसावे लागत नाही, तो केवळ शक्य तितक्या जोरात चेंडू फटकावू शकतो व प्रेक्षकांच्या गॅलरीपर्यंत पोहोचवू शकतो. गोलंदाजाकडे केवळ चार षटके असतात, खेळपट्टी कोरडी व मृत असते ज्यावर चेंडू फिरत नाही किंवा उसळी घेत नाही, चेंडू जुना होत नाही कारण केवळ वीस षटकांचाच सामना असतो तसेच खेळपट्टीही खराब होत नाही कारण संपूर्ण सामना जेमतेम चार तासात संपणार असतो, म्हणजे कसोटी सामन्याची दोन सत्रे. म्हणूनच गोलंदाज केवळ सुरक्षितपणे गोलंदाजी करून धावा नियंत्रित करू शकतात व या प्रक्रियेमध्ये त्यांना काही गडी बाद करता आले तर तो लाभांश.

तुम्ही क्रिकेटचे प्रेक्षक असाल (मी चाहते असेही म्हणत नाही) तर आधीचे प्रसंग कसोटी किंवा एक एकदिवसीय सामन्यातले आहेत व नंतरचे आयपीएलमधले आहेत. आयपीएलमध्ये खेळाचा सहज अंदाज बांधता येऊ शकतो यामुळेच प्रेक्षकांच्या संख्येत तसेच प्रायोजकांमध्ये घट झाली आहे. तरीही आयपीएल देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वाधिक पैसे कमावणारा कार्यक्रम आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु तो अधिक चांगला (योग्य) करायची वेळ आली आहे नाहीतर वीस सेकंदांच्या (रीलच्या) जमान्यामध्ये सध्या जो काही पैसा मिळतोय त्याचा ओघही थांबायला फारसा वेळ लागणार नाही. यानिमित्ताने आपलीही उत्पादने कोणतीही असतील तरीही आपल्यालाही याची जाणीव होते, हाच माझ्या लेखाचा विषय आहे. मी आयपीएल पाहतो याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे मी क्रीडाप्रेमी आहे व दुसरे म्हणजे त्यातून कोणतीही हिंसा, लैंगिक संबंध किंवा अर्वाच्च भाषेचा वापर न करता निखळ मनोरंजन होते, सध्या कोणतीही वेबमालिका किंवा अलिकडचा कोणताही चित्रपट पाहा, त्यामध्ये हीच त्रिसूत्री दिसून येते. परंतु कुठल्याही खेळाला सर्वाधिक कशाची आवश्यकता असते तर ती म्हणजे अनिश्चितता व सर्व खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्यासाठी समान संधी व या वर्षीच्या आयपीएलमध्ये नेमका ह्याचीच कमी होती. जवळपास सत्तर टक्के सामान्यांमध्ये दोन्ही संघांनी दोनशेहून अधिक धावा केल्या व तरीही पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ सामना हरला, याचे एकमेव कारण म्हणजे, संघाचे मालक (म्हणजे फ्रेंचायजीचे मालक) या सामन्यांना फार अधिक फलंदाजस्नेही बनवून त्यातील खेळाचा भाग नष्ट करून टाकत आहेत. आपल्याला जंगलामध्ये ज्याप्रमाणे वाघ पाहायला आवडते, त्याचप्रमाणे आपल्याला सामन्यामध्ये षटकार पाहायला आवडतात, परंतु तुम्हाला प्रत्येक सफारीमध्ये जर एकच वाघ एकाच जागी पाहायला मिळाला, तर तुमचा सफारीमधला रस कमी होईल कारण मग ते जंगल राहणार नाही तर प्राणिसंग्रहालय होऊन जाईल, बरोबर? आयपीएलच्या या आवृत्तीमध्येही हेच होत आहे; कारण पहिला संघ जेव्हा दोनशेहून अधिक धावा बनवतो, तेव्हा आपल्याला माहिती असते की इतर संघही दहापैकी नऊ वेळा तेवढ्या धावा बनवू शकेल, तेव्हा आपला सामन्यातला रस संपतो व तो सामना न राहता नेहमीची बाब होऊन जाते व ते कंटाळवाणे असते. आपल्या देशाच्या क्रिकेटमधल्या ज्येष्ठ बॉसेसनी ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, जर ते अजूनही आयपीएलला खेळ मानत असतील तर.

अर्थात या आयपीएल नामक इव्हेंट मुळे अनेक नव्या खेळाडूंना कारकिर्द घडवण्यासाठी मंच व संधी मिळाली. अधून मधून वैभव सूर्यवंशीसारखा जबरदस्त कामगिरी करणारा एखादा खेळाडू (कृपया गूगल करा) चाहत्यांना आनंद देऊन जातो, परंतु आयपीएलमधून गुणी खेळाडूंना काय मिळत आहे ते पाहा. आपण आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या या खेळाडूंचा समावेश कसोटी सामने व एक दिवसीय सामन्यांच्या राष्ट्रीय संघात केल्यानंतर काय परिस्थिती आहे ते पण पाहा. आयपीएल धूमधडाक्यात सुरू आहे कसोटी सामन्यातील आपले मानांकन सहावर घसरले आहे, अगदी बांगलादेशही आपल्या वर आहे. फुटबॉलमध्येही जेथे मोठे लीगचे सामने लोकप्रिय आहे व त्यातून पैसाही मिळत असला तरीही ते खेळाच्या मूलभूत गोष्टींपासून फारकत घेत नाहीत. खेळाडू अजूनही देशासाठी खेळणे सर्वोच्च मानतात व फिफा विश्वचषकाला प्रत्येक फुटबॉल खेळाडू सर्वोच्च स्थानी मानतो, हा फरक इथे आहे. आयपीएलची वेळ ही एक वेगळी बाब आहे कारण भारतीय संघ टी20 प्रकारामध्ये विश्वविजेता झाल्यानंतर जेमतेम एका महिन्याने, आयपीएलची सुरुवात झाली व केवळ दोन नावे वगळता (इशांत किशन व संजू सॅमसन काही प्रमाणात) ज्यांचा भारतीय संघातील प्रवेशच अतिशय आश्चर्यकारक होता, भारतीय संघातील दिग्गजांची आयपीएलमधील कामगिरी निराशाजनक झाली कारण एक मोठी आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा खेळल्यामुळे अतिशय जास्त थकवा येतो. यामुळे भारतीय संघाच्या बहुतेक खेळाडूंवर ताण आला परंतु ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना आयपीएल खेळण्यास भाग पाडले कारण इथे सगळे काही पैशात मोजले जाते, इथे कप किंवा चषकाला महत्त्व नसते.  यासाठीच केवळ जनतेला म्हणजेच चाहत्यांना खुश करण्यासाठी व त्यांचे लोकप्रिय खेळाडू अजूनही भरात असल्याचे दाखवण्यासाठी धोनी किंवा रोहितसारख्या महान खेळाडूंची डिस्नेच्या मिरवणुकीसारखी मिरवणूक काढली जाते, अर्थात त्यांच्यातला एकजण तर एकही सामना खेळला नाही. आणि दुसऱ्या खेळाडूला, ज्याने भारताला विश्वचषक मिळवून दिला आहे त्याला प्रभावशाली खेळाडूच्या नावाखाली मुख्य खेळाडूऐवजी पर्याय म्हणून खेळवण्यात आले, हा खेळाचा किती अपमान आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे. याबाबत विराटला पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत कारण त्याने आत्तापर्यंत प्रत्येक आयपीएलमध्ये त्याच्या वयावर मात करून अतिशय उत्तम कामगिरी करून दाखवली आहे व प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये त्यातून शिकले पाहिजे. आयपीएलची सुरुवात झाल्यापासून एकोणीस वर्षात पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या संख्येत घट झाली आहे, माध्यमांवरील कमी झालेली चर्चा नजरेत भरण्यासारखी आहे, संघांच्या कामगिरीवरून सार्वजनिक जागी (म्हणजे बार व पब) जोरदार वादविवाद होत नाहीत, ही सगळी आयपीएल उतरणीला लागल्याची लक्षणे आहेत. किंबहुना आम्ही एका उपाहारगृहामध्ये रात्री जेवत असताना तिथे आलेल्या लोकांनी आयपीएलच्या प्रक्षेपणाचा आवाज बंद करायला सांगितला कारण कुणालाही ते पाहण्यात रस नव्हता, हे मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी अनुभवले आहे परंतु आयपीएल, बीसीसीआय (कृपया गूगल करा) व क्रिकेटमधील ज्येष्ठ या सगळ्याकडे काणाडोळा करत आहेत. आयपीएल आता मृतप्राय झाले आहे किंवा होईल असे मी म्हणत नाही. परंतु त्याला एखाद्या खेळासारखे खेळवा, त्याचा एखाद्या प्रचंड उधळपट्टी करून केलेल्या लग्नासारखा सोहळा करू नका, ज्यामध्ये सगळे काही यजमानच नियंत्रित करत असतात कारण जनता मूर्ख असते, पण एवढीही मूर्ख नसते.

त्यानंतर मुद्दा येतो खेळाच्या दर्जाचा, आयपीएलने आपल्या देशातील गुणी खेळाडूंना मोठा मंच तसेच पैसा दिला आहे यात काही दुमत नाही परंतु जे खेळाडू आयपीएलमधून आले आहेत त्यांची कारकिर्द व ते सध्या कुठे उभे आहेत ते पाहा. एका बाजूला संपूर्ण जगातील फुटबॉल प्रिमियर लीगमधील खेळाडू आपापल्या देशांच्या संघामध्ये स्थान मिळवत आहेत व देशासाठी उत्तम कामगिरी करू दाखवत आहेत. तर आपल्याकडे मात्रा रिंकू सिंग व अभिषेक शर्मा यांच्यासारखा एक किंवा दोन खेळाडूंव्यतिरिक्त इतर कुणालाही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधींचा लाभ घेता आलेला नाही. साई सुदर्शन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे कारण आयपीएलमध्ये तो धावांचे डोंगर रचतो परंतु इंग्लंडमध्ये ज्या खेळपट्ट्या आयपीएलचा विचार करून बनवण्यात आल्या नव्हत्या तिथे त्याचा दृष्टीकोन तसेच तंत्र निष्प्रभ ठरले, इतरही खेळाडूंच्या बाबतीत हे होत आहे. आपल्या ऋषभ पंत व जसप्रीत बुमरासारख्या खरोखर गुणी खेळाडूंना आयपीएलमधल्या खराब कामगिरीसाठी टीकेची झोड सहन करावी लागते कारण ते ज्याप्रकारे ही सर्कस चालवली जाते त्याच्याशी जुळवून घेऊ शकत नाहीत. यातही संघ मालकांची गणिते वेगळी असतात कारण संबंधित संघाचे जेवढे अधिक खेळाडू राष्ट्रीय संघाचा भाग असतील, तेवढे प्रायोजकांच्या व तथाकथित चाहत्यांच्या नजरेत तुमच्या संघाचे मानांकन वरचे असते, त्यामुळेच येनकेन प्रकारेण राष्ट्रीय संघात प्रवेश मिळण्यास प्राधान्य दिले जाते. रणजी चषक जिंकणाऱ्या संघाचे कधीही माध्यमांमध्ये नाव येत नाही परंतु आयपीएलच्या एका सामन्यामध्ये जर  चार षटकार मारले तर एका रात्रीत तुम्ही राष्ट्रीय हिरो होता, या बाबीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. दर्जाचा विचार करता, ही आयपीएल क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सर्वात वाईट ठरली असली पाहिजे कारण प्रत्येक संघाने कितीतरी झेल सोडले. बीसीसीआयने सर्वोत्तम झेल घेणाऱ्याऐवजी सर्वोत्तम झेल सोडण्यासाठीचा पुरस्कार दिला पाहिजे, अशी परिस्थिती आहे व आपण टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघानेही हेच करताना पाहिले आहे, ज्यामुळे आपल्या हातून विश्वचषक जवळपास निसटला होता. परंतु त्याविषयी कुणीही काहीही का बोलत नाही, याचे उत्तर आहे की पुन्हा त्यामध्ये पैसा गुंतलेला असतो. थोडक्यात तुम्ही आयपीएलविषयी काहीही वाईट बोलू शकत नाही त्यालाही मनाई आहे. तुम्ही सुनील गावस्कर असा किंवा सचिन तेंडुलकर तुम्हाला पैसा हवा असतो, त्यामुळेच तोंड बंद ठेवा हा कानमंत्र आहे, जो आयपीएलच्या या आवृत्तीमध्ये सामने पाहताना व त्याविषयी वाचताना प्रामुख्याने जाणवला. लोकहो, या देशात दोन गोष्टींची पूजा होते, एक म्हणजे क्रिकेट व दुसरे म्हणजे सिनेमा, परंतु तुम्ही नवीन पिढीला गृहित धरू शकत नाही कारण इथे अगदी किंग खानचाही चित्रपट त्याचे काम चांगले नसेल तर साफ आपटू शकतो व या नियमाला आयपीएलही अपवाद नाही. या तत्वज्ञानाचे सार प्रत्येक व्यावसायिकाने व व्यवसायाने (अगदी राजकारण्यांनीही) लक्षात घेणे आवश्यक आहे, कारण आमचा लोकाश्रय गृहित धरू नका. तुमचा व्यवसाय आज बक्कळ पैसा कमवत असेल व अतिशय यशस्वीही वाटत असेल, परंतु तुम्ही बदलला नाहीत व लोकांना खरोखरच काय हवे आहे ते दिले नाहीत व तुमचा अस्सलपणा गमावलात तर एकेदिवशी तुम्ही गाळात जाल हे नक्की, हाच माझ्या लेखाचा विषय आहे.

शेवटी आयपीएलच्या भविष्याविषयी सांगताना मी पंचतंत्रातील विक्षिप्त राजाविषयी एक गोष्ट सांगेन, खूप खूप वर्षांपूर्वी एक राजा होता जो विचित्र गोष्टी करत असे (राजे हेच करतात म्हणा) व एकेदिवशी त्याने घोषणा केली की त्याला अदृष्य करणाऱ्या कुणालाही तो मोठे बक्षिस देईल, पण जर त्या व्यक्तीला असे करता आले नाही तर त्याचे डोके छाटले जाईल. अर्थातच, हे आव्हान कुणीही स्वीकारले नाही. परंतु एके दिवशी एक हुशार माणूस (म्हणजे लबाड माणूस) आला व त्याने राजाला सांगितले की तो त्याला अदृष्य करून दाखवेल, पण त्यासाठी त्याच्या दोन अटी होत्या. एक म्हणजे अदृष्य होण्यासाठी जे विधी करणे आवश्यक आहे ते केल्यानंतर लगेच त्याला बक्षीस दिले जाईल व राजा तोपर्यंत त्याच्या सर्व आदेशांचे पालन करेल. राजाने तात्काळ मान्य केले व त्या माणसाने काही पूजा वगैरे केली व त्या राजाला सांगितले की दुसऱ्या दिवशी सकाळ पासुन तो अदृष्य होईल परंतु केवळ त्याच्या शुभेच्छुकांना व मित्रांना, त्याच्या शत्रुंच्या डोळ्यांना नव्हे; म्हणजे जे राजाला पाहू शकतील ते त्याचे शत्रू असतील व त्याने राजाला ही बातमी सार्वजनिक करायला सांगितली. राजाच्या माणसांनी दवंडी पीटवून तसे केले व दुसऱ्या दिवशी राजाने आपण कुणालाही दिसत नाही असा विचार करून संपूर्ण शहरात स्वताची नग्न मिरवणूक काढायचे ठरवले. तो नग्न होऊन त्याच्या घोड्यावर बसला, व जो कुणी राजाला पाहू शकेल तो राजाचा शत्रू असल्याचे मानले जाणार असल्यामुळे, कुणीही राजाच्या अशा अस्तित्वाची दखल घेतली नाही व राजाला वाटले की तो खरोखरच अदृष्य झाला आहे. हे शक्य करून दाखवल्याबद्दल त्याने त्या माणसाला घसघशीत बक्षीस दिले व तो माणूस हसतहसत निघून गेला! लोक राजाकडे पाहूनही तो दिसत नसल्याचा दिखावा करत होते, परंतु एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत शहरामध्ये आला होता, त्याने त्याच्या वडिलांना विचारले, “बाबा, घोड्यावर बसलेला तो नागडा माणूस कोण आहे? त्याचे वडील म्हणाले, त्यांनी अशा कुणाही माणसाला पाहिले नाही व ते मुलाला घेऊन लांब निघून गेले. परंतु राजाने लहान मुलाचे बोलणे ऐकले होते व त्याला आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली व त्या दिवसापासून त्याने अशा विचित्र गोष्टी करणे थांबवले. राजाने, अशाप्रकारे खजील झाल्यानंतर धडा घेतला, माझी केवळ एवढीच इच्छा आहे की आयपीएलच्या बॉस लोकांनी पंचतंत्रातील ही गोष्ट नक्की वाचावी व त्यातून काही बोध घ्यावा. नाहीतर एके दिवशी आयपीएलच अदृष्य होईल, एवढे सांगून (इशारा देऊन) निरोप घेतो!!
( हे शेअरिंग लिहून होईपर्यंत आयपीएल संपली होती आणि आरसीबी सलग दुसर्‍यांदा ट्रॉफी जिंकणारी तिसरी टीम बनली. गम्मत म्हणजे,  19 पैकी 13 वेळा ज्या तीन टीम्सनी विजेतेपद वाटुन घेतलंय, त्या तीन टीम्स दहापैकी शेवटून 9 व्या, 8 व्या आणि 7 व्या क्रमांकावर आल्या,  हाच काय तो यावेळचा थरार!)



संजय देशपांडे 
www.sanjeevanideve.com 
www.junglebelles.in




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!