ग्रोइंग-अप; अब तक 57..!!


































 ग्रोइंग-अप; अब तक 57..!!


“मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात तक्रार करणे व कारणे देणे थांबवता; तुम्हाला जाणीव होते की तुमच्या आयुष्यात जे काही होते ते तुम्ही आधी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आहे व तुमचे आयुष्य बदलण्यासाठी नवीन निर्णय घेण्यास सुरुवात करता.”

― रॉय टी. बेनेट.


“तुम्ही कोण आहात याचा शोध लावणे हे आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान आहे, दुसरे आव्हान म्हणजे तुम्हाला जे काही समजले आहे त्यात आनंद मानणे.”

― ऑस्कर ऑलिक-आईस.


“मोठे होणे म्हणजे तुमच्या कृतींमधील उद्दिष्ट शोधण्याची क्षमता”.- मी.


प्रिय दादा व छोटा,

आणखी एक वर्ष सरत आलेय व नवीन वर्ष येऊ घातलेय, तुम्ही त्याकडे कसे पाहता यावर ते अवलंबून आहे. माझा वाढदिवसही याच महिन्यात असतो त्यामुळे मी या महिन्याकडे नवीन सुरुवात म्हणून व तुम्हाला माझे वार्षिक बोधामृत पाजण्याची एक संधी म्हणून पाहतो. हो पहिलेच सांगतो, मी तुमचा खुप आभारी आहे, कारण मी जे काही वार्षिक ग्यान सांगतो ते तुमच्यापेक्षाही जास्त माझ्या स्वतःसाठी असते. विशेषतः ज्याप्रकारे सरते वर्ष गेले , मी आता जरा आणखी जास्त आत्मपरीक्षण करू लागलो आहे (अनेकांना कदाचित विश्वास बसणार नाही पण मी ते अनेक वर्षे करतोय) व मी या वर्षातून हेच शिकलोय. या गोष्टीचा परिणाम माझ्या जंगलातील अलिकडच्या भटकंतीवरही जाणवला, कारण जेव्हा मला एखाद्या क्षणी चांगली छायाचित्रे मिळाली नाहीत व माझा नवीन कॅमेरा कसे काम करतो हे न समजल्यामुळे काही छायाचित्रे काढायची राहून गेली तरीही, मी स्वतःला समजावले, मला जंगलात यायला आवडते म्हणून मी इथे आलो आहे. या क्षणांचा आनंद घेण्याऐवजी जर माझे कोणते छायाचित्र काढायचे राहून गेले असा विचार मी केला तर मी जंगलातून काहीच शिकलो नाही. जंगलामध्ये प्रत्येक गोष्ट काही हेतूने घडते व प्रत्येक प्राण्याला, झाडा-झुडुपांना, अगदी कीटकांनाही त्यांच्या कृतीमागचा हेतू समजलेला असतो. इथे मी स्वतःला सर्वात प्रगल्भ प्रजाती  म्हणवून घेतो, मी स्वतःला शहाणा (थोडासा) समजतो तरीही मी जंगलामध्ये जाण्याचा मूळ हेतूच विसरून गेलो होतो. तो हेतू काहीही असला तरीही, जंगलात जाऊन काही भारी छायाचित्रे काढणे एवढाच निश्चितच नाही, तो त्याहीपेक्षा बराच अधिक आहे. त्याचक्षणी मी स्वतःच्याच श्रीमुखात लगावली (म्हणजे मनातल्या मनात) व मला आता जंगलातल्या त्या काही क्षणांची छायाचित्रे काढणे राहून गेले म्हणून त्याचा कोणताही खेद वाटत नाही किंवा मी वैतागत नाही. अर्थात याचा अर्थ असा होत नाही की माझ्यामध्ये सुधारणाच होणार नाही किंवा कॅमेऱ्याविषयी शिकता येणार नाही किंवा असे क्षण पुढील वेळेस टिपणार नाही! हीच तर खरी गंमत आहे, म्हणजे भूतकाळाचा विचार सोडून द्यायचा किंवा त्याविषयी दुःख करत बसायचे नाही याचा अर्थ तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करणे थांबवता असा होत नाही, असे झाले असते तर तुम्ही एक मशीन झाला असता. तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या अपेक्षांचे ओझे होऊ देऊ नका किंवा ते घेऊन पुढे वाटचाल करू नका व तुम्ही जे काही करत आहात त्यातून आनंद मिळवा. मला माहितीय हे अतिशय अवघड आहे परंतु आता आयुष्यातल्या गोष्टी डिस्नेच्या परिकथांमधून समजावून सांगायला तुम्ही लहान नाही. असे असले तरीही तुम्ही तुमच्यातील ते लहान मूल जपून ठेवावे व त्याचा नेहमी आदर करावा, हीदेखील पुन्हा एक अवघड गोष्ट आहे!

दादा व छोटा, याचा अर्थ असा होतो की, आयुष्य म्हणजे समतोल साधणे व अगदी एखाद्या लहान मुलालाही ते करावेच लागते, ते मूल अर्थातच त्याच्या पद्धतीने करते. पण आपण जसे मोठे होतो, सतत हा समतोल साधण्याचे आपल्याला ओझे वाटू लागते ज्यामुळे आपल्यावर ताण येतो. मी तुम्हाला हे सांगण्याचे करण म्हणजे तुमच्या पिढीला जास्त समतोल साधावा लागतोय. याचे कारण म्हणजे तुमच्याकडे आयुष्याकडुन अपेक्षा करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत कारण अनेक अपेक्षा करणे तुम्हाला परवडते. माझी पिढी सुदैवी होती कारण आम्हाला आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा अतिशय मर्यादित होत्या, जे तुमच्याबाबतीत नाही, तसेच ते आता आमच्या पिढीच्या बाबतीही राहिलेले नाही कारण हव्यास किंवा हाव किंवा लोभ हा आपला मूळ स्वभाव आहे. उदाहरणार्थ, आपल्याला वॅगन-आर (या कारमध्ये काहीही वाईट नाही, केवळ एक उदाहरण म्हणून दिले आहे) खरेदी करता आली की, आपल्याला होंडा सिटी खरेदी करण्याचे वेध लागतात व अशाप्रकारे अपेक्षा वाढतच जातात. हे मी अगदी जंगलाच्या बाबतीतही अनुभवले आहे, आपल्याला एक वाघ दिसताच नंतर एकाचवेळी दोन वाघ पाहण्याचे वेध लागतात. मग आपल्याला ते वाघ समोरून चालत येताना पाहायचे असतात. जेव्हा आपल्याला दोन वाघ एकत्र समोरून चालत येताना दिसतात तेव्हा त्यांच्यामागे कोणतेही वाहन नसावे व आपल्याला स्पष्ट छायाचित्र मिळावे अशी आपली इच्छा असते, ते मिळाले नाही तर आपण वैतागतो व या प्रक्रियेमध्ये आपण एक वाघ दिसल्याचा आनंदही गमावून बसतो, ही मला या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेली जाणीव आहे. तुमच्या पिढीने जेव्हा आयुष्य जगायला सुरुवात केली तेव्हापासूनच अनेक गोष्टींची अपेक्षा न करताही त्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळेच एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर तुम्ही अतिशय लवकर व कायम वैतागू शकता, असा इशारा मला या लेखातून तुम्हाला द्यायचा आहे. म्हणूनच मी जेव्हा वैतागतो तेव्हा मी ते कसे हाताळतो हे मी तुम्हाला सांगणार आहे, हे तुमच्यासाठी धावपट्टीवरील मार्गदर्शक दिवे म्हणून काम करेल (म्हणजे कदाचित). अर्थात ज्या माणसाने डोळे बंद केले आहेत त्याला तुम्ही प्रकाश दाखवू शकत नाही (वैधानिक इशारा, lol).

पुढील आव्हानांविषयी बोलायचे झाले, व्यवसाय व नोकरी यातील मूलभूत फरक म्हणजे व्यवसातील एक चुकीचे पाऊल तुम्ही याआधी टाकलेली सर्व बरोबर पावले उध्वस्त करून टाकू शकते, जे नोकरीमध्ये होण्याची शक्यता नसते. तसंच जबाबदारी घेण्याविषयी बोलायचे झाले, तर मी स्वतः कधीही स्वतःसाठी काम करणे व इतरांसाठी काम करणे यात फरक केलेला नाही, कारण मी कुठेही काम केले तरीही ते काम हे माझंच काम आहे असंच  समजुन केलाय व या वर्षी माझा हा विश्वास अधिकच बळकट झाला. तुम्ही विचारात पडला असाल व तुम्हाला माझे अगदी लहान-सहान गोष्टींमध्ये अतिशय  कडकपणे वागणे अजिबात आवडत नसेल. पण एक लक्षात ठेवा, दिवस बदलताहेत (किंबहुना बदलले आहेत), पहिला अडथळा म्हणजे तुम्हाला असे लोक मिळणार नाहीत जे त्यांना देण्यात आलेले काम त्यांचे स्वतःचे आहे असे समजून तुमच्यासोबत काम करतील व दुसरे म्हणजे तुमच्याप्रमाणेच लोकांच्याही तुमच्याकडून सेवा पुरवठादार (service provider) म्हणून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत, कारण त्यांना तशी अपेक्षा करणे परवडू शकते. रिअल इस्टेट हे आता केवळ काही लोकांची मक्तेदारी असलेले क्षेत्र राहिलेले नाही (ते आजही काही भागात आहे परंतु त्याची किम्मतपणमोजावी लागते) व लोकांकडे पर्याय आहेत व पैसाही आहे. म्हणूनच तुमचे उत्पादन (ज्यामध्ये तुमच्या सेवेचाही समावेश होतो) खरेदी करण्यायोग्य आहे असे तुम्हाला वाटत नाही, तोपर्यंत ते खरेदी करणार नाहीत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही एकशे एक टक्के बरोबर व सुसज्ज असले पाहिजे, मी परफेक्ट असे म्हणत नाही हे लक्षात ठेवा. नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे व धोका वाढला आहे व या आव्हानांना तोंड देण्यासाठी शिस्त ही एकमेव उपाययोजना आहे व त्यासाठी कामाची एक सुनियोजित व्यवस्था असणे आवश्यक आहे. मी सुदैवी होतो कारण मला माझ्या वडिलांकडून शिस्तीचे बाळकडू मिळाले अर्थात ते असे उपदेशाचे डोस पाजत नसत. तरीही आज वयाच्या 90व्या वर्षी ते जसे आहेत त्याचे कारण म्हणजे ते आत्तापर्यंतचे आयुष्य अतिशय शिस्तबद्धपणे जगले. हेच आजीलाही लागू होते, तिला ही सतत नीटनेटकेपणा व स्वच्छतेचा ध्यास असतो, ही सुद्धा एकप्रकारची शिस्तच आहे. या शिस्तीमुळे आजोबा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू शकले आहेत, जे अतिशय महत्त्वाचे आहे. व्यवसाय किंवा कामापेक्षाही आर्थिक सुदृढता हीदेखील शिस्तीचाच परिपाक आहे. मी यावर्षी आयुष्यातील शिस्तीच्या या धड्याची पुन्हा एकदा उजळणी केली कारण आपल्या मनालाही त्याच्या आरोग्यासाठी शिस्तीची गरज असते. अनेकांना मनाच्या आरोग्याचे महत्त्व समजणार नाही परंतु यावर्षी घेतलेला सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे मी माझे मन सुदृढ ठेवू शकलो तरच मी माझ्या शरीराला शिस्त लावण्यासाठी व माझ्या कामासाठी त्याचा अधिक चांगल्याप्रकारे वापर करू शकेन व मी पुढे यावरच लक्ष केंद्रित करणार आहे. मनाच्या आरोग्यासाठी मी काही गोष्टींचा सराव करणे आवश्यक आहे, कारण शिस्त ही सरावातूनच येते व एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीच्या हेतूवर लक्ष केंद्रित करणे, मग ते एखाद्या प्रकल्पाचे नियोजन करणे असो, लोकांना हाताळणे असो किंवा जंगलामध्ये भटकंती असो, मी माझ्या हेतूवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, की मी हे का करत आहे. कारण तसे झाले तरच मी माझे मन अधिक सुदृढ बनवू शकेन, हे मी यावर्षी स्वतःसाठी शिकलो आहे.

नेहमीप्रमाणे मी जे काही शिकलो त्यातले महत्त्वाचे दहा मुद्दे तुमच्यासाठी देत आहे …


1. तुमच्या अपयशाची स्वतः जबाबदारी घ्यायला व यशाचे श्रेय दुसर्‍यांना द्यायला शिका.

2. मागे वळून जरूर पाहा, परंतु कधीही विसरू नका की प्रवास हा नेहमी पुढे करायचा असतो, मागे नव्हे.

3. अंगी शिस्त बाणवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, रोज सराव करा.(प्रॅक्टिस)

4. आपल्या चुकांचा पश्चात्ताप होणे चांगले आहे, परंतु तुम्ही त्या दुरुस्त करण्यासाठी कोणती पावले उचलता ते अधिक मह्त्त्वाचे आहे.

5. कोणतीही चूक खर्‍या अर्थाने दुरुस्त करता येत नाही, कारण एकदा हातातून निसटलेली वेळ पुन्हा येत नाही, त्यामुळे या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याकडे लक्ष द्या.

6. तुम्हाला चुकांची भीती वाटणे गैर नाही परंतु कधीही त्यांची जबाबदारी घेण्यास कचरू नका.

7. आयुष्यात सर्वोत्तम गोष्टी मिळण्याची अपेक्षा जरूर करा, पण तुम्हाला त्या स्वतःलाच कमवाव्या लागतील हे विसरू नका.

8. ज्या लोकांनी तुम्हाला तुमच्या अपेक्षांची पूर्तता करण्यास मदत केली आहे त्यांचे सदैव ऋणी राहा व त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा, मग ती मदत कितीही छोटी का असेना.

9. तुम्हाला संपत्ती तीन स्वरूपात मिळते, ते म्हणजे पैसा, आरोग्य व ज्ञान; जर तुम्ही तुमच्या संपत्तीची काळजी घेतली नाही तर इतर ती घेतील अशी अपेक्षा करू नका.

10. तुम्ही जे नाही, ते कधीही बनण्याचा प्रयत्न करू नका, कारण तेच दुःखाचे मुख्य कारण असते. म्हणजे सुधारणा करणे थांबवा असा याचा अर्थ होत नाही (अर्थात, त्यासाठी आधी तुम्ही काय आहात हे तुम्ही समजून घेणे महत्त्वाचे आहे, ज्यासाठी मी अजूनही प्रयत्न करतो, पण मी किमान त्या मार्गावर वाटचाल तरी करतोय, lol).


थोडे वैयक्तिक सांगायचे तर, तुम्ही दोघे अगदी लहान असताना (म्हणजे वयाने), मी माझ्या कामातच बिझी होतो , म्हणुन मी आपल्या एकत्रपणाचे  ते क्षण काही फार अनुभवू शकलो नाही व आता माझ्याकडे वेळ असताना, तुमचा तुमच्या आयुष्याच्या मार्गावरील प्रवास सुरू झाला आहे. तरीही, तुम्ही माझ्यासाठी नेहमी  लहानच राहाल आणि मी माझ्यापरीने तुमच्यासाठी जे थोडेफार करता येईल ते करत राहीन. तुम्हा दोघांचे तसेच केतकी, निखिल, रोहित एम, श्रुती, तनिषा, सिया, राकेश व पॉलोमी या समस्त तरुण वर्गाचे मनःपूर्वक आभार. अर्थात तुमच्यापैकी बऱ्याच जणांशी माझी आजकाल क्वचितच भेट होते, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात व्यग्र आहात. तरीही तुम्ही सगळे अवतीभोवती असताना 57 वय ही सुद्धा माझ्यासाठी  लहान संख्या वाटते हे मी कायम मान्य करतो. शेवटचा, परंतु महत्त्वाचा नेहमीचा एंड म्हणजे, “दया दाखवायला लाजू नका, चुकीच्या  विरुद्ध  ठामपणे उभे राहायला  घाबरू  नका,  (be kind, have courage) व त्यानंतर काय जादू होते ते पाहा”. याच वर्षी मला आणखी एक शोध लागला की (मला हे याआधी कसे माहिती नव्हते याचे आश्चर्य वाटते), वॉल्ट डिस्ने यांचा जन्मही डिसेंबरमधलाच होता, अर्थात त्याने काही फरक पडत नाही कारण माझा संख्याशास्त्रावर फार विश्वास नाही. तरीही माझा आणि त्यांचा वाढदिवस एकाच महिन्यातला आहे हे जाणून आनंद झाला. असो, तुम्ही हा लेख वाचलात, त्यावर विचार केलात व त्यानुसार कृती केलीत तर (म्हणजे योग्य ती सुधारणा केली किंवा बदल केलेत) मला वाढदिवसाची भेट मिळाल्यासारखे वाटेल. आणि तुम्ही मला ही भेट पाठवली आहे किंवा नाही हे मला कोणतीही पोहोचपावती किंवा ओटीपी क्रमांकाशिवायच कळेल!


बाबा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!