तरुण पिढी, जंगले आणि वाघांचे भविष्य; उत्तरार्ध!!
तरुण पिढी, जंगले आणि वाघांचे भविष्य; उत्तरार्ध!!
“या पिढीने वाढीची आशा सोडून दिली आहे. ते केवळ या जगात टिकून राहू अशी आशा करत आहेत” …
पेनेलोप स्फिरीस
“मला नेहमी असे वाटले आहे की आपण सर्वजण आयुष्यात बरेच एकटे असतो, विशेषतः पौगंडावस्थेत म्हणजेच किशोरावस्थेत” … रॉबर्ट कॉरमायर
“मेंढी म्हणून हजारो वर्षे जगण्यापेक्षा वाघ म्हणून पंचवीस दिवस जगणे कधीही चांगले.”… तिबेटी म्हण
“जंगलामध्ये वाघाचे निरीक्षण करून, मला राजा या पदवीसोबत येणाऱ्या अडचणी व संघर्ष समजला आहे”… मी
तरुण वाघांविषयीच्या लेखाच्या या दुसर्या भागात आपले स्वागत आहेत, मी आधीच्या भागात नमूद केल्याप्रमाणे (धुरंधरचा परिणाम), की तरुण वाघ व त्यांचे जंगलामध्ये निरीक्षण करणे याविषयी लेखाचा हा दुसरा भाग नाही तर आधीच्या लेखाचाच उत्तरार्ध आहे. मी ते एकाच लेखात मांडण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याची एक कादंबरी झाली असती, जी फारशा लोकांनी वाचली नसती, म्हणूनच ते दोन भागात लिहीतोय. असो, तर हा लेख जंगलांविषयी आहे, म्हणजेच ताडोबा व वाघांविषयी आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण हा लेख ज्याप्रमाणे प्रौढ व तरुण वाढ जंगलांमध्ये व त्यांच्या अधिवासामध्ये फिरतात याचे केवळ निरीक्षण करून मला वाघ व जंगलांविषयी जे समजले, जे शिकता आले त्याविषयी अधिक आहे. हा केवळ पर्यटनाशी संबंधितच नव्हे तर एकूणच वन्यजीवनाचा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. मी अलिकडेच इस्टाग्रामवर एक पोस्ट पाहिली. त्यामध्ये एका माणसाने त्याची व त्याच्या कुटुंबाची ताडोबाच्या सफारीची ध्वनीचित्रफित टाकली होती व त्यावर मथळा होता, “हजारो रुपये खर्च करून, काय पाहिले तर दोन रानगवे, सहा हरिणे, काही माकडे व धुळीसोबत ऊन”. मी तात्काळ या पोस्टवर प्रतिक्रिया दिली की जंगल फक्त पाहायचे नसते, तर समजून घ्यायचे असते. मला माहितीय की त्यामुळे त्या व्यक्तीचा किंवा हजारो व्यक्तींचा वन्यजीवन पर्यटनाविषयी किंवा सफारीविषयीच्या दृष्टीकोन बदलणार नाही, म्हणूनच हा लेख लिहीत आहे.
जंगलाप्रमाणेच आयुष्यही दररोज आपल्याला नवीन गोष्टी शिकवत असते परंतु जेव्हा आपण ज्ञान मिळवतो व त्याचा आपल्या जीवनामध्ये वापर करतो तेव्हा ते शिकणे झाले नाही तर नुसतेच “पालथ्या घड्यावर पाणी”! परंतु ही वेगळी गोष्ट आहे म्हणूनच वाघाचे निरीक्षण करण्यावर व त्यातून जे शिकायचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करू. इथे बरेच जण म्हणतील (इन्स्टाग्रामच्या पोस्टमधील व्यक्तीप्रमाणे), वाघाचे निरीक्षण करण्यासाठी आधी जंगलात वाघ दिसला तर पाहिजे व मी तुम्हाला सांगतो हे म्हणजे “आधी कोंबडी की आधी अंडे” यासारखे आहे (कृपया अर्थासाठी गूगल करा). जेव्हा मी वाघाचे निरीक्षण करायचे असे म्हणतो, तेव्हा ते केवळ वाघावर लक्ष केंद्रित करायचे असे नसते तर संपूर्ण अधिवासाचे निरीक्षण करायचे असते ज्यामध्ये वाघ राहतो. कारण ही पहिली पायरी आहे ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या पायरीमध्ये म्हणजे वाघ पाहण्यास मदत होईल. मला तुम्हाला सांगावेसे वाटते (ज्यांना जंगलाची विशेष ओळख नाही त्यांच्यासाठी) की वाघ क्वचितच जंगलामध्ये त्याचे अस्तित्व आपणहून दर्शवतो किंवा दाखवतो. म्हणजे एखादे विशिष्ट कारण असल्याखेरीज, म्हणजे समागमासाठी किंवा वाघीण तिच्या बछड्यांना बोलवत असेल किंवा वाघाच्या शिकारीपासून कोल्हे वा गिधाडा सारख्या पक्ष्यांनी लांब राहावे म्हणून इशारा देणे व इतर तत्सम काही कारणे सोडली तर वाघ अतिशय शांत असतात व म्हणूनच ते शिकार करू शकतात, बरोबर? म्हणूनच, वाघ शोधण्यासाठी तुम्हाला त्याच्या भोवती असलेल्या जंगलाचे निरीक्षण करावे लागेल, कारण जंगलातील प्रत्येक सजीवाला वाघाच्या अस्तित्वाची जाणीव असते, जो लपून राहण्यात निपुण असतो. माणसे ही जंगलामध्ये सर्वच ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत जंगलामध्ये सर्वात कमकुवत प्रजाती आहे, पक्षी, माकडे, हरिण हे सगळे अगदी दाट अभयारण्य किंवा गवतामध्ये वाघाला अगदी लांबूनही पाहू शकतात, त्यांना त्याचा गंध जाणवतो. त्यांनी एकदा ते केल्यानंतर, वाघ जवळपास असल्याचा विशिष्ट आवाजात इशारा देतात, या सगळ्याला वाघाचे निरीक्षण करणे असे म्हणतात. अनेकदा वाघ तुमच्यापासून काही पावलांवर असतो व वाघाने तुम्हाला अगदी स्पष्टपणे पाहिलेले असते. परंतु जोपर्यंत वाघ हालचाल करत नाही किंवा आवाज करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो दिसणार नाही व अशावेळी इतर प्रजाती इशारा देण्यासाठी जे आवाज काढतात त्यावरून तुम्हाला वाघ कुठे आहे हे शोधण्यास मदत होऊ शकते.
दुसरी मदत म्हणजे, वाघाला सामान्यपणे जंगलातील पाऊलवाटेवर चालायला आवडते व प्रौढ वाघ त्याच्या क्षेत्रावर खुणा करण्यासाठी निश्चितपणे एकच विशिष्ट रस्ता किंवा मार्ग अनुसरतो. धुळीमध्ये उमटलेले पंजांचे ठसे किंवा रस्त्यावरील विष्ठा पाहून, तुम्ही आसपास वाघ आहे त्याचप्रमाणे तो कुठे असेल याचा अंदाज बांधू शकता. इथे तरुण वाघांचा ( म्हणजे तारुण्यात नुकतेच प्रवेश केलेले वाघ) माग काढणे मोठ्या किंवा प्रौढ वाघांपेक्षा अधिक कठीण असते कारण त्यांचे स्वतःचे विशिष्ट क्षेत्र नसते, त्यामुळे ते कोणताही विशिष्ट मार्ग अनुसरत नाहीत. किंबहुना प्रौढ वाघांच्या उलट, तरुण वाढ झुडुपांमधून किंवा गवतातून किंवा कशाच्यातरी आडून हालचाल करणे पसंत करतात व याची कारणे स्वाभाविक असतात. एक म्हणजे त्यांना एकटे कुठेही जाण्यासाठीचा आत्मविश्वास कमी असतो, दुसरे म्हणजे त्यांचे प्रशिक्षण अजूनही संपलेले नसते व आईने त्यांना ती सोबत असल्याखेरीज खुल्या जागेत जायचे नाही असे शिकवले असते. तिसरे म्हणजे त्यांना स्वतःला दिसू देण्याची भीती वाटते कारण या टप्प्यात तरुण वाघ विशेषतः नर वाघांना इतर वाघांकडून हल्ला होण्याची भीती वाटते जे त्यांचे वडील नाहीत. त्याचवेळी, जे तरुण वाघ बफर क्षेत्रात जन्मलेले असतात त्यांनी भोवताली माणसे पाहिलेली असतात व त्यांची आई त्यांना माणसांपासून अंतर ठेवायला सांगते कारण जगण्यासाठी ते महत्त्वाचे असते. त्याचवेळी गाभा क्षेत्रातील तरुण वाघांचा मात्र पायी चालत जाणाऱ्या किंवा दुचाकींवर जाणाऱ्या माणसांशी काहीच संपर्क आलेला नसतो. मात्र ते अगदी आरामात जिप्सी वाहनांच्या मधून चालत वाट काढतात, कारण त्यामुळे त्यांना धोका नसल्याचे त्यांना माहिती असते. त्यामुळेच गाभा क्षेत्रामध्ये तरुण वाघ रस्त्यावर चालत जाताना दिसतात परंतु प्रौढ वाघांपेक्षा त्यांचा आत्मविश्वास कमी असतो. याचे एक उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर ताडोबातील मोहार्ली गावामध्ये छोटी मधू नावाच्या वाघीणीचे तरुण बछडे आहेत. लहानपणापासूनच त्यांनी माणसांची बरीच वर्दळ पाहिली आहे, त्यांनी त्यांच्या अवतीभोवती माणसे चालत जाताना पाहिजे आहे, तसेच जंगलाच्या जवळपास असलेल्या शेतांमध्ये काम करणारी माणसे पाहिली आहेत. माणसांशी एवढा संपर्क असूनही या तरुण वाघीणी जेव्हा त्यांची आई त्यांच्यासोबत नसते तेव्हा क्वचितच मुख्य रस्त्यावर चालत जाताना दिसतात व कोणतीही वाहने येताना दिसल्यावर लगेच रस्त्याला लागून असलेल्या झुडुपांमध्ये लपतात किंवा आडोसा घेतात. म्हणूनच, तुम्हाला रस्त्यावर एखादा वाघ तुमच्या दिशेने येताना किंवा तुमच्यापासून लांब जाताना दिसला तर तुमचे वाहन तिथेच थांबवणे योग्य होईल. सर्वप्रथम त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व तुम्ही छायाचित्रकार असल्यास लांबून छायाचित्रे घ्या व त्यानंतर सुरक्षित अंतर ठेवून हळूहळू वाघाच्या दिशेने जा असा सल्ला मी देईन, म्हणजे तुम्हाला हवी तशी छायाचित्रेही घेता येतील व तुम्हाला वाघाचे निरीक्षणही व्यवस्थित करता येईल.
आता तरुण वाघांचे निरीक्षण करताना व छायाचित्रे काढताना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की मलाही वाघ पाहायला व त्याची छायाचित्रे काढायला आवडते. परंतु सर्वोत्तम छायाचित्र मिळवण्याच्या नादात आपण वाघाचे निरीक्षण करायचे विसरून जातो ज्यावर आपल्या वन्यजीवन सफारींमध्ये लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपण छायाचित्र काढू व इन्स्टाग्राम/फेसबुकवर पोस्ट करू व दुसऱ्या दिवशी ती पोस्ट इतिहासजमा झालेली असेल. परंतु वाघ अवतीभोवती असतानाचा एकूणच अनुभव, म्हणजे तो खुल्या जागेत ज्याप्रकारे चालतो, त्याचप्रमाणे तो लपलेला असताना कसा दबक्या पावलाने जातो, तो आसपास असल्याचा इशारा देणारे इतर प्राण्यांचे आवाज, निस्तब्धता या सगळ्याकडे आपले दुर्लक्ष होते जर आपण केवळ वाघाची छायाचित्रे घेण्याकडेच लक्ष दिले, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे. मी सुद्धा छायाचित्रे काढण्याच्या नादात असे अनुभव चुकवले आहेत, परंतु आता मला काय महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली आहे. वाघाची छायाचित्रे काढणे व त्याचवेळी वाघाचे निरीक्षण करणे यातच खरी मौज आहे. इथेही पुन्हा, तुमचे बफर क्षेत्र खुल्या जागेत असेल व तुमचे वाहन केवळ पुढे किंवा सगळ्यात मागे असेल तरच वाघ स्पष्टपणे दिसण्याची शक्यता अधिक असते, म्हणूनच तुम्ही जेव्हा वाघ पाहता तेव्हा धीर धरा, त्यामुळे वाघ पाहण्यासाठी घाई करू नका, थांबा, वाघाच्या हालचालीचे निरीक्षण करा, हा कोणत्या प्रकारचा वाघ आहे ते समजून घ्या व त्यानंतर तुमची जिप्सी योग्य दिशेने हलवा. कारण जर वाघ तरुण असेल तर तो जिप्सी म्हणजेच लोकांना टाळण्याचा प्रयत्न करेल व एकतर झुडुपांचा आडोसा घेईल किंवा वाहनांपासून अंतर राखून रस्ता ओलांडेल व तुम्ही त्याची छायाचित्रे काढणे तर सोडाच त्याला पाहूही शकणार नाही. जर हे जंगलाचे गाभा क्षेत्र असेल तर वाघ सरळ चालत दाट जंगलात निघून जाईल जेथे तुमची जिप्सी त्याच्या मागे जाऊ शकत नाही, म्हणूनच वाघाची मनस्थिती समजून घ्या व त्यानंतर तुम्ही कसे जाणार आहात ते ठरवा. त्यासाठी अधिवासाचे निरीक्षण अतिशय महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे तुम्हाला अधिक सहजपणे वाघाचा माग काढण्यास मदत होते, कारण वाघ विशिष्ट सवयी असलेला प्राणी आहे, तो नेहमी ज्या मार्गाने जातो किंवा तरुण वाघ असल्यास त्याला त्याच्या आईने जो मार्ग दाखवला आहे त्याच मार्गाने तो जाईल, परंतु तुमच्यामध्ये निरीक्षण करण्याएवढा धीर असला पाहिजे व तुमच्या निरीक्षणांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. ताडोबामध्ये अलिकडेच आम्ही एका तरुण वाघीणीचे निरीक्षण करत होतो जी केवळ वीस महिन्यांची होती पण तिने स्वतंत्रपणे राहायला सुरुवत केली होती. आम्ही जेव्हा गवताळ पट्ट्यात शिरताना पाहिले तेव्हा सर्व जिप्सी त्या गवतातून मार्ग काढत तिच्या मागे गेल्या. आम्ही तिला तिथेच सोडले व पुढे गेलो व बरेच पुढे गेलो व ती जेवढे अंतर व ज्या दिशेने चालत गेली होती तिथे ती येईल असा विचार करून पाणवठ्यापाशी तिची वाट पाहात राहिलो. ती जिथून गवतात शिरली होती तिथे सर्व वाहने तिची वाट पाहात होती. परंतु आम्ही खूप पुढे संयमाने उभे राहिलो. जवळपास तीस मिनिटांनी पाणवठ्याजवळच्या गवताळ पट्ट्यातून तिचे डोके बाहेर आले, जिथे आम्ही वाट पाहात होतो, तिथे आम्हाला उत्तम छायाचित्रे मिळाली व त्याहून अधिक म्हणजे एका तरुण वाघीणीला समजून घेता आल्याचे समाधान व आनंद होता. वाघाचे निरीक्षण करणे हे असे असते व छायाचित्रे काढण्याच्या गडबडीत व येनकेन प्रकारेण वाघ पाहण्याच्या अट्टाहासामुळे ही कला हरवतेय, ज्याविषयी आपण इतरांना जागरुक केले पाहिजे.
तरुण वाघांविषयी बोलायचे झाले तर ते दिशाहीन क्षेपणास्त्राप्रमाणे असतात. तरुण वाघांची सर्वात मोठी समस्या म्हणजे, त्यांचे संरक्षण करण्यासाठी किंवा ते विश्वास ठेवू शकतील असे कुणीही नसते. त्यामुळे त्याच्याबाबतीत काहीही अंदाज लावणे कठीण असते, जो वाघ व्यवस्थित दिसण्यातील अडथळा असतो तसेच आजूबाजूला राहणाऱ्या माणसांसाठी धोका असतो. आमच्या अलिकडच्या ताडोबा सफारीमध्ये आम्ही एक तरुण वाघीणीला मोराचा पाठलाग करताना पाहिले व शिकारीच्या अयशस्वी प्रयत्नानंतर तिने एका रानगव्याच्या रेडकावर हल्ला केला, तोदेखील अयशस्वी ठरला कारण कारण त्याची आई रेडकाचे रक्षण करण्यासाठी तिच्यावर चाल करून गेली. आता तुम्ही कल्पना करू शकता, एक सामान्य प्रौढ वाघ कधीही मोराचा पाठलाग करण्यात आपली शक्ती खर्च करणार नाही परंतु तोच तरुण वाघ व प्रौढ वाघ यांच्यातील फरक असतो. तरुण वाघांच्या शिकारीच्या प्रयत्नाच्या दोन्ही घटना पाहणे अतिशय आनंददायक होते, पण तरीही शिकारीच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर तिला दमलेले पाहून मला अतिशय दुःख झाले. एखाद्या प्रौढ वाघासमोर अचानक माणूस आला तरीही तो कधीही माणसांवर किंवा रानगव्यासारख्या कोणत्याही मोठ्या प्राण्यावर विचार न करता हल्ला करणार नाही, पण तरुण वाघ अचानकपणे माणूस समोर आल्यास घाबरून जातो किंवा अतिशय लवकर भुकेनी उतावीळही होतो आणि हल्ला करतो, इथेच वाघाचे निरीक्षण केल्याने आपल्याला पर्यटक म्हणून व जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना अतिशय मदत होते, कारण हे वाघ आता त्यांच्या (आपल्या) जीवनाचा भाग आहेत. सरतेशेवटी मी इतकेच म्हणेन, वाघाचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे तुमच्या मनाला जंगलातील प्रत्येक बारकाव्याचे निरीक्षण करण्याचे प्रशिक्षण मिळते, कारण प्रत्येक तपशील महत्त्वाचा असतो व तुम्ही जेव्हा तुमच्या काँक्रिटच्या जंगलात परत जाता तेव्हा देखील निरीक्षणाच्या या सवयीमुळे मदत होते कारण काँक्रिटच्या जंगलात टिकून राहणे अधिक अवघड असते. इथे दोन पायांचे शिकारी असतात व ते वाघापेक्षा कितीतरी अधिक धूर्त आणि क्रूर असतात, हे लक्षात ठेवा, एवढे सांगू निरोप घेतो!
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा