पुण्यात घर खरेदी 2026 मधे..!!








































पुणे रिअल इस्टेट आणि 2026!


“एखाद्या स्वप्नाप्रमाणे शहरेही इच्छांपासून बनलेली असतात व त्यांनाही भीती वाटत असते, त्यांचा उगम कुठून होतो हे गोपनीय असले, त्यांचे नियम विचित्र असले, त्यांचे दृष्टिकोन फसवे असले व प्रत्येक गोष्ट दुसरे काहीतरी लपवत असले तरीही.”― इटॅलो कॅल्व्हिनो.


“शहरावर कोणताही तर्क लादला जाऊ शकत नाही; लोक तो निर्माण करत असतात, म्हणून आपले आराखडे त्यांना अनुकूल असले पाहिजेत, इमारतींना नव्हे.”― जेन जेकब.


”जे शहर तुम्हाला सर्वाधिक आवडते त्यात मेट्रो, उड्डाणपूल, मॉल किंवा अगदी स्मार्ट ॲप असतीलच असे नाही; ते फक्त तुम्हाला, जिव्हाळा, आपुलकी व शांतता देऊ शकते” -- मी.


बऱ्याच काळानंतर मला कुणीतरी नवीन वर्ष म्हणजे 2026 पुण्यातील रिअल इस्टेटसाठी काय घेऊन येईल हे विचारले, कारण प्रमाणिकपणे सांगायचे तर मी शहराच्या या पैलूविषयी बोलायचे (म्हणजे लिहायचे) विसरूनच गेलो होतो, अशी रिअल इस्टेट उद्योगाची स्थिती आहे, ज्याला मुळात एखाद्या उद्योगाचा दर्जाच नाही (कायद्याने किंवा सरकार दरबारी). अर्थात मी कुठेही गेलो, म्हणजे पुण्याबाहेर गेलो तरीही प्रत्येकाला पुण्यामध्ये त्यांच्या संबंधित हेतूने घर किंवा ऑफिस खरेदी करण्यामध्ये रस असतो, हेदेखील पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राचे वैशिष्ट्यपूर्ण तथ्य आहे. आपल्या देशाच्या 150 कोटींहून अधिक लोकसंख्येमुळे जमीनीला नेहमीच मागणी राहील मग ती कोणत्याही कारणासाठी वापरली जात असो (किंवा आरक्षित असो), कारण या लोकसंख्येला अन्न, शिक्षण, घरे, नोकऱ्या व बस थांबे, रुग्णालये, विमानतळे यासारख्या पायाभूत सुविधा लागतील. या सगळ्या गोष्टींसाठी एआय तुम्हाला मदत करणार नाही तर प्रत्यक्ष जमीन हाच एकमेव तोडगा आहे व त्याचाच अर्थ होतो रिअल इस्टेट. बऱ्याच काळापासून, जमीन म्हणजेच खरी ताकद(power) असे समीकरण झाले आहे, मग ते गाव असो किंवा शहर किंवा पुण्यासारखे महानगर. हे काही रॉकेट विज्ञान नाही व महान शास्त्रज्ञ आइनस्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे ऊर्जा (जी शक्तीचा स्रोत असते) तयार केली जाऊ शकत नाही अथवा नष्ट केली जाऊ शकत नाही, ती केवळ तिचे स्वरूप बदलत असते”! दुर्दैवाने, आपल्या राज्यामध्ये, शहरामध्ये किंवा प्रदेशामध्ये (त्याने काहीही फरक पडतो का) रिअल इस्टेटचे ज्याप्रकारे नियंत्रण केले जाते, ते पाहिल्यावर आईनस्टाईन जिवंत असते तर म्हणाले असते, "ऊर्जा वायाही घालवली जाऊ शकते", पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या अलिकडच्या परिस्थिती संदर्भात मी हे म्हणेन. मित्रांनो माफ करा, मला माहितीय ही काही सकारात्मक सुरुवात नाही, विशेषतः जर तुम्ही पुण्यामध्ये घर किंवा व्यावसायिक मालमत्ता बघत असाल तर आधी ही कडू गोळी गिळणे उत्तम, त्यामुळे असो!

मी जेव्हा जमीनरूपी ताकद वाया घालवण्याविषयी बोलतो, तेव्हा त्याचा अर्थ जमीनीचे दर कमी झाले आहेत किंवा रिअल इस्टेटमधील तुमच्या गुंतवणुकीला धोका आहे असा होत नाही. परंतु तुमच्याकडे फेरारी असेल व तुम्ही 30 किमी/तास वेगाने ती चालवत असाल तर तुम्ही काय म्हणाल, मलाही जमीनीच्या क्षमतेविषयी हाच मुद्दा मांडायचा होता. संपूर्ण राज्यात अशीच परिस्थिती आहे व याचे कारण म्हणजे, आपली नागरी नियोजनाची धोरणे तसेच जमीनीशी व एकूणच रिअल इस्टेटशी संबंधित सध्याच्या धोरणांची अंमलबजावणी. मान्य आहे, हे वाढत्या जमीनीच्या दरांना अनुकूल आहे व या धोरणांची व नागरी नियोजनाशी संबंधित बाबींची फिकीर कुणाला आहे, जमीनीचे दर, सदनिकांचे दर सतत वाढत आहेत, त्यामुळे कशाला काळजी करायची. अर्थातच, माझ्या लेखाचा हाच मुद्दा आहे कारण जमीनींचे हे वाढते दर व सदनिकांचे दर केवळ काही जणांसाठी लाभदायक आहेत व बहुतेकांसाठी आवाक्याबाहरचे आहेत ही रिअल इस्टेटची खरी समस्या आहे. घर किंवा व्यावसायिक मालमत्ता आरक्षित करताना किंवा एखादी जमीन खरेदी करताना किंवा जमीनीमध्ये गुंतवणूक करताना प्रत्येकाने याकडे पाहिले पाहिजे, हे मला सांगायचे आहे. सर्वप्रथम, घराच्या ग्राहकांवर एक नजर टाकू कारण दरवर्षी पन्नास हजारांहून अधिक व्यक्ती केवळ एका उद्देशाने पुणे प्रदेशामध्ये स्थलांतरित होतात (हा केवळ एक तर्क आहे कारण या आकडेवारीचा नेमका डेटा उपलब्ध नाही किंवा तो देणारी काहीही यंत्रणा नाही) व तो म्हणजे अधिक चांगले जीवन! यामध्ये शिक्षण तसेच नोकऱ्यांचाही समावेश होतो व यापैकी बहुतेक लोक इथेच, पुणे प्रदेशामध्येच कायमस्वरूपी स्थायिक होतात (अशा प्रकारे स्थायिक झालेली एक व्यक्तीच हा लेख लिहीत आहे), म्हणूनच तुमचे एकदा शिक्षण व नोकरी झाल्यानंतर लोक ज्या गोष्टीचा शोध घेतात ती म्हणजे घर. हाच कल लक्षात घेऊन अनेक स्मार्ट पालक (आधीच्या पिढीतील) त्यांचा मुलगा किंवा मुलगी जे अजून पुण्याला यायचे आहेत त्यांच्यासाठी घर बघण्यास सुरुवात करतात, कारण ते एकप्रकारे सोने खरेदी करण्यासारखे आहे हे ते जाणतात. हे खरे आहे परंतु सोने आणि रिअल इस्टेटमधला फरक म्हणजे सोने अस्सल असेल (अटी व शर्ती लागू म्हटल्यासारखे) तर तुम्ही ते कधीही, कुठेही विकू शकता, जे घराच्या बाबतीत खरे नाही. याचे कारण, एक म्हणजे ते घेणे हे खार्चिक काम आहे व सोन्यासारखे तुम्ही घराचे तुकडे करू शकत नाही. म्हणजे तुमच्याकडे 10 तोळे सोने असेल (100 ग्रॅम) तर तुम्ही त्यातील एक तोळा विकू शकता. परंतु तुमच्याकडे 3 बीएचकेचे घर असेल तर तुम्ही त्यातील एक किंवा दोन बेडरूम किंवा फक्त लिव्हिंग किंवा डायनिंग रूम विकू शकत नाही. दुसरे म्हणजे, सोन्याचा प्रमाणित दर असतो व जगभरातील बाजारामध्ये त्यामध्ये केवळ 2 किंवा 3 टक्केच फरक असतो. घराच्या बाबतीत मात्र अशी परिस्थिती नसते. 

घराच्या बाबतीत बोलायचे तर तुम्हाला जेमतेम एका वर्षात दुप्पट दाम मिळू शकतात किंवा ते विकले जाण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. आर्थिक भाषेत बोलायचे झाले तर याचाच अर्थ तुमची गुंतवणूक अडकते. तुम्ही घराचा वापर करू शकता जे सोन्याच्या बाबतीत होत नाही. म्हणजे तुम्ही घरामध्ये राहू शकता किंवा ते भाड्याने देऊ शकता, यामुळे तुमचा पैसा वाचू शकतो, जी एकप्रकारे कमाईच आहे. सोन्याच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. इथेच तुम्ही घर कसे व कुठे खरेदी करता व त्यामागचा हेतू यावरूनच तुमच्या गुंतवणूकीचे भवितव्य ठरत असते हा माझ्या लेखाचा विषय आहे. घराचे भवितव्य केवळ बांधकाम किंवा अंतर्गत वैशिष्ट्यांवरच नव्हे तर अनेक घटकांवर अवलंबून असते, कारण त्यामध्ये फारसा फरक नसतो. परंतु त्याचे ठिकाण, आजूबाजूला होत असलेला विकास, तुमचा स्वतःचा करिअरचा मार्ग व तुम्ही कोणत्या बांधकाम व्यावसायिकाकडून ते खरेदी करायचा निर्णय घेता यावर ते अवलंबून असते. हे सर्व घटक अतिशय महत्त्वाचे असतात व इथेच नागरी विकासाची धोरणे महत्त्वाची ठरतात. भूगावचेच (पुण्याचे पश्चिम उपनगर) उदाहरण घ्या, साधारण दशकभरापूर्वी पुण्यातील कोथरुड व बावधन (ॲनेक्स) या दोन्ही विकसित उपनगरांनंतर आता हेच अशी जोरदार चर्चा होती. सर्वांना रिअल इस्टेटमध्ये ही आणखी एक सोन्याची खाण ठरेल असे वाटत होते. परंतु आज परिस्थिती अशी आहे की, इथे दशकभरापूर्वी असलेल्या तेजीत ज्या दराने जमीनी खरेदी केल्या त्यापेक्षा कमी दराने इथे सदनिका विकल्या जात आहेत. याचे कारण म्हणजे खराब पायाभूत सुविधा, विकास योजनेची (डीपी) अनिश्चितता, पुणे महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत याचा समावेश नसणे. मला माफ करा, माझा भूगाववर अजिबात राग वगैरे नाही. आजही जे तिथे घर खरेदी करणार आहेत त्यांना त्यांच्या गुंतवणूकीवर परतावा मिळू शकतो परंतु एक लक्षात ठेवा की ज्यांनी दशभरापूर्वी तिथे गुंतवणूक केली त्यांना चांगला परतावा मिळू शकलेला नाही. पुण्याच्या उपनगरातच नव्हे तर पुण्यात व आजूबाजूच्या भागात, त्याचशिवाय शहराच्या विकसित भागांमध्येही अशीच परिस्थिती आहे. याचे एकमेव कारण म्हणजे पायाभूत सुविधांच्या वाढीविषयी अनिश्चितता तसेच नागरी विकासाबाबतची विचित्र धोरणे. उदाहरणार्थ पुण्यातील आजकाल मेट्रोची (रेल) “चलती” आहे. प्रत्येक स्थानिक नेत्याला त्यांच्या उपनगरामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या रिक्षाच्या थांब्याप्रमाणे मेट्रो हवी असते व सरकारही त्यांच्या नेत्यांवर उदार होत आहे. परिणामी, मेट्रो जेव्हा होईल तेव्हा होईल, एफएसआय (चटई क्षेत्र निर्देशांक) व टीडीआरचे (विकास हक्क हस्तांतर) हिशेब बदलल्यामुळे मेट्रो मार्गालगतच्या स्थानिक रिअल इस्टेटचे आयामही बदलत आहेत. मोठ्या प्रमाणावर एफएसआयला परवानगी दिल्यामुळे, अक्षरशः दर दुसरी सोसायटी किंवा भूखंड बाजारामध्ये आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात केवळ वाहतूक व पायाभूत सुविधांसाठीच गर्दी वाढलेली नाही तर विक्रीच्या बाबतीतही ती झाली आहे. प्रभात रस्ता जो नदीच्या अलिकडच्या बाजूला आहे, अतिशय उच्चभ्रू भाग मानला जातो, तिथे जे पाचवर्षापूर्वी दर सांगितले जात होते आता त्याच्या दुप्पट झाले आहेत का, जे होणे रिअल इस्टेटमध्ये अगदी सामान्य मानले जाते, तर याचे उत्तर स्पष्ट शब्दात "नाही", असे आहे! जमीनीचे दर केवळ दुपटीनेच नव्हे तर तिपटीने वाढले आहेत, याचे कारण म्हणजे इथे तिप्पट एफएसआयला परवानगी देण्यात आली आहे. ही केवळ सदनिकेच्या ग्राहकांसाठीच नव्हे तर विकासकांसाठीही धोक्याची घंटा आहे. कारण इथे केवळ जमीन मालक कमवत आहेत ज्यांचे पूर्वज प्रभात रस्त्यावर भूखंड खरेदी करू शकण्याइतपत नशीबवान होते. अगदी प्रभात रस्ता असला तरीही इथे गुंतवणूक करायचा निर्णय घेणारा बांधकाम व्यावसायिक असो किंवा सदनिकेचा ग्राहक या सर्वांचा पैसा बराच काळासाठी अडकून पडणार आहे हे निश्चित.

मी काही कुणी आर्थिक विश्लेषक नाही व मी तुम्हाला रिअल इस्टेट पैलू समजावेत यासाठी ही दोन उदाहरणे दिली आहेत. म्हणूनच तुम्हाला स्वतः राहण्यासाठी घर खरेदी करायचे असेल ते देखील लगेच किंवा नजीकच्या भविष्यात, तर केवळ विकसित भागात किंवा त्याच्या आजूबाजूलाच घर खरेदी करा. नाहीतर, केवळ विकसनशील उपनगरांमध्ये, पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक तसेच प्रत्येक पायाभूत सुविधांविषयी योग्य व्यक्तीकडे चौकशी करूनच ताबा घेण्यासाठी तयार घरच (सदनिका) खरेदी करा. कारण त्यावरूनच तुमची गुंतवणूक किती दराने वाढेल हे ठरेल. त्यासाठी, उपनगरांमध्ये फेरफटका मारा, ते दशभरापूर्वी कसे होते हे समजून घ्या. पायाभूत सुविधा व सदनिकांची स्थिती प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांनी पाहून घ्या व त्यानंतर निर्णय घ्या. केवळ इन्स्टाग्राम रील किंवा एजंटच्याही बोलण्यावर जाऊ नका. त्यांची मदत घ्या परंतु तुम्ही बांधकाम स्थळाचा तसेच त्या ठिकाणाचा तपशीलवार अभ्यास केल्याशिवाय कधीही घर आरक्षित करू नका. संबंधित बांधकाम व्यावसायिक तसेच त्यांच्या सध्याच्या ग्राहकांशी बोला, वॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमांमुळे तुम्ही आता थेट प्रश्न विचारू शकता. त्याप्रमाणे केवळ गूगलवरच्या प्रतिक्रिया वाचून मत ठरवू नका, त्या सशुल्क असू शकतात व चांगल्या किंवा वाईट दोन्हीही असू शकतात. म्हणूनच रिअल इस्टेटमधील कोणत्याही हेतूने केल्या जात असलेल्या गुंतवणूकीसाठी प्रत्यक्ष तिथे जाऊन प्रतिक्रिया घेणेच सर्वोत्तम. तुम्ही जर स्वतःसाठी घर खरेदी करत असाल तर प्रवासासाठीचे अंतर विचारात घ्या, म्हणजे तुमच्या स्वतःसाठी तसेच तुमच्या कुटुंबीयांसाठी. याचे कारण म्हणजे पुण्यामध्ये तीन गोष्टी दिवसेंदिवस खालावत जाणार आहेत (मेट्रोविषयी पूर्णपणे आदर राखून सांगत आहे), एक म्हणजे शहरांतर्गत प्रवास करणे, दुसरी म्हणजे पाणी व तिसरी म्हणजे स्वच्छ हवा. माझ्यावर विश्वास ठेवा, मी एखादा कट्टर पर्यावरणवादी म्हणून मी हे म्हणत नाही, तर हे केवळ भविष्यच नव्हे तर वर्तमानही आहे म्हणून म्हणतोय. सध्यातरी सरकारकडे वरील तिन्हींसाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही, त्यामुळेच तुम्ही हुशारीने निवड करणे हाच एकमेव मार्ग आहे. कारण घर, मग ते कुठेही असले तरीही, तुम्हाला त्यामध्ये सर्वोत्तम सोयी-सुविधा मिळू शकतात, परंतु तुम्हाला तिथपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी उपाययोजना सापडू शकत नाही, तुम्ही पाणी तयार करू शकत नाही तसेच तुम्ही त्या भागात असलेला सीओ (कार्बन मोनॉक्साईड) हटवून त्याजागी आपणहून ओ (ऑक्सिजन) आणू शकत नाही. बाकी सर्व गोष्टी (म्हणजे बहुतेक गोष्टी) तुम्ही थोड्याफार मदतीने करून घेऊ शकता.

आता व्यावसायिक जागांविषयी बोलायचे, तर याला एक सकारात्मक बाजू आहे ती म्हणजे या जागा खरेदी करण्याचा हेतू वेगळा आहे, त्यामुळेच जेव्हा लोक कार्यालय किंवा दुकान खरेदी करतात तेव्हा त्यांची फारशी हरकत नसते कारण त्यांना इथे रात्र घालवायची नसते तसेच त्यांना त्यांची सकाळ इथून सुरू करायची नसते. म्हणून तुम्ही व्यावसायिक जागा वापरण्यासाठी किंवा गुंतवणूकीसाठी निवडताना तुम्हाला वाहतूक व हवेचा दर्जा यासारख्या समस्यांकडे काणाडोळा करण्याची लवचिकता असते. किंबहुना या शहरात येणारे लोकांचे प्रचंड लोंढे पाहता, या लोकसंख्येला केवळ नोकऱ्या किंवा शिक्षणच नव्हे तर सर्व प्रकारच्या सुविधा लागतील व या सेवांसाठी जागा लागेल. म्हणूनच तुम्ही स्वतःच्या कामासाठी, व्यवसासाठी, स्टार्टअपसाठी जागा बघत असाल, किंवा तुम्हाला ती भाड्याने देण्यासाठी गुंतवणूक म्हणून घ्यायची असेल तर पुण्यातील रिअल इस्टेटसाठी व्यावसायिक जागा हा सर्वोत्तम पर्याय आहे. मी हे एक बांधकाम व्यावसायिक म्हणून म्हणत नाही तर तुम्ही स्वतःच विचार करा. दिवसेंदिवस जमीनी कमी होत चालल्या आहेत, परंतु आपल्या गरजा मात्र नाही. निवासी मालमत्तांसाठी भाडेदरातील वाढीमुळे नेहमी बजेटचा विचार केला जाईल पण व्यावसायिक जागांसाठी व्यक्ती तिच्या उत्पन्नाचा विचार करते कारण जागेसाठी फार अधिक गुंतवणूक करण्यापेक्षा तिची भाडे भरण्यासही हरकत नसते. याचसाठी पुणे प्रदेशात सध्या होत असलेल्या वाढीचा विचार करता स्वतःचा व्यवसाय असो किंवा भाड्याने देण्यासाठी असो, व्यावसायिक मालमत्ता उत्तम पर्याय आहे. तुम्ही फक्त एवढेच करायचे आहे की घाई करायची नाही, एखाद्या भागातील विकासाचे स्वरूप तसेच त्या भागातील निवासी वाढ अभ्यासा. व्यावसायिक वाढ दोन प्रकार असू शकते, एक म्हणजे आजूबाजूच्या भागातील गरजांच्या आधारे, उदाहरणार्थ किराणा सामान, धोबी, तसेच औषधांची दुकाने व दुसरा म्हणजे कॉर्पोरेट कार्यालयांसारख्या जागा. तुम्ही केवळ योग्य हेतूने वापरण्यासाठी योग्य जागा निवडणे आवश्यक आहे व त्यानंतर नक्कीच तुम्ही व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्याचा तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही.

त्याचप्रमाणे, अनेक लोकांची जमीनीचा एखादा तुकडा (भूखंड) घेण्याची इच्छा असते, कारण आपल्या मालकीची एखादी जमीन असावी असे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते व त्यात गैर काहीच नाही कारण जमीनीची मालकी असणे ही सर्वोत्तम भावना आहे तसेच ती अतिशय चांगली मालमत्ता आहे पण! तो जमीनीचा तुकडा कायदेशीर व बेकायदेशीर घटकांपासून सुरक्षित ठेवण्याच्या क्षमतेचा प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे हेच जमीनीमध्ये गुंतवणूक करताना मी सांगेन. पुण्याला सतत बदलणाऱ्या विकास योजनांचा, धोरणांचा व नियमांचा शाप लागला आहे, विशेषतः पुणे महानगरप्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (कृपया गूगल करा) बऱ्या खुल्या जमीनी उपलब्ध आहेत व त्याच्या विकास योजनेविषयी बोलायचे झाले तर अगदी देवही त्याविषयी बोलू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या जमीनीचे दर (म्हणजे खरेतर भविष्य) अक्षरशः सोने किंवा राखेएवढे दोलायमान असू शकतात. हा कायदेशीर धोका आहे व बेकायदा गोष्टींविषयी बोलायचे तर मालकीहक्काविषयीचे दीवाणी खटले अनेक दशकांनंतरही उपटू शकतात व ते दाखल करून घेतले जातात हे आपल्या न्याय व्यवस्थेचे कटू सत्य आहे. त्यामुळेच कोणत्याही भूखंडामध्ये अतिशय काळजीपूर्वकपणे व तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच गुंतवणूक करणे हाच एकमेव मार्ग आहे.


आता शेवटचा व सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तुम्ही खरेदी करत असलेल्या मालमत्तेची वैधता तसेच बांधकामाचा दर्जा व दिलेल्या आश्वासनांची पूर्तता; म्हणूनच, नावाजलेल्या (प्रस्थापित) बांधकाम व्यावसायिकाकडे जा व त्याच्या/तिच्या कार्यालयाला व्यक्तीशः भेट द्या, कर्मचाऱ्यांशी बोला, केवळ उत्पादनाविषयी नव्हे तर कामाविषयी त्यांच्या तत्वज्ञानाविषयी प्रश्न विचारा व तुम्ही ज्यांच्याशी व्यवहार करताय त्या कंपनीविषयी सर्वकाही जाणून घ्या व त्यानंतरच व्यवहार करा. दुर्दैवाने, दोन्ही बाजूंसाठी कठीण काळ आहे व लोक (विशेषतः जेव्हा एजंट किंवा मध्यस्थ सहभागी असतात) व्यवहार करण्याची घाई करतात. म्हणूनच एक लक्षात ठेवा योग्य घर किंवा योग्य कार्यालय निवडताना केवळ बचत, प्रति चौरस फूट दर किंवा सोयी-सुविधा यांचा विचार करता येत नाही. हा व्यवहार करताना सर्वंकष विचार केला जातो ज्यामध्ये केवळ पैसे कमावण्याव्यतिरिक्त, लोक, त्यांचा प्रकल्पाविषयीचा दृष्टिकोन, तसेच त्यांची सामाजिक बांधिलकीही (तसेच निसर्गाप्रति असलेली बांधिलकी) अतिशय महत्त्वाची असते, जे घर घेणारे अनेक ग्राहक विचारात घेत नाहीत. शेवटी, तुम्ही या शहरामध्ये तुम्हाला एक चांगले आयुष्य मिळेल म्हणून घर खरेदी करत असता व हे शहर चांगले राखणे ही तुमची जबाबदारीही आहे. तुम्ही जेव्हा योग्य लोकांशी हातमिळवणी करून पुढे जाता तेव्हाच हे शक्य होते. चला तर मग, तुमचे घर/ऑफिस निवडा व पुण्याच्या विकासाच्या मार्गामध्ये सहभागी व्हा, अशा शुभेच्छा देऊन निरोप घेतो!🌱


Sanjay Deshpande 

www.sanjeevanideve.com 

www.junglebelles.in

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!