तरुण पिढी, जंगले आणि वाघांचे भविष्य; पूर्वार्ध..!!

























तरुण पिढी, जंगले आणि वाघांचे भविष्य; पूर्वार्ध..!!


“तुम्ही एखाद्या किशोरवयीन व्यक्तीला पाहिले तर तुम्हाला अतिशय अनिश्चितता जाणवेल.”…जेमी ली कर्टीस


“एकूण परिस्थितीचा विचार करता निसर्गामध्ये समतोल राखणे हे वाघाचे कार्य असते व क्वचित प्रसंगी अगदी अत्यावश्यक असेल तेव्हाच तो एखाद्या माणसाला ठार करतो व त्याचे नैसर्गिक खाद्य मानवाने निर्दयीपणे नष्ट केले असेल तेव्हाच त्याने मारल्याचा आरोप केलेल्यापैकी केवळ दोन टक्के जनावरेच तो मारतो, अशा कृत्यांमुळे संपूर्ण प्रजातीवरच क्रूर व रक्तपिपासू असल्याचा शिक्का मारणे योग्य होणार नाही.” … जिम कॉर्बेट


“तरुण वाघ व मानवी किशोरवयीन यांच्यातील सर्वात सामायिक बाब म्हणजे, दोघेही दिशाहीन क्षेपणास्त्रासारखे असतात” … मी


मी अलिकडच्या काळात एकाच लेखासाठी अनेक अवतरणांचा (माझ्यासकट) वापर केलेला नाही, परंतु हा विषयच असा आहे. यात ताडोबा आहे (बऱ्याच काळानंतर) व वाघही आहेत, परंतु कर्टीस व कॉर्बेट  यांच्या अवतरणात म्हटल्याप्रमाणे, हा लेख किशोरवयीन मनुष्य आणि तरुण वाघांसंदर्भात आहे, व मी खरोखरच सांगतो माझ्यासाठीही हा पूर्णपणे नवीन अनुभव होता. जंगलात दोन दशकाहून अधिक काळ भटकंती करत असूनही जंगल अजूनही मला आश्चर्याचे धक्के देत असते व ताडोबाची ही सफर सुद्धा त्याला अपवाद नव्हती, त्यातच उमरेड कऱ्हांडला पौनी वन्यजीव अभयारण्याचीही (यूकेपीडब्ल्यूएस) भर पडल्याने ही सफर फोटोग्राफि होण्यापेक्षाही बरेच काही होती, अर्थात ज्ञानाच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते कधीच परिपूर्ण नसते. आता तुम्ही विचार करत असाल की यात एवढे काय विशेष आहे. सर्वप्रथम असे सांगावेसे वाटते की मला ताडोबा व मध्य भारतातील जंगलांना फेब्रुवारीच्या मध्यापासून ते मार्च संपेपर्यंतच्या काळात भेट द्यायला आवडते कारण या काळात पळसाच्या झाडांना बहर येतो, विशेषतः नागपूर भोवतालच्या प्रदेशात ती विपुल प्रमाणात आढळतात, त्यात महुआच्या फुलांची व पिकलेल्या फळांच्या सुवासाची भर पडते. मी कधी काश्मीरला गेलेलो नाही, परंतु मी एखादा सम्राट असतो तर म्हटले असते की, “जर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे!” म्हणजे मध्य भारतात,  मला माहितीय हे वाचून बहुतेकजण हसतील, कारण काश्मीरमध्ये उन्हाळ्यातही वाहणारे थंडगार वारे, ट्यूलिपच्या सुंदर बागा, बदाम व सफरचंदांच्या बागा यांचे निसर्गसौंदर्य कुठे व 40 अंशांच्या वर तापमान असलेली करड्या-पिवळसर रंगाची जमीन कुठे जी अक्षरशः आग ओकत असते. मी या दोन्हींची तुलना करण्याची हिंमतच कशी करू शकतो? तर मी अशा व्यक्तींना दोष देत नाही, परंतु सौंदर्य हे पाहणाऱ्या व्यक्तीच्या नजरेत असते. माझ्यासाठी या शुष्क जमीनीवरील लाल पळसाची झाडे व महुआची झाडे ही काश्मीरपेक्षाही किंवा जगातील कोणत्याही ठिकाणापेक्षा अधिक सुंदर आहेत. कारण इथे वाघांचा अधिवास आहे जो तुम्हाला काश्मीरमध्ये आढळणार नाही व मला खात्री आहे की हाच वन्यजीवप्रेमी व इतरांमधील फरक आहे. तर काश्मीर प्रेमींनो माफ करा, कुणावरही टीका करणे हा उद्देश नाही! विशेषत: नागपूरच्या आसपास असलेल्या फुलांचा रंग मध्यप्रदेशातील पळसापेक्षा अधिक गडद असतो, याचे कारण म्हणजे जेवढी जास्त उष्णता तेवढा पळसाचा रंग अधिक गडद असतो, असे मला वाटते. उष्णतेच्या बाबतीत तसेच जेवणाच्या बाबतीत बोलायचे झाले तर तिखट मसाल्यांसाठीपण उमरेड/ताडोबा या भागांचा हात कुणीही धरू शकणार नाही. म्हणूनच मला पळसाच्या फुलांचा लालबुंद गालिचा पाहून अतिशय आनंद झाला, महुआच्या फुलांचा गोड सुगंध छातीत भरून घेतला आणि माझ्यासाठी जंगलातील उन्हाळ्याच्या सफारीची अद्भूत सुरुवात झाली.

तर आता पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे वळू (सरतेशेवटी), तर ही धावती भेट होती. मला ताडोबासोबतच उमरेड कऱ्हांडला पौनी वन्यजीव अभयारण्याचे तिसरे द्वार पाहायचे होते. मला काही नवीन प्रदेश पाहायची इच्छा होती. मला जे पाहायला मिळाले (अनुभवायला) त्यातून मला (म्हणजे आपल्याला) वन्यजीवनाविषयी किती कमी माहिती आहे याची जाणीव झाली, जे खरेतर अक्षरशः आपल्या परसदारी आहे, किमान ताडोबातील लोकांविषयी तरी मी हे म्हणू शकतो. या सफारीत मला नुकतेच तारुण्यावस्थेत प्रवेश केलेले वाघाचे बछडे पहायला मिळाले, वाघांच्या आयुष्याची माणसांशी तुलना केली तर त्यांना किशोरवयीन म्हणता येईल. वाघीण तिच्या बछड्यांची साधारण अडीच वर्ष म्हणजे तीस महिन्यांसाठी काळजी घेते. नुकतेच तारुण्यात प्रवेश केलेले हे बछडे दिसायला पूर्णपणे वाढ झालेल्या वाघासारखे असतात परंतु मनाने व अनुभवाने एखाद्या किशोरवयीनासारखे असतात. या वयोगटातील वाघांचा आपण अभ्यास केला पाहिजे व आपण अलिकडच्या काळात मरण पावलेल्या वाघांची आकडेवारी तपासली तर त्यातील बहुतांश वाघ हे तारुण्यात नुकतेच पदार्पण केलेले होते, हे वाघांच्या संवर्धनाचे कटू सत्य आहे. आपल्याला ते टाळायचे असेल किंवा या वाघांना वाचवायचे असेल तर आपण या नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या वाघांची जीवनशैली अभ्यासली पाहिजे हा माझ्या लेखाचा विषय आहे. ताडोबा व उमरेड कऱ्हांडला पौनी वन्यजीव अभयारण्यामध्ये काय होत आहे , तर येथे नर वाघ व नवीन तरुण वाघांची संख्या वाढल्यामुळे ज्या वाघीणींचे बछडे आहेत त्यांना ज्या नर वाघांचे हे बछडे नाहीत त्यांच्यापासून सुरक्षित ठेवणे अवघड जाते. ज्यांना वन्यजीवनाविषयी माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो, नर वाघ ज्या वाघीणीशी संबंध आहेत किंवा जिच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न करतोय, स्वतःचा वंश वाढवण्यासाठी किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तिच्या सर्व इतर वाघांपासुन झालेल्या बछड्यांना नेहमी ठार करतो. हे कदाचित इतरांना अतिशय क्रूर वाटेल, परंतु निसर्गानेच वाघांना तसे बनवले आहे व क्रूरतेच्या बाबतीत माणसे वाघांच्याही बरीच पुढे आहेत, त्यामुळे असो. जेव्हा एखाद्या वाघीणीला क्ष नर वाघाकडून झालेली बछडी असतात व तो क्ष वाघ छोटा मटकासारखा (कृपया गूगल करा) वर्चस्व निर्माण करणारा नसेल, अर्थात तोदेखील वर्चस्वाच्या लढाईला बळी पडला, तर वाघीणीच्या मागे लागलेला नवीन नर वाघ तिच्या सध्याच्या बछड्यांसाठी सतत धोका असतो व ती नेहमी वाघीणीसोबतच असल्याचे आढळले तर तो निश्चितपणे त्यांना ठार करतो. म्हणूनच त्यांचे रक्षण करण्यासाठी, आई एक कठीण निर्णय घेते, ती त्यांचे प्रशिक्षण आवरते घेते व अठरा किंवा वीस महिन्यांनीच म्हणजे त्यांच्या किशोरवयाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच त्यांच्याशी फारकत घेते. वन्यजीव संवर्धनातील ही सर्वात मोठी समस्या आहे ज्याकडे आपले दुर्लक्ष होते आहे, हाच माझ्या लेखाचा मुद्दा आहे!

या सफारीमध्ये माझी बऱ्याच तरुण वाघांशी गाठ पडली (म्हणजे योग्य आणि चांगल्याप्रकारे) व त्यांना पाहणे ही एक मौज असते त्याशिवाय ज्याप्रकारे हे तरुण वाघ वन्यजीवनातील समस्यांना आपणहून तोंड देण्याचा प्रयत्न करतात ते पाहून बरेच काही शिकायला मिळते. सर्वप्रथम मी एक तरुण वाघीण पाहिली (म्हणजेच 20 महिने वय ), जी या ताडोबा-मोहार्ली रेंजमधील अतिशय प्रभावी वाघीण असलेल्या कॉलरवालीची, व शक्तीशाली छोटा दढियाल या नर वाघाची मुलगी होती. स्थानिकांनी वाघांना ही टोपण नावे दिली आहेत, वन विभाग मात्र त्यांना सांकेतिक क्रमांकांनीच ओळखतो. तरीही मी त्यांना त्यांची टोपणनावेच वापरणे पसंत करतो, यामुळे वाघांशी जोडले गेल्यासारखे वाटते. तर या तरुण वाघीणीला दोन भावंडे आहेत, दोघीही मादीच आहेत परंतु ही मोठी व अधिक धाडसी आहे. ती अजून वयाने दोन वर्षांचीही नाही, तरीही ती आकाराने तिच्या आईएवढी दिसते व एकटी शिकार करते. कॉलरवाली या वाघीणीच्या मागावर शंभू नावाचा नर वाघ आहे. लवकरच या शंभू व छोटा दढियालदरम्यान संघर्ष होईल अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. आपल्या तरुण मुलींना या संघर्षाच्या आगीत झोकायचे नव्हते म्हणून कॉलरवाली वाघीण छोटा दढियालसोबत जात होती किंवा या तिन्ही बहिणींना एकटे सोडत होती. ही तरुण वाघीण एकटी शिकार करत होती, तरीही ती तिच्या बहिणींना शोधत होती व त्यांना बोलवत होती. हे जंगल मोठे आहे त्यामुळे वाघांसाठीही त्यांच्या भावडांना शोधणे सोपे नसते. दुसरा धोका म्हणजे मोठ्याने आवाज करून बोलवल्यामुळे त्या भागातील तुमचे वडील नसलेल्या नर वाघांना सुगावा लागू शकतो आणि जिव गमवावा लागु शकतो.

त्यानंतर मी छोटी मधू या ताडोबातील आणखी एका सर्वात प्रसिद्ध वाघीणीच्या मुली असलेल्या दोन तरुण वाघीणींना भेटलो. या दोघींचे वय सुद्धा वीस महिन्यांहून अधिक आहे व त्यांनी एकटे फिरायला व आपले स्वतःचे क्षेत्र निर्माण करायला सुरुवात केली आहे. हा अतिशय कठीण भाग असतो कारण आत्तापर्यंत त्या त्यांच्या आईसोबत होत्या आता जंगलाचा हाच भाग तिघींमध्ये वाटून घ्यावा लागतो म्हणजे कमी जागा व कमी अन्न. अलिकडेच ताडोबा  मधील गावकऱ्यांविषयी (पर्यटकांविषयी नव्हे) एक रील व्हायरल झाले होते व त्यामध्ये स्थानिक त्यांच्या सेल फोनवर रस्त्यावरून चालणाऱ्या वाघाला चित्रित करत होते व वाघ त्यांच्यापासून लांब जात होता. हा काही मोठा वाघ नव्हता तर हीच छोटी मधूची मुलगी तरुण वाघीण होती. त्या अगदी बछड्या असल्यापासून गावकरी व लोकांना रस्त्यावर पाहात आहेत व ताडोबा ते चंद्रपूरपर्यंतच्या मुख्य रस्त्यावर वाहनांच्या मधून रस्ता ओलांडतात. तरीही अन्न व क्षेत्राच्या शोधात त्या जवळपासच्या गावात भटकत असतात कारण त्यांची आई त्यांना आधीच सोडून गेली आहे. या दोन्ही तरुण वाघीणींमुळे आमचा वेळ अतिशय छान गेला, त्या जंगलात फिरत असतांना व त्यांच्या खुणा करत असताना मला त्यांचे निरीक्षण करता आले. या खुणा लघवीच्या स्वरूपात व त्यांचे शरीर झाडांच्या सालींवर घासून व पंजाच्या ठशांच्या स्वरूपात असतील तर त्यामुळे इतर वाघांना नवीन वाघ त्यांच्या हद्दीत आल्याची जाणीव होते, तसेच यामुळे त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यासही मदत होते. 

त्या व्हायरल ध्वनीचित्रफितीविषयी सांगायचे, तर वन विभागाने या मुख्य रस्त्यावर थांबण्यासाठी मनाई केली आहे कारण इथे आता बऱ्याच वाघांचा वावर असतो. परंतु मुद्दा असा आहे की, सफारीची वाहने थांबवण्यास मनाई का करायची जे पैसे देऊन तिथे आले आहेत व जे प्रत्येक नियमाचे पालन करतात, हा माझा प्रश्न आहे. किंबहुना वन विभागाने या रस्त्यावर (किंवा कोणत्याही) विनाकरण येणाऱ्या कोणत्याही खाजगी वाहनाला मनाई केली पाहिजे व रस्त्यावर चोवीस तासांची गस्त घातली पाहिजे म्हणजे जंगलातून जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर अवैध पर्यटकांना आळा घालता येईल. यामुळे वाघांनाही सुरक्षित वाटेल तसेच केवळ इन्स्टाग्राम रील बनवण्यासाठी चालत जाणाऱ्या वाघांचा पाठलाग करणाच्या माणसांची लाजीरवाणी कृत्ये कमी होतील. मी म्हटल्याप्रमाणे त्या तरूण वाघीणी होत्या म्हणून घाबरून निघून गेल्या, परंतु त्या गोंधळून गेल्या असत्या व माणसांवर हल्ला केला असता तर आपण त्या माणसांसाठी धोका असल्याचे घोषित केले असते व त्यांना प्राणिसंग्रहालयात पाठवले असते किंवा ठार केले असते. या तरुण वाघीणींचा एकमेव दोष म्हणजे त्यांची आई त्यांना पुरेसे प्रशिक्षण न देता सोडून गेली कारण आपण त्यांच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. दुसरीकडे आपण त्यांना मदत करण्याऐवजी ते सर्कसमधील प्राणी असल्याप्रमाणे त्रास देत आहोत, हा माझ्या लेखाचा मुद्दा आहे.

शेवटी, आम्ही उमरेड कऱ्हांडला पौनी वन्यजीव अभयारण्यात गेलो. तिथे मला आणखी काही तरुण वाघ पाहायला मिळाले, यामुळे या वर्गवारीतील वाघांविषयीच्या माझ्या ज्ञानात आणखी भर पडली. इथे दोन वाघीणी आहेत,x मार्क व शॅडो व दोघींना तरूण बछडे आहेत, जे लवकरच वेगळे होऊन स्वतंत्रपणे जगू लागतील. त्याचवेळी प्रसिद्ध एफ2 वाघीणीचे पाच बछडे आहेत, ते सगळे तिच्यापासून वेगळे झाले आहेत. आता कल्पना करा या जंगलामध्ये दोन नर वाघ होते, तीन मादी वाघ होते, त्याच जागेत आता नऊ आणखी वाघ झाले आहेत, तर इथे किती गदारोळ होत असला पाहिजे. या शिवाय मी इथे आधीपासूनच असलेल्या वाघांची गणनाही यात करत नाही. या जंगलांभोवती राहणाऱ्या गावकऱ्यांची झोप उडाली आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. ज्या दिवशी मी उमरेड कऱ्हांडला पौनी वन्यजीव अभयारण्यात होतो त्याचदिवशी एफ2 वाघीणीच्या एका तरुण बछड्याने एका गावकऱ्याला मारले होते (या शब्दासाठी माफ करा) व परिस्थिती अतिशय तणावपूर्ण होती. मी जेव्हा या घटनेची चौकशी केली, तेव्हा असे समजले की मृत व्यक्ती जेमतेम बावीस वर्षांचा तरुण होता व गुरांना चरायला घेऊन गेला होता. एका तरुण वाघाने त्याच्या गुरांवर हल्ला केला व त्यांना वाचवताना त्या मुलाचा वाघाशी संपर्क आला व शेवटी त्यात तो मारला गेला. असे होणे स्वाभाविक आहे कारण या तरुण वाघांना मोठ्या वाघांप्रमाणे एका झटक्यात शिकार करण्यासाठी पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आलेले नसते. त्याचप्रमाणे आजूबाजूला माणसांना पाहातच ते मोठे झालेले असतात, त्यामुळे माणसांच्या अजिबात संपर्कात न येणाऱ्या गाभा क्षेत्रातील वाघांसारखे ते माणसांना लाजत नाहीत. तसेच  माणसे सुद्धा भूकेमुळे अनेक  नको त्या गोष्टी करतात, तिथे हे तर केवळ तरुण वाघच आहेत. त्याशिवाय गावकऱ्यांनीही समजून घेणे आवश्यक आहे, की तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याकडून त्याचे जेवण हिरावून घेतले, तर तो तेखील तुमच्यावर गुरकावेल, इथे तुम्ही एका भुकेल्या वाघाच्या जेवणात फेरफार करायचा प्रयत्न करताय, जे टाळले पाहिजे. परंतु या घटनेमध्ये सहभागी माणूसही किशोरवयीन होता व वाघ त्याला पाहून पळून जाईल असा विचार त्याने केला असला पाहिजे. आता या सगळ्या जंगलांमधली परिस्थिती अशी आहे की शेतांमध्ये काम करण्यासाठी मजूरही मिळेनासे झाले आहेत. कारण पूर्णपणे वाढ झालेले प्रौढ वाघ टिकून राहतात व त्यांना जगण्याचे नियम माहिती असतात व पहिला नियम म्हणजे माणसांपासून लांब राहा. परंतु तरुण वाघांची जगण्याची धडपड सुरू असते व त्यांचे प्रशिक्षण अपूर्ण असते व शिकार करण्याएवढी व त्यांच्याहून मोठ्या इतर वाघांपासून स्वतःला वाचण्याची ताकद नसते, यामुळे त्यांची अशी परिस्थिती होण्याची शक्यता असते, ज्यासाठी आपण माणसे जबाबदार आहोत व यावर आपणच तोडगा काढला पाहिजे हा माझ्या लेखाचा विषय आहे. पौनी रस्त्यावर आम्ही जिथून बाहेर पडलो तिथे दोन तरुण वाघ झाडीत विश्रांती घेत होते, हे ठिकाण गावाच्या मुख्य रस्त्यापासून फक्त दोनशे फुटांवर होते. तिथेच गावातील महिला बसची वाट पाहात उभ्या होत्या, त्यांना इतक्या जवळ दोन वाघ जंगलात विश्रांती घेत असल्याचे माहितीही नव्हते. एकीकडे हे अतिशय सुखद दृश्य आहे परंतु दुसरीकडे आपण टाइम बॉम्बवर बसलेलो आहोत कारण तरुण वाघांची खात्री देता येत नाही व त्यांचे काय होईल हे तुम्ही सांगू शकत नाही, याची आपण माणसांना जाणीव करून दिली पाहिजे व हे हाताळण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे व हे लवकर झाले पाहिजे.

परिणामी, मी आधीच नमूद केल्याप्रमाणे, तरुण वाघांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे कारण त्यांना माणसांना जंगलामध्ये निर्माण केलेले अडथळे हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेले नसते. मृत्यूची कारणे अनेक असतात विजेचा धक्का लागून, खुल्या विहीरीत पडून, रस्त्यावरील किंवा रेल्वे अपघातामध्ये व तुम्ही या सगळ्यामध्येही टिकून राहिलात तर दुसऱ्या मोठ्या वाघाद्वारे. आपल्या जमीन धोरण निर्मात्यांनी वनविभागासोबत बसले पाहिजे व एक संतुलित उपाय शोधला पाहिजे कारण त्यासाठी अगदी माणसेही युद्ध लढत आहेत. परंतु या तरुण वाघांसाठी एकमेव सैन्य म्हणजे त्यांचे तरुण शरीर व मनातील कुतुहल व आधुनिक युगातील जगण्यासाठीचे कोणतेही युद्ध जिंगण्यासाठी तेवढे पुरेसे नाही. केवळ काही माणसांनी जंगलाभोवती राहणारे लोक व तरुण वाघांच्यामध्ये उभे राहायचे ठरवले, योग्य पावले उचलली तरच या तरुण वाघांसाठी काही आशा आहे. नाहीतर या तरुण वाघांसाठी भविष्यात अंधार आहे, ज्यामुळे रात्रीही अगदी तीक्ष्ण दृष्टी असूनही त्यांना त्यांचे भविष्य पाहता येणार नाही;  हा इशारा देऊन किंवा विनंती करून निरोप घेतो!

*तरुण वाघांविषयी सांगण्यासारखे व निरीक्षण करण्यासारखे बरेच काही आहे, ते मी भाग 2 (धुरंधरचा परिणाम, lol) मध्ये लिहीन. एक गोष्ट सांगाविशी वाटते ती म्हणजे मोहार्ली प्रवेशद्वारापाशी मी जिथे राहात होतो त्या वसुंधरा नावाच्या हॉटेल मध्ये एक लहान आंगण विकसित करण्यात आले आहे व फुलझाडे लावण्यात आली आहेत. सकाळच्या वेळी भोवताली उडत असलेल्या फुलपाखरांमुळे ते जणू डिस्नेलॅन्डचा सेट वाटत होते, फुलपाखरे हा वन्यजीवन व जंगलाचा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे आणि जंगल म्हणजे फक्त वाघ नव्हे! हे  दृश्य पाहून मी माझ्या काँक्रीटच्या जंगलात प्रत्येक प्रकल्पामध्ये असे छोटे फुलांचे ताटवे विकसित करण्याचा निर्णय घेतला, कारण ही कृती लहान असली तरीही निसर्गाच्या संवर्धनासाठी हा अतिशय उत्तम पाठिंबा आहे.


संजय देशपांडे 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!