वन्यजीव महोत्सव, मुलांकरिता..2025!!
“तुम्ही असे एक पुस्तक लिहीणे आवश्यक आहे जे लिहीले जावे अशी इच्छा असते. जर ते पुस्तक मोठ्यांसाठी फार अवघड असेल तर, तर तुम्ही ते लहान मुलांसाठी लिहा.”
― मेडेलीन एलएंजेल
“आपण नेहमी आपल्या तरुणांचे भविष्य घडवू शकू असे नाही, परंतु आपण आपल्या तरुणांना भविष्यासाठी निश्चितपणे घडवू शकतो.”
― फ्रँकलीन डी. रूझवेल्ट
“आपण केवळ आपल्या लहान मुलांना वाघांची जंगलातील भूमिका समजून सांगितली, तर ते निश्चितपणे जंगले व पर्यायाने वाघांनाही वाचवतील.”
-- मी
होय, हा लेख वन्यजीवनाविषयी व जंगलांविषयी आहे व त्यामध्ये ताडोबाही आहे (ते नाही असे कधी होऊ शकेल का), परंतु हा लेख वन्यजीवनाच्या सर्वात दुर्लक्षित पैलूविषयी आहे. नाही तो वाघांविषयी किंवा त्यांच्या अधिवासाविषयी नाही तर लहान मुले व त्यांचे वन्यजीवनाशी नाते याविषयी आहे. हे एका महोत्सवाविषयी आहे, किंबहुना त्याच्यासाठी चळवळ असा शब्द वापरणेच संयुक्तिक ठरेल, तर हा कार्यक्रम होता “लहान मुलांसाठी वन्यजीवन महोत्सव”. जंगलबेल्समध्ये (कृपया गूगल करा) गेल्यावर्षी एका सत्रात आमचा विचारविनिमय (खरेतर काम करताना झालेला वाद, परंतु विचारविनिमय हा शब्द ऐकायला छान वाटतो) सुरू होता की लोकांना वन्यजीवनावर प्रेम करायला कसे लावायचे. कारण तसे झाले तरच लोकं संवर्धनामध्ये हातभार लावण्याचे पुढचे पाऊल उचलू शकतील आणि त्यासाठी लहान मुलांना टार्गेट करायचे. नेहमीप्रमाणे, एक कल्पना म्हणून ती अतिशय उत्तम वाटली, परंतु ती प्रत्यक्षात कशी आणायची हा एक प्रश्न होता. कारण मुले आपणहून जंगलांमध्ये जाऊ शकत नाहीत, कारण पालकच सहलीसाठी कुठे जायचे (बहुतेकवेळा) हे ठरवतात. असे असताना तुम्हाला ज्याविषयी काहीच माहिती नाही अशा ठिकाणी जाण्याविषयी निर्णय तुम्हाला कसा घेता येईल. त्याचशिवाय, अशी जागा जेथे वाय-फायची समस्या आहे, जेथे शॉपिंग नाही, खोलीमध्ये टीव्ही नाही (बरेच ठिकाणी), मोबाईलला रेंज येत नाही, स्विगी किंवा झुमॅटो नाही म्हणजे पिझ्झा किंवा कोक नाही, अशा ठिकाणी कोणते आजकालचे लहान मूल जाईल!! त्याचशिवाय विशेषतः आजच्या काळातल्या बहुतेक पालकांना ते एखाद्या सहलासाठी व वन्यजीवनासाठी खर्च करत असलेल्या पैशांचा पुरेपूर मोबदला हवा असतो. तुम्हाला जर हे योग्य प्रकारे कळत नसेल, तर तुम्ही खर्च केलेल्या पैशांच्या मोबदल्यात तुम्हाला काय मिळाले आहे हे तुम्हाला न समजण्याची शक्यता अधिक असते. थोडक्यात जेव्हा आपल्या देशातील बहुतेक पुरुष (व महिला) जेव्हा पर्यटनासाठी (वन्य) जंगलात जातात तेव्हा त्यांना वाघ पाहायचा असतो. हे जंगल आहे, प्राणीसंग्रहालय नाही, प्रत्येक प्राणी व पक्षी त्यांच्या गरजेप्रमाणे वागतो, पर्यटकांसाठी पैसे लावून केल्या जाणाऱ्या एखाद्या खेळाप्रमाणे नाही याचा त्यांना विसर पडतो. त्यांनी जंगलातील सहलीसाठी भरमसाठ पैसा खर्च केला असल्यामुळे त्यांना वाघ दृष्टीस पडला नाही, तर त्यांचे पैसे वाया गेले असे वाटते. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण कुटुंबाला सहलीसाठी जंगलात घेऊन जाण्यास सर्वात शेवटचे प्राधान्य दिले जाते, याच कारणाने बहुतेक लहान मुलांना वन्यजीवन खऱ्या अर्थाने अनुभवताच येत नाही. फॉलिएज किंवा नेचर वॉक यासारख्या संस्थांच्या माध्यमातून जंगलात जाऊन आलेली मुले आहेत हे मान्य असले, तरीही त्यासाठी लागणारा खर्च बघता अशा मुलांचे प्रमाण अत्यल्प आहे व अशा सहली क्वचित एखादेवेळा घडतात. लहान मुलांना त्याने किंवा तिने जंगलामध्ये जे अनुभवले आहे ते आवडले असले तरीही, त्यांनी जंगलाला पुन्हा भेट देण्याची शक्यता अतिशय कमी असते, कारण आपण पालक वन्यजीवनाविषयी अजाण असतो. यामागचे एक साचेबद्ध कारण म्हणजे, त्याच जंगलाला किंबहुना एकूण जंगलालाच पुन्हा भेट देण्यासारखे काय आहे. मला खात्री आहे की जंगलाला भेट देण्याविषयी अनेक वाचकांना अशाच प्रश्नांना तोंड द्यावे लागले असेल!
नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही असे ठरवले की मुले जंगलात जाऊ शकत नसली तरीही, आम्ही जंगलालाच पुण्यातील लहान मुलांपर्यंत घेऊन येऊ व अशाप्रकारे लहान मुलांसाठी वन्यजीवन महोत्सवाची सुरुवात झाली, अशाप्रकारचा पहिला महोत्सव २०२४ साली, म्हणजेच बरोबर एका वर्षापूर्वी आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम अगदीच मूलभूत पातळीवर आयोजित करण्यात आला होता कारण कालावधीपासून ते त्यातील उपक्रमांपर्यंत सर्व काही प्रायोगिक होते, जे मुलांना केंद्रित ठेवून आयोजित करायचे होते. यातील सर्वात मोठे आव्हान होते (खऱ्या अर्थाने सर्वात मोठे आव्हान मी सगळ्यात शेवटी सांगेन) की लहान मुलांना पूर्ण वेळ गुंतवून ठेवणे व तो वेळ किती असावा हे ठरवणे. आम्ही ठरवले की हा कार्यक्रम चार तासांचा असेल व हे चार तास विविध उपक्रमांमध्ये विभागले जातील. हे सर्व उपक्रम अर्थातच वन्यजीवनाशी निगडीत असले पाहिजेत परंतु त्यातून मौजमस्तीसोबतच माहितीही मिळाली पाहिजे, तरच कार्यक्रमाचा मुख्य हेतू साध्य होईल. आश्चर्य म्हणजे तो कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला, कारण यावर्षी वन्यजीवन महोत्सव कधी आयोजित केला जाईल अशी लोकांकडून विचारणा केली जात होती, यशाची याहून अधिक चांगली पावती कोणती असू शकते! त्यामुळे आमच्यावरचा ताण वाढला कारण यश ही एक गोष्ट झाली व ते पुन्हा मिळवण्यासाठी सोबतच चांगली कामगिरी करण्याच्या अपेक्षांचे ओझेही येते.
तर, वन्यजीवन महोत्सवाची दुसरी आवृत्ती 14 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती.
आमच्या गाठीशी गेल्यावर्षीचा अनुभव असला तरीही, पुढच्या क्षणाला मुलांच्यासोबत काय होईल हे तुम्ही सांगू शकत नाही व आमचा मेंदू याच विचारांमध्ये गुंतलेला होता. यावर्षी आमच्या संघामध्ये आणखी एका महत्त्वाच्या सदस्याची भर पडली तो म्हणजे तुषार जोशी, तो माध्यम तज्ज्ञ आहे. त्याने आम्हाला सल्ला दिला की आम्ही अशा कुणालातरी आणावे ज्यांचे माध्यम मूल्य आहे, म्हणजेच माध्यमांना त्या व्यक्तीमध्ये रस असेल. मला माहितीय की कुणीही जंगलापेक्षा मोठा नाही तरीही आपण अशा एका जगात राहतो जेथे माझ्या आयुष्यावर (मी वैयक्तिक पातळीवर बोलतोय) माध्यमांचे नियंत्रण नसले तरीही, जनतेच्या आयुष्यावर मात्र आहे. त्यामुळे आपण अशा कुणालातरी घेऊन आलो ज्यामध्ये माध्यमांना रस असेल व मुलांना वन्यजीवनाची ओळखही होईल तर काय हरकत आहे असा विचार पुढे आला. यात पहिले नाव समोर आले ते सुमेध वाघमारे, हा ताडोबामध्ये गाईड आहे तसेच पक्षी व पशुंच्या प्राण्यांची उत्तम नक्कल करतो व सचिन तेंडुलरकरने सुमेधविषयी एक रील केले होते, त्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला. अनुजने सुमेधला या कार्यक्रमासाठी आणण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याच्या मानधनाविषयी थोडेफार मतभेद झाले, परंतु मला असे वाटते जोपर्यंत वन्यजीवनाशी संबंधित व्यक्तींना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत ते तग धरू शकणार नाहीत. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री केवळ एखाद्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावण्यासाठी लाखो रुपये मागू शकतात, तर हा माणूस, जवळपास हजार किलोमीटर प्रवास करून त्याच्याकडे असलेली वन्यजीवनाविषयीची सर्वोत्तम माहिती लहान मुलांना देणार असेल तर आपण काही हजार खर्च करायला काय हरकत आहे कारण खर्चापेक्षाही हेतू अधिक महत्त्वाचा असतो. त्यानंतर विषयांविषयी चर्चा करण्यात आली व कोणत्या व्यक्ती त्या मांडतील हे ठरवण्यात आले, कारण वन्यजीवन क्षेत्रात अनेक व्यक्ती काम करतात व ते सर्वच अतिशय उत्तम काम करत आहेत. तरीही एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्या व्यक्तीला लहान मुलांशी संवाद साधता आला पाहिजे व त्यांच्या पातळीवर जाऊन, त्यांना रुचेल अशाप्रकारे ते जे सांगत आहेत त्यामागे काय हेतू आहे हे सांगता आले पाहिजे, व विषयही तसाच असला पाहिजे.
उदाहरणार्थ, कॅमेरा ट्रॅपिंगचा विषय ज्यामुळे वन अधिकाऱ्यांना प्रगणना करण्यास व जंगलातील प्राण्यांना ओळखण्यास मदत होते. हा विषय कितीही महत्त्वाचा असला तरीही मुलांना यात कदाचित रस वाटेल किंवा कदाचित वाटणारही नाही, नेमके हेच आम्हाला होऊ द्यायचे नव्हते. कारण असे झाले असते तर पुढील वक्त्याच्या सादरीकरणावर तसेच संपूर्ण कार्यक्रमाच्या हेतूवर परिणाम झाला असता. अशाप्रकारे आम्ही डॉ. प्राची मेहता यांचे नाव निश्चित केले, ज्या घुबडांचे संवर्धन करतात व मुलांना हॅरी पॉटरच्या कृपेने (कृपया गूगल करा) निश्चितच घुबडामध्ये रस असतो. त्यानंतर एक कठपुतळ्यांचा खेळ आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये जंगलातील पात्रे होती. दोन गोष्टींचा विचार करून हा खेळ आयोजित करण्यात आला होता, एक म्हणजे या पिढीने (लहान मुलांनी) कधी कठपुतळ्यांचा खेळ पाहिलेलाच नाही व प्राण्यांच्या कठपुतळ्या माणसांची भाषा बोलत आहेत हे ऐकणे मजेशीर ठरले असते, आणि तसेच झाले. त्यानंतर आम्ही बांधवगढ व्याघ्र प्रकल्पातील एका तरुण आरएफओला, अर्पितला (रेंज अधिकाऱ्याला) बोलावले होते, जो सुमेधच्याही जवळपास दुप्पट प्रवास करून आला होता व त्याने एका वन कर्मचाऱ्याचे जीवन, त्यांच्यासमोरील अडचणी तसेच हे काम करण्यासाठी आवश्यक असलेली बांधिलकी याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे वन्यजीवनाविषयी एक लघुपट दाखवण्याचेही आम्ही ठरवले, ज्यामध्ये लहान मुले गुंतून राहतील. त्याचसोबत तिथे वन्यजीवनाशी संबंधित वस्तुंचे स्टॉल होते, तसेच वाघ व हत्तीच्या रूपातील शुभंकरही होते, म्हणजे माया, छोटी तारा, माताराम व छोटा मटकासूर या सतत बातम्यांमध्ये असणाऱ्या चार वाघांची मोठ्या आकारातील कटआउट (ही स्थानिकांनी वाघांना दिलेली नावे आहेत, कारण वन विभाग त्यांना क्रमांक देतो) व तसेच त्यांचे संबंधित जंगलातील योगदान याविषयी माहिती देण्यात आली होती. ही कल्पना देखील अतिशय लोकप्रिय ठरली, कारण “तुमच्या आवडत्या वाघासोबत छायाचित्र काढा” या कल्पनेमुळे केवळ लहान मुलेच नाही तर पालकही याकडे आकर्षित झाले. अशा गोष्टींमुळे लहान मुले वन्यजीवनाशी अधिक जोरकसपणे जोडली जाण्यास मदत होते. त्यानंतर एक पुस्तकांचा स्टॉल होता, ज्यामध्ये माया वाघिणीविषयी पुस्तक लिहीणारे लेखक अनंत सोनावणे हे उपस्थित होते, त्यामुळे पालकांमध्ये त्यांच्यासोबत छायाचित्र काढून घेण्याचा उत्साह होता. त्यानंतर शेवटचे व महत्त्वाचे म्हणजे आम्ही वाघ व हत्ती दोघांचेही शुभंकर ठेवले होते व मुलांमध्ये ते देखील अतिशय लोकप्रिय ठरले.
या सगळ्या गोष्टी ठरवून तर झाल्या होत्या, परंतु कागदोपत्री ठरवणे व त्याची अंमलबजावणी करणे या दोन वेगळ्या गोष्टी होत्या व त्यासाठी अनेक लोकांच्या मदतीची गरज होती, त्यात सगळ्यात महत्त्वाचा होता तो जागेचा मुद्दा. त्यासाठी सिद्धार्थ गोखले व नचिकेत यांचे बोगनव्हिला फार्म ही अतिशय योग्य जागा होती. तिथे भरपूर हिरवळ व झाडे असल्यामुळे या कार्यक्रमासाठी ही पार्श्वभूमी होती व अशाप्रकारे एकेका गोष्टीचे आयोजन झाले. महोत्सवाच्या दिवशी आणखी एक अडचण होती, ते म्हणजे पुण्यातील पावसाचे बदललेले (म्हणजेच बेभरवशाचे झालेले) स्वरूप. आम्ही पाऊस पडेल अशी अपेक्षा केली असली तरीही, आजकाल तो जसा मुसळधार कोसळू लागतो, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची दैना उडाली असती. तरीही माझा आमच्या कामावर विश्वास होता जे प्रत्यक्ष निसर्गासाठीच आहे, त्यामुळेच निसर्गानेही आम्हाला साथ दिली. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मध्येच येऊन गेलेली एक छोटीशी सर वगळता सुदैवाने त्या दिवशी पाऊस पडला नाही. पुण्याच्या वन विभागाने अतिशय उदारपणे या उपक्रमाला पाठिंबा दिला व श्री प्रवीण, सीसीएफ तसेच श्री. तुषार चव्हाण, डीसीएफ (वन्यजीवन) हेदेखील अगदी सुरुवातीपासून होते व ते या कार्यक्रमाचे अधिकृतपणे भागीदारही झाले.
मी म्हटल्याप्रमाणे, लहान मुलांसाठी वन्यजीवन महोत्सव आयोजित करणे ही एक मोठी जोखीम होती कारण आत्तापर्यंत कुणीही मुलांना केंद्रस्थानी ठेवून, वन्यजीवनाच्या संकल्पनेवर असे काही नियोजित केले नव्हते, वन्यजीवनाविषयी व मुलांसाठी अनेक कार्यक्रम झाले आहेत, परंतु या दोन्हींचा संगम साधणारे कार्यक्रम आत्तापर्यंत झाले नव्हते, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो (जंगल बेल्स व नेचर वॉक यांच्या वतीने) हा अशाप्रकारचा पहिला उपक्रम होता. आम्हाला असा ठाम विश्वास वाटतो की आपल्या वन्यजीवनाचे भवितव्य आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल तर आपण लहान मुलांपासून सुरुवात केली पाहिजे व त्यांनी त्याला अतिशय उत्साहाने प्रतिसाद दिला. शेकडो मुले चार तासांपेक्षा अधिक काळ सादरीकरणे, कठपुतळ्यांचे खेळ यांचा आनंद लुटला, या मुलांमध्ये कंटाळ्याचा मागमूसही नव्हता. मी अशाच एका पाहुण्या आईला हेमांगीशी बोलताना ऐकले की तिचा मुलगा अगदी अल्पोपाहारासाठीही बाहेर जायला तयार नव्हता, त्यामुळे त्याची बसण्यासाठीची मोक्याची जागा जाईल असे त्याला वाटत होते, आम्हाला मिळालेली ही कौतुकाची सर्वोत्तम थाप होती असे मला वाटते. संपूर्ण चार तास मी कार्यक्रमात गुंगून गेलेली लहान मुले (आणि पालकांचेही) पाहात होतो. एखादे मजेशीर छायाचित्र पाहिल्यानंतर किंवा तशी एखादी घटना पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते, वन्यजीवनाची छायाचित्रे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते, तसेच बांधवगढच्या जंगलाचे आरएफओ श्री अर्पित मैराल जेव्हा ते मनुष्य व प्राण्यांमधील संघर्ष (मी त्याला सहजीवन म्हणेन) कसा हाताळतात याविषयी सांगत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दुःखी भाव होते, जेव्हा बोलक्या बाहुल्या वन्यजीवन संवर्धनाचा संदेश देत होत्या तेव्हा ते त्यामध्ये रंगून गेले होते. डॉ. प्राची मेहता यांचे सादरीकरणही सगळ्यांना अतिशय आवडले कारण मुलांना (व पालकांना) एकाच प्रजातीचा अभ्यास करणे किती रोचक असू शकते व निसर्गातील त्याच्या महत्त्वाची जाणीव झाली. वन्यजीवनाविषयी सुमेधचे सादरीकरण हा महोत्सवाचा परमोच्च बिंदू होता. त्यातील सर्वोत्तम भाग म्हणजे ती केवळ पक्षी व प्राण्यांच्या आवाजाची नक्कल नव्हती तर त्याने लहान मुलांना जंगलामध्ये कोणतीही गोष्ट एखाद्या हेतूशिवाय घडत नाही हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने ज्याच्या जीवनातील अडीअडणींवर मात करत तो आज ज्या मंचावर उभा होता तिथपर्यंत कसा पोहोचला हे देखील सांगितले. आम्ही पालकांचे आभार मानले कारण ते मुलांना वन्यजीवन महोत्सवाला घेऊन आले नसते तर तो यशस्वी झाला नसता. लहान मुले ही एखाद्या कारसारखी असतात व पालक त्याचे स्टिअरिंग व्हील असतात. हे स्टिअरिंग व्हील कारचा मार्ग व भविष्यातील प्रवास निश्चित करते. म्हणूनच जंगल बेल्समध्ये आम्ही पालकरूपी स्टिअरिंग व्हीलला काररूपी लहानमुलांना वन्यजीवनाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी जागरुक करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतो, कारण त्यानंतर संवर्धन हे ओघाने होईलच.
मित्रांनो, मी नमूद केल्याप्रमाणे लहान मुलांसाठी वन्यजीवन महोत्सव आयोजित करण्याचा सर्वात कठीण भाग होता (आहे) तो म्हणजे निधी गोळा करणे. सिद्धार्थ गोखले (बोगनव्हिला फार्म), राजू मडकर (मडकर कन्स्ट्रक्शन्स), कमलेश झाला (मयूक प्रोजेक्ट), अजय (आस्मी व्हिला, ताडोबा) यासारख्या व्यक्तींनी केलेल्या मदतीसाठी शतशः आभार. परंतु या चळवळीमध्ये आणखी लोकांनी सहभागी होणे आवश्यक आहे, खरेतर ही मार्केटिंगच्यादृष्टीनेही चांगली संधी आहे परंतु त्यापेक्षाही त्यामागचा हेतू महत्त्वाचा आहे, असे मला वाटते. म्हणूनच मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की संजीवनीची टीम या महोत्सवाशी तसेच वन्यजीवनाशी निगडित आहे. जंगल बेल्सच्या संघाने आभारप्रदर्शन केल्यानंतर, अनेक पालक व मुले पुढील वन्यजीवन महोत्सव कधी आहे अशी विचारणा करत होते. यासाठी पैसा लागतो व दुर्दैवाने वन्यजीवनामध्ये तो पैसा आकर्षित करण्यासाठी ग्लॅमर नाही (अजून तरी). आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एकमेव आशा आहे व मला असे वाटते की आपल्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी हे समजून घेतले पाहिजे, कारण संपूर्ण मानवजातीचे भवितव्य अंधारात असेल तर तुमच्या उत्पादनांचा काय उपयोग, लोकहो याविषयी विचार करा, असा “वैधानिक इशारा” देऊन निरोप घेतो. मुलांसाठी वन्यजीवन महोत्सव आयोजित करणे हा अतिशय आनंददायक, मनाला शांतता व समाधान देणारी भावना होती. आम्ही पुढील वर्षी व त्यानंतरही पुन्हा असा कार्यक्रम आयोजित करू कारण आम्हाला वन्यजीवनाची काळजी आहे. जंगल बेल्स, नेचर वॉकच्या नावाने थ्री चिअर्स आणि तुषार जोशी, तुम्ही सगळे कौतुकास पात्र आहेस, तुमच्यासारख्या व्यक्तींमुळेच वन्यजीवनासाठी काही आशा आहे!
*तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर लहान मुलांच्या वन्यजीवन महोत्सवाच्या चित्रफिती पाहू शकता...आणि हा अनुभव जरुर शेअर करा इतरांशी!!
https://www.flickr.com/photos/coexistance_is_the_key/albums/72177720327009569
संजय देशपांडे
www.sanjeevanideve.com
www.junglebelles.in









टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा