दुबई , गुंतवणूक, युद्ध आणि भारत!!






























 दुबई , गुंतवणूक,  युद्ध आणि भारत!!


“देवाने अमेरिकन लोकांना भूगोल समजावा यासाठी युद्धाची निर्मिती केली.”

― मार्क ट्वाईन


“तिसरे जागतिक महायुद्ध कोणत्या शस्त्रांनी लढले जाईल हे मला माहिती नाही, परंतु चौथे महायुद्धा काठ्या व दगडांनी लढले जाईल.”

― अल्बर्ट आईनस्टाईन


इंग्रजीमध्ये युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या “वॉर” या शब्दाची अक्षरे आपण उलट क्रमाने वाचली तर तो शब्द “रॉ” असा होतो. आपणही खरेतर तसेच आहोत म्हणजे हुशार, सुशिक्षित तरीही आतून अतिशय “रॉ” म्हणजेच अपरिपक्व, म्हणूनच आपण सतत “वॉर”साठी म्हणजेच युद्धासाठी सरसावलेले असतो … मी


मला दुबई शहर अतिशय आवडते व मी त्या शहराला दिलेल्या अनेक  भेटींची मला नेहमी आठवण येते. मी जेव्हा हा लेख लिहीण्यास सुरुवात केली, जो दुबईविषयी आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल, तेव्हा माझ्या मनात एक विचित्र भावना होती, कारण मी अशा एका सफरीविषयी लिहीणार होतो जी होऊच शकली नाही. तर मी दुबईला शेवटचा तीन वर्षांपूर्वी, म्हणजे 2022 च्या डिसेंबर महिन्यात गेलो होतो. कोविडचा जागतिक परिणाम ओसरल्यानंतरच लगेच हा दौरा झाला होता. परत आल्यानंतर मुंबई विमानतळावर तिसऱ्या लाटेसाठी नमुने संकलित करण्याचे काम सुरू होते, जी सुदैवाने आली नाही (अगदी माझ्या या दुबई दौऱ्यासारखी, उपहासाने बोलतो आहे)! मी म्हटल्याप्रमाणे मी नेहमी दुबईचा तिच्या जगाबद्दलच्या खुल्या दृष्टिकोनासाठी आदर केला आहे. तुम्ही एकप्रकारे या शहराला आशियाची अमेरिका म्हणू शकता. दुर्दैवाने अमेरिका आता नवीन कल्पनांचा खुलेपणाने स्वीकार करणारा देश म्हणून असलेले बिरुद गमावून बसली आहे किंवा गमावण्याच्या मार्गावर आहे, दुबई मात्र नव्या कल्पनांचा खुलेपणाने स्वीकार करण्यासाठी तयार होती व आहे. आपल्यापैकी बहुतेकजण खरेदीसाठी व तिथे उपलब्ध असलेल्या मनोरंजनासाठी दुबईला भेट देतात व त्यात चूक काहीच नाही. सुट्टीचे दिवस (विशेषतः भारतीयांसाठी) त्याचसाठी असतात व हे सगळे अगदी रास्त दरात उपलब्ध होते. त्यामुळे केवळ भारतीयच नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आवर्जून भेट देण्याच्या यादीत दुबईला प्राधान्य दिले जाते याच काहीच आश्चर्य नाही. माझा हेतू नेहमीच या शहरात नवीन अनुभवण्यासारखे काय आहे ते बघण्याचा व जाणून घेण्याचा राहिला आहे. यावर्षीदेखील मी एमिरेट्स या विमानसेवा कंपनीचे तिकीट आरक्षित केले होते. त्यासाठी पुण्याहून मुंबईला जाणे आवश्यक होते. यामुळे अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतील की पुण्याहून दुबईला जाण्यासाठी इंडिगो, तसेच स्पाईस जेटचा पर्याय असताना मुंबईहून जायची काय गरज आहे. याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे स्पाईस जेटच्या सेवेत अजिबात सातत्य नाही व तुम्ही दुबईमध्ये केवळ कुणाच्यातरी घरी राहणार असाल तर तर इंडिगोची वेळ सोयीची आहे. म्हणजे ते विमान दुबईला भल्या पहाटे पोहोचते व बहुतेक हॉटेलचे चेकइन दुपारनंतरचे असते. त्याचशिवाय परत येताना एमिरेट्सच्या टर्मिनलवर थोडा वेळ घालवायला मला आवडते कारण तिथेसुद्धा शिकण्यासारखे खूपअसते, म्हणून विचार केला की काही हरकत नाही. माझे विमान 5 मार्चला होते व त्याच्या अगदी आठवडाभर आधीच अमेरिका व इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध पुकारल्याने सगळीकडे गदारोळ माजला. काही काळातच या युद्धाने संपूर्ण मध्य-पूर्वेस व्यापून टाकले. हे युद्ध व त्याचा माझ्या आवडत्या शहरावरील परिणाम हा माझ्या लेखाचा विषय आहे.

सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मी माझ्या स्वतःच्या व्यवसायाविषयी म्हणजे पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राविषयीचा दृष्टिकोन व्यापक व्हावा यासाठी व सौंदर्यशास्त्र शिकता यावे यासाठी दुबईला भेट देत आलो आहे. अर्थात त्यातील बऱ्याच गोष्टींची आपल्याकडे कधीच अंमलबावणी करता येणार नाही, ज्याची अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपल्यावर निर्बंध येतात. म्हणजे अगदी पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक नियमांपासून ते प्रकल्पाच्या आर्थिक ताळेबंदापर्यंत. तरीही आपण जे पाहतो त्यातील काही टक्के भागाची जरी अंमलबजावणी करता आली, तरीही त्यामुळे खूप मोठा फरक पडू शकतो, असा अनुभव मला आला आहे. युद्धाची पहिली बातमी 28 फेब्रुवारी रोजी आली. मला (त्याचसोबत इतरांनाही) असे वाटले की, संयुक्त अरब अमिरात यामध्ये सहभागी होणार नाही किंबहुना युद्धाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. याचे कारण म्हणजे मध्यपूर्वेसाठी युद्ध म्हणजे एखाद्या गरीब देशात जनतेला होणाऱ्या सर्दी-पडशाइतके सामान्य आहे. परंतु यावेळी मात्र या सर्दी-पडशाने कोव्हिडसारखे रौद्र रूप धारण केले (या तुलनेसाठी माफ करा परंतु माझी खरोखरच अशीच भावना होती). पहिल्यांदाच जगातील सर्वात सुरक्षित शहर किंवा देशातील नागरिकांना भीती जाणवू लागली. समाजमाध्यमांवर (इन्स्टाग्राम/फेसबुक) तर विविध प्रकारच्या पोस्टचा महापूर आलाय, तो इतका मोठा आहे की आता दुबईचे नागरिकही नेमका कशावर विश्वास ठेवावा व कशावर ठेवू नये याविषयी बुचकळ्यात पडले आहेत. यातील  बर्‍याच पोस्ट ही सगळी एआयची कृपा आहे, लोकांना युद्धाविषयी ताजी माहिती जाणून घेण्यात रस असल्यामुळे इन्फ्लूएन्सर त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत. सुदैवाने, माझी भाची व तिचा नवरा जे दुबईमध्ये काम करतात ते मला तिथल्या परिस्थितीविषयी योग्य व अचूक माहिती देत होते व एमिरेट्सनेही त्याचीच पुष्टी केली. पहिल्यांदाच जगातील बहुधा सर्वात मोठ्या व सर्वोत्तम विमान कंपनीचे संपूर्ण कामकाज सलग चार दिवसांहून अधिक काळापेक्षा पूर्णपणे ठप्प होते. त्याचवेळी जगातील सर्वात वर्दळ असलेल्या विमानतळांपैकी एक असलेले दुबई विमानतळ त्याच्या इतिहासात पहिल्यांदाच चार दिवासांसाठी पूर्णपणे बंद होते. यातूनच युद्धाचा परिणाम समजतो, जो कुणालाही म्हणजे दुबईच्या जवळपास सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या शासनकर्त्यांनाही त्याचा अंदाज आला नाही. माझा दुबईचा दौरा रद्द झाला हे वेगळे सांगायची गरज नाही कारण अगदी आजही जो माझा परतीचा दिवस असणार होता, विमानसेवा सुरळीत झालेली नाही. इराणच्या शेकडो ड्रोन व क्षेपणास्त्रांनी दुबईचे अवकाश गजबजून गेले आहे. अर्थात हेदेखील सगळे इन्स्टग्रामच्या पोस्टवरूनच समजते आहे, मध्यपूर्वेतील शासनकर्ते म्हणझे शेख हे प्रत्यक्षात किती नुकसान झाले आहे किंवा युद्धाची काय परिस्थिती आहे याविषयी मौन बाळगून आहेत, परंतु हे माहितीचे युग आहे (बरोबर किंवा चूक दोन्हीही). जे काही सांगितले जात आहे त्याच्या अगदी पन्नास टक्केही आपण खरे मानले तर खरोखरच व दुर्दैवाने सर्वात सुरक्षित शहर म्हणून दुबईच्या डोक्यावर असलेला मानाचा मुकुट थोडाफार निसटला आहे असेच म्हणावे लागेल, व हे तथ्य आपण नाकारू शकत नाही.

सतत हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत, सुरक्षा यंत्रणेद्वारे ड्रोन व क्षेपणास्त्र आकाशातच नष्ट केली जात आहेत. परंतु गेले दहा दिवस, ज्या शहराला पूर्वी कसलीच भीती नव्हती, अर्थात याला अपवाद केवळ शेख झईद मार्गाचा क्रॉस करताना(केवळ तुम्ही सिग्नलपाशी तो ओलांडत नसाल) , जोक होता हा, तिथे लोकांना आता उच्चभ्रू वसाहतींमधून बाहेर पडून, उपनगरांमध्ये विरळ वस्तीच्या भागांमध्ये आसरा घ्यावा लागत आहे. तिथेही, लोक तळघरांमध्ये रात्री घालवत आहेत. इशारे देणाऱ्या संदेशांमुळे तुमचा सेल फोन सतत व्यग्र असतो, आकाश धुराने भरलेले असते व ड्रोन नष्ट केल्याचे आवाज दिवसभर दणाणत असतात. प्रत्येकवेळी तुम्ही आकाशात असताना तुम्हाला वर बघावे लागते व परिस्थिती निर्माण झाल्यास पळत जाऊन आसरा घ्यावा लागतो. तुमची विमाने निश्चित नसतात, डीएक्सबी म्हणजे दुबईचे आवडते विमानतळ कोणत्याही क्षण बंद होऊ शकते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुणालाही माहिती नाही किंवा खात्री नाही की हे सर्व कधी संपेल, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. जेव्हा एखादे शहर तुम्हाला सुरक्षितता देण्याचा दावा करते तेव्हा ते तुम्हाला संपूर्ण यंत्रणेविषयी भरवसा निर्माण करून सर्वात मोठी मदत करत असते. पुढे काय होणार आहे, हे तुम्हाला माहिती असते कारण तरच तुम्ही घाबरणार नाही. लोकांना अनिश्चिततेची भीती वाटते व गेल्या दहा दिवसात दुबईने नेमके हेच गमवले आहे. अमेरिकेने (नेहमीप्रमाणे) तिच्या नागरिकांना संपूर्ण मध्यपूर्वेतून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत व त्यामध्ये दुबईचाही समावेश होतो, हेदेखील दुबईच्या इतिहासात पहिल्यांदा होत आहे. ड्रोनच्या हल्ल्यांमुळे अनेक मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कामकाज विस्कळीत झाले आहे, जे उघडपणे कुणीही मान्य करणार नाही, परंतु लोक त्याविषयी कुजबुज करत आहेत. ई-वाणिज्य कंपन्यांच्या विदा केंद्रांवर (डेटा सेंटर) व त्यांच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. हे सगळे रमझानच्या महिन्यात सुरू आहे, जो काळ मध्यपूर्वेमध्ये दिवाळीसारखा असतो, यामुळे होणारे नुकसान अनेकपटींनी वाढले आहे, हेदेखील दुबईच्या बाबतीत पहिल्यांदाच होत आहे. इथे मला दुबईच्या शासनकर्त्यांच्या भूमिकेविषयी थोडे आश्चर्य वाटले कारण ते त्यांच्या नागरिकांचे काय होत आहे याविषयी काहीही स्पष्ट कल्पना देत नाहीत. इथेच बाहेरून येणाऱ्या लोकांचा विश्वास संपादन करण्याची संधी त्यांनी गमावली आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. जेव्हा एखादी बाहेरील व्यक्ती आजपर्यंत एखाद्या तिसऱ्या देशावर किंवा शहरावर विश्वास ठेवत होती तेव्हा त्याचे कारण त्याला किंवा तिला शहराचे शासनकर्ते किंवा प्रशासकीय संस्था ज्याप्रकारे वागवतात त्यामुळे सुरक्षित व आरामशीर वाटते म्हणून. यामुळेच एखादी व्यक्ती शहरावर विश्वास ठेवते कारण संवाद हा विश्वास कमावण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यावेळी कदाचित दुबईचे शासनकर्तेच युद्ध कधी थांबेल याविषयी अनभिज्ञ आहेत, त्यामुळेच ते त्यांच्या रहिवाशांना काहीही स्पष्टता देत नाहीत, हा माझ्या लेखाचा विषय आहे.

किंबहुना, ते इन्फ्लूएन्सरर्सच्या मदतीने दुबईमध्ये सगळे कसे सुरळीत आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नात गुंतलेले आहेत व जे लोक दुबईमध्ये युद्धामुळे झालेल्या नुकसानाविषयी बातम्या देत आहेत त्यांना इशारे देणारे संदेश प्रसिद्ध करत आहेत. दिशाभूल करणाऱ्या बातम्या थांबवल्या पाहिजेत हे खरे असले तरीही, अशा फसव्या बातम्या किंवा अफवा हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काय खरे आहे हे तुम्ही स्वतःच प्रकाशित करणे. दुबईच्या शासनकर्त्यांनी आश्चर्यकारकपणे हे अजूनतरी केलेले नाही. असे करणे हे दुबळेपणाचे लक्षण आहे असे कदाचित त्यांना वाटू शकते पण ते ही अतिशय मोठी चूक करत आहेत. लोक शहर सोडून चालले आहेत, कामाच्या ठिकाणांवर हल्ले होत आहेत, हे वस्तुस्थिती कदाचित माध्यमांमध्ये दाखवली जाणार नाही, परंतु कुठेतरी, कोणीतरी बोलेल व त्यामुळे नावलौकिकाचे होणारे नुकसान अधिक धोकादायक असते. कारण एकदा विश्वास गमावला की तो परत मिळवणे अतिशय अवघड असते, हे दुबईच्या शासनकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे. अशावेळी तिथे अडकून पडलेले पर्यटक निवासव्यवस्था व प्रवास या दोन्ही आघाड्यांवर असहाय होते. एमिरेट्सविषयी पूर्णपणे आदर राखून हे सांगावेसे वाटते की ते तिकीटांचे पैसे परत मिळणे, उड्डाणांच्या वेळापत्रकात फेरबदल यासारख्या गोष्टींविषयी काहीही कल्पना देत नव्हते. यामुळे दुबई व बाहेरही अडकून पडलेल्या पर्यटकांना अतिशय मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागला. माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर मला माझ्या तिकीटांविषयी व रद्द झालेल्या प्रवासाविषयी काहीही कळविण्यात आले नव्हते, नंतर मला पूर्ण रिफंड मिळाला,  हे पण मीनमूद करतोय. मी त्यांच्या मर्यादा समजू शकतो, परंतु जर तुम्ही स्वतःला सर्वोत्तम म्हणवत असाल तर तुम्ही किमान संवादासाठी खुले असले पाहिजे व स्पष्टता राखली पाहिजे, जे विमानसेवा कंपनी तसेच दुबई सरकार या दोघांकडूनही झाले नाही. त्याचप्रमाणे शहरामध्ये अडकून पडलेल्या कोणत्याही भारतीय पर्यटकाला एकाही दिरहमची आर्थिक मदत करण्यात आली नाही (माझ्या माहितीप्रमाणे), कारण दुबईसारख्या शहरात वास्तव्याचा काळ वाढणे व जेवणा-खाण्याचा खर्च यामुळे अनेकांवर मोठा आर्थिक ताण आला. मी मान्य करतो, की ती काही दुबई सरकारची चूक नव्हती किंवा कायदेशीर जबाबदारीही नव्हती, परंतु तुम्ही जेव्हा स्वतःला सर्वोत्तम व सर्वात सुरक्षित शहर म्हणवता तेव्हा तुम्हाला आपत्तीच्या काळात थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात, बरोबर? यामुळे प्रवाशांच्या मनात या शहराविषयी नकारात्मक भावना निर्माण झाली.

हा दौरा रद्द झाल्यामुळे मी त्यातून काही धडे घेतले, एक म्हणजे हॉटेल आरक्षित करताना थोडे जास्त पैसे भरा पण शेवटच्या दिवसापर्यंत ते रद्द करण्याचा पर्याय खुला ठेवा, जे मी केले होते, त्यामुळे मला हॉटेल आरक्षणाचे संपूर्ण पैसे परत मिळाले. त्याचप्रमाणे, विमानप्रवासाची तिकीटेही थोडे जास्त पैसे भरून खुली ठेवा म्हणजे पुढील प्रवासासाठी तुम्हाला दावा करता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझा दौरा आधीच रद्द झाला, परंतु मला तिथे अडकून पडावे लागले असते, तर युद्धासारख्या परिस्थितीसाठी थोडा जास्त हप्ता भरून विमा संरक्षण घेतले असते, म्हणजे त्यातून वास्तव्याचा काळ वाढल्यामुळे हॉटेलच्या खोलीचे भाडे, तसेच युद्धामुळे जखमी वगैरे झाल्यास वैद्यकीय विम्याचे संरक्षणही मिळाले असते. आपल्या सरकारने आणखी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे तो म्हणजे प्रत्येक आंतरराष्ट्रीय तिकीटावर १०० रुपये अधिभार आकारावा. या पैशांचा वापर युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना विमानाने परत मायदेशी आणण्यासाठी केला जावा, नाहीतर एकतर तो खर्च सामान्य करदात्यांना भरावा लागतो किंवा पर्यटकांना परतीच्या प्रवासासाठी प्रचंड पैसे द्यावे लागतात, जे यावेळी झाले. दुबईहून मुंबईला येण्यासाठी एकतर्फी तिकीटाचे दर ७५ हजार रुपये ते १ लाख रुपयांपर्यंत, म्हणजे जवळपास पाच पटींनी वाढले, ही सुद्धा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी तसेच तेथील रहिवाशांसाठी नकारात्मक बाब आहे. दुबई, मी समजू शकतो की या युद्धाची कल्पना कुणीच केली नव्हती, परंतु तुम्ही जर स्वतःला जगातील सर्वात सुरक्षित व सर्वोत्तम शहर म्हणवत असाल, तर आधी तुम्ही सर्वात वाईट गोष्टींसाठी सज्ज असले पाहिजे व दुसरे म्हणजे तुम्ही असे नियोजन करण्यात अपयशी ठरला असाल तर ते सुधारण्यास लाजू नका, हाच माझ्या लेखाचा विषय आहे!

आता या लेखाच्या शेवटच्या मुद्द्याकडे वळू; कोणत्याही युद्धामध्ये कुणाचाच लाभ होत नाही, असे म्हणतात. परंतु ते पुस्तकी तत्वज्ञान झाले, व्यावसायिक तत्वज्ञान अगदी साधे आहे, कुणाचातरी तोटा हा कुणाचातरी फायदा असतोच. दुबईने गमावलेला हा विश्वास व श्रीमंत लोकांच्या मनातील भीती (त्यांनी इन्स्टाग्रामवर सर्व काही आलबेल आहे असे कितीही दावे केले तरीही), हा भारतासाठी मोठा फायदा असू शकतो, विशेषतः पुणे व बेंगलुरूसाठी. भारतामध्ये आपल्याकडे दुबईसारख्या पायाभूत सुविधा, कर-मुक्त खरेदी, किंवा स्वच्छता कदाचित कधीच नसेल, परंतु आपल्याकडे एक गोष्ट आहे ती म्हणजे संपूर्ण शहर किंवा प्रदेश, युद्धग्रस्त होण्याची भीती किमान सध्यातरी नाही. इथे राज्ये किंवा केंद्र सरकार पुण्या-मुंबईजवळ (विमानतळाशी जोडलेली असल्यामुळे) “डी” प्रदेश किंवा “डी” शहरांची निर्मिती करू शकते (डी म्हणजे दुबई), पायाभूत सुविधा तयार करून देऊ शकते त्याचप्रमाणे डेटा सेंटर व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कार्यालयांसाठी कर सवलतीही देऊ शकते, जी मध्यपूर्वेतून बाहेर पडण्यासाठी सज्ज आहेत. कारण व्यवसाय कुणासाठीही थांबत नाही, हे दुबईनेच आपल्याला शिकवले आहे. जर आपले सरकार या आपत्तीतून काही शहाणपण शिकले (मी कुणाला मूर्ख बनवत आहे, lol) व स्वतःला योग्यप्रकारे सज्ज केले व याकडे एक संधी म्हणून पाहिले, तर दुबईचा तोटा हा किमान तात्पुरता तरी आपल्यासाठी मोठा फायदा होऊ शकतो. अर्थात, मला अजूनही शहर म्हणून दुबई अतिशय आवडते व त्याचे गत वैभव त्यास लवकर परत मिळावे; एवढीच सदिच्छा व्यक्त करून निरोप घेतो!


संजय  देशपांडे smd156812@gmail.com www.sanjeevanideve.com www.junglebelles.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!