हनी बॅजर, जंगल आणि जीवनाचे धडे..!🐾
हनी बॅजर, जंगल आणि जीवनाचे धडे..!🐾
आपल्यापैकी प्रत्येकजण स्वतःच्या मार्गानेच जगत असतो.”― सारा जे मास.
निष्पापपणा हा एकप्रकारचा वेडेपणा असतो― ग्राहम ग्रीन.
मूर्ख माणसाला तो शहाणा आहे असे वाटते, परंतु शहाणा माणूस स्वतःला मूर्ख समजतो.
― विल्यम शेक्सपिअर.
सारा जेनेट मास या अमेरिकी काल्पनिक कथांच्या लेखिका असून त्या थ्रोन ऑफ ग्लास, अ कोर्ट ऑफ थॉर्न्स अँड रोझेस, व क्रेसेंट सिटी या मालिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या पुस्तकांच्या २०२४ पर्यंत ७५ दशलक्ष प्रति विकल्या गेल्या होत्या व त्यांच्या साहित्याचा ४० भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. हेन्री ग्राहम ग्रीन हे इंग्लिश लेखक व पत्रकार असून, अनेक जण त्यांना २०व्या शतकातील आघाडीचे कादंबरीकार मानतात. तिसरे नाव म्हणजे श्री.शेक्सपिअर, तर त्यांच्याविषयी कृपया गूगल करा कारण इंग्रजी थोडेतरी येत असलेल्या वाचकांना हे नाव माहित असायलाच हवे. तुम्ही हा लेख वाचायला सुरुवात केली असेल परंतु तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती नसेल तर माझ्याकडून साष्टांग नमस्कार! असो, जंगलाविषयी बोलायचे झाले तर वन्यजीवन हा त्याचा एक भाग आहे (आणि ताडोबासुद्धा, lol). परंतु हा लेख वन्यजीवन किती सुंदर आहे व आपण वन्यजीवन का वाचवले पाहिजे, वगैरे, वगैरेविषयी नाही...(माफ करा, हे ज्यांना वन्यजीवनाविषयी सतत वाचायला आवडत नाही त्यांच्यासाठी आहे). तर हा लेख जंगल आपल्याला ज्या गोष्टी शिकवते (म्हणजे मला शिकवल्या) व त्याच्या शिकवण्याच्या पद्धतींविषयी आहे. मित्रांनो, सौंदर्य, साहस व संवर्धन इत्यादींव्यतिरिक्त तुमच्या बालपणीच्या काळाची सफर केली तर त्यातील सर्वोत्तम गोष्टी इसापनीती व पंचतंत्रातील होत्या. तुम्ही हे वाचले नसेल (तर देवा अशा लोकांना कृपया माफ कर, कारण ते काय पाप करत आहेत त्यांचे त्यांनाच माहिती नाही lol), तर कृपा करून ते आता वाचा, कारण ज्ञान मिळवण्यासाठी वयाचा निकष कधीच नसतो. तर, या कथा ज्यांनी वाचल्या आहेत त्यांनी सांगावे की या सर्व गोष्टींची प्रमुख पात्र कोण होती, तर ते माणुस नव्हे तर प्राणी होते व बहुतेक तर वन्यप्राणी होते. माझे चुकत नसेल तर पंचतंत्र हे अनेक व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमांचा एक भागही आहे. तर जंगले, पंचतंत्रामध्ये एक समान धागा काय आहे, ते म्हणजे जगताना मिळणारी शिकवण जी जगण्याचा एक भाग आहे किंवा जगण्याचे उप-उत्पादन आहे, तसेच वन्यप्राणी व ते आपल्याला त्यांच्या वागणुकीतून काय शिकवतात. हुश्श, या लेखाचे सार काय आहे हे तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, आता पुढे वाचायचे किंवा नाही याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता.
अलिकडेच ताडोबामध्ये एका वाघीणीने एक चांदी अस्वलाला (हनी बॅजर) मारल्याची एक ध्वनी-चित्रफित व्हायरल झाली व ही अतिशय दुर्मिळ दृश्ये आहेत जी तुम्हाला अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतर (होय, दिवस किंवा महिने नव्हे तर वर्षे), तुमच्या दिमतीला स्वयंचलितपणे हालचाल टिपणारे कॅमेरे असतील तरच किंवा अशी दृश्ये पाहायला मिळण्याइतके तुमचे नशीब जोरदार असेल तर पाहायला मिळतात. या संदर्भात काही पर्यटकांचे नशीब जोरदार होते कारण त्यांना केवळ ती नाट्यमय घटना पाहताच आली नाही तर त्याचे छायाचित्रणही करता आल्यामुळे आपणही नशीबवान ठरलो. ताडोबाच्या बफर क्षेत्रामध्ये, एक चांदी अस्वल छोटी मधू नावाच्या वाघीणीच्या मध्यम वाढ झालेल्या बछड्यांसमोर आले. या घटनेचा शेवट वाघीणीने चांदी अस्वलाला मारण्यात झाला असला तरीही त्या विडिओ क्लिप मधून बछड्यांनी चांदी अस्वल दिसल्यानंतर कशी प्रतिक्रिया दिली व त्याचीही काय प्रतिक्रिया होती हे दिसते. बिचारे चांदी अस्वल असे लिहावे असे माझ्या मनात आले परंतु नंतर जंगलामध्ये बिचारे किंवा नशीब किंवा दुर्दैव अशी कुठलीही गोष्ट नसते, तुम्ही जगण्यासाठी काय शिकला आहात तर तुम्ही जे शिकला आहात त्याचा वापर जिवंत राहण्यासाठी तुम्ही कसा करता हेच महत्त्वाचे असते. ही ज्ञानाची व्यवहार्य बाजू झाली परंतु आपण सजीव आहोत व आपल्याला भावना आहेत. मीसुद्धा त्याला अपवाद नाही, मी मान्य करते की मला ही ध्वनी-चित्रफित पाहताना वाईट वाटले व चांदी अस्वल ज्याप्रकारे वाघाला सामोरे गेले ते पाहून मी मूकपणे रडलोही. मी स्वतःला कणखर, कठोर व्यक्ती मानतो, तरीही मला दुसऱ्यांदा ती क्लिप पाहण्याची हिम्मत करता आली नाही. ती केवळ एकदाच पाहून मला जगण्याविषयी कितीतरी गोष्टी जाणवल्या, ज्या अशा इतर काही घटनांसोबत मला सांगायच्या होत्या, ज्या मी स्वतः जंगलामध्ये अनुभवल्या आहेत व त्यातून मला खरोखरच काही अतिशय महत्त्वाचे धडे मिळाले आहेत. असे काही धडे आहेत जे आपण एकूणच स्वीकारले पाहिजेत किंवा एखादे दिवशी आपल्याला स्वतःच्या अज्ञानातून काहीही न शिकल्यामुळे भोगावे लागेल, हे माझ्या लेखाचे सार आहे.
ठीक आहे, तर आता चांदी अस्वलाविषयी, मला खात्री आहे की फारशा लोकांनी ते प्रत्यक्षात पाहिले नसावे जे आकाराने लहान पगएवढे (कुत्र्याची एक प्रजाती जी तुम्ही व्होडाफोनच्या जाहिरातीत पाहिलेल्या कुत्र्याएवढी असते) असते. त्याची त्वचा जाड असते परंतु त्याची उंची जेमतेम नऊ ते दहा इंच असते जी मध्यम वयातील वाघाच्या बछड्याच्या एक चतुर्थांश उंचीएवढीही नसते. चांदी अस्वल हा निशाचर प्राणी आहे व माझ्या माहितीप्रमाणे दिवसाच्या प्रकाशात त्याला नीट दिसतही नाही, ते नेहमी अंधारातच फिरत असते. याच कारणामुळे जंगलात ते क्वचित दृष्टीस पडते. तर, हे चांदी अस्वल दिवसा बाहेर पडलेले होते, त्यामुळे त्याला जवळपास काहीच दिसत नसावे किंवा कुठे जायचे याची त्याला कल्पना नसावी. वाघाच्या बछड्यांनी जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ते देखील हे नेमके काय आहे म्हणून गोंधळात पडले व त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून होते. चांदी अस्वलाला त्यांचा वास आला असावा व तो आक्रमक प्राणी आहे व ते बछड्यांपैकी एकावर धावून गेले, परंतु आपण कुणावर झडप घालत आहोत हे त्याला दिसत नव्हते. आधी वाघाने एक पाऊल मागे घेतले व जेव्हा त्याला जाणीव झाली की चांदी अस्वल हे त्याच्यासाठी अजिबात धोकादायक नाही तेव्हा त्याने एका झटक्यात त्याला ठार केले व ही गोष्ट तिथेच संपली. मी जर चांदी अस्वल असतो तर यातून मला मिळालेला धडा म्हणजे माझ्यासाठी जे अनोळखी क्षेत्र म्हणजे उजेड आहे त्यात मी दिवसाढवळ्या शिरण्याचे धाडस करू नये. त्याचप्रमाणे जंगलामध्ये वाघ, बिबिटे किंवा जंगली कुत्रे यासारखे मोठी श्वापदे असतात तिथे मी खुले भाग टाळले पाहिजेत. चांदी अस्वल रस्त्यावर होते जेथे लपण्यासाठी अजिबात जागा नव्हती व त्यामुळे कुठल्याही हिंस्र प्राण्याने त्याची शिकार करणे सहज शक्य होते. त्याचप्रमाणे त्याला वाघासारखे त्याचे शत्रू ओळखण्याचे प्रशिक्षण मिळालेले नसते, कारण त्याची त्यांच्याशी कधी गाठच पडलेली नसते व हा अतिशय महत्त्वाचा धडा आहे. कारण तुम्हाला जेव्हा तुमचा शत्रू कोण आहे हे माहिती नसते तेव्हा तुम्हाला सर्वाधिक धोका असतो. म्हणूनच मला जर का या जगात टिकायचे असेल, तर मला माझे शत्रू पूर्णपणे ओळखता आले पाहिजे, तरच माझी अपघाताने जरी शत्रूशी गाठ पडली तरी मी योग्य रणनीती अवलंबू शकेन, हे चांदी अस्वलाने मला शिकवले आहे. चांदी अस्वल वाघाला अजिबात ओळखत नव्हते तरीही त्याने त्याच्यावर आधी झेप घेण्याचा प्रयत्न केला. त्याची दृष्टी व उंची मर्यादित असल्याने ते संपूर्ण वाघाला पाहूही शकत नव्हते, त्यामुळे त्याने खरेतर एखादा आडोसा शोधून पळ काढायला हवा होता. वाघाने त्याला सोडून दिले असते कारण चांदी अस्वल म्हणजे काय हे वाघालाही माहिती नव्हते, हा आणखी एक घेण्यासारखा धडा आहे. ज्या शत्रूशी तुमची बरोबरी होऊच शकत नाही त्याला सामोरे जाण्याचे धाडस दाखवण्याऐवजी पळून जाण्यात व आणखी एक दिवस जास्त जगण्यात लाज वाटण्यासारखे काहीही नाही, बचाव यालाच म्हणतात. अर्थात त्या लहानशा चांदी अस्वलाने दात फिस्कारणे व वाघावर झडप घालणे व त्याला एक पाऊल मागे जायला लावणे ही दृश्ये माझ्या मनात बराच काळ रेंगाळत राहतील, कारण त्या दृश्याचा शेवट करूण होता. अर्थात जंगलामध्ये दुःख किंवा आनंद यासारखे काहीही नसते, केवळ धडा घ्यायचा आणि पुढे वाटचाल सुरू ठेवायची,तर त्या चांदी अस्वलाच्या आत्म्याला शांती मिळो!
या घटनेने मला पंचतंत्रातली आणखी एक गोष्ट आठवली, ज्यामध्ये एक काळवीट मुख्य पात्र आहे. त्याला त्याच्या भल्यामोठ्या व सुंदर शिंगांचा अतिशय अभिमान असतो व तो ती मिरवत असतो. ज्या काळविटांकडे अशी शिंगे नाहीत त्यांना चिडवत असतो. एके दिवशी एक वाघ जेव्हा काळविटांच्या कळपाचा पाठलाग करत असतो, तेव्हा सर्व काळविटे पळून जातात, या काळविटाला वेगाने पळता येत नाही कारण त्याच्या शिंगाचे वजन जास्त असते. त्यानंतर तो चुकीच्या दिशेने, घनदाट झाडीकडे धाव घेतो, तर इतर काळविटे खुल्या मैदानाकडे धाव घेतात. वाघ त्या काळविटाला सहजपणे पकडतो कारण त्याचा वेग इतरांपेक्षा कमी असतो व त्याची शिंगे झुडुपांमध्ये व वेलींमध्ये अडकतात, ज्यामुळे काळवीट अडकून पडते. हे काळवीट ज्या शिंगांचे आत्तापर्यंत सतत कौतुक करत असते त्यामुळेच त्याचा जीव धोक्यात आल्याबद्दल हरीण मरताना आपल्या शिंगाना दोष देते व इथेच ही गोष्ट संपते. पुन्हा एकदा, जगण्याचा आणखी एक धडा, तुम्ही काळवीट असाल तर फसव्या किंवा तुम्हाला प्रत्यक्ष काही उपयोग होण्यापेक्षा धोक्यात आणतील अशा केवळ दिखाऊ गोष्टींच्या मागे न धावता तुम्हाला जगण्यासाठी प्रत्यक्ष कोणती साधने आवश्यक आहेत हे समजून घ्या. याच कारणाने हरीण नेहमी जंगलांमधील खुले पट्टे किंवा कुरणांना प्राधान्य देतात, कारण जगण्यासाठी त्यांचे सर्वात मुख्य शस्त्र म्हणजे वासाची तीव्र जाणीव व वेग या दोन्ही साधनांचा दाट जंगलामध्ये काहीही उपयोग नसतो.
आणखी एका घटनेमध्ये, जेव्हा आम्ही सफारीवरून परतत होतो, तेव्हा एक धष्टपुष्ट रानडुक्कर, उंच गवताच्या कडेला उभे होते (ताडोबामध्ये) व माझ्या गाईडने मला विचारले, साहेब छायाचित्र घ्यायचे आहे का? परंतु आधीच उशीर होत होता त्यामुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला, आम्ही त्या रानडुकराला ओलांडून थोडेसे पुढे आलो होतो परंतु ते स्वतःमध्येच एवढे मग्न होते की आमच्या जिप्सीला जागा देण्यासाठी ते थोडेसेही हलले नाही. अचानक एका वाघीणीने, जी जवळपास गवतामध्ये दबा धरून बसलेली होती, रानडुकरावर झडप घातली, त्याला मानेपाशी पकडून खाली दाबून ठेवले व हळूहळू ठार केले. ते एक मोठे रानडुक्कर होते, आणि ती वाघीण गरोदर होती व सामान्य परिस्थितीत तिने एवढ्या अवाढव्य रानडुकरावर खुल्या जागामध्ये आपणहून हल्ला करण्याचे धाडस केले नसते. तिला त्याच्यावर पकड मिळवता आली नसती व दुसरे म्हणजे पूर्णपणे वाढ झालेला नर रानडुक्कर हा अतिशय सशक्त प्राणी असतो व शिकारीदरम्यान वाघीणीला गंभीर इजाही होऊ शकली असती, ज्याचा धोका तिने गरोदर असताना स्वीकारला नसता. केवळ रानडुक्कर सावध नसल्यामुळेच किंवा त्याला त्याच्या आकाराबद्दल व शक्तीबद्दल अतिआत्मविश्वास असल्यामुळेच किंवा वाघीणीकडून होणाऱ्या हल्ल्याची क्षमता व वेग याविषयी पूर्णपणे अज्ञानी असल्यामुळे, शेवटी परिणामी त्याला त्याच्या अतिआत्मविश्वासाची/अज्ञानाची किंमत मोजावी लागली. जंगलामध्ये तुम्हाला अशा चुकांसाठी केवळ एकच किंमत मोजावी लागते, ती म्हणजे मृत्यू. त्यादिवशी, मी वाघीणीने ज्याप्रकारे त्या रानडुकराची शिकार केली ते पाहून आणखी एक धडा शिकलो, खरेखुरे जंगल असो किंवा काँक्रिटचे जंगल कधीही बेसावध राहू नका. व्यवसायामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी, तुम्ही नेहमी सतर्क असले पाहिजे व तुम्हाला माहिती असले पाहिजे की धोका नेहमी अनपेक्षित दिशेने येतो, मग तो व्यवसाय असेल किंवा वन्यजीवन किंवा तुम्ही करत असलेले कोणतेही काम.
मला तुम्हाला सांगावेसे सांगावेसे वाटते की, जगण्याचा हा खेळ केवळ दुबळ्या किंवा सावज असलेल्या प्रजातींसाठी नसतो, कारण जंगलामध्ये कुणाही जगताना निर्माण होणाऱ्या धोक्यांना अपवाद नाही, अगदी वाघही या खेळातून सुटू शकत नाही व त्यालाही नेहमी सजग राहावे लागते. एखादा म्हणेल की, संपूर्ण जंगलामध्ये वाघ हे सर्वात मोठे व सर्वात शक्तीशाली श्वापद आहे. परंतु तुम्ही जेवढे अधिक शक्तीशाली तेवढे इतर तुमचा अधिक द्वेष करतात व इतरांकडून केला जाणारा हा द्वेष किंवा भीती (तुम्ही त्याला काहीही म्हणा) तुमच्या जगण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे. वाघांच्या बाबतीत बोलायचे झाले तर तो जिथे जाईल तिथे पक्षी असोत, हरिण किंवा माकडे, प्रत्येक प्राण्याला जेव्हा वाघ जवळपास असल्याची जाणीव होते किंवा तो त्याला पाहतो, तेव्हा तो संपूर्ण जंगलाला तिथे वाघ असल्याबद्दल इशारा देतो. वाघासाठी शिकारीतील म्हणजे अन्न मिळवण्यातील ही सर्वात मोठी अडचण आहे, जी थेट वाघाच्या जगण्याशी संबंधित आहे. म्हणूनच, वाघ कधीही, विशेषतः जेव्हा तो शिकारीला निघाला असेल तेव्हा विनाकारण डरकाळ्या फोडत नाही, त्याची ताकद दाखवत नाही. किंबहुना शिकारीला जाताना तो दबक्या पावलांनी जातो व त्याचे अस्तित्व कुणालाही जाणवू देत नाही, असे केले तरच तो त्याच्या शत्रूंकडून सावजाला इशारा न मिळता शिकार करू शकतो, बरोबर? यापेक्षा अधिक चांगला धडा कोणता असू शकतो, ज्याद्वारे तुमच्या तथाकथित यशाने किंवा श्रीमंतीने हुरळून न जाता, तुमच्या उद्दिष्टावर तुमचे लक्ष केंद्रित करून, विचलित न होता तुमच्या मोहिमेमध्ये यशस्वी कसे व्हायचे हे तुम्हाला शिकायला मिळते (रिअल इस्टेट व्यावसायिकांनो म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांनो लक्षात ठेवा, lol). त्याचशिवाय वाघाच्या बछडे पूर्णपणे वयात येत नाहीत तोपर्यंत त्यांना धोका असतो, यापूर्वी जंगली कुत्री, बिबटे किंवा अस्वलांनी लहान वाघांना ठार केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. हा देखील एक धडाच आहे, तुमचा जन्म भले अतिशय ख्यातनाम, प्रभावशाली कुटुंबात झाला असेल किंवा तुमच्यामध्ये अनेक गुण असतील. परंतु तुम्ही स्वतः जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या सुरक्षित क्षेत्राबाहेर इतरांच्या पाठिंब्यावर फार लांबपर्यंत जाऊ नका.
जंगलामध्ये तुम्हाला जगण्याचे अनेक प्रकार दिसून येतील, वाघासाठी त्याची शक्ती असणे हा देखील जगण्याचा एक मार्ग आहे, त्याचप्रमाणे सहजीवन म्हणजे इतर कुमकुवत प्राण्यांसोबत सौहार्दाने राहणे हा देखील जगण्याचाच एक मार्ग आहे. हे एखाद्या भागीदारी प्रकल्पासारखे किंवा इतर पक्षांसोबत मिळून ताकद वाढवण्यासारखे असते. उदाहरणार्थ लंगूर (माकडे) व ठिपकेदार हरिण, चितळ जमीनीवर चरत असताना, झाडावर बसून माकड भोवताली लक्ष ठेवून असते. ते लांबून येणाऱ्या वाघाला पाहते व चरत असलेल्या ठिपकेदार हरिणाला वाघाच्या आगमनाचा इशारा देऊ शकते. त्याचवेळी ठिपकेदार हरिणाला बिबट्या आजूबाजूला असल्याचा वास येऊ शकतो ज्याचा लपून राहण्यात किंवा छुपा हल्ला करण्यात हातखंडा असतो. ते जमीनीवर खात असलेल्या किंवा पाणी पीत असलेल्या बेसावध माकडाला इशारा देते. अशाप्रकारे या सावज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन्ही प्रजाती जगण्यासाठी एकमेकांना सहाय्य करतात. ही यंत्रणा आपण आपल्या काँक्रिटच्या जंगलातही आपल्या जीवनातील विविध आघाड्यांवर आपला अहंकार बाजूला ठेवून व आपल्या त्रुटी स्वीकारून वापरू शकतो.
सर्वात ठेवटचा व सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हव्यासावर नियंत्रण ठेवणे व केवळ गरजांनुसार किंवा आवश्यकतांनुसार जगणे. संपूर्ण वन्यजीवनात जगण्याचा हाच एक मार्ग आहे जो आपण माणसांनीही आत्मसात केला पाहिजे. तुम्ही कधीही वाघाने एकाचवेळी दहा किंवा बारा हरिणांची शिकार केली व पुढील महिन्यांसाठी ती साठवून ठेवली किंवा आपली जास्तीची शिकार इतर वाघांना विकली असे ऐकले आहे का? मला माहितीय, हे वाचून तुम्ही हसाल व म्हणाल की म्हणूनच ते प्राणी आहेत व आपण माणसे, अर्थात प्रगल्भ प्रजाती आहोत. परंतु माझ्यावर विश्वास ठेवा की म्हणूनच वाघ जगू शकतो(म्हणजे जोपर्यंत आपल्या जगण्याच्या पद्धतींनी आपण त्यांना मारायला सुरुवात करत नाही तोपर्यंत, जे आपण आजकाल करत आहोत), कारण आपले भविष्य सुरक्षित करण्याच्या हव्यासापोटी, आपण अक्षरशः प्रत्येक स्रोत नष्ट करत चाललो आहोत. आपण फटाके उडवण्यासारख्या गोष्टींनी आनंद साजरा करून आपले आयुष्य आणखी अंधकारमय करून घेण्याइतके कारण आपणच ज्या हवेत श्वास घेतो ती आणखी प्रदूषित करण्याइतके मूर्ख आहोत. आपल्या अशा मूर्खपाणाची यादी कधीही न संपणारी आहे. जंगलातील जगण्याच्या या खेळाचे निरीक्षण करून मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो आहे ती म्हणजे शिस्त. जंगलामध्ये सर्व काही वेळेशी निगडित आहे, म्हणजेच शिस्तबद्ध आहे. त्याचवेळी तुम्ही जेव्हा शिस्तबद्ध असता तेव्हा त्याचा असा अर्थ होतो की जगण्यासाठी एक यंत्रणा आहे ज्यामध्ये माणसांना अतिशय सवयीची झालेली सबब देण्यास, म्हणजेच, “मला असे वाटले” असे म्हणण्यास काहीही वाव नाही. जंगल असो किंवा शहरातील जीवन (म्हणजे काम म्हणून), गोष्टी तुमच्या वाटण्या नुसार वा भावनांनुसार काम करणार नाही तर तथ्यानुसार व तुम्ही ज्याप्रकारे त्यांना सामोरे जात आहात त्यानुसार काम करतील, ही गोष्ट तरुण पिढीने शिकली पाहिजे व आत्मसात केली पाहिजे.
मित्रांनो, खरेतर, हा पीएचडीचा विषय आहे (खरोखर), कारण जंगलातल्या प्रत्येक गोष्टीचा एक हेतू असतो व त्यालाच जगणे असे म्हणतात. आपल्या आयुष्यातील मूल्ये बदलत असताना, आपण पुन्हा एकदा वन्यजीवनरूपी गुरूकडे वळलो आहोत. या गुरुने शिकवलेला धडा समजून घेणे व त्याचा अवलंब करणे आवश्यक आहे. नाहीतर आपण स्वतःच नामशेष होण्यासाठी जबाबदार असू. स्वतःचा जीव खर्चून मला थोडे अधिक शहाणे केल्याबद्दल चांदी अस्वलाचे आभार. असो, तुम्ही कदाचित प्रश्न विचाराल की जगणे ही एक समस्या असेल, तर माणसांची लोकसंख्या कशी वाढत आहे. तुमचे म्हणणे चूक नाही. परंतु मानवी लोकसंख्या वाढीचा दर किती आहे याकडे आपण लक्ष देतो का? माणसांची लोकसंख्या वाढत असताना वाघ, देवमासा, झाडे, अगदी फुलपाखरे यासारख्या इतर प्रत्येक प्रजातीची संख्या कमी होत चालली आहे. या सर्व प्रजातींचा एकच शत्रू आहे, ज्याच्याविरुद्ध जगण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही तंत्र नाही तो म्हणजे माणूस. आणि माणसाचाही केवळ एकच शत्रू आहे, तो म्हणजे आपण स्वतः. तुम्हाला असे वाटत असेल की मी विनोद करतोय, तर लक्षात ठेवा की कर्करोग म्हणजे दुसरे काही नाही तर शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ, ज्या कालांतराने एकमेकींना खाऊन टाकतात आणि शरीराला नष्ट करतात, हे लक्षात ठेवा. हा इशारा देऊन निरोप घेतो!
*तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर असे काही क्षण पाहू शकता.
https://flic.kr/s/aHBqjBthpt
https://www.flickr.com/photos/coexistance_is_the_key/albums/72177720317550777/
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in










टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा