शाश्वत विकास, म्हणजे काय रे भाऊ..??
शाश्वत विकास, म्हणजे काय रे भाऊ..??
“सर्वात शाश्वत मार्ग म्हणजे कोणत्याही गोष्टींची निर्मिती न करणे. दुसरा सर्वात शाश्वत मार्ग म्हणजे, जी समस्या सोडवण्यात आलेली नाही ती सोडवण्यासाठी काहीतरी उपयोगी तयार करणे.” – थॉमस सिग्जगार्ड.
“शाश्वतता म्हणजे कमी अपाय करणे असा अर्थ आता होत नाही. तर त्याचा अर्थ काहीतरी अधिक चांगले करणे असा होतो.” – जोशेन झेईट्झ
“पृथ्वी प्रत्येक माणसाच्या गरजा पूर्ण होतील एवढे पुरेसे देत असते, प्रत्येक माणसाची हाव पुरवण्याएवढे नाही.”— महात्मा गांधी
थॉमस, हे रॉश डॅनिश अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्समधून १९९५ साली वास्तुविशारद झाले. तर जोशेन झेईट्स हे व्यावसायिक हर्ले-डेव्हिडसन, इंकचे सीईओ म्हणून, लाईव्हवायर इंकचे अध्यक्ष म्हणून, व त्याआधी बराच काळ पूमाचे सीईओ म्हणून सर्वाधिक ओळखले जातात. तिसऱ्या नावाची काहीही ओळख देण्याची गरज नाही व या व्यक्तीच्या अवतरणाचे वैशिष्ट्ये म्हणजे वरील दोन अवतरणांमध्ये तथाकथित विकसित जगातील व्यक्तींनी शाश्वततेविषयी जे म्हणले आहे, त्याची जाणीव महात्मा गांधींना आधीच झाली होती व त्यांनी जवळपास आठ दशकांपूर्वी हे म्हटले होते. गांधीजींनी शाश्वत विकासाविषयी केवळ मत किंवा चिंताच व्यक्त केली नव्हती, तर त्यांनी तसे जगायला सुरुवात केली होती, जे त्यांच्या समकालीन इतर पाश्चात्य तत्ववेत्त्यांना जमले नाही, म्हणूनच ते महान आहेत! दुर्दैव म्हणजे, आपल्याकडे गांधींसारख्या व्यक्तीचा पर्यावरणाविषयी व निसर्गाविषयीच्या विचारांचा वारसा असूनही आपण त्याविषयी क्वचितच काही करतो किंवा आत्तापर्यंत केले आहे. किंबहुना आपण शाश्वततेची संपूर्ण संकल्पना उलट दिशेने नेत आहोत. हा माझ्या लेखाचा विषय नाही, विषयांतर केले म्हणून माफ करा (नेहमीप्रमाणे) परंतु हा असा भावनिक उद्रेक होण्याचे कारण म्हणजे मला एका मित्राचा अचानक आलेला कॉल जो पर्यावरण मंत्रालयासोबत काम करतो. त्याने विचारले की संजय, तू मला सांगू शकतोस का, “शाश्वत विकास” म्हणजे काय व त्याचा दुसरा प्रश्न असा होता की, “शाश्वत बांधकाम साहित्य” म्हणजे काय? मला दोन गोष्टींचा अतिशय आनंद झाला, एक म्हणजे या मित्राने अशा एका प्रश्नासाठी मला कॉल केला, ज्यातून मी केवळ एक बांधकाम व्यावसायिकच नाही तर अजूनही एक अभियंता पण आहे, जो त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीसाठी ओळखला जातो हे दिसून आले (हा मी स्वतःच काढलेला निष्कर्ष आहे😄) व दुसरे म्हणजे, यामुळे सकारात्मक विचारांना चालना मिळाली, विशेषतः रिअल इस्टेटमधल्या जे अलीकडे दुर्मिळ होतं चालले आहे!
मी त्याला विचारले, उत्तर ऐकण्यासाठी तुझ्याकडे किती वेळ आहे, तो अतिशय व्यग्र माणूस आहे जशी सरकारी क्षेत्रातील बहुतेक माणसे असतात (मी उपरोधाने बोलत नाही, तर मी तिथे खरोखरच काम करणाऱ्या माणसांबद्दल बोलत आहे) व त्याने खरोखरच फारसा वेळ नाही असे उत्तर दिले. म्हणूनच मी त्याला थोडक्यात समजून सांगायचा प्रयत्न केला की शाश्वत विकास हा आंधळ्या माणसांसारखा असतो जे हत्तीला स्पर्श करून त्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असतात (कृपया या गोष्टीसाठी गूगल करा) व दुर्दैवाने, मी सुद्धा त्या आंधळ्या माणसांच्याच समूहाचा एक भाग आहे. पण मला किमान एवढे तरी माहिती आहे की मी ज्या भागाला स्पर्श केला आहे तो संपूर्ण हत्ती नाही. मी शोध घेतोय व हत्तीला योग्य प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी त्याला माझा दृष्टिकोन काय आहे ते समजून सांगितले (जो या लेखाचा विषय आहे) व दुसरा प्रश्न होता शाश्वत बांधकाम साहित्याचा, तो पहिल्या प्रश्नातून निर्माण झालेला उपप्रश्न आहे, हेदेखील मी त्याला सांगितले. शाश्वत साहित्य म्हणजे, जे नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध आहे त्याचा, किमान किंवा अजिबात प्रक्रिया न करता वापर करणे. उदाहरणार्थ कोकणामध्ये जांभा दगडाचा घर बांधण्यासाठी वापर करणे व त्यावर नारळाच्या झावळ्यांचे छत आच्छादणे व या घराच्या जमीनीसाठी मातीचा वापर करणे. या सर्व प्रक्रियेमध्ये तुम्हाला दगडांना आकार द्यावा लागतो, परंतु तो किमान त्रास असतो. म्हणूनच तुम्ही अशा घरांना शाश्वत साहित्यापासून तयार झालेले घर म्हणू शकता, असे असले तरीही तुम्ही त्याला नेहमीच शाश्वत विकास म्हणू शकत नाही. तो हे ऐकून गोंधळला व मी हसून म्हणालो, “हीच तर गुगली आहे” (गोलंदाजीसाठी वापरला जाणारा शब्द, जी व्यक्ती सतत गूगलवर काहीतरी शोध घेत असते तिच्यासाठी नाही; कृपया माफ करा). मग मी त्याला समजून सांगितले की, जांभा दगड वापरण्यासाठीही, तुम्हाला जमीन खणावी लागते, ही कृती निसर्गाच्या विरोधात आहे. त्याचप्रमाणे, जिथे घर बांधले जात आहे ती जागा कोकणात नसेल जिथे हा जांभा दगड मिळतो, मध्य भारतात असेल तर तरीही ते शाश्वत नाही कारण हा दगड तिथपर्यंत नेण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेल लागेल, हीसुद्धा पुन्हा पर्यावरणविरोधीच कृती आहे. त्याचप्रमाणे, जर प्रत्येकानेच आपली घरे जांभा दगडाने बांधायला सुरुवात केली तर कोकणात किंवा कुठेही हा दगड शिल्लकच राहणार नाही, पुन्हा हेसुद्धा निसर्गासाठी चांगले नाही, हीच गोष्ट महत्त्वाची आहे!
मित्राचे बहुतेक या स्पष्टीकरणाने समाधान झाले असावे, म्हणून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला, तरीही हा प्रश्न माझ्या मनात रेंगाळत राहीला की आपल्याला हा शाश्वत विकास कसा साध्य होऊ शकतो ज्यामध्ये शाश्वत साहित्याचा वापर हा केवळ एक पैलू आहे. आधी मी हे विचार मनातून झटकून टाकले कारण असे विचार कितीही सकारात्मक असले तरीही त्यामुळे व्यक्ती अधिकच वैतागते (म्हणजे निराशा येते) असा माझा अनुभव आहे. तरीही मला हे माहिती आहे की आपण कृती केली नाही व सांघिकपणे केली नाही तर एकूणच निसर्गासाठी फार उशीर झालेला असेल. म्हणूनच मी हा लेख लिहायला बसलो कारण हाच एक मार्ग माझ्या नियंत्रणात आहे. सर्वप्रथम, मला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे (व कठोरपणे) मान्य करायची आहे, ती म्हणजे या जगात मानव निर्मित आणि पर्यावरण-स्नेही असे काहीच नाहिये, विशेषतः स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये (म्हणजे रिअल इस्टेटमध्ये), कारण बहुतेकवेळा शाश्वत विकास हा शब्द निसर्गाच्या संदर्भाने किंवा संवर्धनाच्या बाबतीत वापरला जातो, परंतु हे केवळ डॉक्टर ज्याप्रमाणे तुम्हाला कडू औषध गोड आवरणाच्या कॅप्सूलमधून देतात तसेच आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, इथे शाश्वत या नावाच्या गोडव्याखाली आपण निसर्गाला होणारा अपाय लपवत आहोत हे कटू सत्य आहे. शाश्वत हा शब्द जेव्हा केवळ निसर्गाच्या बाबतीतच वापरला जातो तेव्हा जेव्हा एखादी गोष्ट निसर्गामध्ये तयार होत नाही व ती त्याच प्रकारे वापरली जात नाही ती निसर्गासाठी शाश्वत नसते. तुम्ही जर गोंधळून गेला असाल तर, एक साधे उदाहरण देतो; झाडावर जगणारे, फळे खाणारे, नैसर्गिक पाणवठ्यांवरील पाणी पिणारे माकड किंवा नैसर्गिक गुहेमध्ये राहणारा, नैसर्गिक स्वरूपात हरिण खाणारा (बटर चिकन किंवा मटण रोगन-जोश नव्हे), नदी किंवा ओढ्याचे पाणी पिणारा वाघ म्हणजे शाश्वत जगणे, व त्याव्यतिरिक्त काहीही शाश्वत नाही, किमान निसर्गासाठी तरी नाही. जोपर्यंत माणसे अशाप्रकारे जगत होती ते शाश्वत जगणे होते असे आपण म्हणू शकतो. परंतु आपण तथाकथित बुद्धिमान प्रजाती आहोत व आपले आयुष्य अधिक आरामदायक किंवा सुलभ होण्यासाठी इतर साधनांचा वापर करून आपली उत्क्रांती (आपल्या शब्दात विकास) होण्यास सुरुवात झाली व इथेच निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली व आता आपण जे काही करतो ते काहीच पर्यावरण स्नेही नाही किंवा निसर्गाच्या बाबतीत ते शाश्वत आहे असे म्हणता येत नाही, हे आधी स्वीकारले पाहिजे, हा माझ्या लेखाचा विषय आहे.
रुडयार्ड किपलिंग यांच्याद्वारे लिखित जंगल बुक या पुस्तकावर आधारित चित्रपटात (अर्थातच डिस्नेपट) माणसे व प्राण्यांची गोष्ट आहे. विशेष म्हणजे त्याच्या कथानकाला मध्य भारतातील जंगलाची पार्श्वभूमी आहे, ज्यामध्ये एका माणसाच्या मुलाला मोगलीला बल्लू (अस्वल) व बगीरा (काळा बिबट्या) हे प्रशिक्षण देतात. मोगली बल्लूला दोरीच्या मदतीने उंचावर चढून मध काढायला व मधमाशांना हकलण्यासाठी मशाल पेटवायला शिकवतो. बगीरा अशाप्रकारे अन्न (मध) मिळवण्यास आक्षेप घेतो व बल्लूला जंगलाचा समतोल बिघडवू नकोस असा इशारा देतो. तो म्हणतो, अस्वलांनी अशाप्रकारे मध मिळवणे अपेक्षित नाही कारण प्रत्येकाने असा मध मिळवायला सुरुवात केली तर मधमाशांसाठी व इतर प्राण्यांसाठी मधच शिल्लक राहणार नाही, जो निश्चितपणे संपूर्ण जंगलासाठी अपशकुन असेल, ही अशाश्वतता आहे व याचप्रकारे माणसांनी त्यांच्या तथाकथित नाविन्यपूर्ण उपाययोजनांद्वारे निसर्गाचा समतोल त्यांनी स्पर्श केलेल्या प्रत्येक आघाडीवर बिघडवला आहे. आपण आपल्या तथाकथित विकासाची व्याख्या किंवा रचना करण्यापूर्वी हे समजून घेण्याची वेळ आता आली आहे, हाच माझ्या लेखाचा विषय आहे. म्हणूनच, शाश्वत विकास म्हणजे, ज्यामुळे त्या विकासाशी संबंधित प्रत्येक भागधारकाचे जीवन सध्या आहे त्यापेक्षा थोडे अधिक चांगले होणार आहे. एकदा आपण ही संकल्पना समजून घेतल्यानंतर (व ती मान्य केल्यानंतरच) शाश्वत विकासाचे नियोजन करू शकतो जी कोणतीही मानवनिर्मित वस्तू असू शकते, पुलापासून ते धरणापर्यंत, एखाद्या रिसॉर्टपासून ते विमानतळापर्यंत, रेल्वेमार्गापासून ते खाण किंवा एखाद्या उद्योगापर्यंत ही यादी न संपणारी आहे. परंतु माझा संबंध रिअल इस्टेट उद्योगाशी असल्यामुळे, मी शाश्वततेच्या दृष्टीकोनातून आपली घरे बांधणे या पैलूवर लक्ष केंद्रित करणार आहे.
म्हणूनच, मी आणखी एक गोष्ट मान्य करतो की, रिअल इस्टेटमध्ये पर्यावरण-स्नेही इमारतींसारखे काही नसते; आपण फक्त एवढे म्हणू शकतो की पर्यावरणाला कमीत कमी अपाय करणाऱ्या किंवा पर्यावरणाला जास्त अपाय करणाऱ्या इमारती! एक लक्षात ठेवा, रिअल इस्टेटमध्ये निसर्ग हाच केवळ एक भागधारक नाही तर जेव्हा आपण त्याला शाश्वत असे म्हणतो तेव्हा त्यामध्ये रहिवासी (म्हणजे सदनिका खरेदी करणारे), शहर, पर्यावरण (निसर्ग), सरकार (आपण त्यांना कसे वगळू शकतो), तसेच विकासकाचाही समावेश होतो. शेवटच्या दोन घटकांमुळे अनेकांच्या कपाळाला आठ्या पडतील, की शाश्वत विकासामध्ये या दोघांचा समावेश कसा असू शकतो, परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कोणताही विकास जर सरकारसाठी शाश्वत होणार नसेल तर तो दीर्घकाळ कसा टिकू शकतो व जर तो विकासकासाठी शाश्वत होणार नसेल तर तो कसा व का पूर्ण करेल असा प्रश्न आहे.
तुम्ही गोंधळून गेला असाल तर आजचे (10-07-25) वर्तमानपत्र वाचा व तुम्हाला संपूर्ण पानावर पावसामुळे झालेल्या वाहतुकीच्या कोडींची छायाचित्रे दिसतील, आता तुम्ही म्हणाल ‘त्यात काय मोठेसे’? तर त्याचे असे आहे की, शहरामध्ये व शहराच्या अवती-भोवती होत असलेला विकास शहरासाठी शाश्वत नाही याची ही खूण आहे. हे केवळ वाहतुकीच्याच बाबतीत होत नाही तर पाण्यापासून ते हवेच्या दर्जापर्यंत सगळ्याच गोष्टींवर ताण येत आहे. हे शाश्वत करणे सरकारचे काम असले तरीही आपण या आघाडीवर सातत्याने अपयशी ठरत आहोत, म्हणजेच विकासामुळे सरकारसाठी गोष्टी अवघड होत चालल्या आहेत, अशावेळी तुम्ही त्याला शाश्वत म्हणू शकता का, असा माझा प्रश्न आहे.
विकासकाविषयी बोलायचे झाले, तर तुम्ही अगदी ताज महाल बांधू शकता परंतु जर त्याची विक्रीच होणार नसेल किंवा तो व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य नसेल, तर तो ते का पूर्ण करेल व कोणत्याही घटकासाठी अपूर्ण विकास हा शाश्वत नसतो, हा अगदी साधा तर्क आहे. थोडक्यात सांगायचे, तर विकास हा विकासकासाठीही आर्थिकदृष्ट्या शाश्वत असला पाहिजे, शाश्वत विकास करताना, आपण हा पैलू विसरून जातो. त्यासाठी आपल्याकडे व्यवसाय सुलभता असली पाहिजे जी रिअल इस्टेटमध्ये सध्या कुठेच दिसत नाही, परंतु तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
त्याचवेळी कोणत्याही विकासामुळे शहरातील रहिवाशांना व नागरिकांना अधिक आराम मिळाला पाहिजे, तसेच त्याचा अर्थ असाही होतो की प्रकल्प सदनिका विकत घेणाऱ्यांना परवडणारा असला पाहिजे व वेळोवेळी तिच्या देखभालीचा खर्चही त्यांना परवडणारा असला पाहिजे, तो त्यांच्या खिशांना कात्री लावणारा नसावा, ज्यामध्ये पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत गोष्टींचा समावेश होतो. खिशाला कात्री म्हणजे, आपण मनावर ताण येणार, म्हणजे अस्वस्थता वाढणार म्हणजे असा विकास शाश्वत नाही, बरोबर? याचाच अर्थ असा होतो की तुम्ही जे काही बांधता ते वापरकर्त्यासाठी दोन बाबतीत उपयोगी असले पाहिजे (रिअल इस्टेटच्या संदर्भात घराचे ग्राहक), एक म्हणजे भांडवली गुंतवणूक (घराचा बांधकाम किंवा निर्मिती खर्च) व दुसरे म्हणजे मासिक देखभालीचा खर्च ज्यामध्ये मालमत्ता कर, वीजची देयके व घराच्या देखभालीचा खर्च यांचा समावेश होतो, नाहीतर त्यात राहणाऱ्या व्यक्तींसाठी तिथे राहणे त्रासदायक होईल म्हणजे शाश्वत होणार नाही, हेच शहराच्या आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या रहिवाशांसाठीही खरे आहे. बेंगलुरू हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, कारण काही दशकांपूर्वीपर्यंत ते रहिवाशांसाठी एक उत्तम शहर होते परंतु विकासामुळे सध्याच्या नागरिकांसाठी वाहतुकीची कोंडी, पावसाळ्यात तुंबणारे पाणी, अपुरा पाणीपुरवठा यामुळे त्रासदायक झाले आहे, याचाच अर्थ आपण या संकल्पनेचा केवळ एक-दोन भागधारकांच्या दृष्टिकोनातून मर्यादित विचार केल्यावर काही प्रकल्प शाश्वत असले तरीही तिथला एकूणच विकास हा अशाश्वत आहे, हाच माझ्या लेखाचा विषय आहे.
याचा अर्थ आपण विकास थांबवावा असा होत नाही किंवा सगळे काही चूक आहे असाही होत नाही. माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की आपण शाश्वत विकासाची योग्य प्रकारे व्याख्या करण्याची वेळ आली आहे. असे झाले तरच आपण सर्व भागधारकांच्या हिताचा समतोल राखू शकू, व केवळ काही जणांचेच आयुष्य आरामशीर बनवून, इतरांचे आयुष्य त्रासदायक बनवणार नाही.
त्यानंतर शेवटचा पैलू येतो, तो म्हणजे शाश्वत जीवनशैली, ज्याचा उल्लेख गांधीजींनी केलेला आहे, आपण नैसर्गिक गुहेत जगू शकत नाही व फळे खाऊ शकत नाही, परंतु त्याच वेळी कोणत्याही विकासाचे वापरकर्ते (लाभार्थी) म्हणून आपण निसर्गाशी एकरूप होऊन जगायला पाहिजे, जे होताना दिसत नाही व त्यानंतर आपण प्रत्येक भागधारकाला आपले जीवन त्रासदायक बनविण्यासाठी दोष देतो. यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्याला हवी तशी वीज वाया घालवणे, अनावश्यक खरेदी करणे तसेच अगदी फुलझाडांवरील फुले तोडण्यासारख्या अगदी साध्या-साध्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, आपले जीवन शाश्वत व्हावे यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो ज्या आपण करत नाही. माझ्या इमारतीच्या प्रवेशापाशी, मी चाफा, तगर, जास्वंद अशी अनेक फुलझाडे लावली आहेत, कारण अशा सर्व झाडांची फुले मधमाशी व फुलपाखरांसाठी अतिशय महत्त्वाची असतात, नाहीतर या काँक्रिटच्या जंगलात त्यांना अन्न कुठून मिळेल, बरोबर? अशी फुलझाडे लावणे हादेखील शाश्वत विकासाचाच भाग आहे, परंतु दररोज, सकाळी फेरफटका मारणारे व सोसायटीचे रहिवासी या झाडांवरील एकूणएक फूले ओरबाडून नेतात, ज्यामुळे फुलपाखरे किंवा मधमाशांसाठी काहीच शिल्लक राहात नाही व ही आणि अशा अनेक कृती या अशाश्वत जीवनशैली आहे, यामुळे शाश्वत विकासाचा हेतूच अपयशी होतो, ज्याविषयी कुणीही विचार करत नाही किंवा बोलत नाही, हा माझ्या लेखाचा विषय आहे. शाश्वततेचे हे सर्व पैलू समजून घेतल्यानंतरच आपण शाश्वत बांधकामाचे साहित्य केवळ ओळखूच शकणार नाही तर शाश्वत विकासामध्ये त्याचा वापर मोजूही शकू. मला असे वाटते, विकासाच्या योजना तयार करणे, त्याच्या मंजुरीच्या प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करणे, नागरी विकासाची धोरणे तयार करणे, ते अगदी एका प्रकल्पाचे नियोजन करण्यापर्यंत, सगळ्या गोष्टींकडे या व्यापक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे झाले तरच आपण त्यापैकी काही साध्य करू शकू.
मित्रांनो, ज्याप्रमाणे जंगलबुकमधील बिबट्या बगीरा, बल्लू अस्वलाला इशारा देतो की तर आपण निसर्गाचा नाश केला तर निसर्ग केवळ विध्वंसाच्या रूपानेच प्रत्युत्तर देतो; एका बिबट्याला व अस्वलाला शाश्वतता म्हणजे काय हे समजू शकत असेल, तर आपण तथाकथितपणे सर्वात बुद्धिमान प्रजाती आहोत तर आपल्यालाही ते समजले पाहिजे, मात्र त्यासाठी आपण खरोखरच अतिशय बुद्धिमान असले पाहिजे, त्याच्या उलट असू नये, असा “वैधानिक इशारा” देऊन निरोप घेतो!
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा