ताडोबाचा टायर रोड !!














































ताडोबाचा टायर रोड !!


“आयुष्यात नेहमी सगळे काही सुरळीत नसते. रस्त्याप्रमाणे, त्यातही नागमोडी वळणे, चढ व उतार असतात, परंतु तेच आयुष्याचे खरे सौंदर्य आहे.” ― अमित रे


 “इतरांना कुठेही घेऊन न जाणारा रस्ता तुम्हाला मात्र कुठेतरी घेऊन जाऊ शकतो!” ― मेहमत मुरत इल्दान


 “मला जंगलातल्या रस्त्यांचा हेवा वाटतो, त्यांना दररोज किती वेगवेगळे वन्यजीवन पाहायला मिळते"…मी


 अमित रे नक्कीच ताडोबाला येऊन गेले नसावेत, नाहीतर त्यांच्या अवतरणात त्यांनी ज्या रस्त्याचा उल्लेख केला आहे त्याला अपवाद आहे असे ते म्हणाले असते. इथे कोणतीही नागमोडी वळणे नाहीत किंवा चढ-उतार नाहीत. सरळ डांबरी रस्त्याचे पट्टे आहेत, जे जंगलातून सुरू होऊन, जंगलातच जातात, मग तुम्ही पुढे पाहा किंवा मागे. मेहमत यांच्याशी मी सहमत आहे, या रस्त्यावरून जाताना मला गंतव्याची काळजी नसते कारण या रस्त्यावरील प्रवास हेच माझ्यासाठी एकप्रकारे गंतव्य असते. असो, हे वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल तर हा लेख वन्यजीवनाविषयी आहे व तो ताडोबाविषयी सुद्धा  आहे(अगदी पूर्णपणे नाही), किंबहुना ताडोबातील व त्याभोवतालच्या रस्त्यांविषयी आहे. त्यातही एका विशिष्ट रस्त्याविषयी आहे, ज्याविषयी मला आश्चर्य वाटते की मी आत्तापर्यंत लिहायला कसा विसरलो! कदाचित प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते, तर ही एकप्रकारे मी या रस्त्याला केलेलं वंदन आहे आणि तो आहे, ताडोबातील डांबरी रस्ता ज्याला प्रेमाने गाईड आणि ड्रायवरस टायर रोड पण म्हणतात!

अतिशय कमी जंगलांच्या गाभा क्षेत्रामध्ये डांबरी रस्ते आहेत व ताडोबा त्यापैकी एक आहे. हा रस्ता चंद्रपूरच्या बाजूला असलेल्या मोहर्ली प्रवेशद्वारापासून सुरू होतो व ताडोबाच्या गाभाक्षेत्राच्या मध्यभागी म्हणजे ताडोबा तलावापाशी येऊन संपतो. साधारण दहा एक वर्षांपूर्वी कोलारा प्रवेशद्वारापासून ते चिमूरपर्यंत राज्य परिवहन मंडळाची बस या मार्गाने जात असे. पावसाळ्यामध्ये जेव्हा कोअर क्षेत्र पर्यटनासाठी बंद असते तेव्हा मी या बसने प्रवास केलेला आहे. आम्हाला या बस चालकांचा नेहमी हेवा वाटत असे कारण या लोकांना ताडोबाच्या निसर्ग सौंदर्याचा रोजच अखंडितपणे आस्वाद घेता येतो. वाघही या डांबरी रस्त्यांवर अनेकदा मुक्तपणे संचार करत असत, विशेषतः पर्यटनाचा हंगाम नसलेल्या काळात तर बरेचदा, त्यामुळे त्यांना बस थांबवावी लागत असे. “ताडोबाच्या स्तंभांसारखी” प्रसिदध व प्राचीन वारसा लाभलेली स्मारकेही याच रस्त्यालगत आहेत. या स्तंभांचे जवळपास तीनशे ते चारशे वर्षे जुने विटांचे बांधकाम आहे. त्यांचा उद्देश काय होता हे आजही एक गूढच आहे, त्यातील अनेक आता मोडकळीच्या स्थितीत असले तरीही, ते या जंगलांवर राज्य करणाऱ्या राजवंशांच्या कथा सांगतात व ते वन्यजीवनाच्या कितीतरी गोष्टींचे प्रेक्षक आहेत, ज्या कधीच सांगितल्या गेल्या नाहीत. हा डांबरी रस्ता संपूर्ण कोअर क्षेत्रातून जातो (व राखीव म्हणजेच बफर क्षेत्रातूनही), त्याच्या बऱ्याच मोठ्या टप्प्यामध्ये दोन्ही बाजूंनी बांबूची वने आहेत व एका लहान भागामध्ये ती सपाट भाग व डोगरांमधून जातात ज्यातून ताडोबाचा अतिशय सुंदर अधिवास दिसून येतो. या रस्त्यावरून जाणारे सर्व प्राणी व त्यांची थक्क करणारी दृश्ये तुम्ही पाहू शकता. बर्‍याच वाघ व वाघीणींनी अनेक वर्षे या रस्त्यावर अधिराज्य गाजवले आहे. माधुरी, सोनम, लारा, रोमा, व सध्या कॉलरवाली त्याचसोबत सी3 या जंगलातील काही वाघीणींचे या रस्त्यावर वर्चस्व राहिले आहे. बाघडोह, बजरंग, छोटा दढीयाल या मेल वाघांचेही या रस्त्यावर वर्चस्व होते. रस्त्याच्या उजव्या बाजूला, ताडोबा केंद्रावर जाईपर्यंत बहुतेक भाग हा बांबूच्या वनाने व्यापलेला आहे. त्याच्या पलिकडे एक समांतर रस्ता जातो ज्याला अग्निरेखा रस्ता , (फायर लाइन रोड) असे म्हणतात जो तेलिया बंधाऱ्यापर्यंत जातो व पुढे जाऊन डांबरी रस्त्याला मिळतो. या रस्त्याला येऊन मिळणारे आणखी दोन रस्ते एकेरी आहेत. या रस्त्यांवर एकेकाळी हिरव्या बांबूंची सुंदर कनात होती व या कनातीखाली कुठल्याही प्राण्याला पाहण्याचा अनुभव तुम्ही कधीच विसरू शकणार नाही.  दुर्दैवाने, वणव्याच्या धोक्यामुळे वनविभागाने ही कनात कापून टाकली. या रस्त्याला येऊन मिळणारे आणखी असे रस्ते असले पाहिजेत. कारण या दोन-तीन रस्त्यांच्या मध्ये अतिशय मोठे जंगल आहे. तिसरा रस्ता जो वाघडोह रस्ता म्हणून ओळखला जातो, जो मोहर्लीच्या पट्ट्याच्या अगदी कडेला आहे व अंधारी नदीला समांतर आहे. एखाद्या प्राण्याने हे मुख्य रस्ते ओलांडले व जंगलात नाहीसा झाला की मग तो दिसणे अवघड होते. म्हणूनच मुख्य रस्त्याला येऊन मिळणारे असे काही रस्ते बनवले पाहिजेत म्हणजे त्यामुळे गस्त घालण्यासही मदत होईल तसेच आगही नियंत्रणात येईल. हा संपूर्ण पट्टा बांबूच्या वनांचा असल्यामुळे आग लागली की कागदांच्या गठ्ठ्याप्रमाणे वणवा पेटू शकतो. त्यासाठी असे रस्ते अग्निरेखा म्हणूनही काम करू शकतात, यामुळे गस्त घालणे सोपे होते व पर्यटकांनाही या रस्त्यांवरून सफारीचा अधिक चांगल्याप्रकारे अनुभव घेता येईल. असाही हा भाग पर्यटनासाठी खुला आहे, त्यामुळे तुम्ही पर्यटनाच्या 20% एरियाच्या मर्यादेचे (हा एक विनोद आहे, माननीय न्यायालयाविषयी आदर राखून मी हे म्हणतो व याचा फेरविचार झाला पाहिजे, परंतु तो स्वतंत्र विषय आहे) उल्लंघन करत नाही.

डांबरी रस्त्याच्या डाव्या बाजूला, तुम्ही ताडोबाच्या दिशेने प्रवास करत असताना, एक अगदी लहानसा पट्टा पर्यटनासाठी खुला आहे व त्यामध्ये काही सुंदर जलाशय आहेत, जिथे हमखास अनेक वन्य प्राणी दिसतात. वाघ, बिबट्या, अस्वले पाण्याच्या, अन्नाच्या शोधात बरेचदा डांबरी रस्ता ओलांडतात. यामुळे या डांबरी रस्त्यावरून प्रवास करणे अतिशय थरारक असते कारण तुम्हाला कुठला प्राणी कधी दर्शन देईल याची खात्री नसते. बांबूच्या दाट वनामुळे, जोपर्यंत प्राणी झुडुपांमधून बाहेर रस्त्यावर येत नाहीत तोपर्यंत ते दिसणे अशक्य असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पिवळ्या, करड्या बांबू व गवतामध्ये वाघ व बिबट्यासारखे प्राणी बेमालूमपणे मिसळून जातात. या डांबरी रस्त्याच्या उजव्या बाजूला बांबूचे वन आहे तर डाव्या बाजूला वैविध्यपूर्ण भूदृश्य आहे. त्यात मिश्र झाडे व जलाशयांचा समावेश होतो, ज्यामुळे वन्य प्राण्यांना विश्रांती घेण्यासाठी ते सर्वोत्तम ठिकाण होते. दुसऱ्या भागामध्ये पर्यटनासाठी प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे या भागाला जोडणारे रस्ते जलाशयांपर्यंतच आहेत किंवा काही अंतरावर तिथे अडथळे लावण्यात आले आहेत. यामुळे तुम्हाला परत जावे लागते. हे रस्ते जंगलातील पायवाटांसारखे आहेत, इथे तुम्हाला अचानक आपल्याच धुंदीत चालणारे अस्वल पाहायला मिळते किंवा एखादा लाजाळू बिबट्या सावधपणे अन्न शोधत असतो. अशी थरारक दृश्ये पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा डांबरी रस्त्यावर येता व पुढे जाता जिथे तुम्ही खाटोडा प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता जे पूर्वी दुसरे प्रवेश द्वार होते (दुसरे प्रवेशद्वार का आवश्यक असते हे विचारू नका). आता हा तपास नाकाही झाला आहे, इथे तुम्ही नाश्ताही करू शकता, तसेच इथे ताजेतवाने होण्यासाठी स्वच्छतागृहांचीही सोय आहे.. खाटोडा प्रवेशद्वारापाशीही दोन रस्ते डांबरी रस्त्याला येऊन मिळतात, एक खुटवंडा प्रवेशद्वारापासून येतो व दुसरा कोलसा व पळसगाव या गावांमधून जी आता गाभा क्षेत्रातून स्थलांतरित करण्यात आली आहेत. साधारण दहावर्षांपूर्वी तुम्ही मोहर्लीतून कोलसा क्षेत्रापर्यंत जाऊ शकत होता परंतु आता तो रस्ता बंद करण्यात आला आहे ज्यामुळे तुम्हाला उद्यानाच्या बाहेर जाऊन झरी किंवा पांगडीतून प्रवेश करावा लागतो व त्यानंतर कोलसा क्षेत्रात प्रवेश करावा लागतो. हा अर्थातच पर्यटकांसाठी सोयीचा बदल नाही. कान्हामध्ये ज्याप्रकारे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रवेशद्वारातून जाऊ शकता, त्याप्रमाणे आपण डांबरी रस्त्याने (मोहर्ली प्रवेशद्वार) कोलसा क्षेत्रात प्रवेश करण्याचा पर्याय खुला का ठेवू शकत नाही, याचे उत्तर केवळ वनविभाग देऊ शकतो. त्यामुळे असो, कुणीतरी हे वाचेल अशी आशा करूया, विचार करूया व योग्य ती पावले उचलूया.

खाटोडानंतर डांबरी रस्ता सरळ पुढे जातो व आता बांबूच्या वनांची जागा उंच वृक्षांच्या मिश्र जंगलाने घेतलेली असते, त्यावर वेली लटकत असतात व अचानक संपूर्ण दृश्य बदलते. इथेही खाटोडा प्रवेशद्वारापासून गोसेखाणार रस्ता नावाचा दुसरा रस्ता लागतो, जो ताडोबाच्या मध्यभागी असलेल्या डांबरी रस्त्याला येऊन मिळतो, इथे डांबरी रस्ता संपतो. या गोसेखाणार रस्त्यावर एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या छोटी तारा या वाघीणीचे अधिराज्य होते व डांबरी रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला माया या अतिशय लोकप्रिय वाघीणीचे राज्य होते. जवळपास आठ वर्षे या दोन वाघीणी या दोन रस्त्यांच्या अविभाज्य भाग होत्या, ज्यांनी पर्यटकांना वन्यजीवनाच्या अतिशय सुंदर आठवणी दिल्या. दुर्दैवाने वय व वन्यजीवनातील अडचणींमुळे या दोन्ही वाघीणी ताडोबातून निघून गेल्या. आता या दोन्ही रस्त्यांवर छोटी ताराच्या मुलींचे राज्य आहे, गोसेखाणार रस्त्यावर बिजली ही वाघीण अधिराज्य गाजवते, तर डांबरी रस्त्यावर रोमा ही वाघीण.

माझ्या या डांबरी रस्त्याने प्रवास करतानाच्या अतिशय सुंदर आठवणी आहेत. परंतु एक जी माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरली गेली आहे (त्यापैकी बहुतेक कोरल्या गेल्या आहेत), ती जवळपास, दोन दशकांपूर्वीची आहे. तो इन्स्टाग्राम किंवा फेसबुकचा जमाना नव्हता. मी वन विभागासाठी जल व्यवस्थापन प्रकल्पावर काम करत होतो. आम्ही रात्रीच्या वेळी कोलसाहून ताडोबा केंद्रापर्यंत परत येत होतो. अचानक चालकाला एक मोठा वाघ डांबरी रस्त्यावरून मधोमध चालत जाताना दिसला. तेव्हा रस्त्याची रुंदी आत्ताच्या तुलनेत एक चतुर्थांश होती. आम्ही तो बाजूला होईल या आशेने शांतपणे त्याच्या मागे राहून गाडी चालवत होतो, परंतु तो त्याच्याच तंद्रीत चालला होता व रस्त्यावरून बाजूला होण्याची काही चिन्हे नव्हती. तेवढ्यात मला काय वाटले कुणास ठावूक पण मी मागे वळून पाहिले, तेव्हा अंधार होता, तरीही चंद्राचा प्रकाश असल्याने आमच्या जिप्सीच्या मागे एक वाघीण होती. या दोघांचा कदाचित हा समागमाचा काळ असावा व आम्ही त्या दोघांच्या मध्ये होतो, आज ते आठवून अतिशय थरारक वाटते. परंतु रात्रीच्या त्या अंधारात, तुम्ही जंगलामध्ये एकटेच आहात व दोन वाघांच्या मध्ये आहात याची जाणीव झाल्यावर, तो डांबरी रस्ता तितकासा थरारक वाटत नव्हता. सुदैवाने नर वाघ रस्त्याला लागून असलेल्या जंगलात निघून गेला व या समागम करत असलेल्या जोडप्याला मागे सोडून आम्ही शक्य तितक्या लवकर पुढे निघून गेलो. नंतर, दिवसा आम्हाला डांबरी रस्त्यावर अनेक संदर प्राणी पाहायला मिळाले, परंतु ती रात्र मला नेहमी लक्षात राहील. मी अतिशय नशीबवान आहे की मला त्या डांबरी रस्त्यावर माया चालत असताना पाहायला मिळाली व मला खात्री आहे की या रस्त्यालादेखील माया व तिची चाल यांची आठवण येत असेल.

प्रतयेक हंगामात डांबरी रस्त्याचे सौंदर्य बदलत असते, हिवाळ्यामध्ये संपूर्ण रस्ता हिरव्याच्या विविध छटांनी नटलेला असतो. परंतु मला हा डांबरी रस्ता उन्हाळ्याची सुरुवात होताना अतिशय आवडतो, जेव्हा पळस व अमलताशच्या लाल व पिवळ्या फुलांनी, तसेच महुआ, तेंदू, जांभूळ, बेहडा व अशा इतर अनेक झाडांमुळे हा परीसर विविध रंगांनी नटलेला असतो, अशा जादुई दुनियेतून रस्त्याचा प्रवास सुरू असतो.

हा झाला या रस्त्याचा गाभा क्षेत्रातील भाग, मोहर्ली प्रवेशद्वाराबाहेरील चंद्रपूरपर्यंत जाणारा भाग आता राखीव जंगलाचा भाग आहे व हा भाग देखील तितकाच घडामोडींनी भरलेला असतो, इथे दिवसाही रस्त्यावर वाघ दिसतो. इथे केवळ पर्यटकच नव्हे तर स्थानिकही या रस्त्याचा वापर करतात, त्यामुळे या रस्त्यावर वन्यप्राणी व माणसांमधील संघर्ष (म्हणजे योग्य अर्थाने घ्या) नेहमीचाच झाला आहे. हा रस्ता सहजीवनाचे जिवंत उदाहरण आहे, कारण वाघ व माणसे दोघेही हा रस्ता व वापरतात, एकमेकांचा आदर करतात व एकमेकांना सामावून घेतात. असे पाहिले तर ताडोबातील व आजूबाजूच्या प्रत्येक रस्त्याशी संबंधित एखाद्या गोष्टीच्या पुस्तकाइतके किस्से आहेत. आपल्या सुरक्षित काँक्रिटच्या जंगलात, अगदी सुरक्षित व सुखरूप राहणे अगदी सोपे आहे. परंतु जे लोक या रस्त्यावरून कोणत्याही सुरक्षेशिवाय पायी किंवा सायकलवर जातात व तोच रस्ता वाघ, अस्वल किंवा रानगवाही वापरत असेल, तर या रस्त्याच्या आजूबाजूला राहणारे लोक किती शूर आहेत हे तुम्हाला समजेल.

जंगलातील जीवन हे अतिशय व्यवहारी असते हे मान्य आहे, त्यात कोणतीही दुःखे नसतात, केवळ प्रत्येक दिवस येईल तसा जगायचा असतो. तरीही मला खात्री आहे की डांबरी रस्त्याला बोलता येत असते तर तो सर्वोत्तम कथाकार ठरला असता. ताडोबातला डांबरी रस्ता हा केवळ लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणारा रस्ता नाही, तर ते जणू ताडोबाचे वन्यजीवनाच्या गोष्टींचे अतिशय विशेष पुस्तक आहे. इथे प्रत्येक सफारीची एक नवीन गोष्ट असते, एक नवे साहस असते. मी प्रत्येकवेळी ताडोबातून बाहेर पडताना मला शक्य तितक्या लवकर डांबरी रस्त्यावर परत येण्याचीच माझी इच्छा असते. मला असे वाटते माझी या रस्त्यासाठी सर्वोत्तम आदरांजली असेल, एवढे सांगून निरोप घेतो!!

मी ताडोबाच्या डांबरी रस्त्यावर आलेल्या अनुभवातून टिपलेले काही क्षण खालील दुव्यावर उपलब्ध आहेत, ते आवर्जून पाहा...


https://www.flickr.com/photos/coexistance_is_the_key/albums/72177720333155187


संजय देशपांडे smd156812@gmail.com 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in

 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

हनुमान अंश; प्रवास, श्रद्धा आणि आशेचा!

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??