छोटा मटका, फक्त वाघ नाही, अ‍ॅटिट्यूड!!🐾

































छोटा मटका, फक्त वाघ नाही, अ‍ॅटिट्यूड!!🐾


“जो तलवार घेऊन जगतो, त्याचा मृत्यूही तलवारनीच होतो”… येशू ख्रिस्त.


“एकदा तुम्ही हातात तलवार घेऊन जगायचा निर्णय घेतला की ते चूक किंवा बरोबर याने फरकच पडत नाही. त्यात मजा आहे का हे सर्वात महत्त्वाचे असते.” … ताकेहिको इनोयू.


पहिल्या अवतरणाच्या लेखकाची (म्हणजे निर्मात्याची) ओळख करून देण्याची गरज नाही व दुसरे ताकेहिको इनोयू हे जपानी मांगा कलाकार आहेत. ते त्यांच्या बास्केटबॉलवरील स्लॅम डंक या मालिकेसाठी व जिदाईगेकी मांगा व्हागाबाँडसाठी सर्वाधिक ओळखले जातात, या दोन इतिहासातील सर्वाधिक खपाच्या मांगा मालिका आहेत. लेखाच्या नावातूनच तुम्हाला त्याच्या विषयाची कल्पना आली असेल, तर हा लेख वाघांविषयी (किंबहुना वाघाविषयी) आहे व अर्थातच त्यामध्ये ताडोबाचा उल्लेख आहे, तरीही मला तुम्हाला असे सांगावेसे वाटते की तो ताडोबाविषयी अथवा वाघ पाहण्याविषयी नाही, तर वाघाच्या वृत्तिविषयी आहे! शीर्षकामध्ये नमूद केल्याप्रमाणे समाज माध्यमांवर सगळीकडे (म्हणजे वन्यजीवप्रेमींच्या खात्यामध्ये) सीएम या नावाची चर्चा आहे, राजकारणामध्ये सीएम या नावाला विशेष वलय असले तरीही इथे सीएम म्हणजे ताडोबातील सर्वांचा लाडका वाघ. सीएम म्हणजेच छोटा मटकासूर नावाचा वाघ त्याला झालेल्या इजांमुळे सगळ्याच माध्यमांमध्ये बातम्यांमध्ये होता/आहे व वन विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार त्याला नागपूरजवळील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयामध्ये हलवण्यात आले आहे व कदाचित आता तो आपले उर्वरित संपूर्ण जीवन तेथेच घालवेल. मी जेव्हा हा लेख लिहीण्यास सुरुवात केली, तेव्हा समाज माध्यमांवर सीएमची आधीच (बऱ्याच काळापासून) चर्चा होती व यासंदर्भात दोन मतप्रवाह होते, एक म्हणजे इजा झालेल्या वाघावर उपचार करण्यासाठी काहीही न करणाऱ्या वन विभागावर टीका करणारा व दुसरा म्हणजे जंगलाला आपल्या पद्धतीने जगू द्यावे असा विचार करणारा. त्याचप्रमाणे, ज्यांनी ताडोबाला भेट दिली आहे ते प्रत्येक जण सीएमची छायाचित्रे टाकत होते व दुर्दैवाने तो या सगळ्याच्या पलिकडे आहे, तो पूर्वीही होताच, परंतु आता तो कदाचित कायमस्वरूपी पिंजऱ्यामध्ये असणार आहे. मी या लेखासाठी ‘छोटा मटकाचा उदय व अस्त’ असे शीर्षक ठरवले, परंतु मला नंतर जाणीव झाली की हे असे करणे जंगल किंवा वन्यजीवन नावाच्या यंत्रणेवर अन्याय केल्यासारखे होईल. कारण निसर्ग केवळ एकच उदय व अस्त जाणतो तो म्हणजे सूर्याचा, ज्याभोवती वन्यजीवनाचे जीवनचक्र अव्याहत सुरू असते, बाकी सर्व काही निव्वळ जगणे असते! व्वा, म्हणजे भारीच, माझा विश्वासच बसत नाहीये मी या ओळी (म्हणजे आधीच्या ओळी) लिहील्या आहेत, कारण त्या वन्यजीवन क्षेत्रातील एखाद्या महान  तत्त्वज्ञानी व्यक्तीच्या असल्यासारख्या वाटतात. परंतु मी त्या केवळ जंगलामध्ये जाऊन शिकलो आहे व ते वाहवा मिळवण्यासाठी नाही तर तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे की सीएमसारखा शक्तीशाली वाघ असला तरीही जे काही झाले ते वन्यजीवनामध्ये सामान्य किंवा नवीन सामान्य होते.

इथेच खरी गंमत आहे, तर आधी सीएमची गोष्ट ऐकू, तुमच्यापैकी बहुतेकांना ती माहिती असेल तरीही डिस्ने किंवा चांदोबातल्या गोष्टींमध्ये असते तशी खूप वर्षांपूर्वी नसले तरीही बर्‍याच वर्षांपुर्वी ताडोबा नावाचे एक राज्य होते. चंद्रपूरच्या घनदाट जंगलात ते वसलेले होते, इथेच आपल्या गोष्टीचा नायकही जन्मला, हाहाहा (गोष्ट थोडी नाट्यमय करण्याचा  प्रयत्न)! तर, बरोबर नऊ वर्षांपूर्वी, म्हणजे जुलै २०१६ मध्ये त्याचा जन्म झाला. मटकासूर व छोटी तारा या वाघांच्या अतिशय लोकप्रिय जोडप्याची सीएम व ताराचंद ही दोन बछडी होती. ताराचंद हा लहानपणापासून सीएमपेक्षा अंगाने मोठा होता. ते दोघे आपल्या पालकांपासून वेगळे झाल्यानंतर व त्यांनी स्वतःचे कार्यक्षेत्र तयार केल्यावर ताराचंड मनुष्य-प्राण्यातील संघर्षाचा बळी पडला (सीएमच्या आधी) व त्याचा नवेगाव बांधाच्या बाजूला असलेल्या बफर क्षेत्रातील गावांपैकी एकामध्ये विजेच्या तारांचा धक्का लागून मृत्यू झाला असे मानले जाते. ही घटना साधारण पाच-सहा वर्षांपूर्वीची असावी. त्या काळात सीएम स्वतःचे कार्यक्षेत्र प्रस्थापित करण्यामध्ये व्यग्र होता, त्यासाठी त्याचा आकार हे जणू देवदत्त वरदानच होते! वाघांच्या संवर्धनामध्ये हीच मुख्य समस्या आहे व त्यामुळेही ते विशेष ठरतात. हा स्वतःमध्येच रमणारा प्राणी आहे, विशेषतः नर वाघ, तसेच सीएमच्या आकाराच्या वाघासाठी अधिक मोठे कार्यक्षेत्र आवश्यक असते, याचाच अर्थ असा होतो की जंगलाचा अधिक भाग त्यांना हवा असतो जे दिवसेंदिवस चहूबाजूंनी आक्रसत चालले आहे. आता इथे कुणी म्हणेल, जंगलाचे गाभा क्षेत्र हे संरक्षित असते, अशावेळी जंगल आक्रसत चालले आहे असे कुणी कसे म्हणू शकते व मी प्रश्नकर्त्याला दोष देणार नाही. इथेच आपले (म्हणजे बहुतेक जनतेचे व आपल्या शासनकर्त्यांचेही) जंगलाबाबतचे ज्ञान अपुरे आहे. गाभा क्षेत्रातील जंगल आक्रसत नसले तरीही या क्षेत्रातील वाघांची संख्या प्रत्येक समागमाच्या हंगामात वाढत जाते व ही जागा वाघांसाठी आक्रसत चालल्याची जाणीव होते, समजले? विचार करा एका चौकोनी कुटुंबाकडे १००० चौरस मीटरचे एक शेत आहे, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते पुरेसे आहे. पण काही वर्षात कुटुंबातील दोन तरुण मुलांची लग्न झाल्यानंतर ते चारवरून दहा ते बारा जणांचा कुटुंब होईल, पण त्या शेतातून पिकणारे पीक तेवढेच आहे, तर अशावेळी काय होईल? आता त्यांच्यासाठी हे शेत पुरेसे नसल्याचे त्यांना समजेल, गाभा क्षेत्रातील जंगलांमध्येही हेच होत आहे कारण जंगलाचे क्षेत्र तेवढेच आहे परंतु वाघांची संख्या वाढत आहे म्हणजे अधिक वाघांसाठी कमी जागा आहे व परिणामी त्यांना जगण्यासाठी लढावे लागते.

जर गाभा क्षेत्रामध्ये ही परिस्थिती असेल तर दुसरीकडे बफर क्षेत्रामध्ये अतिशय कठीण परिस्थिती आहे कारण इथे माणसेही जागेतील वाटेकरी आहेत, म्हणजे वाघांना जगण्यासाठी दुहेरी शत्रूला तोंड द्यावे लागते व म्हणून सीएम जसा होता तसा म्हणजे लढाऊ वृत्ती झाला! साधारणपणे 2018च्या हिवाळ्यामध्ये सीएम व ताराचंद यांनी स्वतःच्या कार्यक्षेत्रासाठीचा प्रवास सुरू केला, कारण गाभा क्षेत्राचा पूर्वेकडील भाग म्हणजे प्रामुख्याने पांढरपौनी (इथे जलाशय आहे) हे त्यांच्या वडिलांचे म्हणजे शक्तिशाली अशा मटाकासुराचे कार्यक्षेत्र होते. त्याचे डोके अतिशय मोठे म्हणजे एखाद्या मडक्यासारखे होते म्हणून त्याला हे नाव देण्यात आले व तो तिथून अजिबात हलणार नव्हता हे निश्चित होते. म्हणूनच दोन तरुण नर वाघांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षेत्राचा शोध घेण्यास सुरुवात केली व कालांतराने सीएम अतिशय धोरणीपणे नवेगाव/कोलारा बाजूला स्थायिक झाला जेथून त्याला गाभा व बफर अशा दोन्ही क्षेत्रात सहजपणे जाणे शक्य होणार होते. पांढरपौनी क्षेत्र तिथे माया नावाच्या अतिशय लोकप्रिय वाघीणीमुळे नेहमीच प्रकाशझोतात राहिले आहे व तिच्या चाहत्यांची म्हणजे नर वाघांची यादी मोठी होती. त्यामध्ये बजरंग, मटकासूर, रुद्रा, ताला, हिलटॉप मेल, बलराम, मोगली व इतरही अनेकांचा समावेश होता व त्यामुळेच ताडोबातील हे ठिकाण म्हणजे जणु युद्धक्षेत्र होते. २०२० ते २०२३ दरम्यान, आणि जेव्हा माया अचानक नाहीशी झाली, तेव्हा प्रत्येक नर वाघाने येथे त्याचे नशीब आजमावून पाहिले व एकतर त्याला इजा झाली किंवा त्याने माघार घेतली व परिणामी, मायाची सर्व बछडी नर वाघांच्या या रक्तरंजित संघर्षात मारली गेली. विचित्र योगायोग म्हणजे ही गोष्ट थोडीफार अनेक मानवी साम्राज्यांच्या कथेच्या जवळपास जाणारी आहे जी राज्याच्या गादीसाठी लढत राहिली व या लढाईमुळे संपूर्ण प्रदेशाला त्रास भोगावा लागला. वाघांच्या संघर्षामुळे पर्यटनालाही फटका बसला कारण अचानक वाघ दिसेनासे झाले होते कारण वाघिणींना फार जास्त नर वाघ अवती-भोवती नको असतात कारण प्रत्येक नर वाघ इतर वाघाची बछडी ठार करतो ज्यामुळे त्या क्षेत्रामध्ये बछडीच शिल्लक राहात नाहीत, ताडोबाच्या पांढरपौनी या गाभा क्षेत्रात काही काळ अशीच परिस्थिती होती!

सीएम हुशार होता. त्याच्या वडिलांचे वय झाल्यानंतर एक दिवस ते नाहीसे झाले. ते कुठे गेले कुणालाच माहिती नाही. त्या काळात गाभा क्षेत्रात सीएमला मोगली व रुद्राशी संघर्ष करावा लागला. परंतु सीएम नवेगाव बफर क्षेत्राच्या दिशेने गेला व तिथे पाळीव प्राण्यांची शिकार करून त्याचा उत्तमप्रकारे उदरनिर्वाह सुरू होता. तिथे नवेगंत, अलियांझ व निमढेला या तीन बफर क्षेत्रांचा व्यापक कार्यक्षेत्रात समावेश होतो. इथे एक अतिशय रोचक गोष्ट माझ्या ताडोबाच्या अनेक भेटींमध्ये माझ्या निरीक्षणास आली आहे की बफरमधील वाघांच्या वर्तनाचे स्वरूप हे गाभाक्षेत्रापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. याचे कारण म्हणजे गाभा क्षेत्रातील वाघांना संपूर्ण खाजगीपणाची सवय असते कारण वन कर्मचारी व पर्यटकांच्या जिप्सींव्यतिरिक्त तिथे माणसांची वर्दळ नसते, परंतु बफर क्षेत्रात माणसांची बरीच वर्दळ असते, तसेच लोक इथे प्रत्यक्ष राहतात. म्हणूनच, बफर क्षेत्रातील वाघांचे वर्तन दोन प्रकारचे दिसून येते, एक म्हणजे अतिशय लाजाळू, खबरदारी घेणारे व केवळ माणसांची वर्दळ नसेल अशा वेळेतच म्हणजेच अंधारात बाहेर निघायचे व दुसरे म्हणजे अतिशय निर्धास्त व माणसे जीवनाचा एक भाग आहेत असे मानून निर्भयपणे फिरायचे. सीएमने जगण्याचा दुसरा मार्ग स्वीकारला व त्यासाठी ताडोबाच्या रहिवाशांना (गावकऱ्यांना) पूर्ण श्रेय द्यावे लागेल कारण एवढा मोठा वाघ दिवसाच्या कोणत्याही वेळी निर्धास्तपणे जंगलातील रस्त्यावर फिरताना दिसल्यावर जास्त पर्यटक येतील, ज्यामुळे त्यांना उपजीविकेचे, रोजगाराचे साधन म्हणजेच पैसा मिळेल, त्यामुळे त्यांचे पाळीव प्राणी वाघाच्या हल्ल्यात मारले गेले तरीही तेवढी किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. अर्थातच वन विभागानेही जनावरांचे नुकसान झाले तर दिल्या जाणाऱ्या भरपाईमध्ये बरीच सुधारणा केली आहे व क्वचित प्रसंगी माणसेही मारली गेली, तरीही कुणी तक्रार केली नाही. हे वन्यजीव सहजीवन ही सीएमने ताडोबाला दिलेली सर्वात मोठी भेट होती व म्हणूनच त्याच्याविषयी एवढी चर्चा केली जाते, कारण तो केवळ पर्यटकांचाच नव्हे तर स्थानिकांचाही लाडका होता. मी स्वतः डोळ्यांनी हे पाहिले आहे, माझ्या एका भेटीमध्ये मला जेव्हा समजले की येथील शेतात काम करतांना एक शेतकरी वाघाने मारला, मी सहज विचारते की हे सीएमचे काम होते का कारण बातमीमध्ये ज्या ठिकाणाचे नाव नमूद करण्यात आले होते ते त्याच्या हद्दीत होते. सर्वप्रथम त्यावर शांतता होती व नंतर उत्तर आले, साहेब माहिती नाही, कुणी नवीन वाघ होता (एखाद्या अनोळखी वाघाने हे कृत्य केले असावे), त्यावर मी विचारले नवा वाघ, सीएम त्याच्या हद्दीत कुणाला येऊ देईल का. यावरही केवळ स्मितहास्य करण्यात आले, म्हणजे वस्तुस्थिती अशी होती की हे सीएमचेच काम होते परंतु त्यांना ते जाहीर करायचे नव्हते, कारण माणुस मारल्यामुळे वनविभाग सर्वांचे आकर्षण असलेल्या त्याला लांब पाठवेल अशी भीती त्यांना वाटत होती.

लोकहो, सीएमचा असा दरारा होता. मी नेहमी म्हणतो की आरामात जिप्सीमध्ये बसून, रस्त्यावर वाघ चालत जातानाची छायाचित्र काढणे व तुमच्या सुरक्षित घरी जाऊन ती एडिट करणे अतिशय सोपे आहे परंतु जेव्हा जवळपास ३०० किलो वजनाचा एक वाघ तुमच्या शेताच्या, घराच्या अवती-भोवती फिरत असतो, तुम्ही किंवा कुटुंबीय एकटे पायी कुठेही जात असताना निरखून पाहात असतो असा विचार केल्यामुळे सुद्धा माझ्या पोटात गोळा येतो. तरीही इथले लोक वाघ त्यांच्या कुटुंबांसाठी काय करत आहे यासाठी आदर व्यक्त करण्यासाठी त्याची पूजा करतात. आणि खरोखरच, सीएम सद्गृहस्थासारखा आहे, किमान माणसांसाठी तरी, कारण त्याने कधीही जाणीवपूर्वक माणसांवर हल्ला केलेला नाही, नाहीतर तो अशा शेकडो लोकांना सहज मारू शकला असता. परंतु तो हुशारही होता कारण असे केल्यामुळे माणसांचे शत्रूत्व पत्करावे लागले असते व बफर क्षेत्रामध्ये अशाप्रकारे राज्य करता येत नाही हे सीएम शिकला होता व त्याने शेवटपर्यंत त्याचे पालन केले. अर्थात हा चांगल्या वाघाचा मुखवटा इतर नर वाघांसाठी नव्हता व इथेच येशूचे अवतरण सीएमच्या संदर्भात लागू पडते. कारण त्याचे कार्यक्षेत्र अतिशय मोठे होते व त्यामध्ये तीन ते चार वाघीणी होत्या व कुटुंब म्हणजे त्यांची बछडी होती, त्यामुळेच राजाला घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध सतर्क राहावे लागत असेल व असे कितीतरी होते. त्यामुळेच ही लढाई सुरू राहिली व सीएम प्रत्येक लढाई एकाच उद्देशाने लढला, माझे कार्यक्षेत्र सोडून जा किंवा मरा. याच्या परिणामी बजरंगा व ब्रह्मा या नर वाघांना तर जिव गमवावा लागला, ही दोन उदाहरणे खात्रीशीर माहिती होती. परंतु कोणतेही युद्ध रक्त सांडल्याशिवाय जिंकता येत नाही (याला अपवाद, फक्त तुम्ही रजनीकांत असाल तरच, हाहाहा) व सीएमही या लढाईच्या मूलभूत नियमाला अपवाद नव्हता. त्याला सर्वात पहिली मोठी इजा झाली ऑगस्ट किंवा सप्टेंबर २४ मध्ये, त्याच्या डाव्या पायाच्या पुढच्या भागाला व पंजाला मार लागला होता. त्याने बफर क्षेत्रावर राज्य करण्यास सुरुवात केल्यापासून पहिल्यांदा स्थानिकांनी अवती-भोवती लंगडत चालणारा सीएम पाहिला. त्याला चालता येत नव्हते व त्याचे वजन हा लढाईमध्ये त्याचे शस्त्र असले तरीही, जेव्हा इजा होते तेव्हा ते तुमचा सर्वात मोठा शत्रू होते. त्याचसोबत मोठे कार्यक्षेत्र सुरक्षित ठेवणे ही आणखी एक समस्या आहे कारण तुम्हाला सतत कुठे ना कुठे फिरावे लागते. सुदैवाने तुम्हाला इजा झाली असली तरीही पाळीव जनावरांची शिकार करणे सोपे असते व तिनशे किलोच्या वजनाच्या शक्तीमुळे, एकाच फटक्यात जनावराची मान मोडू शकते, त्यामुळे सीएम जगला, परंतु तो कधीच पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. किंबहुना त्या वेळी केवळ त्याच्या इजांवर उपचार करणे किंवा त्याची देखभाल करणे आवश्यक होते. कारण त्याही परिस्थितीत तो चालत राहिला व त्याची प्रवृत्ति आक्रमक होती. परिणामी ब्रह्मा नावाच्या तरुण वाघासोबत मे किंवा जून 25 मध्ये जेव्हा त्याची लढाई झाली तेव्हा त्याचा आधीच अधू झालेला डावा पाय व सुळे पूर्णपणे तुटले. वाघ असण्यातली मुख्य अडचण म्हणजे, जंगलामध्ये कुणीच तुमची सेवा करत नाही जेव्हा खरेतर तुम्हाला सर्वाधिक धोका असतो. सुदैवाने सीएमचा लौकिकच असा होता की त्याला अतिशय वाईट इजा होऊनही कुणाही नर वाघाने त्याच्या कार्यक्षेत्रात येण्याची हिंमत केली नाही. परंतु पर्यटकांना व स्थानिकांना त्यांचा अंत अगदी स्पष्टपणे दिसत होता, कारण यावेळी तो केवळ लंगडत नव्हता तर उरलेल्या तीन पायांवर उड्या मारत होता, तरीही त्याच्या कार्यक्षेत्रावर खूण करायचा प्रयत्न करत होता व त्यासाठी लढा देण्यास तयार होता. मला असे वाटते माननीय उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याआधी (हा देखील वादाचा मुद्दा आहे) व वन विभागाने सीएमला उपचारासाठी उपशामक औषधे देण्याआधी माझे मित्र निखिल अभ्यंकर यांच्याकडे त्याची शेवटची ध्वनी-चित्रफित होती. मला आठवते, जेव्हा महानायक अमिताभ बच्चन यांना कुली चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी इजा झाली तेव्हा संपूर्ण देश त्यांच्या तब्येतीचा हालहवाल मिळावा यासाठी वाट पाहात होता, त्याचप्रमाणे संपूर्ण वन्यजगत सीएमच्या उपचाराविषयी जाणून घेण्यास उत्सुक होता, यातूनच तो केवळ ताडोबाचा नव्हता तर संपूर्ण वन्यजीवनाचा हिरो होता हे दिसून येते! दुर्दैवाने, वाईट बातमी समजली की सीएम आता पुन्हा जंगलात प्रवेश करण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही कारण ते त्याच्यासाठी तसेच गावकऱ्यांसाठी धोकादायक होऊ शकते, कारण भुकेमुळे बरेचदा उतावीळपणा वाढतो, हे आपण सगळे जाणवतो. म्हणूनच त्याला नागपूरमधील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात हलवण्यात आले आहे. मी म्हटल्याप्रमाणे समाजमाध्यमांमध्ये त्याच्या उदय व अस्ताविषयी अनेक गोष्टी छापून येत आहेत, परंतु जंगल या अशा गोष्टी जाणत नाही, ते केवळ टिकून राहा किंवा निघून जा एवढेच जाणते.

आता माणसांनी निसर्गाच्या अशा प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करावा का याविषयी वादासंदर्भात माझे मत असे आहे की आपल्याला सीएमसारख्या वाघांची गरज आहे कारण ते खऱ्या अर्थाने वन्यजीवनाचे महानायक व ब्रँड दूत आहेत. त्यांच्या जोरावर अनेक कुटुंबांची उपजीविका चालते व भरभराट होते. आपण संपूर्ण वन्यजीवनासाठी आधीच जागा कमी करून हस्तक्षेप केला आहे, जे अशा लढायांचे मुख्य कारण आहे, ज्या अधिक नियमितपणे होऊ लागल्या आहेत. म्हणूनच आपण सीएमसारख्या वाघाला अशी इजा झाल्यानंतर सर्वतोपरी संरक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एक कायमस्वरूपी धोरण तयार केले पाहिजे म्हणजे फार विलंब होणार नाही व एखाद्या वाघावर उपचार करण्यासाठी प्रत्येक वेळी उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागणार नाही व जंगलामध्ये वेळ अतिशय मोलाचा असतो! ताडोबा तसेच इतर जंगलांमध्ये अनेक प्रसिद्ध वाघ आहेत व यापुढेही असतील, तरीही तारांकित आकाशामध्ये सीएमचे स्थान ध्रूव ताऱ्याप्रमाणे असेल, कायमस्वरूपी व स्थिर, अगदी त्याच्या जीवनाविषयीच्या दृष्टिकोनाप्रमाणे.

मी सीएम व ताराचंद यांची जेव्हा ते अगदी बछडे होते तेव्हा त्यांची आई छोटी तारासोबत छायाचित्रे घेतली आहेत, परंतु सीएमला मोठा झाल्यानंतर पाहणे व त्याची छायाचित्रे काढणे राहून गेले होते. परंतु ऑक्टोबर २४ मध्ये, तो मला छान दिसला व त्याचा वयात आलेला बछडा कालुआसोबत त्याची काही छायाचित्रे घेता आली.  तेव्हा सूर्यप्रकाश अगदी कमी होता व मी त्याला आमच्या जिप्सीमागे चालत येताना पाहिले होते. ते चालणे अतिशय वेदनादायक होते, कारण मला त्याच्या इजेचे गाभींर्य व चेहऱ्यावरील व्रण जाणवले होते. परंतु त्या कमी प्रकाशातही दोन गोष्टी स्पष्ट होत्या एक म्हणजे चकाकते व स्थिर डोळे व प्रत्येक पावलोगणिक पावलांचा ठामपणा!  म्हणूनच सीएम हे केवळ एक नाव नाही, तर तो जगण्याचा एक दृष्टिकोन आहे संपूर्ण जगाविषयीचा, व केवळ एकाच मार्गाने, म्हणजे माझ्या मार्गाने जगण्याचा!. मी सीएमला गोरेवाडा प्राणीसंगहालयामध्ये भेटायला जाणार आहे, त्याला अशाप्रकारे पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवणे त्रासदायक असेल परंतु मला त्याला सांगायचे आहे, राजा कैदेत असला तरीही, “कैदेतील राजा” या नावानेच ओळखला जातो, जो तू आहेस, व सदैव राहशील, एवढे सांगून निरोप घेतो!


खाली दिलेल्या लिंकवर सीएमचे आणखी काही क्षण पाहा...


https://www.flickr.com/photos/coexistance_is_the_key/albums/72177720321143099/


संजय देशपांडे 

www.junglebelles.in 

www.sanjeevanideve.com

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!