शुद्ध हवा आणि आपली जबाबदारी
शुद्ध हवा आणि आपली जबाबदारी
“आपण जेवढे पृथ्वीवर जास्त प्रदूषण करू, तेवढा पृथ्वीवर जगण्याचा आपला हक्क कमी होत जाईल!"..- मेहमत मूरत इल्दान
"पर्यावरणातील बदल व वायू प्रदूषणाला कोणत्याही सीमा नसतात, व प्रतिजैविकांचा प्रतिकार कोणत्याही सीमांचे बंधन पाळत नाही. आफ्रिकेतील जीवाणू अमेरिकेतील माणसाला आजारी पाडू शकतात. इंडोनेशियाच्या जंगलातील वणव्यामुळे आशियाचा जीव गुदमरू शकतो."
- रोहिणी नीलकेणी
खरंतर मी आधीही या विषयावर लिहीले आहे व अशा विषयांवर पुन्हा लिहायचे नाही असे ठरवले होते (इतर लाखो देशवासियांप्रमाणे) कारण काहीच बदलत नाही. मला काहीवेळा राजा विक्रमादित्यासारखे वाटते, ज्याला तो वेताळावर विजय मिळवू शकणार नाही हे माहिती असूनही (कृपया गूगलवर विक्रम व वेताळ यांच्याविषयी शोधा, जर तुम्ही या दोन पात्रांविषयी माहिती नसण्याएवढे अनभिज्ञ किंवा व्यग्र असाल) त्याला पाठकुळी घेऊन जात असे व हा नित्यक्रम वर्षानुवर्षे सुरू होता, किमान माझ्या बालपणापासून ते आजपर्यंत तो सुरू आहे. केवळ लेखनाचा काही प्रयत्न वगळता माझ्यात व राजा विक्रमादित्यामध्ये काहीही साम्य नाही कारण शेवटी, विक्रमादित्य राजा होता व त्याच्या राज्यामध्ये त्याचा शब्द अंतिम होता, माझ्याबाबतीत मात्र तसे नाही, तरीही निर्धारामुळे मी ओढला जातो (म्हणजे वैतागतो) व आपण पुन्हा एकदा इथे आहोत. मला पुणे महानगरपालिकेकडून वायू प्रदूषणासंबधी एका बैठकीचे आमंत्रण मिळाले तेव्हा मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला त्याच निमित्ताने हा लेख लिहीत आहे. ही बैठक बांधकामाच्या स्थळी वायू प्रदूषण निर्देशांक मोजण्यासाठी यंत्रणा बसविण्यासंदर्भात होती व त्याचे कारण म्हणजे शहरात सुरू असलेली बांधकामे हे शहरातील वाढललेल्या वायू प्रदूषणामागचे एक प्रमुख कारण असल्याचे अधिकाऱ्यांना वाटते (अहवालांच्या आधारे). हे पूर्णपणे चूक नसले तरीही मी त्या मुद्यावर नंतर टिप्पणी करेन, आधी मी त्या बैठकीविषयी सांगतो. या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, विकासकांचे प्रतिनिधी तसेच एअर सेन्सर उत्पादकांकडचे अनेक लोक होते. बैठकीचा विषय होता ही प्रदूषण मोजणारी साधने बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी बसवायची जेणेकरून त्यांच्या हवेच्या दर्जाचा निर्देशांक तपासता येईल. हा चांगला विचार आहे व विकसित देशांमध्ये ही अजिबात नवीन गोष्ट नसून प्रमाणित पद्धत आहे. आम्ही सादरीकरणे पाहिली व बैठकीच्या अखेरीस ही समस्या असल्याचे मान्य करण्यात आले तसेच त्यासाठी एक कृती दल स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला जे या विषयाचा सखोल अभ्यास करेल व पुढील कारवाईसाठी एक अहवाल सादर करेल. मी त्यासंदर्भात माझ्या सूचना पाठवेन असे म्हटले व त्याच मी इथे देत आहे … (त्यातील काही बाबी अतिशय तांत्रिक वाटू शकतात परंतु विषयच तसा आहे).
१. इमारतींच्या वर्गवाऱ्या प्रति चौरस फूट आधारावर नव्हे तर प्रकल्पाच्या आराखड्यानुसार आणि मजल्यांनुसार निश्चित करा.
२. सध्याच्या प्रदूषणाच्या पातळ्यांनुसार शहराचे विभाग पाडा म्हणजे प्रकल्पाची सुरुवात होण्यापूर्वी प्रदूषणाचा निर्देशांक कारण आपल्याला तो माहिती असल्याशिवाय प्रकल्पामुळे प्रदूषणात भर पडली आहे का व किती पडली आहे याचा निर्णय आपल्याला कसा घेता येईल. उदाहरणार्थ एखादा प्रकल्प नळ स्टॉप, कर्वे रोड इथे सुरू होत असेल तर लाखो वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे तिथे हवेचा दर्जा आधीच निकृष्ट आहे, त्याचवेळी एखादी इमारत उपनगरांमध्ये बांधली जात असेल तर तेथील हवा अजूनही चांगली आहे, म्हणूनच या दोन प्रकल्पांना स्वतंत्रपणे हाताळले पाहिजे.
३. वायू प्रदूषण बांधकामाच्या टप्प्यावरही अवलंबून असते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खोदकाम किंवा जुने इमारत पाडण्याचे काम सुरू असते तेव्हा जास्त धूळ उडते, तर स्लॅब घालण्याच्या वेळी वायू प्रदूषण मध्यम असते तर केवळ शटर लावण्याचे काम सुरू असते तेव्हा काहीही वायू प्रदूषण होत नाही. अशा सर्व टप्प्यांमध्ये जर केवळ काही दिवसच हवेच्या दर्जाचा निर्देशांक मोजला तर आपल्याला वस्तुस्थिती कदाचित समजणार नाही, थोडक्यात आपल्याला निर्देशांक मोजण्यासाठी अशी यंत्रणा तयार करावी लागेल जी बांधकामाच्या टप्प्यांनुसार तो मोजेल.
५. वाहत्या हवे प्रमाणेच वायू प्रदूषण ही अतिशय फसवी गोष्ट आहे व ती बरीचशी वाऱ्याच्या स्थितीवरही अवलंबून असते, जर वाऱ्यामुळे एखाद्या ठिकाणचे धुलीकण दूर लोटले गेले तर तोच वारा प्रदूषण करणारे घटक विशिष्ट ठिकाणी पोहोचवू शकतो जी एखाद्या प्रकल्पाची जागा असू शकते. आपण हा पैलू लक्षात घेतला पाहिजे. निर्देशांकाच्या मापनावर मोसमामुळेही परिणाम होऊ शकतो म्हणजे उन्हाळ्यामध्ये हवा हलकी असते व हवेचा निर्देशांक अधिक चांगला असतो कारण उष्ण हवा अधिक हलकी होते व धुळीचे कण आकाशात ढकलते तर हिवाळ्यामध्ये हवा जड होते व नेमका उलटा परिणाम होऊन जमीनीच्या जवळची हवा प्रदूषित होते.
५. त्याचप्रमाणे रेती, खडी किंवा सिमेंट यासारखे बांधकाम साहित्य उतरवले जात असताना किंवा बांधकामाच्या ठिकाणी हलवले जात असताना या साहित्यामध्ये बारिक धुलीकण असतात व त्यामुळे निर्देशांक तात्पुरता अतिशय वर जाऊ शकतो. त्याचवेळी बहुमजली इमारत बांधताना प्रदूषणाची पातळी प्रत्येक मजला बांधला जात असताना सुरू असलेल्या कामांनुसार बदलू शकते कारण जर काही मजल्यावर जर टाईल बसविण्याचे/अंतर्गत प्लास्टरचे काम सुरू असेल तर तिथे हवेमध्ये अधिक धुलीकण असतील तर इतर मजल्यांवर जेथे या कृती पूर्ण झाल्या आहेत तेथे किमान किंवा अजिबात प्रदूषण दिसून येणार नाही.
६. धूलिकण दर्जा किंवा वायू प्रदूषणाचे स्वरूपही महत्त्वाचे असते कारण बहुतेक बांधकामाच्या स्थळी कोणत्याही धोकादायक रसायनांचे बारिक कण नसतात तर बहुतांशी मातीशी निगडित धूळच असते व ती कालांतराने खाली बसते. रसायनांचे कण मात्र हवेत बराच अधिक काळ हवेत तरंगत राहतात, तसेच हवेसोबत बराच लांब अंतरापर्यंत प्रवास करतात.
७. आपण प्रकल्पामुळे तयार झालेली धूळ प्रकल्पाच्या आवारातच राहावी यासाठी ज्या उपाययोजना वापरतो ज्यामुळे प्रकल्पातील हवेच्या दर्जाविषयी चुकीचे निकाल दिले जाऊ शकतात त्याविषयी विचार केलेला नाही.
८. केल्या जाणाऱ्या उपाययोजना व त्यांचा हवेच्या दर्जावर होणारा परिणामही आपण विचारात घेतला पाहिजे. म्हणजे इमारतीच्या संपूर्ण बाह्य पृष्ठभागावर पाणी फवारणे ही बांधकाम स्थळावरील कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यासाठी चांगली पद्धत नाही विशेषतः जेव्हा प्रकल्प अतिशय रहदारीच्या रस्त्यांवर असेल कारण सतत पाण्यामुळे जागा निसरड्या होतात.
९. प्रकल्पाच्या बाहेर प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या हवेचा दर्जा नमूद करणारा एलईडी स्क्रीन प्रदर्शित केल्यामुळे ज्यांना या विषयातील तांत्रिक बाबी माहिती नाही त्यांचा गैरसमज होऊ शकतो व प्रकल्पासाठी तसेच पुणे महानगरपालिका व स्थानिक अधिकाऱ्यांसाठी त्याचे उपद्रव मूल्य वाढू शकते.
१०. आपण जवळपास सुरू असलेल्या प्रकल्पातील कामांची स्थिती तसेच टप्पेही विचारात घेतले पाहिजेत कारण एकाच वेळी वेगवेगळी कामे सुरू असल्यामुळे परस्परविरोधी मापने येऊ शकतात, तसेच मोसम/ हवामान/हवेच्या दिशेनुसारही त्यावर परिणाम होऊ शकतो.
११. आपण वायू प्रदूषणास प्रतिबंध करणाऱ्या योग्य त्या उपाययोजना तयार केल्या पाहिजेत तसेच बांधकामाच्या ठिकाणी या सगळ्या परिस्थिती व टप्प्यांनुसार त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे, तसेच मापन कसे आले की काय उपाययोजना करायच्या याविषयी एक धोरण तयार करा व त्यानंतरच वायू प्रदूषणाचा निर्देशांक मोजण्यास सुरुवात करा. ही समिती कायमस्वरूपी अस्तित्वात असली पाहिजे जी सुरू असलेल्या प्रकल्पासंदर्भात आपणहून कारवाई करण्याआधी कोणत्याही तक्रारीची दखल घेईल!
आता, या माझ्या सूचना आहेत व मला खात्री आहे की इतरही अनेक असतील किंवा थोड्या असतील कारण या विषयाला अनेक पैलू आहेत, म्हणूनच आपण प्रत्यक्ष वायू प्रदूषणाच्या पैलूवर व बांधकाम उद्योगामध्ये त्याची भूमिका याविषयावर लक्ष केंद्रित करू. आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये पन्नास लाखांहून अधिक वाहने (त्याहून नक्कीच अधिक असतील) आहेत व त्यापैकी कोणत्याही वेळी निम्मी वाहने जरी रस्त्यावर असली, तरी त्यांच्या इंजिनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे वायू प्रदूषणामध्ये मोठी भर पडत असते व त्यासंदर्भात आपण काय करणार आहोत? त्याचवेळी दिवाळी शिवाय सुद्धा, विविध कारणांनी फटाके उडवणे ही नवीन फॅशन झाली आहे व हे नवीन फटाके हवेत उंच जातात व त्यांच्यामुळे आकर्षक आतषबाजी होत असली तरीही प्रचंड धूर निर्माण होतो म्हणून पुन्हा वायूप्रदूषण आलेच. मला खात्री आहे की या फटाक्यांमधून बाहेर पडणारा धूर दहा किंवा अधिक ट्रक रिकामे करताना उडणाऱ्या धुरळ्याएवढा असतो व बांधकामाच्या ठिकाणी उडणारी धूळ ही धोकादायक नसते कारण ती बहुतांशी नैसर्गिक साहित्यापासून (सिमेंट वगळता) तयार झालेली असते परंतु वाहने व फटाक्यांमधील धूर अधिक धोकादायक असतो हे अगदी लहान मुलांनाही माहिती असते व त्यासाठी आपण काय करणार आहोत, हा माझा प्रश्न आहे?
बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे ही समस्या असते की, जेव्हा वायू प्रदूषण हा विषय असतो तेव्हा तुम्ही खाजगी वाहने व फटाक्यांमधून बाहेर पडणारा धूर असे घटक नमूद करताच, तुमच्यावर स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा किंवा इतरांकडे अंगुली निर्देश करून स्वतःचे दोष लपवत असल्याचा ठपका ठेवला जातो, परंतु त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही, बरोबर? मी बांधकामांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचे समर्थन करत नाही, मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की वाहने किंवा फटाक्यांचा धूर वर्षभर व कायमस्वरूपी असतो, इमारतींच्या बांधकामामुळे होणारे प्रदूषण तात्पुरते असते, एकदा इमारत पूर्ण झाल्यानंतर त्यामुळे आपली हवा प्रदूषित होत नाही; म्हणूनच बांधकामाच्या ठिकाणी वायू प्रूदषण निर्देशांक तपासताना हा पैलू केवळ लक्षात ठेवा! रिअल इस्टेटविषयी अधिकाऱ्यांचा (म्हणजे सरकारचा) दृष्टिकोन विचारात घेता, काहीही समस्या निर्माण झाली की या सर्व तथ्यांकडे दुर्लक्ष केले जाते व थोडीशीही चूक झाल्यानंतर (इथे हवेच्या दर्जाच्या निर्देशांकाचे मापन), पहिली कृती काय केली जाते तर बांधकामाचे स्थळ बंद करण्याचे आदेश दिले जातात. याच कारणाने आपण असे एक धोरण तयार केले पाहिजे, ज्यामध्ये बांधकामाच्या ठिकाणच्या सर्व त्रुटींचा तसेच तथ्यांचाही समावेश आहे, माझ्या या लेखाचा हाच उद्देश आहे! त्याचवेळी, अहवाल विचारात घेता, बांधकामांमुळे शहराच्या वायू प्रदूषणामध्ये केवळ २०% भर पडते व बांधकाम पूर्ण होते तसे वायू प्रदूषण थांबते ही वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे या बांधकामाच्या ठिकाणी अनेक झाडेही लावली जातात जी खऱ्या अर्थाने हवा शुद्ध करतात, परंतु जोपर्यंत आम्ही इमारती पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्हाला नवीन झाडेही लावता येत नाहीत. रिअल इस्टेटचा हा पैलूही आपण लक्षात घेतला पाहिजे. सरतेशेवटी मी केवळ इतकेच म्हणेन, आपण या पृथ्वीवर जे काही निर्माण करू, जे नैसर्गिक नाही त्यामुळे केवळ हवेचेच नव्हे तर प्रत्येक नैसर्गिक स्रोतांचे प्रदूषण होणार आहे या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, परंतु आपण सगळे
अशी प्रत्येक गोष्ट तयार करण्यासाठी एकत्रितपणे जबाबदार आहोत, एवढे लक्षात ठेवू व त्यासाठी एकत्रितपणे लढू (म्हणजे धोरणे तयार करू), नाहीतर निसर्ग वगळता प्रत्येक गोष्टीला वाचवण्यासाठी तयार करण्यात आलेली अशी धोरणे केवळ कागदावरच राहतील, असा इशारा देऊन निरोप घेतो!
-
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
www.junglebelles.in
www.sanjeevanideve.com










टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा