धन्यवाद इंडिगो!!
धन्यवाद इंडिगो!!
“तिसर्या क्रमांकाच्या खाली असणे सर्वात सुरक्षित असते. अजिबात काहीही ताण नसतो. पहिल्या तीन मध्ये असणे धोकादायक, स्ट्रेसफुल, व खडतर असते, कारण तुम्हाला नेहमी डोळ्यात तेल घालून राहावे लागते. अतिशय कणखरच टिकून राहू शकतात टॉप वर.”
― डॉन सँटो.
“तुम्हाला माहितीय कोणत्याही देशाचा चांगल्या गोष्टींवर एकाधिकार नसतो, प्रत्येकाकडे असे काहीतरी असते ज्याचा अंगिकार इतर करू शकतात.”
― विल रॉजर्स.
“सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत लागते परंतु शिखरावरून गडगडून गाळात जायला फक्त एक आठवडा पुरतो.”
_ मी.
थोडा बदल म्हणून मी जरा माझ्या आवडत्या विषयापासून किंवा विषयांपासून जरा फारकत घेतोय. हा लेख वन्यजीवन किंवा रिअल इस्टेटविषयी नाही तरीही एक प्रकारे तो त्या दोन्हींशी संबंधित आहे. याचे कारण म्हणजे सध्या भारतीय हवाई वाहतूक उद्योगातील सद्यपरिस्थितीतील पेच (अथवा आपत्ती किंवा सावळागोंधळ). मला खात्री आहे की यासंदर्भात अनेक तर्क-वितर्क केले जातीलच, विश्लेषण केले जाईल व पण सध्या एकमुखाने या सगळ्याला इंडिगो नावाची विमान कंपनी दोषी आहे असे जाहीर करण्यात आले आहे. हे नाव गेल्याच आठवड्यापर्यंत आपल्या देशाचा अभिमान होते व ग्राहक सेवेचे व वेळेच्या शिस्तीचे प्रतीक होते. परंतु जो देश भावनांवर चालतो म्हणजे अगदी खेळापासून (म्हणजे क्रिकेट) ते राजकारणापर्यंत सर्वकाही भावनांच्या आधारे ठरवले जाते, तिथे कुणीही एका दिवसात 1ल्या क्रमांकावरून तळाशी पोहोचू शकते, इंडिगोही त्याला अपवाद नाही. एआयचे आभार, तुम्ही हवाई वाहतूक समस्येविषयी एक रील पाहिल्यानंतर, त्याविषयीच्या सर्व माध्यमांमधील बातम्यांची तुमच्या सेलफोनमध्ये गर्दी होते. इंडिगोविषयी माझ्या बाबतीतही असेच झाले. मी सुद्धा या समस्येचा पीडित होता-होता वाचलो. मी घरातील एका
लग्नाला जाऊन कुटुंबासोबत नागपूरहून पुण्याला परत येणार होतो. आमचे विमान रात्री 11.40 वाजता निघणार होते. परंतु माझ्या आतेभावाने मला सल्ला दिल्यामुळे मी विमानाने जाणे टाळून रस्त्याने आलो. मी पुण्यात पोहोचतोय न् पोहोचतोय तोच बातमी आली की आम्ही ज्या विमानाने येणार होतो ते केवळ उशीराच निघाले नाही, तर पुणे विमानतळावर पार्किंग बे उपलब्ध नसल्यामुळे, ते हैदराबादला नेण्यात आले व दुसरा पूर्ण दिवस प्रवासी तिथेच अडकून होते. आत्तापर्यंत असे असंख्य अनुभव ऐकण्यात आले असतील, ज्यामध्ये लोकांना केवळ त्यांच्या प्रवासाच्या योजनाच रद्द कराव्या लागल्या नाही तर त्यांचे खुप आर्थिक नुकसानही झाले. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे झालेला मानसिक छळ व त्रास, जे खरे नुकसान आहे. हे सगळे केवळ एका विमान कंपनीमुळे झाले, ते म्हणजे इंडिगो, असे बहुतेक लोक म्हणतील. परंतु माझे मत थोडे वेगळे आहे किंवा मी या मताशी सहमत नाही, म्हणूनच हा लेख लिहीला आहे. नाही, मी काही कुणी इन्फ्लूएन्सर किंवा पैसे घेऊन लिहीणारा ब्लॉगर नाही, जो कुणाची तरी पैशांसाठी पाठराखण करेल. मी हे लिहीतोय कारण मी एक स्थापत्य अभियंता आहे व स्वतः एक व्यावसायिक आहे. प्रवास हा पायाभूत सुविधांचा भाग आहे जो माझ्या कामाची दोन्ही क्षेत्रे म्हणजे वन्यजीवन व रिअल इस्टेटशी संबंधित आहे. म्हणूनच मी हा लेख लिहीत आहे. एखाद्या व्यवसायाच्या अनेक पैलूंचे हे उत्तम उदाहरण आहे, ज्यामध्ये कौतुक व टीकेचा भडीमार, तसेच सरकारच्या धोरणांचे अपयश (हा समायिक घटक आहे) या सगळ्याचा समावेश आहे.
सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोक का चिडले किंवा विमान कंपनीविरुद्धचा असंतोष एवढा प्रचंड का वाढला. याचे कारण केवळ विमाने रद्द होणे किंवा त्यांना उशीर होणे किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमांना पोहोचू शकणे हे नव्हते, तर प्रवाशांना ज्या अनपेक्षितपणे याला तोंड द्यावे लागले (म्हणजे धक्कादायकपणे) व संवादाचा अभाव ही त्यांना रागाची प्रमुख कारणे होती. माझी बहीण नागपूर विमानतळावर चालली होती. तिला ज्या विमानाने जायचे होते हे सहसा पुण्याहून नागपूरला येते व परत जाते. विमान येतानाच २ तास उशीरा पोहोचले व ते माझ्या बहिणीला कळवण्यात आले नव्हते, जे सर्व विमानकंपन्या बहुतेकवेळा करतात (करायच्या असे वाचा), इंडिगो तर नेहमी उशीराबद्दल वेळेत इन्फॉर्मे करते. मला माहिती होते की पुण्याहून विमान निघायचे होते कारण माझा एक मित्र त्याच विमानाने प्रवास करत होता. मी माझ्या बहिणीला सांगत होतो की किती उशीर होणार आहे हे तपासत राहा, पण तिच्या मोबाईलवर काहीच माहिती आली नसल्याने तिला विमान वेळेवर आहे असा भरवसा होता व ती माझ्या ऐंशी वर्षांच्या आईसोबत प्रवास करत होती. ती बोर्डिंगपूर्वी एक तास आधी विमानतळावर पोहोचली व तिथे त्यांना विमान दोन तास उशीरा असल्याचे सांगण्यात आले. लोक यामुळे वैतागतात, तुम्ही वेळेवर सेवा देऊ शकत नाही हे तुम्हाला माहिती असते तेव्हाही तुम्ही आधी कळवले नाही, हे रागाचा उद्रेक होण्यामागचे मुख्य कारण होते. सुदैवाने, ही केवळ गोंधळाची सुरुवात होती व माझी बहीण व आई केवळ दोन तास उशीराने पुण्याला पोहोचल्या. परंतु दुसऱ्या दिवसापासून (ते आजपर्यंत) जो काही सावळा गोंधळ सुरू झाला ते तुम्ही सगळ्यांनी वाचले व वारंवार पाहिले. त्यामुळेच, व्यवस्थित संवाद न साधणे व तसेच आपल्या ग्राहकांपासून (म्हणजे प्रवाशांपासून) तथ्ये लपवून ठेवणे यासाठी इंडिगो निश्चितच जबाबदार आहे. कारण त्यांची विमाने वेळेवर उड्डाण करत नाहीयेत किंवा उड्डाणच करणार नाहीयेत हे माहिती असूनही त्यांनी नवीन तिकीट आरक्षण का दिले असाही आरोप आहे जो कंपनीला फेटाळता येणार नाही. योग्य संवाद साधणे व खोटी आश्वासने देणे टाळणे या दोन गोष्टी प्रत्येक उद्योग समूहासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण ग्राहक असमाधानी होण्याचे हे सर्वात मुख्य कारण आहे. यामुळे कंपनीचे त्याचसोबत संपूर्ण उद्योगाचेही नाव खराब होते. याची किंमत इंडिगोला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मोजावीच लागेल हे नक्की, तर असो.
आता गोंधळाच्या मुख्य कारणाविषयी बोलू, हे केवळ इंडिगो त्यांच्या विमान कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांविषयीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करू शकले नाही याविषयी नाही. असे ते असे गेली दोन वर्षे करत होते, त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे आपल्या देशातील इतर सार्वजनिक वाहतूकीच्या अतिशय खराब (केवळ वाईट नव्हे) पायाभूत सुविधा, हा माझ्या लेखाचा विषय आहे. ही काही एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवाद्यांचा हल्ला किंवा सायबर-हल्ला नव्हता, ज्यामुळे विमान कंपनीला त्यांच्या विमानांचे उड्डाण करता आले नाही (तेसुद्धा बाजारावर त्यांचा जवळपास एकाधिकार असताना) व प्रवासाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अशी आपत्ती आली तर काही पर्यायी तरतूद करण्यात आलेली नव्हती. हा मनुष्यनिर्मिती गोंधळ होता व तो टाळण्यासाठी कोणतीही निरीक्षण यंत्रणा नव्हती, हा माझ्या लेखाचा विषय आहे.
इंडिगोने, डीजीसीएने घालून दिलेल्या विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन करून गोंधळ घातला, इतर विमान कंपन्यांनी या परिस्थितीत त्यांचे भाडेदर वाढवल्यामुळे तिकीटांचे दर गगनाला भिडले. परंतु अशावेळी विमानतळावरील पायाभूत सुविधांचे काय, त्याहीपेक्षा जर एखादी विमान कंपनी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहचवू शकत नसेल तर त्यांच्यासाठी प्रवासाचे इतर काहीही साधन उपलब्ध नव्हते, हे खरे अपयश आहे किंवा गोंधळाचे खरे कारण आहे ज्यासाठी या देशातील आधीची सर्व सरकारे व सध्याचे सरकार जबाबदार आहे, हे माझ्या लेखाचे कारण आहे.
त्याचप्रमाणे ही संपूर्ण परिस्थिती ज्याप्रकारे हाताळली गेली, पहिले चार दिवस कुणीही ज्येष्ठ मंत्री किंवा सरकारी अधिकाऱ्याने काही समस्या आहे याची साधी दखलही घेतली नाही. का, कारण जे लोक विविध ठिकाणी अडकून पडले होते ते तथाकथित उच्चभ्रू वर्गातले होते, कारण विमानप्रवास आजही उच्चभ्रू वर्गासाठीच आहे. ते कुठल्याही राजकीय पक्षाची मतपेटी नाहीत, हे त्यामागचे मुख्य कारण होते व मी हे पूर्णपणे तर्कसंगतपणे बोलतोय मीसुद्धा त्याच वर्गाचा एक भाग आहे म्हणून नव्हे. साधारण तीस एक वर्षांपूर्वी जेव्हा मी तरूण होतो तेव्हा विमान प्रवास हा केवळ अति-श्रीमंत वर्गापुरताच मर्यादित होता. परंतु नोकऱ्या (व शिक्षण) केवळ काही महानगरे किंवा शहरांमध्येच केंद्रित झाल्यामुळे व मध्यम व उच्च मध्यम वर्ग या ठिकाणी स्थायिक झाल्यामुळे, या वर्गासाठी विमानाने प्रवास करणे एक आवश्यकता झाली. सरकार छट पूजा किंवा देशाच्या काही भागामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी जर मोफत बस, रेल्वे गाड्या पाठवू शकते तर या वेळेस इथेही तसेच का करण्यात आले नाही. हे लोक केवळ तुमची मतपेटी नाही म्हणून? किंबहुना, इंडिगोने आपल्या देशातील मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांसाठी विमान प्रवास शक्य केला. मी पुन्हा हे विधान अतिशय तर्कसंगतपणे करतोय, त्याआधी सरकारने स्वतःच्या विमानप्रवास कंपनीच्याबाबतीत (एअर इंडिया) काय केले ते पाहा, हा प्रश्न स्वतःला विचारा. आज अगदी विरोधी पक्षही सरकारला इंडिगोच्या एकाधिकारशाहीवरून धारेवर धरताहेत. पण हा व्यवसाय आहे व सरकारने सेवा पुरवठादार म्हणून काम करणे अपेक्षित नाही, तर सेवा पुरवठादारांना सुविधा पुरवण्याचे काम त्यांनी केले पाहिजे. सरकार हे करण्यात अपयशी ठरले म्हणून इंडिगोची एकाधिकारशाही निर्माण झाली व त्यात काहीही लाज वाटण्यासारखे किंवा चूक काही नाही. कोणत्याही सेवा व्यवसायाप्रमाणे हवाई वाहतूक हीदेखील एक सेवा आहे. ग्राहकांना जी कंपनी उत्तम सेवा देऊ शकेल असे वाटते तिच्याकडे ते जातील, जी सेवा इंडिगो गेल्या आठवड्यापर्यंत देत होती ही वस्तुस्थिती आहे. सरकार प्रवासाची समांतर माध्यमे उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्यामुळे, अधिकाधिक लोक विमान प्रवासावर (म्हणजे इंडिगोवर) अवलंबून राहू लागले. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग. तो अस्तित्वात येण्यापूर्वी या दोन्ही शहरांमधले अंतर जेमतेम १५० किलोमीटर असूनही चार विमाने होती, कारण रेल्वेच्या वेळा व रस्त्याने प्रवास करणे त्रासदायक होते. परंतु द्रुतगती महामार्ग अस्तित्वात आल्यानंतर जेमतेम वीस वर्षात आज रोजी मुंबई व पुणे या दोन्ही शहरांदरम्यान एकही विमान उड्डाण होत नाही. तुम्ही लोकांना प्रवासासाठी योग्य पर्याय उपलब्ध करून दिला तर लोक तो निवडतात याचे हे उत्तम उदाहरण आहे. इंडिगोच्या गोंधळावरून सरकारने हा धडा घेतला पाहिजे (अशी आशा करू). आणखी एक उदाहरण म्हणजे पुणे ते नागपूरचे. मी जेव्हा चार दशकांपूर्वी पुण्यात आलो तेव्हा या दोन्ही शहरांदरम्यान तीन ट्रेन व राज्य वाहतूक मंडळाच्या सहा बस होत्या व तेवढे पुरेसे होते. कारण विमानाने प्रवास आमच्या आवाक्याबाहेरचा होता. परंतु आज दररोज ३०,००० हून अधिक लोक या दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करताहेत ज्यामध्ये ८०० किलोमीटरचे अंतर आहे. त्याचप्रमाणे निम्म्या अंतरासाठी समृद्धी द्रुतगती महामार्ग आहे, पण अजूनही त्यावर राज्य वाहतूक मंडळाच्या तेवढ्याच बस धावतात. या दोन्ही शहरांदरम्यान केवळ सात ट्रेन आहेत व या मार्गावर तुम्हाला लगेच ट्रेनचे तिकीट हवे असेल तर वर्षातील कोणत्याही दिवशी ते मिळत नाही. अशावेळी लोकांकडे खाजगी बसेस वा टॅक्सी वा विमान प्रवासाशिवाय म्हणजे इंडिगोशिवाय पर्याय नसतो. याच एकाधिकारामुळे इंडिगो त्यांच्या पुणे ते नागपूर विमानासाठी पहाटे 5 वाजता सारखी विचित्र वेळ नियोजित करू शकते. यामुळे वन्यजीवन पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या प्रवासावरही थेट परिणाम होतो, कारण ते ताडोबा किंवा उमरेड कऱ्हांडला अभयारण्यामध्ये सकाळी 8 ला पोहोचतात व तिथे हॉटेल चेकइन ची वेळ दुपारी 2 ची असते. त्याचप्रमाणे खाजगी वाहनाने नागपूरहून या ठिकाणांपर्यंत येण्याच्या खर्चाची त्यात भर पडते, यामुळे या ठिकाणचे वन्यजीव पर्यटन अधिक महाग होते. मान्य आहे, यासाठी इंडिगो जबाबदार नाही, पण सरकार निश्चितच जबाबदार आहे. कारण केवळ रस्ते बांधून समस्या सुटत नाहीत, तर आपल्याकडे एखादी केंद्रीयकृत रस्ते वाहतूक कंपनी हवी, जशी अमेरिकेमध्ये ग्रेहाउंड्स आहे, त्यांची सेवा वेगवान व सुरक्षित आहे व ते प्रवाशांना बहुतेक गंतव्यस्थानी किंवा जवळपासपास थेट पोहोचवतात. यामुळे वेळ, पैसा व जीव वाचतात, हेच मला सांगायचे होते. त्याचप्रमाणे आपण आणखी ट्रेन किंवा सध्याच्या रेल्वे मार्गाचा परिणामकारक वापर करणे आवश्यक आहे, याचे कारण म्हणजे इंडिगोचा गोंधळ सुरू झाल्यानंतर चार दिवसांनी रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केले की रेल्वे काही मार्गांवर आणखी ट्रेन देईल. पण तुम्ही हे वर्षभर का करू शकत नाही, म्हणजे लोकांना केवळ एखाद्या विमान कंपनीवर अवलंबून राहावे लागणार नाही, असा माझा सरकारला प्रश्न आहे. त्याचशिवाय लोकांनीही, लाडकी बहीण योजनेसारख्या मोफत योजनांसाठी मते देण्याऐवजी, पायाभूत सुविधांसाठी मते द्यावीत. तुमचा आवाज योग्य कारणासाठी उठवा, केवळ एखाद्या विमानकंपनीच्या असाहाय्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरून काही होणार नाही. असे केले तर तुमच्या समस्या कायमस्वरूपी सोडवल्या जातील (म्हणजे घरासंदर्भातील)!
यात कहर म्हणजे टाईम्स ऑफ इंडियाचे संपादकीय ज्यात इंडिगोने बेधडकपणे नियमांचे उल्लंघन केल्याची तुलना रिअल इस्टेटमधील बांधकाम व्यावसायिकांशी करण्यात आली होती. खरोखरच रिअल इस्टेट उद्योगाने स्वतःची काय प्रतिमा तयार करून घेतली आहे, याचे सुद्धा थोडे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. याची कारणे कोणतीही असली तरीही माध्यमांचे व जनतेचे आपल्याविषयी हे मत आहे. शेवटची परंतु महत्त्वाची समस्या म्हणजे 150 कोटींची लोकसंख्या. आपण लोकसंख्या वाढीच्या वेगाला आळा घातला नाही, तर अगदी देवही आपल्याला पुरेशा पायाभूत सुविधा देऊ शकणार नाही, याकडे आपण काणाडोळा करत आहोत. तोपर्यंत तरी इंडिगो प्रकरणामुळे झालेल्या गोंधळाने आपले डोळे उघडले पाहिजेत किंवा आपण धडा घेतला पाहिजे व आपल्या रस्त्यांचे तसेच रेल्वे वाहतुकीसारख्या सार्वजनिक वाहतूक प्रणालीला अधिक सशक्त केले पाहिजे. यामुळे लोकांचा विमान प्रवासावर खर्च होणारा पैसा वाचेल तसेच लोकांचे जीवही वाचतील, कारण आपल्या देशात दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास दोन लाख लोकांचा मृत्यू होतो व त्यापैकी बहुतेक लहान व खाजगी वाहने असतात. म्हणूनच, 150 कोटी लोकसंख्येच्या देशाला एकाच फटक्यात एवढा महत्त्वाचा धडा शिकवल्याबद्दल इंडिगोचे आभार! अर्थात आपण खरोखरच धडा घेतला किंवा नाही हे काळच ठरवेल. तोपर्यंत, बाकी सब फर्स्टक्लास है, कसमसे... (कृपया गूगल करा)!
संजय देशपांडे www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in










टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा