निलगिरीज, सिनेमा नाही भविष्याचा इशारा..!
निलगिरीज, सिनेमा नाही भविष्याचा इशारा..!
"आपल्याकडे असलेलं एकमेव जैववैविध्य म्हणजे कोक आणि पेप्सी यांची पैकी एकाची निवड. आपण संपूर्ण जगाचं सौंदर्य एका मागोमाग एक अशा मूर्ख चुकांनी नष्ट करत आहोत.” — चक पॅलानिक
“मी नेहमी म्हणतो की पृथ्वी आपलं कायमचं घर नाही. ‘घर’ या शब्दात मालकीची भावना दडलेली असते. पण पृथ्वी ही एक वसतिगृहासारखी आहे — जिथे आपल्याला एकत्र राहायला, एकमेकांशी वाटून घ्यायला आणि परस्परांची काळजी घ्यायला शिकावं लागतं.” — शिवांशु के. श्रीवास्तव
"सुपरमॅन असो किंवा कॅप्टन अमेरिका — ते खरे नाहीत. आपल्या पृथ्वीला वाचवणारे खरे हिरो म्हणजे कार्यकर्ते आणि जैववैविध्याचे रक्षण करणारे लोक.” — हकान कापुजू
चार्ल्स मायकेल पॅलानिक हे अमेरिकन कादंबरीकार आहेत. शिवांशु के. श्रीवास्तव हे लखनौ (भारत) येथे कार्यरत असलेले ख्यातनाम लेखक, कवी आणि कायदा व्यवसायिक आहेत. हकान कापुजू हे इस्तंबूल (तुर्की) येथील व्हीसी लॉ अँड कन्सल्टन्सीमध्ये टेक्नोव्हर्सल लीडर म्हणून कार्यरत आहेत. “आश्चर्याची बाब म्हणजे, वरील दोन कोट्स लिहिणारे लेखक कायदा क्षेत्राशी संबंधित आहेत. तरीसुद्धा त्यांनी मांडलेला विचार हा कायदे बनवण्याबद्दल नसून (हे बरं झालं!), त्यामध्ये सामाजिक नियमांचे अनेक पैलू गुंफलेले आहेत — आणि त्या बाबतीत प्राणी माणसांपेक्षा कितीतरी पुढे आहेत! आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो माझ्या दोन आवडत्या गोष्टींना एकत्र आणतो ( ताडोबा आणि क्रिकेट नाही). त्या म्हणजे – चित्रपट आणि निसर्ग/वन्यजीवन! मला ‘नीलगिरी’ नावाचा एक चित्रपट अचानक पहायला मिळाला (हो, अगदी ‘bumped on’ हा शब्दच योग्य आहे). हे नाव ऐकताना एखाद्या सुंदर स्त्रीचं नाव वाटतं (खरंतर तसं आहेही), पण प्रत्यक्षात हा ‘नीलगिरी’ पर्वतरांगेवरील एक माहितीपट आहे. दक्षिण भारतात असलेली ही पर्वतरांग आपल्या देशाच्या तळाच्या त्रिकोणी प्रदेशात पसरलेली आहे आणि ती पूर्व व पश्चिम घाटांना जोडते! नीलगिरी’ या नावामागचं कारण म्हणजे इथे आकाशात दिसणारा निळसर धुरकटपणा — म्हणूनच त्यांना ‘ब्ल्यू माउंटन्स’ म्हटलं जातं. पण हे फक्त भूगोलात गुण मिळवण्यासाठी शाळेत शिकवतात तसं सांगणं आहे. प्रत्यक्षात अशा शब्दांतून या निसर्गस्वर्गाचं खरे सौंदर्य उमजत नाही. आणि नीलगिरी पर्वतरांग केवळ आपल्यासाठीच नाही, तर हजारो प्रकारच्या प्रजातींसाठी जीवनदायी आहे, ज्यांपैकी अनेक प्रजाती तर फक्त याच डोंगररांगांमध्ये आढळतात! त्याच वेळी, भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील शब्द या अद्भुत स्वर्गाच्या अफाट रूपाची जाणीव करून देण्यात अपयशी ठरतात, तसेच जगभरातील असंख्य घटकांशी याचा असलेला संबंध, जे संपूर्ण पृथ्वीवरील जीवनाला अधिक सुंदर बनवतात – हेही आपल्या लक्षात येत नाही. आणि हाच माझ्या या कथनाचा मुख्य हेतू आहे!
ठीक आहे, नीलगिरी हा एक माहितीपट आहे, जो आपल्या देशातील तंत्रज्ञ, छायाचित्रकार, दिग्दर्शक आणि अशा संपूर्ण चमूने बनवला आहे. सर्वप्रथम, या देशाच्या या लपलेल्या रत्नावर चित्रपट साकारण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांना मी शंभर टक्के गुण देतो! लपलेलं’ असं मी म्हटलं कारण केवळ अनेक ‘वाइल्डलायफर्स’ (ज्यांच्याकडे भारी कॅमेरे असतात आणि त्यांना वाटतं की त्यांना वन्यजीवनाचं सगळं ज्ञान आहे) एवढेच नव्हे तर आपलं वनविभाग आणि शेवटी आपले शासकसुद्धा (त्यांना अशा गोष्टी कधी माहिती असतात का? – उपरोध) या जंगलाच्या संपूर्ण अस्तित्वाबद्दल अनभिज्ञ आहेत. आणि हे जंगल आज मोठ्या धोक्यात आहे (नेहमीप्रमाणेच – उपरोध). यामागचं मुख्य कारण म्हणजे याचं दुर्गम स्थान आणि वाघांचे दुर्मिळ दर्शन,म्हणुन जास्त वन्यजीव प्रेमी इथे येत नाहीत आणि समाज माध्यमांवर निलगिरीची फारशी चर्चा होत नाही. त्यामुळे इथे चाललेलं निसर्गाच प्रचंड नुकसान लोकांच्या लक्षातच येत नाही! हे वेगळं सांगायला नकोच की या धोक्याचं मूळ आपण मानवच आहोत. कारणं म्हणजे – नीलगिरी परिसरातील चहा/कॉफीच्या शेती आणि लागवडी, पर्यटन आणि तथाकथित विकासकामं जसं की रस्ते, रेल्वेमार्ग आणि अजून कितीतरी. या चित्रपटातील सर्वात प्रभावी भाग म्हणजे त्यांनी टिपलेली दृश्यं – रस्ता ओलांडताना झुंडीनं चालणारे भारतीय गवे, चहाच्या मळ्यातील रिकाम्या घरात घुसणाऱ्या अस्वलाचा सीसीटीव्ही व्हिडिओ, आणि बंगल्याच्या व्हरांड्यातून पाळीव कुत्र्याची शिकार करणारा बिबट्या! अशा सगळ्या क्षणांमधून आपल्याला जाणवतं की या वन्य प्रजाती किती आकांताने प्रयत्न करत आहेत, आपल्या घराभोवती सगळीकडून मानवांनी (आणि प्रदूषणानं) वेढलेल्या वातावरणात जिवंत राहण्यासाठी. या प्राण्यांकडे स्वतःचं संरक्षण करण्याचा कोणताही मार्ग नाही, म्हणूनच त्यांना मानवांचे नियम शिकावे लागत आहेत आणि त्यांच्याच पद्धतीनं जगायला सुरुवात करावी लागत आहे!
साधारणपणे अशा प्रकारचे वन्यजीवनावरील चित्रपट फारसे लोक चित्रपटगृहात किंवा टॉकीजमध्ये पाहायला जात नाहीत. आणि जे जातात ते अशा चित्रपटांच्या अप्रतिम छायाचित्रणानं मंत्रमुग्ध होतात. नॅटजिओ, डिस्कवरी किंवा अॅनिमल प्लॅनेटसारख्या वाहिन्यांमुळे भारतीय प्रेक्षकांनाही वन्यजीवन छायाचित्रणाचा मोठा परिचय झाला आहे, त्यामुळे या सगळ्याशी ‘नीलगिरी’ची तुलना होणं ओघानं आलंच आहे! मी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, ‘नीलगिरी’मध्ये तुम्ही वाघाच्या शिकारीचे थरारक दृश्य, पाण्याखाली केलेले साहसी चित्रीकरण किंवा जीवावर बेतणारे पाठलाग यासारखं काही ‘एक्झॉटिक’ छायाचित्रण अपेक्षू नका! हो, यात वाघाचे ड्रोनद्वारे टिपलेले अप्रतिम दृश्य आणि त्याची अपयशी शिकार, तसेच रानकुत्र्यांच्या टोळीच्या जीवनशैलीचे दुर्मिळ चित्रण आहेच; पण ‘नीलगिरी’ बघण्याचा खरा अर्थ आहे निसर्गाचं आपल्या आजूबाजूला चालणारं रोजचं जीवन आणि त्याचा मानवाकडून होणारा विनाश टिपणं! इथेच ‘नीलगिरी’ वेगळा आणि खास ठरतो, कारण तो आपल्याला मानवांच्या मधोमध राहणारं वन्यजीवन दाखवतो आणि त्यामागची कारणं समोर आणतो. ही जैवविविधतेनं समृद्ध अशी अद्भुत पर्वतरांग ब्रिटिश राजवटीत चहा आणि कॉफीच्या मळ्याखाली कशी दडपली गेली आणि त्यामुळे या अधिवासाचं मूळ स्वरूप कसं बदललं, हाच या चित्रपटाचा गाभा आहे. या एका गोष्टीवरूनच ब्रिटिशांनी आपल्या देशाचं किती नुकसान केलंय याची जाणीव होते. आणि दुर्दैवानं, ते निघून गेल्यानंतरसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं हे नुकसान करून ठेवलं, त्याच पद्धतीनं आपण आजही ते पुढे चालवत आहोत! ब्रिटिशांनी आपल्याकडून कोहिनूर, सोने–नाणं–दागदागिने लुटले, पण तो एकदाच झालेला तोटा होता. मात्र आपल्या संस्कृतीवर आणि निसर्गावर त्यांनी केलेला अतिक्रमणाचा तोटा आपण आजही भोगत आहोत. ‘नीलगिरी’ हा चित्रपट हाच पैलू आपल्यासमोर अगदी उघड, ठसठशीत आणि कडवट पद्धतीनं ठेवतो, जो आतापर्यंत कुणीच दाखवला नव्हता. आजपर्यंत कूर्ग, कन्नूर, मडिकेरी, ऊटी या सगळ्या ठिकाणांना पर्यटकांचं स्वर्ग मानलं जातं, हिरवाईने नटलेली डोंगररांग आणि कॉफी-चहाच्या मळ्यांतील रिसॉर्ट्स त्यांच्या नजरेत सुखद निसर्गसौंदर्याचं आकर्षण आहेत. पण या तथाकथित विकासासाठी आसपासचं वन्यजीवन कोणती किंमत चुकवतंय, हे मात्र कुणीच दाखवायचा प्रयत्न केला नाही. ‘नीलगिरी’ने मात्र हे धाडसानं समोर आणलं आहे! आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे – ज्या पद्धतीनं वन्यप्राणी माणसांसोबत राहायला शिकत आहेत, त्याची जाणीव फारशा शहरी लोकांना नाही. स्थानिक सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं ‘नीलगिरी’ आपल्याला सूर्यास्तानंतर शहरांच्या रस्त्यांवरचं वास्तव दाखवतो. मानवांमुळे घरं आकुंचन पावल्यावरही हे प्राणी ज्या पद्धतीनं स्वतःला जुळवून घेत आहेत ते कौतुकास्पद आहे, पण तितकंच हृदय पिळवटून टाकणारंही आहे, जसं की बिबट्या घरगुती कुत्र्याची शिकार करताना किंवा भारतीय गव्हर गाड्यांच्या हेडलाईट्सशी डोळे जुळवत रस्ता पार करताना दिसतो, तेव्हा आपल्याला अस्वस्थ करतं, अर्थात आपण जर या गोष्टींना थोडं जरी मनावर घेतलं तर! त्याचप्रमाणे, अस्वलांच्या कुटुंबानं किंवा बिबट्यांनी चहाच्या मळ्यांभोवती मानवी हालचालींच्या हंगामी बदलांनुसार आपलं वास्तव्य जुळवून घेतलेलं पाहणंही फारच हृदयस्पर्शी आणि माहितीपूर्ण आहे.
शेवटी एवढंच सांगायचं की ‘नीलगिरी’ हा फक्त एक चित्रपट किंवा माहितीपट नाही, तर तो संपूर्ण मानवजातीला (विशेषतः आपल्या देशाला) दिलेला संदेश आहे — किंवा खरं तर इशाराच आहे. कारण ज्या दिशेनं आपण विकासाच्या नावाखाली चाललो आहोत, ती दिशा प्रत्यक्षात विनाशाकडे नेणारी आहे! नीलगिरी’च्या कथानकात नायक ना माणसं आहेत, ना प्राणी, ना झाडं, इथे मुख्य भूमिकेत आहे निसर्ग (म्हणजेच जैवविविधता). खरं तर संपूर्ण चित्रपटातला एकमेव पात्रच निसर्ग आहे! आपल्या जीवनातसुद्धा निसर्गच खरा नायक आहे, पण बहुतेक वेळा तो पार्श्वभूमीत शांतपणे असतो… जोपर्यंत तो ओरडायला लागणार नाही. आणि एकदा निसर्गाची ही किंकाळी सुरू झाली की मग आपल्याला तिच्याकडे लक्ष द्यावंच लागतं, आणि त्याची किंमतही चुकवावी लागते.
नीलगिरी’ मानवी लोकसंख्येच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रश्नालाही स्पर्श करतो, ज्याबाबत प्रत्येक शासक आणि प्रत्येक राजकीय पक्ष गप्प आहे, डोळेझाक करतो. पण निसर्गाने असं कधीच केलेलं नाही! जर आपण आपल्या विकासात वन्यजीवनाला सामावून घ्यायला शिकलो नाही, तर एक गोष्ट निश्चित आहे, तो विकास नसून विनाश ठरेल. आणि हाच इशारा ‘नीलगिरी’ आपल्याला देतोय असं मला वाटतं! आणि हो, श्री. नंदन निलेकणी आणि त्यांच्या परिवाराचे मनःपूर्वक आभार- कारण त्यांनी या प्रकल्पासाठी निधी दिला. वन्यजीवनाबाबत जागृती निर्माण करण्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते आणि दुर्दैवानं या कार्यासाठी आपल्या देशातील श्रीमंतांचे खिसे फारशी मदत करत नाहीत हे सत्य आहे. पण निलेकणी यांनी हे काम केलं, म्हणून त्यांचे मनापासून आभार! तसेच या प्रकल्पाला पाठिंबा दिल्याबद्दल संबंधित राज्यांच्या वनविभागांचेही आभार. चित्रपट परीक्षणाबद्दल बोलायचं झालं तर मी एवढंच सांगेन — प्रत्येकाने ‘नीलगिरी’ हा चित्रपट नक्की पाहावा. आणि पाहिल्यानंतर आपल्या जीवनात एक गोष्ट नक्की अंगीकारावी — ती म्हणजे, वन्यजीवनासोबत सहअस्तित्व शिकणं. कारण जर तुम्हाला फुलपाखरं, पक्षी, फुलं, गवत, झाडं, ओढे आणि हो, वाघही असलेली दुनिया हवी असेल — तर हे सहअस्तित्व गरजेचं आहे! या संदेशासह तुम्हाला निरोप…!
संजय देशपांडे
smd156812@gmail.com
संजीवनी डेव्ह.
कृपया खालील युट्यूब लिंकवर जंगल बेल्सचे conservation initiatives बघा आणि शेअर करा ..
https://youtu.be/2j_A41RdorQ?si=8FsmHHxF0_Ivxb7U









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा