मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!
मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!
“प्रत्येक पोलिसाला हे माहिती असते की प्रत्येक वेळी तो जेव्हा अंगावर गणवेश चढवतो, तेव्हा तो इतरांचे रक्षण करण्यासाठी धोका पत्करत असतो ”… माईक पार्सन.
“लोक रात्री त्यांच्या घरी आरामात झोपू शकतात कारण काही व्यक्ती वर्दी घालून त्यांच्यावतीने वाईट व्यक्तींना तोंड देण्यासाठी सज्ज असतात.”... जॉर्ज ऑरवेल.
मायकल लिन पार्सन हे अमेरिकी राजकारणी व कायद्याची अंमलबजावणी करणारे माजी अधिकारी होते व एरिक आर्थर ब्लेअर, जे जॉर्ज ऑरवेल या नावाने लेखन करत, सुप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार, निबंधलेखक, पत्रकार, व टीकाकार होते. त्यांचे लेखन अतिशय प्रवाही, सामाजिक अन्यायाविषयी जागरुकता निर्माण करणारे, सर्वंकषवादाला विरोध करणारे व लोकशाही समाजवादाला ठाम पाठिंबा देणारे होते. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता आपले अनेक देशबांधव ऑरवेल व माईक यांच्या वरील शब्दांशी सहमत होणार नाहीत. याचे कारण म्हणजे कोणतेही वर्तमानपत्र वाचा, बहुतेकवेळा वर्दीधारि व्यक्ती(पोलिस) चुकीच्याच कारणाने चर्चेत असतात. एकतर त्या बातम्या पोलीसांनी निष्पाप लोकांवर केलेल्या अत्याचारांविरुद्ध असतात किंवा चौकशी करताना अनावश्यकपणे बळाचा वापर केला म्हणून असतात किंवा एफआयआर (पोलीस खात्यातील परवलीचा शब्द, म्हणजेच प्राथमिक तपासणी अहवाल) दाखल न करण्यासाठी लाच घेतली म्हणून कुणी पोलीस पकडला गेला म्हणून असतात व तेही नसेल तर कामाच्या ताणामुळे एखाद्या पोलीस शिपायाने आत्महत्या केली म्हणून असतात. हे अतिशय विचार करण्यासारखे आहे, नाही का? एकीकडे पोलीस खात्याच्या समाजाशी (म्हणजे जनतेशी) असलेल्या संपर्काचे किंवा संवादाचे वाद वाढतायत व दुसरीकडे पोलीस खात्यावर कामाचा अतिशय ताण असतो (म्हणजे राजकीय तसेच माध्यमांचा ताण) तसेच मनुष्यबळ कमी असते व पायाभूत सुविधा निकृष्ट असतात, ज्यामध्ये निवासाच्या तरतुदींसारख्या मूलभूत गोष्टींचा समावेश होतो. पोलीस खात्याच्या संदर्भात कुठेतरी, नक्कीच काहीतरी अतिशय चुकीचे घडत आहे, खात्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नसले तरीही आपण जिला पोलीस यंत्रणा म्हणतो तिच्या संदर्भात! कारण वर नमूद केलेल्या अशा घटनांमधून कुणीही शहाणा माणूस हाच अर्थ काढेल, नाही का? हे अतिशय दुर्दैवी आहे की शहाणी माणसे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती झाली आहे, विशेषतः सरकार नावाच्या जंगलामध्ये. अशा सर्व पार्श्वभूमीवर आपल्याकडे नवीन पोलीस महासंचालकांनी चार्ज स्वीकारला आहे (म्हणजेच डीजी) जे याच नामशेष होत चाललेल्या प्रजातीचाच एक भाग आहेत असा अनेकांचा विश्वास आहे, म्हणजेच ते अतिशय बुद्धिमान, पाय जमीनीवर असलेले व स्पष्टवक्ते अधिकारी आहेत (यातील अभिप्रेत अर्थ कृपया समजून घ्या)!
होय, मी श्री. सदानंद दाते, आयपीएस, यांच्याविषयी बोलतोय, ज्यांनी आपल्या राज्याच्या पोलीस दलाचे प्रमुख म्हणून नुकताच प्रभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले आहे, ज्या अंतर्गत पोलीस खाते येते, त्यामुळेच पोलीस खात्याच्या कामावर माध्यमांची तसेच समाजाची, आणि हो, राजकारण्यांचीही नजर असते. कारण, कोणत्याही वर्गामध्ये शाळेचे मुख्याध्यापक जर विशिष्ट वर्गामध्ये विशिष्ट विषय शिकवत असतील, तर अर्थातच सर्वजण अशी अपेक्षा करतील की विद्यार्थ्यांनी त्या विशिष्ट विषयामध्ये नैपुण्य मिळवले पाहिजे, पोलीस विभागासाठीही हेच उदाहरण लागू पडते, बरोबर? कदाचित यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या विशिष्ट व्यक्तीला वर्गाचा प्रमुख बनवले आहे. आता ते मोठे ओझे आहे किंवा जबाबदारी आहे, विशेषतः या वर्गाची स्थिती पाहता (कुणाचाही अनादर करायचा उद्देश नाही, केवळ लोकांचे मत व्यक्त करत आहे). मी माननीय पोलीस महासंचालकांना एक व्यावसायिक म्हणून व त्याहूनही अधिक एक सामान्य नागरिक म्हणू खाकीविषयी माझे मत लिहीण्याचा किंवा मांडण्याचा विचार केला. मी क्रेडाईमध्ये (कृपया गूगल करा) गेली पंधरा वर्षे पोलीस समितीचे काम हाताळतो, त्यामुळे बहुतेक लोकांपेक्षाही माझा खाकीशी बराच अधिक संपर्क येण्याचे हे आणखी एक कारण आहे व मला अशी खात्री वाटते की या लोकांना त्याचे वाईट वाटत नसावे, lol!
माननीय महासंचालक साहेब, सर्वप्रथम नवीन वर्षाच्या तुम्हाला मनःपूर्वक हरित शुभेच्छा व आपल्या बॉलिवुडच्या प्रसिद्ध संवादाप्रमाणे, “पोलीसवालोंसे, दोस्ती भी अच्छी नहीं, ना ही दुष्मनी,”. अर्थात माझे खाकीतील काही खूप चांगले मित्र आहेत ज्यांचा मला अभिमान आहे, व या संवादाच्या दुसऱ्या भागाविषयी बोलायचे झाले, तर पोलीसांच्या म्हणजेच कायद्याच्या चुकीच्या वाटेला न जाण्याइतपत शहाणपण मला आहे; एवढेच मी म्हणेन. तुमचे नाव बहुतेक व्यक्तींना 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी ह्ल्ल्यातील हिरो म्हणून माहिती असले तरीही, हिरो या बिरुदासोबत जबाबदारीचे ओझे येते व ते प्रत्येकाला वैयक्तिकपणेच वाहावे लागते, तुमच्या प्रत्येक शब्दाचे पालन करण्यासाठी तुमच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पोलीस दल सज्ज असले तरीही!
सर, तुम्हाला माहितीय कोणत्याही नागरिकाची (म्हणजे कायद्याचे पालन करणाऱ्या) पोलीसांकडून सर्वात मूलभूत व साधी अपेक्षा काय असते; ती म्हणजे त्यांना पोलीसांकडून न्याय मिळण्यापेक्षा व गुन्हेगारांना शासन करण्यापेक्षाही पोलीसांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. त्यासाठी त्यांना हा विश्वास मिळायला पाहिजे की खाकी गणवेशातील मंडळी त्यांचे ऐकतील, सध्या तो विश्वास दिसून येत नाही, हे कटू सत्य आहे, हे मला तुम्हाला सांगेवेसे वाटते. मला हेदेखील माहिती आहे की (पोलीस खात्यातील माझ्या चांगल्या मित्रांची कृपा), पोलीसांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे आपली सातत्याने वाढती लोकसंख्या व या लोकसंख्येच्या परिस्थितीमध्ये असलेली तफावत. पाच टक्के लोकांकडे सगळे काही आहे व उर्वरित लोकांकडे काहीच नाही, ज्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागते. आपल्या समाज माध्यमांच्या कृपेने (आणि मोफत नेट पॅकच्या योजनांमुळे) सगळी माहिती सगळ्यांना उपलब्ध असते, कोणते नवीन शूज किंवा घड्याळ उपलब्ध आहे, किंवा बाजारामध्ये कार आली आहे व ती कुणाकडे आहे, हे सर्व स्क्रीनवर असते. यामद्ये “आमच्याकडे ब्रँडेड वस्तू आहेत” हे सांगणाऱ्या श्रीमंत वर्गातील लोकांचा भपका भर घालत असतो व यामुळे ज्यांच्याकडे काही नाही व भरपूर वेळ आहे, पण रोजगार नाही अशांवर परिणाम होणे स्वाभाविक असते. पोलीस दलासाठी ही एक मोठी समस्या आहे कारण आता संघटित गुन्हेगारीचे दिवस गेले, त्या गुंडांनी एकतर आत्मसमर्पण केले किंवा ते संपले आहेत किंवा आता ते पांढऱ्या कॉलरच्या गुन्हेगारीकडे वळले आहेत. हा तोच तरुण (बहुतेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन) वर्ग आहे ज्याला अतिशय सोप्या मार्गांनी म्हणजे गुन्ह्यांनी श्रीमंत व्हायचे आहे. हे गुन्हे बंदुकीच्या गोळीने किंवा दांडुक्याने हाताळता येणार नाहीत (काळी वेळा येतील), तर संवाद साधून व जागरुकता निर्माण करून ते होईल व तेदेखील पूर्ण वेळाचे काम आहे व त्यासाठी सध्याचे पोलीस बळ एकतर अपुरे आहे किंवा त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देण्यात आलेले नाही असे माझे स्पष्ट मत आहे. आता जुन्या मताचे वाचक माझ्यावर हसतील व मी अतिशहाणा किंवा समाजवादी असल्याचा शिक्का मारतील. परंतु मी आता पन्नाशी ओलांडली आहे व मी स्वतःही जुन्याच मताचा आहे परंतु आता परिस्थिती बदलली आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर आपण तिच्याकडे दुर्लक्ष केले तर त्याची धग आपल्यालाच जाणवेल ही वस्तुस्थिती आहे, किंबहुना आपल्याला ती आधीच जाणवतेय.
कोणत्याही दिवशी कोणतेही वर्तमानपत्र उघडा व गुन्हेगारीविषयक बातम्या वाचा, व्यावसायिक गुन्हेगार सुरक्षित व सराईत गुन्हेगारीकडे वळले आहे उदाहरणार्थ आर्थिक गुन्हे किंवा सायबर गुन्हे परंतु जे अपरिपक्व आहेत (अल्पवयीन आहेत) जे शारीरिक हल्ले, व अगदी खून व गुंडगिरी करणे यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असतात. गुन्हेगारीतील व गुन्हेगारांच्या बदललेल्या प्रवृत्तींचे हे जिवंत उदाहरणच नाही का, ज्यामुळे पोलीस दलापुढे आणखी आव्हाने उभी राहतात? सराईत गुन्हेगार अदृश्य असतात व जे गुन्हेगार सराईत नसतात, त्यांच्यावर दांडुक्याचा वापर केल्यामुळे त्यांचे भविष्य अधिक अडचणीचे होणार आहे, कारण त्यांना असे वाटते की गुन्ह्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळेल, ही पोलीस दलासाठी अतिशय अवघड परिस्थिती असते. त्यावर आपले शासनकर्ते (म्हणजे राजकारणी) ज्यांनी स्वतःच्या वर्तनाने तसेच धोरणे तयार करून समाजाचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे जेणेकरून समाजाला कायद्याचे पालन करावे लागेल, तिथेदेखील संपूर्ण समाजावर अंधःकार पसरलेला आहे. काळ्या काचा लावलेल्या एसयूव्ही चालवणारे हे तथाकथित नेते (नेते, कार्यकर्ते किंवा निवडून आलेले लोकप्रतिनिधी), त्या त्यांच्या मनाला येईल तिथे कुठेही लावतात, सिग्नल तोडतात व कोणत्याही परवानग्या न घेता मोर्चे काढतात/सभा घेतात ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, शांततेचा भंग होतो व सामान्य माणूस हा सगळा गोंधळ हताशपणे पाहात असतो. तरुण पिढी हे सगळे कौतुकाने पाहात असते व त्यांना असे वाटते की शारीरिक शक्तीच्या बळाचा असा वापर करून ते कायदा हातात घेऊ शकतात व तो गुन्हा करताना हेच खूप भारी काम आहे असा त्यांचा विचार असतो; पोलीसांसाठी आज हेच खरे आव्हान आहे. इथे, पुणे शहरामध्ये, पोलीसांना हेल्मेटची सक्ती करण्यासारख्या मूलभूत नागरी नियमांची अंमलबजावणी करायची भीती वाटते जे समाजाच्याच भल्याचे आहेत, परंतु राजकीय नेतेच हेल्मेटची सक्ती केली जाऊ नये असे पोलीसांना बजावतात. त्याचवेळी समाज कायद्याविषयी काय विचार करतो असे तुम्हाला वाटत असेल तर कोणत्याही वाहतुकीच्या सिग्नलला वाट पाहा व स्वतः अनुभवा. मध्यमवयीन व्यक्तींपासून ते गृहिणींपर्यंत, अगदी आजी-आजोबांपर्यंत कुणीही वाहतुकीच्या सिग्नलचे पालन करत नाही व लाल सिग्नलचे उल्लंघन करून निघून जातात, बरेचदा ट्रॅफिक हवालदार सिग्नलला उभा असूनही हे केले जाते. माझ्या मते कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कोणत्याही यंत्रणेसाठी हा धोक्याचा इशारा आहे कारण ही अतिशय मूलभूत गोष्ट आहे ज्यातून संपूर्ण समाजाचा वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयीचा दृष्टिकोन दिसून येतो. ते जर बेधडकपणे वाहतुकीचे नियम मोडत असतील, तर त्यांच्या हातात असेल तर शक्य असेल तेंव्हा कोणताही कायदा मोडतील व गुन्ह्यामध्ये सहभागी होतील. कारण एकतर ते कायद्याचा आदर करत नाहीत किंवा त्यांनी कायद्याचा भंग करूनही काहीच होणार नाही हे त्यांना माहिती असते, समाजाचा हाच दृष्टिकोन खरेतर संपूर्ण खाकी वर्दीसाठीच धोक्याचा इशारा आहे, असे मला तुम्हाला सांगावेसे वाटते.
पोलीस दलामध्ये प्रवेश घेण्यासाठी येणारे तरूणही या बदललेल्या समाजातीलच असतात, त्यामुळे ते कायद्याचा आदर करतील अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो. कारण तो त्यांच्या डीएनएचा भागच राहिलेला नसतो, म्हणूनच मी तुम्हाला लिहीत आहे. सर, म्हणूनच ज्यांना कायद्याचे पालन करायचे आहे किंवा कायद्यानुसार जगायचे आहे ते प्रत्यक्षात कोणत्याही पोलीस स्थानकात जायलाही घाबरतात. त्यांना असे वाटते की त्याचा काय उपयोग आहे कारण पोलीस दल असहाय्य आहे. याच कारणामुळे अनेक लोक अतिशय आवश्यक असूनही गुन्ह्यांची तक्रारच करत नाहीत, हे अतिशय कटू सत्य आहे जे कुणीही स्वीकारत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. दुसरीकडे, जे गुन्हेगार आहेत ज्यांना पोलीसांची भीती वाटली पाहिजे, त्यांना आता पोलीस ठाण्यात जाण्याची भीती वाटत नाही कारण ते आज ना उद्या ते काहीतरी करून त्यांना हवा तो मार्ग काढतीलच असा विश्वास त्यांना वाटतो. मला माहिती आहे की, एखादी व्यक्ती दोषी आहे किंवा नाही याचा निवाडा करणे हे पोलीसांचे काम नाही तर न्याय व्यवस्थेचे काम आहे, तर दोषींना पकडण्यासाठी व त्यांना शिक्षा व्हावी यासाठी न्यायव्यवस्थेला मदत करणे हे आहे. हे केवळ पोलीसांच्या मदतीने शक्य होऊ शकते, परंतु सामान्य माणसाला खाकी गणवेशातील माणसे हे योग्य प्रकारे करत आहेत किंवा ते करण्यासाठी पुरेशी योग्य आहेत असे वाटत नाही, मग त्याचे जे काही कारण असो, याच कारणामुळे मला तुम्हाला हे पत्र लिहायचे होते. मोठा उद्योग असलेला एखादा व्यावसायिक असो किंवा अगदी रस्त्यावर पावभाजीचे दुकान चालवणारी व्यक्ती. इथे आज कुठल्याही स्वरूपातील व्यवसाय चालवणे हे केवळ स्पर्धा किंवा सरकारी धोरणांमुळे कठीण नाही तर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचा म्हणजेच पोलीसांचा पाठिंबा नसल्यामुळे कठीण आहे. मी खोटे बोलत आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन लोकांशी बोलू शकता (तुमची ओळख जाहीर न करता) व तपासू शकता. मी जे बोलतोय ते चुकीचे असेल तर हे पत्र विसरा (ते जर तुमच्यापर्यंत पोहोचले तर, lol), परंतु तुम्हाला त्यात काहीही तथ्य आढळले, तर तुमच्यापुढे आणखी खडतर आव्हान आहे, आणि मी एका रात्रीत काही सर्व बदल होईल अशी अपेक्षा करत नाही, परंतु तुम्ही त्याविषयी काहीतरी सुरुवात करू शकता, म्हणूनच तुम्हाला मी हे पत्र लिहीत आहे. तुमच्यासारख्या व्यक्ती खरेतर एकप्रकारे संपूर्ण समाज व यंत्रणेसाठी आशेचा किरणच आहात. मला पोलीस दलाच्या नाण्याची दुसरी बाजूही माहिती आहे कारण निकृष्ट पायाभूत सुविधा, अपुरे पगार (जेवढ्या कामाची अपेक्षा केली जाते त्या तुलनेत), राजकीय हस्तक्षेप यासंदर्भात अगदी पोलीस महासंचालकही एकटे काही करू शकत नाहीत. परंतु या गोष्टी नेहमी असणारच आहेत, म्हणूनच तुम्हाला त्यातूनच मार्ग काढावा लागणार आहे, जो तुम्ही नक्कीच काढाल असा मला विश्वास आहे. साहेब, पोलीस दलासाठी बल हा शब्द वापरला जातो कारण इतर विभागांना किंवा समाजातील वर्गांना जे करण्याची परवानगी नसते त्या गोष्टी करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. जिथे ताकद असते तिथे जबाबदारी येते (स्पायडरमॅन). इथे लक्षावधी लोकांची जबाबदारी आहे ज्यांच्याकडे केवळ एकच ताकद आहे, ती म्हणजे गृह विभागाची. हे कदाचित फार नाट्यपूर्ण वाटेल परंतु ही वस्तुस्थिती आहे कारण बहुतेक लोकांना पोलीस नावाचे दल अस्तित्वातच नाही किंवा ते केवळ निवडक लोकांसाठी काम करते असे वाटत असते. त्यांचा या दलावरील विश्वास कमी होऊ लागला आहे व पोलीस दल नावाच्या बलावर जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण करणे हे तुमच्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे!
शेवटी, मी तुम्हाला माझी अतिशय वैयक्तिक आठवण सांगणार आहे. माझ्या बालपणी विदर्भातील खामगाव नावाच्या माझ्या लहानशा गावी, जेव्हा आम्ही रस्त्यावर एखाद्या पोलीस शिपायाला पाहात असू जे पोलीस दलाच्या उतरंडीमधील सर्वात शेवटचे पद आहे, आम्ही त्यांच्याकडे पाहून हात हलवत असू व त्यांना सॅल्युट करून “पोलीस काका, जय हिंद” असे म्हणत असू. तो शिपाई देखील हसून “जय हिंद” म्हणत आमच्या सॅल्युटला प्रत्युत्तर देत असे. डीजीपी सर, आजच्या लहान मुलांनीही रस्त्यावर चालणाऱ्या पोलीस शिपायाला असाच हसून सॅल्युट करावा अशी माझी इच्छा आहे; कारण तो सॅल्युट केवळ औपचारिकता किंवा गम्मत म्हणून केला जात नसे, तर समाजाला खाकीविषयी वाटणारा जिव्हाळा, आदर व प्रेमाचे ते प्रतीक होते, एवढेच सांगून निरोप घेतो. तुम्हाला कधीही वाटले व गरज लागली तर वैयक्तिकपणे व संघटना म्हणून कोणत्याही प्रकारे मदत करायला मला आनंदच होईल हे सांगायची गरज नाही, जय हिंद!
-
संजय देशपांडे
smd156812@gmail.com www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in











टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा