कसोटी सामना वाचवण्याची कला आणि टीम इंडिया..!!






























कसोटी सामना वाचवण्याची कला आणि टीम इंडिया..!!


 “कसोटी क्रिकेट तुम्हाला संयम, शिस्त व संघ भावना शिकवते.”… शकील कंबोह.


“क्रिकेट हा असा खेळ आहे की इथे तुम्हाला दररोज कुणाकडून काहीतरी शिकायला मिळते”… रविंद्र जडेजा.


“कसोटी क्रिकेटची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे पाच दिवस प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्यांच्या पसरदारी खेळायचे असते किंवा घरच्या मैदानावर आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आघाडी लढवायची असते – प्रत्येक सत्रावर वर्चस्व गाजवायचे असते, प्रत्येक दिवसावर वर्चस्व गाजवायचे असते, स्पर्धा जिंकण्यासाठी २० गडी बाद करायचे असतात. ही ऐतिहासिकदृष्ट्या क्रिकेटची सर्वात चित्तवेधक भेट आहे’… रवी शास्त्री.


कसोटी क्रिकेट हा अद्भूत खेळ आहे व मला खात्री आहे की जसा माझ्या लेखामध्ये ताडोबाचा उल्लेख झाल्यावर काही वाचकांच्या कपाळाला आठ्या पडतात तसेच आता काही जणांच्या कपाळाला क्रिकेटच्या उल्लेखाने आठ्या पडत असतील. यातला एकमेव फरक असा असू शकतो की क्रिकेटमुळे चेहऱ्यावर कमी आठ्या पडत असतील, कारण आपल्या देशात ह्या खेळावरील प्रेम जात, लिंग व धर्म यापैकी कोणत्याही सीमेच्या पलिकडचे आहे. मी वारंवार नमूद केले आहे की मला सगळे खेळ आवडतात (मैदानी खेळ अधिक) परंतु मला त्यातही कसोटी क्रिकेट हा प्रकार अधिक प्रिय आहे कारण त्यासाठी मन व शरीर खूप तंदुरुस्त असावे लागते, त्यामध्ये तुम्हाला पाच दिवसांच्या खडतर परिस्थितीत स्वतःला टिकवून ठेवायचे असते व जेव्हा मालिका पाच कसोटी सामन्यांची असते तेव्हा त्याला किंवा तिला त्यांची सर्व शक्ती जवळपास चाळीस दिवसांच्या कालावधीसाठी टिकवून ठेवावी लागते. मला दुसऱ्या कोणत्याही खेळाचे नाव सांगा जेथे एखाद्या संघाला एवढा दीर्घ काळ इतका ताण सहन करावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही दिडशे कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशासाठी खेळत असता ज्यांच्यासाठी क्रिकेट हाच धर्म आहे तेव्हा या सगळ्या लोकांच्या (म्हणजे चाहत्यांचे) अपेक्षांचे ओझे असते. त्यामुळे एक खेळाडू म्हणून, एक माणूस म्हणून तुमच्यासाठी तो केवळ एका खेळाचा सामना राहात नाही, तर जगण्याचे युद्ध होऊन जाते. हे युद्ध, तुम्हाला एका रात्रीमध्ये नायक बनवू शकते तर एका झटक्यात तुमची राखरांगोळीही करू शकते, आपण हे सगळे  तरुण खेळाडूंच्याबाबतीत होताना पाहिले आहे व ज्येष्ठ खेळाडूंच्या बाबतीत होतानाही पाहिले आहे. एक संतुलित चाहता (स्वघोषित) म्हणून हा खेळ पाहण्याचा सर्वोत्तम भाग म्हणजे, तुम्ही स्वतः रक्तबंबाळ न होता दररोज प्रत्येक खेळाडूकडून त्याच्या लढाईतून शिकत असता.

असो, आता ही ज्ञानगंगा थोडा वेळ जरा आवरती घेऊ या, तर इंग्लंडमध्ये गेल्या तीस दिवसांपासून सुरू असलेली भारत व इंग्लंड यांच्यादरम्यानची कसोटी मालिका आता निर्णायक टप्प्यामध्ये आहे व यामध्ये आता केवळ दोन निकाल शक्य आहेत, मालिका अनिर्णित राहू शकते किंवा इंग्लड ही मालिका जिंकू शकतो. आता यावर तुम्ही म्हणाल की यात काय मजा आहे कारण असेही भारत जिंकणार नाही व तुमचे म्हणणे बरोबर आहे. परंतु तुम्हाला अस प्रश्न पडत असेल तर तुम्हाला हा खेळच आधी समजलेला नाही व तुम्ही उतावळे चाहते आहात कारण प्रत्येक वेळी जिंकणे म्हणजेच सर्व काही नव्हे, विशेषतः कसोटी क्रिकेटसारख्या स्वरूपाच्या खेळामध्ये! तुम्हाला माहिती आहे का कसोटी क्रिकेटचा सामना हा विशेष का असतो व खेळाचा हा विशिष्ट प्रकार खेळांच्या इतिहासात खेळल्या जाणाऱ्या बहुतेक सर्व खेळांपेक्षा वेगळा कसा असतो? माझ्या माहितीप्रमाणे कसोटी क्रिकेट हा एकमेव असा खेळ आहे ज्यामध्ये सामना अनिर्णित राहतो म्हणजे कोणताही संघ जिंकत नाही किंवा हरत नाही, तुम्हाला असा इतर कोणताही खेळ माहिती आहे का ज्यामध्ये सामना अनिर्णित राहतो? अनेक खेळांमध्ये सामना बरोबरीत सुटतो पण सामना बरोबरीत सुटणे व अनिर्णित राहणे यामध्ये फरक आहे. सामना बरोबरीत सुटणे म्हणजे दोन्ही संघांची गुणसंख्या समान होणे व एखाद्या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंच्या संघांना समान गुण मिळू शकतात. परंतु सामना अनिर्णित राहणे म्हणजे कोणताही संघ जिंकत नाही व त्यांचे पॉईंट्स म्हणजे रनस वेगळे असु शकतात, हा कसोटी क्रिकेटचा सर्वात मजेशीर भाग आहे व सर्वात रोचक भाग आहे असे मला वाटते. त्याशिवाय, दोन्ही संघांपैकी एक सामना अनिर्णित राहण्यासाठी म्हणजे कोणताही निकाल येऊ नये यासाठी लढू शकतो व त्यासाठी त्या संघाला कठोर प्रयत्न करावे लागतात, हे केवळ कसोटी क्रिकेटमध्ये होऊ शकते व म्हणूनच मला कसोटी क्रिकेट हा खेळ आवडतो. यातला केवळ  खेळाचाच भाग नव्हे तर सामना अनिर्णित राहण्यासारख्या निकालासाठीही जे परिश्रम किंवा प्रयत्न करावे लागतात त्यामुळे.

म्हणूनच, आत्तापर्यंत दोन्ही संघांमध्ये जे चार कसोटी सामने खेळले गेले, त्यातले दोन इंग्लंडने जिंकले व एक भारताने जिंकला व चौथा सामना अशा स्थितीमध्ये होता की बहुतेक चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारत पराभवाच्या उंबरठ्यावर होता व त्याचा अर्थ असा झाला असता की भारत मालिका हरला असता व पाचवा कसोटी सामना केवळ एक औपचारिकता उरली असती. परंतु भारताने जोरदार झुंज दिली व सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले, त्यामुळे त्यांचे आव्हान शेवटच्या सामन्यापर्यंत टिकून ठेवले कारण शेवटचा सामना ते जिंकू शकतात व मालिका अनिर्णित ठेवून, इंग्लंडला विजयापासून दूर ठेवू शकतात (हा लेख तुम्ही वाचेपर्यंत हेच घडलेपण आहे). हे करत असताना अनेक विक्रम मोडीत निघत होते तसेच भारतीय खेळाडूंनी चिकाटी, समर्पण, कणखरपणा व तंदुरुस्ती या सगळ्याचे असामान्य प्रदर्शन घडवले व या प्रदर्शनातून मला जे शिकायला मिळाले तोच माझ्या लेखाचा विषय आहे. 


सर्वप्रथम, जेव्हा ही कसोटी मालिका सुरू झाली तेव्हा निकाल शेवटच्या मॅचपर्यंत खेचला जाईल असे कुणाला वाटले नव्हते, मग ती अनिर्णित राहिली तरीही, ती भारतीय संघाचे मनोबल वाढवणारी ठरेल. आत्तापर्यंत प्रत्येक कसोटी सामना ज्याप्रकारे खेळला गेला तेदेखील क्रिकेट जगतासाठी (हॅरी पॉटरच्या “जादुई दुनियेप्रमाणे”, कृपया गूगल करा) अविश्वसनीय असेच होते, अशी कामगिरी भारतीय संघाने करून दाखवली आहे. या टी२० क्रिकेटच्या इरा मध्ये ज्यामध्ये बहुतेक कसोटी सामने हे तीन किंवा चार दिवसात संपतात, तिथे अशी एक मालिका खेळली गेली ज्यामध्ये प्रत्येक सामना हा शेवटच्या दिवसापर्यंत व शेवटच्या सत्रापर्यंत खेळला गेला, कसोटी क्रिकेटचा खेळ असाच असणे अपेक्षित आहे. ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण कसोटी सामने केवळ जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी नसतात, त्यातून सामना अनिर्णित ठेवण्याची क्षमताही दिसून येते व त्यासाठी प्रचंड निर्धार, तंदुरुस्ती व संयम लागतो, ज्याचा बहुतेक क्रिकेट जगताला विसर पडत चालला आहे. या मालिकेमुळे ही कला पुनरुज्जीवित झाली किंवा नव्याने लिहीली गेली, हे अतिशय विशेष आहे, हाच माझ्या लेखाचा विषय आहे. 


चार सामन्यांनंतर म्हणजे वीस दिवसांचा खेळ झाल्यानंतर तुम्ही आता पाचव्या कसोटीच्या उंबरठ्यावर असताना, परिस्थिती अशी आहे की जवळपास निम्म्या खेळाडूंना वेगवेगळ्या इजा झालेल्या आहेत, यामध्ये इंग्लंडच्या संघाच्या अतिशय सुदृढ कप्तानाचाही समावेश होतो, एवढी ही मालिका खडतर होती.

सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे “कसोटी सामना वाचवण्याच्या भारतीय कलेचे” पुनरुज्जीवन, कारण काही दशक पूर्वीपर्यंत भारतीय संघ जिंकण्यासाठीचा सशक्त दावेदार मानला जात नसे तेव्हा आपले सगळे प्रयत्न कसोटी सामना किमान अनिर्णित राहावा यासाठी केले जात, सुनिल गावस्कर, चेतन चौहान, अंशुमन गायकवाड, विजय हजारे, दिलिप वेंगसरकर, अजित वाडेकर, जी. विश्वनाथ व इतर अशा फलंदाजांसाठी ही सामना जिंकण्यासाठी नव्हे तर सामना वाचवण्यासाठीची लढाई असे. याचाच अर्थ असा होतो की दिवसभर फलंदाज संयमाने चेंडू खेळण्याऐवजी सोडून देत असत, ज्यामुळे गोलंदाज थकत व शेवटी वेळ संपत असे व सामना अनिर्णित राहात असे. हे सकृतदर्शनी अतिशय सोपे वाटते कारण तुम्हाला चेंडू खेळायचेच नसतील फक्त सोडून द्यायचे असतील तर त्यात काय मोठेसे. मात्र यासाठी संयम, निर्धार व गोलंदाजी तसेच खेळपट्टीची चांगली समज लागते, विशेषतः जेव्हा तुम्ही इंग्लडच्या खेळपट्ट्यांवर खेळत असता, तुमच्या सपाट, मृत खेळपट्ट्यांवर नव्हे. याच कारणाने भारतीय संघाचा इंग्लंडमध्ये खेळण्याचा व अगदी सामना अनिर्णित ठेवण्याचा आत्तापर्यंतचा इतिहास फारसा चांगला नाही. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी होती, चौथ्या कसोटी सामन्याने दाखवून दिले की भारतामध्ये अजूनही सामना अनिर्णित ठेवण्याची व असा निकाल यावा यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते करण्याची क्षमता आहे. जवळपास ३५० हून धावांची आघाडी भरून काढायची असताना व त्यानंतर इंग्लडला दुसऱ्या सत्रामध्ये खेळायला लावताना (कृपया कसोटी सामन्याचे नियम गूगलवर पाहा, कारण मला त्यासाठी माझे शब्द व वेळ खर्च करायचा नाही) भारतीय संघाला जवळपास १४० षटके व दोन दिवस खेळावे लागले व इंग्लंडच्या गोलंदाजीच्या जोरदार माऱ्याला तोंड द्यावे लागले. भारतीय संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज जायबंदी झाल्यामुळे प्रत्यक्षात फक्त पाच फलंदाज व दोन अष्टपैलू खेळाडू व तीन गोलंदाज उरले होते. पहिल्याच षटकामध्ये दोन गडी शून्यावर बाद झाले व अशा परिस्थितीमध्ये आपण किती षटकांमध्ये लढाईच्या बाहेर फेकले जाऊ एवढेच बघायचे असते. याच आव्हानाला भारतीय संघ पुरून उरला व चारही फलंदाजांनी  स्वतः बाद न होता इंग्लंडच्या संपूर्ण माऱ्याची अक्षरशः दमछाक केली. लोकहो, आपण टेनिसचा सामना जेव्हा पाच सेटपर्यंच खेळला जातो तेव्हा आपण लोकप्रिय टेनिसपटूंच्या तंदुरुस्तीचे कौतुक करतो, परंतु इथे जवळपास चौदा तास खेळाडूला मैदानावर राहायचे होते व गोलंदाजीचा सामना करायला असतो ज्यामध्ये कातडी चेंडू (टेनिस बॉल नव्हे) तुमच्याकडे अथकपणे १४० किमी/तास वेगाने येत असतो. त्यामध्ये तुमच्या अवतीभोवती असलेल्या क्षेत्ररक्षकांनी अपशब्द बोलण्याचीही (टीका-टिप्पणी) भर पडते व तुम्ही बाद झालात तर तुमचा संघ पराभवाच्या आणखी एक पाऊल जवळ जाईल हे तुम्हाला माहिती असते व तुम्ही १५० कोटींहून अधिक लोकांच्या अपेक्षांचे ओझे घेऊन सामना वाचवण्यासाठी खेळत राहता कारण गुणफलकावरून जिंकणे हा पर्याय नाही असे दिसत असते!


त्याचशिवाय हा असा संघ होता ज्यामध्ये एक बुमरा हा गोलंदाज सोडला तर कुणीही मोठे खेळाडू नव्हते, किंबहुना पहिल्यांदा भारतीय संघ कोणत्याही मोठ्या फलंदाजाशिवाय, ज्यासाठी भारतीय संघ ओळखला जातो, पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला आहे. म्हणूनच ज्याप्रकारे हे सामने खेळले गेले त्यामुळे केवळ कसोटी क्रिकेटच्या इतिहासातच नव्हे तर एकूणच भारतीय क्रिकेटच्या इतिहासात त्यांना विशेष स्थान मिळाले आहे. के.एल. राहुल, गिल, जडेजा व वॉशिंग्टन ज्याप्रकारे खेळले जे अतिशय उत्साहवर्धक होते व तुम्ही जेव्हा असा उल्लेखनीय खेळ करता तेव्हा विक्रम मोडीत निघतात व इतिहास पुन्हा लिहीला जातो व सामना अनिर्णित राहणेही एखाद्या मोठ्या विजयासारखे भासू लागते, जे खरोखरच झाले. सामना अनिर्णित ठेवण्याच्या या प्रक्रियेमध्ये शुभमन गिल आधीच सुनिल गावस्कर, गॅरी सोबर्स व डॉन ब्रॅडमन यांच्यासारख्यांच्या पंक्तित जाऊन बसला आहे, अशी कामगिरी करणे आत्तापर्यंत अनेक दिग्गज भारतीय खेळाडूंनाही शक्य झालेले नाही! अशा विक्रमांपेक्षाही तुम्ही अशा सामन्यांमधून आत्मविश्वास व आदर मिळवता; जिंकू किंवा मरू अशा स्वरूपाच्या या सामन्यांमध्ये तरुणांमधूनच नायक घडतात, सामान्य जनतेतूनच तारे जन्माला येतात व त्यातून तुमच्या संघाला व लक्षावधी चाहत्यांना आशा देऊन जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामुळे लोकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होते की आपण जर आपली सर्वोत्तम कामगिरी केली तर काहीही साध्य करू शकतो, जे या अनिर्णित चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याने दिले आहे व माझा लेख याच निकालासाठी आहे! भारतीय संघाची कामगिरी अशीच होत राहो, तुमचा निर्धार हीच तुमची सर्वोत्तम ताकद आहे, त्याच्याच आधारावर लढत राहा म्हणजे विक्रम आपसूकच घडतील. माझ्यासारख्या लोकांना प्रेरणा देण्यासाठी आभार ज्यांना तुम्ही ज्याप्रकारे लढताय ते पाहण्याचे भाग्य लाभले आहे, एवढे सांगून निरोप घेतो!


संजय देशपांडे www.sanjeevanideve.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!