स्वदेशीवाली दिवाळी!!



































 स्वदेशीवाली दिवाळी!!



“तुमचा देश कदाचित मनातील एक कल्पनाच असेल. ती कदाचित अशी एक जागा असेल जिची तुम्ही स्वप्ने पाहता व गाणी म्हणता. नकाशावर तिचे स्थान कदाचित नगण्य असेल, पण त्याविषयी अनेक गोष्टी असतील, तुम्ही भेटलेल्या लोकांच्या, तुम्ही पाहिलेल्या ठिकाणांच्या, तुम्ही वाचलेली पुस्तके व पाहिलेले चित्रपट असतील. मला घरची आठवण येते व जगताना आजूबाजूला आपली भाषा नाही म्हणून भीती वाटत नाही. मी इतर कुणासारखेही असण्याची गरज नाही. मी वाटेल तिथे चालतोय व मला कुणीही थांबवू शकत नाही.”
― ह्यूगो हॅमिल्टन.

“ स्वतःच्या जमीनीच्या लहानशा तुकड्यावर आरामात उपजीविका चालवणे ही भविष्यात सर्वोत्तम कला असणार आहे.”
― अब्राहम लिंकन.

"आपण स्वदेशीला दूर लोटले नसते, आपले सध्या झाले आहे तसे पतन झाले नसते. आपल्याला आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता हवी असेल, तर आपण स्वतःच्या कपड्यांचे उत्पादन केले पाहिजे व, सध्याच्या घडीला ते केवळ हाताने सूत कातून व हातमागावर केले पाहिजे." – महात्मा गांधी.


ह्युगो पी. हॅमिल्टन हे एक आयरिश लेखक आहेत,  त्यांचा जन्म व ते लहानाचे मोठे झाले डब्लिनमध्ये. स्वातंत्र्याविषयीचे आपले विचार त्यांनी ज्याप्रकारे मांडले आहेत त्यातून त्यांची कट्टर आयरिश पार्श्वभूमी डोकावते यात काहीच आश्चर्य नाही. इतर दोन नावे त्या देशांच्या पित्या समान आहेत जो माझ्या लेखाचा विषय (कणा) आहे व त्याचे कारण म्हणजे अलिकडच्या काळात जागतिक पटलावर होत असलेल्या घडामोडी. मी काही जागतिक राजकारणाचा किंवा धोरणांचा किंवा अर्थव्यवस्थेचा किंवा युद्धाविषयीचा तज्ज्ञ नाही. परंतु या लेखाचे कारण म्हणजे आपल्या माननीय पंतप्रधानांनी दिवाळी निमित्ताने स्वदेशी माल खरेदी करण्याविषयी केलेले आवाहन. अर्थातच माननीय पंतप्रधान जो राग आळवत आहेत त्याचेच अनुकरण त्यांचे अनुयायी म्हणजेच पक्षाचे कार्यकर्ते तसेच राज्य सरकारे करत आहेत जे आपण सगळे पाहत आहोत. विनोद म्हणजे, मी ज्या दोन महान व्यक्तींची अवतरणे वर वापरली आहेत, ते म्हणजे अब्राहम लिंकन व महात्मा गांधी या दोघांनीही जवळपास एका शतकापूर्वी आपापल्या देशांसाठी हेच केले. आणि आज परत दोन्ही नेत्यांच्या देशांमधील नेते पुन्हा तोच राग आळवत आहेत, आपण "देजावू" अनुभवतोय असे वाटतेय ना? श्री. ट्रम्प यांनी "मागा ऊर्फ MAGA" (अर्थात अमेरिकेला तिचे गतवैभव पुन्हा मिळवून देऊ वगैरे वगैरे, त्याने असा फारसा काय फरक पडणार आहे, उपरोध) धोरणांतर्गत विविध घोषणांचा सपाटा लावला आहे, तर आपल्या माननीय पंतप्रधानांनी “स्वदेशीचा वापर करा” असे आवाहन वारंवार केले आहे. श्री. ट्रम्प यांनी अचानक मुक्त व्यापार व व्यावसायिक दर्जा या अमेरिकी धोरणांना तिलांजली देत फक्त अमेरिका हे धोरण का स्वीकारले हे देवालाच माहिती, तर आपल्या पंतप्रधांनी दिलेला स्वदेशीचा नारा (घोषणा) हा ट्रम्प यांनी आपल्या देशाविरुद्ध सुरू केलेल्या करयुद्धाचा परिपाक आहे!
या पार्श्वभूमीवर, आपण प्रकाश व आनंदाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या स्वागताची तयार करायला सज्ज झालो आहोत, परंतु खरेतर त्याहीपेक्षा संपूर्ण देशासाठी हा खरेदीचा उत्सव आहे, ज्यामुळे समाजातील लाखो कुटुंबांचा लाभ होतो, ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतात व गरीबांचे जीवन थोडे अधिक चांगले होते. याचे कारण म्हणजे १५० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये दिवाळी हा एकमेव असा सण आहे जो सर्व प्रदेश व राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा सण जाती, धर्माच्या रेषा पुसट करून टाकतो, ज्या एरवी ओलांडता येत नाही किंवा कितीही बळाचा वापर केला तरीही अभेद्य असतात, याला अर्थात अपवाद एकच तो म्हणजे क्रिकेट सामन्यातील भारतीय संघाचा विजय. दिवाळीच्या काळात प्रत्येक जण त्याच्या किंवा तिच्या ऐपतीप्रमाणे काही ना काही खरेदी करत असतात, यामध्ये घरातील भांडीकुंडी, झाडूपासून ते अगदी आयफोन17 पर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार व ऐपतीप्रमाणे विविध गोष्टींचा समावेश असतो. ही खरेदी परंपरा जपण्यासाठी, तुमच्या आप्त-स्वकीयांना आनंदी करण्यासाठी व व्यावसायिक लाभ मिळवण्यासाठीही (भेटवस्तू देऊन) केली जाते. यामुळेच दिवाळीचा काळ हा बाजारामध्ये प्रत्येक वस्तुचीच मोठी उलाढाल होण्याचा काळ असतो. नेमके इथेच आपल्या पंतप्रधानांनी स्वदेशीसाठी केलेले आवाहन सर्वात महत्त्वाचे आहे. कारण ट्रम्प तात्यांनी फोडलेल्या करशुल्काच्या बाँबमुळे आपल्याकडून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीला मोठा फटका बसला आहे. आपल्या देशाच्या मालाला ग्राहकांची गरज आहे असे मलाच नाही  तर सगळ्यानाच वाटते आहे.

 आपल्या माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे मी हा लेख लिहीण्याचा विचार केला कारण स्वदेशी खरेदी करणे किंवा स्वदेशीचा प्रचार करणे निश्चितच चांगले आहे. परंतु ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी बरेच काही करणे आवश्यक आहे, असे मला सांगावेसे वाटते.
सर्वप्रथम व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लोक (ज्यांना परवडू शकते) अमेरिकेमध्ये (किंवा भारताबाहेर) तयार झालेली उत्पादने का खरेदी करतात हा प्रश्न आपल्या शासनकर्त्यांनी (केवळ विद्यमान पंतप्रधानच नव्हे) स्वतःला अनेक दशकांपूर्वी विचारला पाहिजे होता.  याचे साधे उत्तर आहे, दर्जा व पैशाचा पूरेपूर मोबदला. याचा अर्थ असा होत नाही की भारतीय उत्पादने निकृष्ट असतात; किंबहुना हस्तकलेच्या कोणत्याही वस्तुंचा विचार केला तर आपण कोणत्याही देशाच्या कारागिरीला मात देतो. परंतु हे युग यंत्रांचे व तंत्रज्ञानाचे आहे, ज्याद्वारे घाऊक उत्पादन केले जाते, जेथे आपण बाह्य जगाच्या तुलनेत कमी पडतो. बाजारपेठा काही आज खुल्या झालेल्या नाहीत, विदेशी मालासाठीचे आपले प्रेम स्वातंत्र्यकाळापासूनचे आहे. आधीच्या बॉलिवुड चित्रपटांचा विचार करा, त्यातील खलनायक हे सामान्यपणे विदेशी माल, सोने, घड्याळे, मद्य इत्यादींच्या तस्करीमध्ये गुंतल्याचे दाखवले जाते. तस्करी आजही केली जाते परंतु तुम्हाला आज उघडपणे दुकानामध्ये ब्लॅक लेबल व्हिस्की मिळत असेल तर तस्करी कशाला करायची, नाही का? यात खरी समस्या आहे ती व्यवसायासंदर्भातील आपल्या धोरणांची व एकूणच उत्पादनांची, “व्यवसाय सुलभता” नावाच्या विनोदाची. मला माफ करा पण कोणत्याही वस्तुचा व्यवसाय करणाऱ्या कुणाही व्यावसायिकाला, त्याची सर्वात मोठी समस्या काय आहे ते विचार, त्यावर सरकारी धोरणे किंवा सरकार नावाच्या यंत्रणेला तोंड देणे हेच उत्तर असेल. मी कुठल्याही विशिष्ट सरकारी विभागाला दोष देत नाही तर संपूर्ण यंत्रणेला दोष देतो आहे, ज्यांना एखाद्या उद्योगाची फळे चाखायची असतात परंतु त्या फळाची जोमाने वाढ होण्यासाठी योग्य वातावरण किंवा परिस्थिती तयार करण्यासाठी ती काहीच करत नाही, ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो! मग ते स्वयंचलित वाहन उद्योग असू दे, आयटी उद्योग किंवा कृषी उद्योग अथवा रिअल इस्टेट (मी त्याला विसरून कसे चालेल), मला दाखवून द्या की एक खिडकी परवानगी किंवा सुरुवातीपासूनच पाणी, रस्ते, वीज, कायदा-सुव्यवस्था यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे काय ज्यांची कुठल्याही उत्पादन यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक समाधान वा शांततेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे, त्यानंतर तुम्हाला आपोआप या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
इथे आपल्या शेतकऱ्यांची पिके कोरड्या व ओल्या दुष्काळामुळे सुद्धा वाया जातात. दशकातून एखादेवेळी असे होणे मी समजू शकते, परंतु दर एक वर्षाआड पिके वाया जात आहेत व तरीही आपण निसर्गाला दोष देतो, खरेतर दोषी आपणच आहोत, निसर्ग नव्हे.  शेतकऱ्यांची ही गत आहे तर दुसरीकडे समाजातील सधन वर्गही (उद्योजक) निसर्गाच्या नाही परंतु यंत्रणेच्या माऱ्यातून सुटलेला नाही. त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर पोहोचता यावे यासाठी चांगल्या रस्त्यांपासून ते पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत गरजांपर्यंत व्यवसायाची संबंधित प्रत्येक आघाडीवर समस्या आहेत. ही वस्तुस्थिती कुणीही उघडपणे मान्य करत नाही (काही नामांकित व्यवसाय समूहाचा किंवा ज्या व्यक्तींना सरकार नामक यंत्रणा वाकवता येते त्यांचा अपवाद वगळता). व्यावसायिक वर्गाचा जसे की डॉक्टर वा सीए, थोडाफार आदर केला जातो, परंतु ज्या व्यक्ती घर बांधणीच्या व्यवसायामध्ये आहेत (म्हणजेच बांधकाम व्यावसायिक) त्यांना आदर सोडा योग्य धोरणेही मिळत नाही व याच कारणामुळे आपण परवडणाऱ्या घरांसारखी मूलभूत गोष्ट देण्यास अपयशी ठरत आहोत, जी शंभर टक्के स्वदेशी आहे. सुदैवाने चिनी लोक जमीन किंवा घरे इथे निर्यात करू शकत नाही. नाहीतर रिअल इस्टेट व्यवसायही जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असता (जो असाही काही काळापासून करतच आहे). त्याचशिवाय आपले कायदे, कर यंत्रणा ज्यामध्ये जीएसटी, आयकर, शेकडो स्थानिक कर, शुल्के व अधिभार (कधीतरी पुणे महानगरपालिकेला भेट द्या) व त्यांच्या परताव्याची यंत्रणा पाहता, वडा-पाव बनविण्याचा व्यवसाय असो किंवा कार, उत्पादन बनवणे व स्थानिक बाजारामध्ये ते विकणे तितकेच अवघड आहे.
शेवटचा मुद्दा म्हणजे कौशल्य विकास तसेच कोणत्याही उत्पादनासाठी उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा दृष्टिकोन जो एका रात्रीत तयार होत नाही. शैक्षणिक यंत्रणेपासून ते शिक्षणाच्या दर्जापर्यंत, तसेच जनतेला ते परवडणे, असे कितीतरी घटक कुशल मनुष्यबळ विकसित करण्याशी निगडित असतात, व त्या आघाडीवर आपण कुठे आहोत? याच कारणामुळे प्रत्येक मुलगा व मुलगी, ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता व पैसा आहे ते अमेरिका, युरोप किंवा सिंगापूरकडे धाव घेत आहेत. जग आपल्या शैक्षणिक यंत्रणेवर विश्वास ठेवत नाही किंवा काय? कोणत्याही यंत्रणेमध्ये कर्मचारी व मालकांना नेहमी एकमेकांविषयी अढी असतेच. परंतु बहुतेक व्यवसायात/निर्मिती उद्योगांमध्ये परिस्थिती अशी आहे की एकीकडे उद्योगांना योग्य मनुष्यबळ मिळत नाही तर दुसरीकडे लाखो तरुण बेरोजगार आहेत, “दया कुछ तो गडबड है” (कृपया याचा अर्थ शोधण्यासाठी गूगल करा)! त्याच वेळी आपल्या देशातील स्त्री-पुरुषांचा अर्थव्यवस्थेविषयीचा दृष्टिकोन तितकाच महत्त्वाचा आहे. आपल्या देशातून अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीवर जेव्हा भरमसाठ शुल्क आकारले जात असताना, आपल्या देशातील लोक आयफोनचे नवीन मॉडेल बाजारात आल्यावर ते खरेदी करण्यासाठी ॲपलच्या दुकानासमोर रांगा लावून उभे होते, हा किती मोठा विरोधाभास आहे. कुणी काय खरेदी करायचे हा अतिशय वैयक्तिक विषय आहे व मला त्यामध्ये शिरायचे नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, अमेरिका किंव कोणताही पाश्चिमात्य देश एका रात्रीत महान किंवा विकसित झालेला नाही. त्याचप्रमाणे केवळ सरकारी धोरणांमुळे त्यांच्यासाठी हे शक्य झाले नाही, तर आपापला देश महान बनविण्यासाठी प्रत्येकाने केलेल्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे हे साध्य झाले आहे. त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने थोडी शिस्त अंगी बाणवण्याची गरज आहे व आपल्या हाती असलेल्या कामाची जबाबदारी घेतली पाहिजे, हाच माझ्या लेखाचा विषय आहे.
ऐन दिवाळीत तुमच्याशी एवढ्या गंभीर विषयावर चर्चा करतोय म्हणून माफ करा, परंतु माननीय पंतप्रधान सर, आपल्या देशवासियांना स्वदेशी वापरण्याचे आवाहन करताना समाजाच्या (मी केवळ व्यवसाय असे म्हणत नाही) या सर्व पैलूंकडेही लक्ष द्या. सर, आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य हवे आहे, आपल्या देशाने कोणत्याही व्यापार युद्धामध्ये तथाकथित महाशक्ती असलेल्या देशाविरुद्ध पूर्णपणे ताकदीनिशी व निर्भयपणे उभे राहावे असे आपल्याला वाटते. ज्याप्रमाणे लष्कर सीमेवर निकराचा लढा देत असते त्याचप्रमाणे आमच्यापैकी प्रत्येक जण उभा राहण्यासाठी, लढा देण्यासाठी व उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. स्वदेशी विरुद्ध अमेरिका या युद्धामध्ये लष्कराप्रमाणे आम्हालाही आमची शस्त्रे हवी आहेत, ती म्हणजे पायाभूत सुविधा, योग्य व स्पष्ट धोरणे, कामातील पारदर्शकता, मंजुऱ्या वेगाने मिळणे व काहीतरी महान बनविण्याच्या/उभारण्याच्या ध्येयाने झपाटलेले सरकार! अनेक दशकांपूर्वी, चीन युद्धामुळे तत्कालीन पंतप्रधानांनी “जय जवान, जय किसान” ची घोषणा केली होती. त्याला जोडुन आता “जय कामगार, जय कारखानदार” अशी घोषणा करण्याची वेळ आली आहे. माननीय पंतप्रधान सर, अशाप्रकारे प्रत्येक कामगाराकडे काम असेल व इथे तयार करण्यात आलेल्या प्रत्येक उत्पादनाला ग्राहक असेल, एक सशक्त व संघटित राष्ट्र बनण्याचा हाच मार्ग आहे. त्या दिशेने पहिले पाऊल म्हणून तुम्ही केलेल्या आवाहनाबद्दल तुमचे आभार, कारण दिवाळीमध्ये आपण उत्पादन केलेल्या वस्तू  इतरांना भेट देण्याशिवाय अधिक चांगली दिवाळी भेट काय असू शकते, मग ती भेट देण्याच्या दृष्टिकोनातून असो किंवा खरेदी करण्याच्या. म्हणूनच  “दिवाळीच्या अनेक शुभेच्छा, स्वदेशीचा आग्रह धरा”!


संजय देशपांडे

www.sanjeevanideve.com 
www.junglebelles.in

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!