कुशलता नावाची कला..!!
कुशलता नावाची कला..!!
“कुशल माणसाला योग्य परिणामांसाठी नियुक्त केले जाते, कारणे देण्यासाठी नव्हे.”
“एका चांगल्या तलवारीपेक्षाही तलवारपटू अधिक महत्त्वाचा असतो.”
― अमित कलंत्री.
अमित कलंत्री हे व्यावसायिक जादुगार व संमोहनतज्ज्ञ आहेत, जे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण व सफाईदार जादूचे खेळ व निखळ विनोदासाठी ओळखले जातात. ते त्यांच्या “ब्युटीफूल माइंड्स” या संस्थेद्वारे जादू व इतर बौद्धिक कलांचे प्रशिक्षण देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला विकीपीडियावरून समजले की ते विदर्भामधील माझ्या खामगाव नामक गावाजवळच असलेल्या अकोल्याचे आहेत. मी क्वचितच कधी एका लेखामध्ये एकाच लेखकाची दोन अवतरणे वापरली आहेत, यावरून अमित यांचे या विषयावरील प्रभुत्व दिसून येते ते म्हणजे माणसे व त्यांचा केवळ कामाबद्दलचाच नव्हे तर एकंदरच जीवनाबद्दलचा दृष्टिकोन दिसून येतो. तुम्ही आता विचारात पडला असाल (नक्कीच पडला असाल) की मी एरवी ताडोबा व आजकाल क्रिकेट हे विषय सोडून आज या कुठल्या विषयावर बोलत आहे. त्यासाठी माझ्या एका मैत्रिणीचे आभार की तिने मला चिमटा काढला व जाणीव करून दिली की मी एक अभियंता आहे व व्यावसायिकही सुद्धा आहे (म्हणजे बांधकाम व्यावसायिक) व कामात बर्याच समस्या व मुद्दे आहेत ज्याकडे मी लक्ष दिले पाहिजे. मानवी मनाची गंमत आहे, एखाद्या मुद्द्याविषयी किंवा विषयाबद्दल आपण वारंवार वैतागतो किंवा नकारात्मकता असते, तेंव्हा तो विषय टाळण्याकडे तुमच्या सुप्त मनाचा कल असतो, मग तो तुमच्या कामासाठी किंवा व्यवसायासाठी कितीही महत्त्वाचा का असेना, एवढी तुमच्या मनाची ताकद असते. मला खात्री आहे की तुम्ही अजूनही विचार करत असाल की आता हे मन कुठल्या दिशेने चालले आहे, तर रिअल इस्टेटमधील ( एकंदरीत व्यावसायिक कामाच्या) कामाच्या दर्जाविषयी बोलत आहे. तो फक्त बांधकामाचे स्थळ किंवा बांधकामापुरताच मर्यादित नाही तर या उद्योगाच्या प्रत्येक पैलूला, मग ते विपणन असो, देखभाल असो, किंवा अगदी प्रशासन अथवा मनुष्यबळ विभाग असो. या सगळ्याची सुरुवात झाली माझ्या मैत्रिणीच्या कामवालीच्या घरी दुरुस्तीच्या कामापासून. तिच्या घराच्या टाईल्स बदलण्यासाठी आम्ही आमच्या एका कामावरून मजूर व गवंडी पाठवले होते. त्या गरीब बाईसाठी ती खरोखरच मोठी मदत होती व त्या मजुरांनी ते काम पूर्ण केले परंतु त्यासाठी बराच पाठपुरावा घ्यावा लागला. शेवटी काम पूर्ण झाल्यानंतर माझ्या मैत्रिणीने आभार मानण्यासाठी मला कॉल केला होता परंतु कामामध्ये काही समस्या होत्या असे तिने सांगितले. टाइल बसवल्यानंतर सफाईचे काम व्यवस्थित करण्यात आले नव्हते (किंबहुना अजिबात करण्यात आले नव्हते) व त्या माणसांनी टाइल बसवण्यासाठी एका भिंतीवरून काढलेली टीव्हीची फ्रेम मोडून ठेवली व तिच्या मोलकरणीला ती बसवून घेण्यासाठी अर्ध्या दिवसाची रजा घ्यावी लागली. ती एकमेव पालक असल्यामुळे तिला घरी मदत करण्यासाठी कुणीही नव्हते. माझ्या मैत्रिणीने मला विचारले की, या कामामुळे तिच्या कामवालीची मोठी मदत झाली, परंतु तुझी माणसे अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकली नसती का व उरलेले साहित्य वेळेत साफ करण्यासाठी जास्तीचे कष्ट पडणार नसताना ते तिथेच टाकून जाण्याची काय गरज होती? विशेषतः त्यांनी मुख्य काम पूर्ण केल्यानंतर, अशा बारीक-सारीक त्रुटी राहिल्यामुळे शेवटी कडवटपणा राहतो ना ? या प्रश्नामुळे माझ्या कामातील म्हणजे रिअल इस्टेटमधील सुप्त (म्हणजे मी लपवलेल्या) प्रश्नाने डोके वर काढले, ते म्हणजे कामातील नेटकेपणा व काम चांगल्याप्रकारे कसे करायचे हे समजून घेणे. खरे सांगायचे, तर वाहतूक, पाणी, कचरा, किंवा नागरी नियोजन यापेक्षाही मी ज्यामुळे सर्वात जास्त वैतागत असेन तर ते व्यवहारात व्यावसायिकता या विषयामुळे व म्हणूनच मी त्याविषयी लिहीण्याचे व अगदी चर्चा करण्याचेही टाळत होतो. आता सुप्त मनाविषयी एवढी प्रस्तावना का लिहीली हे तुम्हाला कळून चुकले असेल!
मी त्या मजुरांना पुन्हा त्या घरी पाठवले व त्या कामवाल्या बाईला तिच्या कामात जाणवलेल्या समस्यांचे निराकरण केले. परंतु तो विषय माझ्या मनात रेंगाळत राहिला. आजकाल उद्योगातील किंवा बांधकाम स्थळाशी संबंधित माझ्या वयोगटातील माणसे जेव्हा एकत्र जमतात, ज्यांनी वयाची पंचेचाळीशी ओलांडली आहे, तेव्हा चर्चेचा एकच विषय असतो तो म्हणजे “आपल्यावेळी असे नव्हते” (म्हणजे, आपल्यावेळी काम वेगळ्या प्रकारे केले जात असे). मी खरोखरच सांगतोय, आमचा काळ म्हणजे काही अगदी तीस-चाळीस वर्षांपूर्वी नव्हे, तर जेमतेम दहा-पंधरा वर्षांपूर्वी. आता संपूर्ण काम करण्याच्या पद्धतीतच आमूलाग्र बदल झाला आहे (मी ज्याला दृष्टिकोन असे म्हणतो). असे वाटणारा मी एकमेव व्यक्ती नाही, तर ज्याला किंवा जिला आपल्या कामाविषयी आत्मीयता वाटते अशा प्रत्येक व्यक्तीला, मग ते बांधकाम स्थळ असो किंवा कार्यालय, दस्तऐवजांमध्ये नोंद असो, देयके तयार करणे असो, विक्री किंवा देखभाल, कोणतीही गोष्ट असो, हातातील कोणतेही काम किंवा गोष्ट पूर्ण करून घेण्यासाठी आजूबाजूच्या लोकांशी व्यवहार करताना, त्या व्यक्तीला हा फरक जाणवतो. आम्ही काही दुसऱ्या ग्रहावरून आलो होतो किंवा अधिक सरस होतो असे माझे म्हणणे नाही, किंबहुना आजकालची पिढी अधिक हुशार, प्रभावी, वेगवान व व्यवहारी आहे. परंतु ते त्यांची कौशल्ये कुठल्याही कामामध्ये केवळ त्यांचे स्वारस्य असेल तरच वापरतात, तरच ते कार्यक्षम असतात, नाहीतर त्यांना कामाची अजिबात फिकीर नसते व हे विधान मी पूर्णपणे शुद्धीत राहून करतोय. मला आजकालच्या पिढीचा अपमान करायचा नाही किंवा त्यांचे हेतू किंवा कौशल्यांबद्दल शंका घ्याची नाही, परंतु चांगले अथवा योग्य काम म्हणजे काय किंवा हातातील काम पूर्ण कसे करायचे याची व्याख्याच त्यांना माहिती नाही, हा माझ्या लेखाचा विषय आहे.
कदाचित समस्या ही आमचीच असावी (म्हणजे आमच्या पिढीची) कारण आम्ही पुढच्या पिढीला चांगल्या कामाचा वारसा देऊ शकलो नाही, ज्याप्रकारे तो आम्हाला हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु यामुळे वस्तुस्थिती व कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या बदलत नाहीत. दिवसभराचे काम संपल्यानंतर टाकाऊ साहित्य उचलू टाकण्यासाठी बांधकामाची जागा व्यवस्थित तपासणे किंवा अंधार पडल्यानंतर बांधकामावरील दिवे लावणे किंवा संबंधित कामाचे नकाशे फाइलला व्यवस्थित लावून ठेवणे किंवा आलेली काही कागपत्रे व्यवस्थित नोंद करून ताब्यात घेणे किंवा एखाद्या फोन कॉलला उत्तर देणे, हातातील काम अपूर्ण सोडणे किंवा ते योग्यप्रकारे पूर्णत्वास न नेणे अशी ही यादी हनुमानाच्या शेपटीप्रमाणे (कृपया गूगल करा) लांबलचक आहे. इथेच काम चांगल्याप्रकारे करण्याबाबतचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो कारण बहुतेक लोकांना (म्हणजे कर्मचाऱ्यांना किंवा काम करणाऱ्या चमुला) संबंधित व्यक्तीकडून त्यांना दिलेल्या कामातून काय निष्पन्न होणे अपेक्षित आहे हे समजत नाही (किंवा त्यांना त्याची फिकीर नसते). काम चांगल्या प्रकारे करणे म्हणजे तुम्हा एखादे काम ज्याप्रकारे करायला सांगितले आहे किंवा तुम्हाला देण्यात आले आहे ते त्याच प्रकारे करून दाखवणे व त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते म्हणजे ते काम समजून घेणे जो आजकालच्या पिढीचा सर्वात कमजोर दुवा आहे. मी आज एखाद्या कंपनीचा मालक आहे किंवा टेबलाच्या दुसऱ्या बाजूला बसतो म्हणजे साहेब आहे म्हणून मी हे म्हणत नाही, कारण मीसुद्धा बराच काळ एक सामान्य कर्मचारी म्हणून काम केले आहे व लोक कसे काम करत असत हे पाहिले आहे. जी माणसे फक्त कामापुरते काम करतात किंवा पगार मिळतो म्हणून काम करतात अशी माणसे नेहमीच जास्त असतील परंतु अशीही माणसे होती त्यांनी केवळ पैसे मिळतात म्हणून काम केले नाही तर आणखी कशासाठी तरी काम करत व ते आणखी काहीतरीच बहुतेक लोकांच्या कामातून वजा झालेले दिसत आहे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.
विशेष म्हणजे या विषयाचा विचार करताना मी जेव्हा मनातून अतिशय वैतागलेलो होतो, तेव्हा माझ्या वाचण्यात साहेबाचा अधिकार गाजवण्याविषयी एक अतिशय सुंदर लेख आला, ज्यामध्ये साहेबाच्या ( बॉसचे वागणे) चुकीच्या वागण्याविषयी व त्याच्या कामातील त्रुटींविषयी लिहीले होते व कामाच्या या पैलूचाही मी आदर करतो. खरंतर कोठल्याही बॉसवर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो ते म्हणजे, तुमचे वरिष्ठ कोण होते व त्यांनी तुम्हाला कशाप्रकारे प्रशिक्षण दिले (म्हणजे वागवले) कारण ही शिकवण (म्हणजे, घाव) दीर्घकाळ तुमच्यासोबत राहते, परंतु तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करायची निवड स्वतः केलेली असते, कारण त्यातूनच तुमचे भविष्य घडणार असते. हे युग फायद्याचा विचार करणारे आहे व तो सुद्धा झटपट हवा असतो, कुणाचीही थांबायची तयारी नसते व यामुळे तुमचे काम शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठी समस्या निर्माण होते कारण काम चांगल्याप्रकारे कसे करायचे हे शिकताना कोणत्याही पळवाटा नसतात, त्यामुळे आधी शिकावा लागतो तो संयम, मी हेच सर्व वरिष्ठांना (म्हणजे माझ्यातल्या वरिष्ठालाही) तसेच कर्मचाऱ्यांनाही सांगेन कारण तुम्ही कुठेलेही काम करताना तुम्हाला उपयोग होईल अशी कौशल्ये मिळवा, स्वतःच्या भल्यासाठी काम चांगल्याप्रकारे कसे करायचे ते शिका व या प्रक्रियेमध्ये तुमच्या कंपनीचाही फायदा होईल असा साधा तर्क आहे. परंतु त्यासाठी वेळ दिला पाहिजे व कामातील बारीक-सारीक तपशीलांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, मग ते काहीही असोत. मग ते एखाद्या कॉलला उत्तर देणे असो, तुमचे टेबल नीटनेटके आवरून ठेवणे असो किंवा कामाची दैनंदिनी ठेवणे असो, जर तुम्हाला चांगले काम अचूकप्रकारे करायचे असेल तर अगदी लहानात लहान गोष्टही अतिशय महत्त्वाची ठरते. अनेक लोकांची आणखी एक समस्या म्हणजे लिखाणाचा आळशीपणा किंवा काहीही लिहीण्यास टाळाटाळ करणे कारण एकीकडे आपण आपल्या स्मरणशक्तीचा वापर करत नाही (गूगल व स्मार्टफोनची कृपा) व दुसरीकडे महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवण्याची सवय आपण लावून घेत नाही व त्यामुळे त्रुटी राहतात, चुका होतात, कामे विसरली जातात व परिणामी ताण निर्माण होतो, तुमच्यावर व तुमच्या वरिष्ठांवरही. एक लक्षात ठेवा हे वरिष्ठांनाही लागू होते, कारण आज कदाचित तुम्ही कुणाच्या तरी हाताखाली काम करत असाल परंतु उद्या तुमच्यासाठी कुणी काम करेल व तुम्ही स्वतःला चांगल्या सवयी लावून घेतल्या नसतील तर त्या तुमच्या कनिष्ठांना लागतील अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता, बरोबर?
त्याचसोबत तुम्हाला देण्यात आलेल्या किंवा तुम्ही स्वीकारलेल्या कोणत्याही कामाची जबाबदारी घ्यायला शिका, तुम्ही जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच काम चांगल्याप्रकारे करण्याची कला कधीच शिकणार नाही. माझे शब्द काहीतरी महान वाटावेत म्हणून केवळ मी हे बोलत नाही अथवा एखाद्या व्यवस्थापन गुरूच्या पुस्तकातून ते उसने घेतलेले नाहीत, तसेच ते चॅट जीपीटीच्या (आजकालचा परवलीचा शब्द) मदतीनेही लिहीलेले नाहीत, तर मला नेहमी माझ्या कामाविषयी हे वाटत आले आहे. कामाची जबाबदारी घ्या असे मी जेव्हा म्हणतो, तेव्हा तुम्ही कोणत्या पदावर काम करत आहात किंवा कुणासाठी काम करत आहात किंवा तुम्हाला त्या कामासाठी किती पैसे मिळत आहेत असा विचार करू नका कर केवळ हे तुमचे काम आहे व तुम्हीच येथे बॉस आहात असा विचार करा म्हणजे तुम्हाला त्या कामाचे असे पैलू दिसू लागतील ते तुम्हाला कुठल्याही बिजनेस स्कूलमध्ये शिकवले जाणार नाहीत. यासाठी माझ्या स्वतःच्या व्यवसायाचे मी एक छोटेसे उदाहरण देईन, माझ्या संघातील कुणीही सदस्य (मला त्यांना कर्मचारी म्हणायला आवडत नाही) अंतिम निर्णय घेण्यासाठी एखादे दरपत्रक किंवा कामाची मागणी घेऊन येतात, मग ते विजेचे देयक असेल किंवा एखाद्या टाइलच्या कंत्राटदाराचे दर असतील किंवा कारच्या विम्याचे नूतनीकरण करायचे असेल व अशाच कोणत्याही गोष्टी असतील, तर मी त्यांना फक्त एक साधा प्रश्न विचारतो, आधीच तुमच्या खिशातले पैसे खर्च होणार आहेत असा विचार करा व त्यानंतर माझ्याकडे या. म्हणजे विजेचे देयक असेल तर तुम्ही तुमच्या घरचे वीज देयक असेल तर प्रत्येक युनिट व त्यासाठीचा दर तपासला असता, तुम्ही कुठलेही विजेचे देयक तपासत असताना तसेच करा. जर कारच्या विम्याचे नूतनीकरण करायचे असेल, तर तुम्ही स्वतःच्या दुचाकीच्या विम्याचे नूतनीकरण करत असताना त्याच्या अटी व शर्ती, तसेच हप्त्यांची रक्कम जेवढी काटेकोरपणे तपासली असती तेवढ्याच काटेकोरपणे तपासा. तुम्ही स्वतःच्या घरात टाइल बसवत आहात असा विचार करा व त्यानंतर कंत्राटदारांचे दर ठरवा, यालाच मी कामाची जबाबदारी घेणे म्हणतो, कारण यानंतर तुम्ही एखादी चूक केली तर काही हरकत नाही कारण तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत व त्यानंतर घडलेल्या चुकांमधून तुम्ही अधिक चांगले व्हाल, कारण आता तुम्ही त्या चुकांचीही जबाबदारी घेता. हाच दृष्टिकोन कामाच्या प्रत्येक पैलूसाठी लागू होतो ज्याचा दुर्दैवाने कर्मचारी व मालकांमध्येही अभाव दिसून येतो, जी आज काम करतानाची मोठी समस्या आहे. काम चांगल्याप्रकारे करण्यात नैपुण्य मिळवण्यासाठीचा एकमेव उपाय म्हणजे संयम राखणे, प्रशिक्षण व स्वतःच्या उदाहरणातून दाखवून देणे व तुम्ही वरिष्ठ असाल तर तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल, मी हे दररोज सकाळी जेव्हा आरशात पाहतो, तेव्हा स्वतःला सांगतो. मी यासंदर्भात एक अतिशय सुंदर गोष्ट सांगतो, जी मी झेन स्पीक्स या पुस्तकात वाचली आहे व त्यामध्ये कामची जबाबदारी घेण्याच्या दृष्टिकोनाचे काय फायदे आहेत हे अतिशय चांगल्याप्रकारे समजावून सांगितले आहे, पुन्हा त्यातून काय घ्यायचे किंवा घ्यायचे का हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, एवढे सांगून गोष्टीस सुरुवात करतो …
"एक सुतार वयस्कर झाला होता आणि लवकरच निवृत्त होणार होता. त्याने त्याच्या मालकाला तो सुतारकाम व घरे बांधण्याचे काम सोडणार असल्याचे व आपल्या कुटुंबासोबत निवांतपणे जगणार असल्याचे सांगितले. अर्थातच, त्याला मासिक पगाराची उणीव भासणार होती, परंतु त्याला निवृत्तीवेतन हवे होते. कंपनीच्या मालकाला त्याचा सर्वोत्तम कर्मचारी सोडून जात असल्याचे वाटत होते व त्याने त्याला एक शेवटचे घर बांधण्याची विशेष विनंती केली. त्या सुताराने संमती दिली, परंतु हळूहळू त्याचे लक्ष व मन आता त्या कामात लागत नव्हते हे दिसू लागले होते. त्याने कामाशी बांधिलकी दाखवली नाही व निकृष्ट-दर्जाचे मनुष्यबळ व कच्चा माल वापरला. त्याच्या कारकिर्दीचा शेवट अशाप्रकारे होणे ही अतिशय दुर्दैवी बाब होती. जेव्हा सुताराने त्याचे काम संपवले, तेव्हा बांधकाम व्यावसायिकाने त्या सुताराला बोलाविले आणि त्याच घराची किल्ली सुताराला. “ही माझ्यातर्फे निवृत्तीची तुला भेट आहे,” असे तो मालक म्हणाला. हा खरोखरच सुखद धक्का होता पण सुतार खजील झाला! तो स्वतःचे घर बांधत आहे हे त्याला माहिती असते, तर त्याने ते पूर्णपणे वेगळ्याप्रकारे बांधले असते, तो इतका निवांत राहिला नसता. आता त्याच्याकडे अशा यथातथा बांधलेल्या घरात राहण्याशिवाय पर्याय नव्हता …."
...शहाण्यास जास्त सांगणे न लगे; आपण प्रत्येक जण तो सुतार असतो कधीतरी, हे लक्षात असु द्या..एवढंच सांगुन निरोप घेतो..!!
-
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in










टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा