सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सहजीवन!!
सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सहजीवन!!
“बरेचदा आपण ज्याला काही प्रजातींसाठी विकास म्हणतो, तो इतर अनेक प्रजातींकरता विनाश असू शकतो”… मी.
मला जाणीव आहे की या ओळी माझ्यासारख्या स्थापत्य अभियंता व बांधकाम व्यावसायिक असलेल्या व्यक्तीच्या तोंडी नव्हे तर एखाद्या कट्टर पर्यायवरणवादी किंवा संवर्धनवादी व्यक्तीच्या तोंडी अधिक शोभतील (म्हणजे योग्य वाटतील) परंतु म्हणून विकासाच्या बाबतीतली वस्तुस्थिती बदलत नाही, हाच विचार मी नुकत्यात दिलेल्या एका व्याख्यानात मांडला. निमित्त होते, जो खरेतर एक प्रकारे माझा गौरवच होता कारण मला राज्यभरातील अनेक तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधील स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांच्या एका गटासमोर भाषण देण्यासाठी (विचार मांडण्यासाठी) आमंत्रित करण्यात आले होते. शासकीय तंत्रनिकेतन, पुणे ज्याला सर्वजण जीपीपी म्हणून ओळखतो, तिथे काम करणाऱ्या माझ्या स्नेही प्राध्यापक सीमा व त्यांच्या सहकारी प्राध्यापक सिंधू यांनी मला आमंत्रित केले होते. त्यांनी जेव्हा मला सांगितले की मी मला हवा तो विषय निवडू शकतो. मला समारोपाच्या सत्रात बोलायचे असल्यामुळे, बहुतेक सहभागी तांत्रिक भाषणांच्या (अभियांत्रिकी संदर्भातील) भडिमाराने पाच दिवस कंटाळले असतील, म्हणूनच मी असा एक विषय निवडला जो अभ्यासक्रमाचा भाग नसला तरीही आपल्या स्थापत्य अभियांत्रिकच्या शाखेचेच नव्हे तर मानव जातीचे भविष्य आहे व त्याला सहजीवन असे म्हणतात. त्यांनी त्यासाठीच तात्काळ होकार दिला व मला कशाप्रकारे हा विषय मांडायचा आहे हे माझ्यावर सोडले, जी एक दुर्मिळ बाब होती व एक सन्मानही होता. श्री विश्वेश्वरैय्या यांच्या स्मरणार्थ 15 सप्टेंबरला साजरा होणारा अभियंता दिवस जवळच असल्यामुळे, मी दोन गोष्टींचा मेळ साधण्याचा निर्णय घेतला: स्थापत्य अभियांत्रिकी व सहजीवन! मी ज्याप्रमाणे बोलताना पीपीटीमध्ये मुद्दे मांडले होते तसा मी हा लेख लिहीला आहे जेणेकरून वाचकांना या लेखातील महत्त्वाच्या संकल्पना व मुद्दे समजतील.
1 स्थापत्य अभियांत्रिकी व सहजीवन शिकणे
तंत्रनिकेतनच्या प्राध्यापकांची बैठक 12 सप्टें 25
संजय देशपांडे व संजीवनीचा चमू जंगलबेल्ससह.
शासकीय तंत्रनिकेतन पुणे.
मी जाणीवपूर्वक जंगल बेल्सचे नाव नमूद केले कारण, स्थापत्य अभियांत्रिकी हे विज्ञान आहे किंवा नियमावली आहे परंतु सहजीवन ही जीवनशैली आहे व तुम्ही तिला काही नियमांच्या चौकटीत बसवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एखाद्या उत्प्रेरकाच्या मदतीची गरज असते, जी प्रजातींच्या जीवनशैलीसंदर्भात कार्य करते, जंगल बेल्सनेही माझ्यातल्या स्थापत्य अभियंत्यामध्ये हा बदल घडवून आणला!
2 स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय?
“जीवन अधिक चांगल्याप्रकारे जगता येईल असे बांधकाम करण्याकरता जी व्यक्ती त्याचे/तिचे तांत्रिक ज्ञान वापरणार व्यक्ती म्हणजे स्थापत्य अभियंता!”
इथे “जीवन” या शब्दामध्ये प्रत्येक सजीव प्रजातीचा समावेश होतो, म्हणजे, वनस्पती, जंगले, पृथ्वी, नद्या, डोंगर, तलाव, समुद्र अशी प्रत्येक गोष्ट जी स्वतः श्वास घेते व इतरांना श्वास घेण्यास मदत करते. दुर्दैवाने, आपण स्थापत्य अभियांत्रिकीची मूळ व्याख्याच विसरलो आहोत ज्यामध्ये आपण “जीवन” म्हणजे फक्त “मानवी जीवन” असा संकुचित अर्थच गृहित धरला आहे. हेच माणूस व निसर्गातील संघर्षाचे मुख्य कारण आहे जो आपल्याला आजकाल अधिकाधिक प्रकर्षाने पाहायला (म्हणजे त्रासदायकपणे) मिळतो आहे. तुम्ही मनुष्य व प्राण्यांमधील संघर्षाविषयी ऐकले असेल, परंतु ही त्याची केवळ एक बाजू झाली. प्रत्यक्षात माणसांनी निसर्गाविरुद्ध युद्ध पुकारले आहे व आपण स्थापत्य अभियंते म्हणजे माणसांच्या सैन्यदलासारखे आहोत जे निसर्गावर चाल केली आहे. आपण त्याला शत्रू म्हणत नसलो तरीही, आपण आपले बांधकाम करताना त्याचे रक्षणही करत नाही, हे सरतेशेवटी निसर्गासाठी अतिसंहारक शस्त्राप्रमाणे आहे हे आपण समजून घेणे व स्वीकारणे आवश्यक आहे. आता स्थापत्य अभियंत्यांची व्याख्या विस्तारणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला आपल्या बांधकामांमधून प्रत्येक सजीवाचे जीवन आरामदायक बनवता यावे हाच तुमच्याशी संवाद साधण्यामागचा माझा उद्देश आहे.
3 आपल्याला महाविद्यालयांमध्ये काय शिकवले जाते …
काँक्रिट, स्टील, विटा, बांधकाम व मजबूत तरीही निर्जीव गोष्टी बांधण्यासाठीची सूत्रे! ही सगळी सूत्रे व साहित्याचा जेसीबी, बुडडोझर, टॉवर क्रेन यासारख्या यंत्रसामग्रीच्या मदतीने आपण बांधकाम करतो, ज्यांना आपण इमारती, पूल, धरणे, कालवे, धक्का, विमानतळ, रेल्वे स्थानक, महामार्ग. बोगदे, गटारे, जलप्रक्रिया प्रकल्प अशी नावे देतो, ही यादी न संपणारी आहे. परंतु दुर्दैवाने (पुन्हा एकदा) या सगळ्या निर्जीव गोष्टी आहेत, त्या निर्जीव गोष्टींच्या पलिकडे, माणसांच्या आरामाव्यतिरिक्त आपल्याला काहीही शिकवत नाहीत. कोणत्याही स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला जैवविविधतेविषयी व आपली त्यासंदर्भात काय जबाबदारी आहे याविषयी शिकवले जात नाही व याच कारणामुळे आपल्या विकासाच्या गेल्या शंभर वर्षांमध्ये इतर अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत. या सर्व प्रजाती त्यापूर्वी हजारो वर्षे त्यांचे घर म्हणजेच पृथ्वी आपल्यासोबत वाटून घेत होत्या, हे पण विसरलो आहोत किंवा त्याकडे दुर्लक्ष करत आहोत, हे माझ्या लेखाचे कारण आहे.
4 वाढ विरुद्ध विकास!
वाढ ही नैसर्गिक बाब आहे, विकास म्हणजे हीच गोष्ट निरोगीपणे करणे, यालाच शाश्वतता असे म्हणतात!
एकदा आपल्याला स्थापत्य अभियंत्याचे खरे काम समजले, की त्यानंतर विकासाद्वारे वाढ समजून घेणे हा भाग येतो. आपण सर्व जण कुठल्या ना कुठल्या प्रकारचा जीव आहोत व प्रत्येक जीवालाच टिकून राहण्याची उर्मी असते. म्हणूनच, पालकांनी रस्त्यावर सोडून दिलेले अनाथ मूलही कसेबसे जगायला व मोठे व्हायला शिकतेच. परंतु ही वाढ केवळ वयाने मोठे होण्याचा एक भाग असते, ती विकासातून झालेली वाढ नसते. त्याचप्रमाणे तुम्हाला एखादा अपघात झाला आणि तुमच्या दंडाला मार लागून तो सुजला, तर तुम्ही त्याला वाढ म्हणाल का, अर्थातच नाही, ती सूज आहे, बरोबर? त्याचप्रमाणे जेव्हा विकासही योग्यप्रकारे केला जातो, पृथ्वीशी संबंधित प्रत्येक घटकाला जेव्हा त्यामध्ये समाविष्ट करून घेतले जाते व जेव्हा त्यांना त्यांच्या वाटची जागा मिळते तेव्हा विकासाच्या मार्गाने वाढ होते. पुन्हा एकदा, केवळ स्थापत्य अभियंता हे घडवून आणू शकतो कारण आपणच विकासाचे पहिल्या फळीचे शिलेदार आहोत व आपण खणतो, आपण बांधतो, म्हणून आपणच योग्य विकासाची व्याख्या करू शकतो व त्याचे पालन करू शकतो!
5. विकास नव्हे विनाश!
आपण विकासाच्या नावाखाली नेमके काय करत आहोत?
तुम्ही अभियंता म्हणून हा प्रश्न स्वतःला विचारला व अवती-भोवती पाहिले तर तुम्हाला जाणीव होईल की या विकासाचा परिणाम आहे, पूर, जंगलतोड, माणूस-प्राण्यांमधील संघर्ष, रस्त्यावरील अपघात मरण पावणारे प्राणी, प्रजाती नामशेष होणे, प्रदूषण व नैसर्गिक आपत्ती. आणि जर तुम्हाला असे वाटत असेल की हे कुणी उजव्या-विचारसरणीचा, कट्टर पर्यावरणवादी बोलत आहे, तर माफ करा, मी स्थापत्य अभियंता आहे, व मी गेली 35 वर्षे प्रकल्प बांधत आहे व तरीही मी हे म्हणतोय! अर्थात याचा अर्थ असा होत नाही की आपण (म्हणजे मी) घरे बांधणे थांबवावे व प्रायश्चित्त म्हणून हिमालयात जावे व तपस्या करावी. मी जो मार्ग निवडला आहे तो म्हणजे मला शक्य आहे तेवढे संतुलन राखण्याचा प्रयत्न करणे, व नेमकी इथेच स्थापत्य अभियांत्रिकी माझ्या तसेच जगाच्या मदतीला येणार आहे, आपण म्हणतो की चिमण्या शहरातून हद्दपार झाल्या आहेत व फुलपाखरेही दिसत नाहीत, दोन अगदी साध्या प्रजाती ज्यांच्या अगदी किमान गरजा असतात त्यांची ही परिस्थिती असेल तर माकडे व भारद्वाज यासारख्या प्रजातींचा तर विचारच करायला नको जे दोन दशके पूर्वीपर्यंत अगदी सहजपणे दिसत असत.
6. यावर तोडगा काय?
… सहजीवन!
हे काही रॉकेट विज्ञान नाही, मी आधीच म्हटल्याप्रमाणे ही काही बांधकामाच्या एखाद्या सूत्राने किंवा काँक्रिटच्या तंत्राने सुटणारी समस्या नाही, काही प्रमाणात आहे, परंतु योग्य विकास करण्यासाठीचा तोडगा म्हणजे सहजीवन समजून घेणे! माणसाला ज्याप्रमाणे घरे, रस्ते, पाणी, अन्न, शिक्षणाची गरज असते, त्याचप्रमाणे इतर प्रजातींनाही अशा सर्व गोष्टींची (आरामदायक गोष्टी वगळता) गरज असते व आपल्या बांधकामांमध्ये आपण त्यासाठी जागा तयार करणे आवश्यक आहे. प्रत्येक जीवाच्या गरजेनुसार त्याला जागा द्या, हाच यावरील तोडगा आहे. आपण पृथ्वीचे मालक नाही; इतर लक्षवधी प्रजातींसोबत आपल्याकडे तिचे सह-स्वामित्व आहे. आपल्या आरामाची सोय करण्यासाठी आपल्याकडे ‘स्थापत्य अभियंते’ आहेत, इतर प्रजातींचे काय, हा प्रश्न स्वतःला विचारा व सहजीवनाच्या मार्गावरील हे पहिले पाऊल असेल!
7. पृथ्वीवर सर्व भागधारांना विचारात घेऊन तुमच्या प्रकल्पाचे नियोजन करा
सहजीवनासाठी साचेबद्ध तोडगा असू शकत नाही!
सर्वप्रथम, आपण सहजीवनाविषयी बोलतो तेव्हा ते साध्य करण्यासाठी कोणतीही निश्चित नियमावली किंवा सूत्रे अथवा ऑटोकॅड ड्रॉईंग नसतात हे स्पष्टपणे समजून घ्या. तुम्ही शेजारच्या गावात किवा शहरात जे करण्यात आले आहे त्याची तुम्ही तुमच्या बांधकामाच्या ठिकाणी थेट नक्कल करू शकत नाही. त्यामुळे निश्चितच तोडगा काढण्यासाठी पाश्चिमात्य जग किंवा कृत्रिम प्रज्ञेकडे (सध्याचा कल) आशेने पाहता येणार नाही. त्याऐवजी अवतीभोवती पाहा व संदर्भ घेण्यासाठी जगात काय चालले आहे याचा अभ्यास करा. उदाहरणार्थ जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्टमधून जाणाऱ्या ऑटोबान या मार्गावरील बेडकांचे प्रकरण, त्यांनी एक दुर्मिळ जातीचा बेडूक वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बेडकांच्या आवाजाचे साऊंड टेप लावले!! आपल्या देशामध्ये चिमण्यांपासून ते मधमाशांपर्यंत कितीतरी प्रजातींकडे लक्ष देण्याची गरज आहे व या उपाययोजना त्यांच्या गरजांनुसार बदलल्या पाहिजेत, आपण त्यांच्या जीवनाचा हा पैलू निश्चित करून चालणार नाही. उदाहरणार्थ ताडोबामध्ये जंगलाच्या अवतीभोवती राहणाऱ्या गावकऱ्यांना नैसर्गिक विधींसाठी उघड्यावर जावे लागत असे व हे बहुतेकवेळा पहाटे किंवा रात्री उशीरा जावे लागत असे, यामुळे मनुष्य व प्राण्यांमधील संघर्ष या काळामध्ये सर्वाधिक असे. म्हणूनच सरकारने या गावांमध्ये सार्वजनिक शौचालये बांधली, परंतु त्यांच्यासाठी पाण्याची पुरेशी सोय नसल्यामुळे किंवा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी तरतूद नसल्यामुळे ही उपाययोजना केवळ दाखवण्यासाठी राहील व संघर्ष होत राहिले. नियोजन व त्याची अंमलबजावणी शेवटच्या पातळीपर्यंत करताना सहजीवनासंदर्भातील दृष्टिकोन कसा असतो याचे हे अगदी लहानसे उदाहरण आहे.
8. आधी सहजीवन समजून घ्या त्यानंतरच आपण वाटून घेऊ शकतो!
आपण ते कसे करू शकतो?
तुमच्या अभ्यासामध्ये निसर्गाचा समावेश करून घ्या. थेट नियोजनापासून कामामध्ये सहजीवनाचे तत्वज्ञान रुजवा, कारण तुम्ही अंमलबाजवणीला सुरुवात करण्याआधी मनात व कागदावर जसे नियोजन करता त्याचप्रमाणे ते बांधता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नागपूर ते जबलपूर असा राष्ट्रीय महामार्ग 44, पेंचभोवतालच्या जंगलाच्या भागामध्ये वर बांधण्यात आला आहे जेणेकरून वन्य प्राण्यांचे कॉरिडॉर वाचवता येतील. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गावरही प्राण्यांना रस्ता ओलांडता यावा यासाठी महामार्गाच्या वर मार्ग तयार करण्यात आले आहेत. कोणत्याही उपाययोजनेमुळे वन्यप्राणी व माणसांमधील संघर्ष शंभर टक्के थांबणार नाही हे मान्य असले तरीही त्यामुळे तो निश्चितपणे कमी होऊ शकतो व हाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
माहितीपट, प्रत्यक्ष भेटी, तज्ज्ञांशी, पर्यावरणवाद्यांशी चर्चा. शिका व सांगा.
-
9. तुमच्या विद्यार्थ्यांना केवळ स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवीधारक नव्हे तर चांगला माणूस कसा व्हायचे ते शिकवा!
याच ठिकाणी स्थापत्य अभियांत्रिकीच्या शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते, कारण तुम्ही आज तुमच्या विद्यार्थ्यांना जे शिकवणार आहात त्याचीच त्यांच्या संबंधित क्षेत्रांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. म्हणूनच, तुमच्या विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियंता म्हणून पृथ्वीसंदर्भात त्यांचे कर्तव्य काय आहे हे समजून सांगा व तुम्ही त्यांना मार्ग दाखवून दिला आहे आता त्यावर बांधकाम त्यांनाच करायचे आहे व ते विस्तारायचे आहे. कारण सहजीवन ही काही एखाद्या स्पर्धेची अंतिम रेषा नाही तर तो जगण्याचा एक मार्ग आहे आहे व तो साध्य करण्यात अपयश आल्यामुळे, आपली भावी पिढी आपल्यासारख्या स्थापत्य अभियंत्यांनाच दोष देईल, आता निर्णय आपल्या हातात आहे, एवढे सांगून निरोप घेतो!
तुम्ही सोबत दिलेल्या यूट्यूबच्या दुव्यावर सादरीकरण पाहू शकता व केवळ स्थापत्य अभियंत्यांनाच नव्हे तर इतरांनाही जागरुक करण्यासाठी ते जरुर शेअर करा ...
https://youtu.be/56xNo4wLUIg?si=u8r790TnxDhBVduB
संजय देशपांडे
www.junglebelles.in
www.sanjeevanideve.com











टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा