वारसा शिकवतांना!!

 






                                                               

                                                





























 वारसा शिकवतांना!!

“वडिलांकडून त्यांच्या मुलाला मिळणारा सर्वोत्तम वारसा म्हणजे, योग्य चारित्र्याचा वारसा” …

मला कल्पना आहे की चारित्र्य, नैतिकता, मूल्ये, तत्वे असे शब्द आजच्या जगासाठी राहीले नाहीत तरीही एक गोष्ट तितकीच खरी आहे की, हजारो लोकांनी एखाद्या चुकीच्या गोष्टीचे पालन करायला सुरुवात केली तरीही ती गोष्ट चुकीचीच रहाते, हाच माझा नेहमी विश्वास राहिला आहे व तुमचा ज्या गोष्टीवर विश्वास असतो तेच तुमचे चारित्र्य बनते,  हे विसरू नको माझ्या मुला! म्हणूनच माझ्या मुलांच्या नजरेत मी कदाचित बावळट असलो, तरीही मी (एक वडील म्हणून) थांबता कामा नये, आधी माझ्या मुलांना (किंवा मुलीला) योग्य गोष्टी म्हणजे काय हे समजवले व नंतर कृतीतून सांगितले तरच उद्याचा चांगला समाज घडेल अशी आशा आहे. या पिढीला आपल्या लेखातल्या किंवा बोलण्यातील शब्दांची कदर नाही त्यामुळे कशाला उगाच ते वाया घालवा असा विचार करून आपण लिहीलेच किंवा सांगितलेच नाही, तर आपणही अगदी त्यांच्याचसारखे होऊ, म्हणूनच मी माझे काम करत राहतो. मी केवळ एकाच विचाराने असे लेख लिहीतो, कुठेतरी कुणीतरी वडील त्यांच्या मुलासाठी काहीतरी चांगले (योग्य) करतील व हे जग अधिक चांगले होण्यास थोडाफार हातभार लागेल. माझी मुले बारा वर्षांची असल्यापासून मी त्यांच्यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने पत्र लिहीतोय, मला खरोखरच माहिती नाही की माझ्या पत्रांचा (लेखनाचा) त्यांच्यावर काय परिणाम झाला आहे, परंतु त्याचा माझ्यावर नक्कीच काहीतरी परिणाम झाला आहे, कारण प्रत्येक वर्षी मी स्वतःमध्येच डोकवून पाहतो, आपल्याभोवतालच्या जगाचा नव्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा प्रयत्न करतो. मी त्याच्यासारखा (माझ्या मुलासारखा) विचार करण्याचा प्रयत्न करतो की त्याला माझ्याकडून काय जाणून घ्यायला आवडेल व या प्रक्रियेमध्ये एकप्रकारे मी स्वतःशीच जोडला जातो. आता तुम्हाला हे सगळे फारच तात्विक होत असल्यासारखे वाटत असेल तर या पिढीचे ब्रिदवाक्य आहे “डेल्यूल्यू इज द सोल्यूल्यू”, याचा थोडक्यात अर्थ असा होतो की नाविन्यपूर्ण कल्पनांमधून, आत्मविश्वासातून, सकारात्मकतेतून कोणत्याही थोड्या वेडगळपणातून सुद्धा कोठल्याही समस्येवर सर्वोत्तम तोडगा काढता येतो. एकीकडे आमच्या पिढीला असे वाटते की पुढची पिढी वाया गेलेली जरी नसली तरीपण, कोणतीही बांधिलकी न जपणारी, बेजबाबदार आहे, परंतु आमच्याहून सुदैवी आहे व त्याचवेळी पुढच्या पिढीला आम्ही अजिबात समजून न घेणारे, अति काळजी करणारे, परंपरावादी, पेशन्स नसलेले आणि जुन्या (आउट डेट) फॅशनचे आहोत असे वाटत असावे. हे जग फारच गोंधळलेले आहे, नाही का, परंतु बहुतेक लोक बदलाकडे अशाच नजरेने पाहतात व मी माझ्या मुलांचे आभार मानतो की ती माझे असे विचार वर्षातून किमान एकदा अशा पत्रांद्वारे मांडण्याची संधी देऊन या बदलांशी कसे जुळवून घ्यायचे हे शिकवतात, हे मी त्यांच्याकडून स्वतःहूनच घेतलेले रिटर्न गिफ्ट आहे!

तुमच्या मुलांना मोठे होताना पाहणे ही एक सुखद प्रक्रिया आहे जर तुम्ही स्वतः त्यांच्यात फार गुंतून न राहायला शिकला तर, हे मी शिकलो आहे किंवा मला जाणवले आहे किंवा माझा त्यावर विश्वास आहे (त्याने काही फरक पडतो का?). याचा अर्थ अजिबात असा होत नाही की तुमचे कर्तव्य करू नका वा मुलांकडे दुर्लक्ष करा. फार गुंतून पडू नका याचा अर्थ, तुमच्या मुलाला तुमचीच प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करू नका किंवा तुमच्याच चांगल्या किंवा वाईट गोष्टींचे त्याने पालन करावे अशी अपेक्षा त्याच्याकडून करू नका, परंतु त्याचवेळी तुम्ही आयुष्यात जे काही शिकलात ते त्यांना शिकवण्याचा प्रयत्न सोडू नका व त्यानंतर त्यांना बरोबर किंवा चूक याची स्वतः निवड करू दे!  जेव्हा मी मागे वळून माझ्या मुलांसाठी लिहीलेली पत्रे पाहतो (सुदैवाने त्यातली बहुतेक मी जपून ठेवली आहेत) तेव्हा माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू येते, कारण या पत्र प्रवासात डिस्ने, मार्व्हल, बॅटमॅन पासून ते थेट आता थेट गॉडफादर डॉन कॉर्लिऑनच्या डायलॉगपर्यंतच्या प्रवासात वाटा बदलल्या असल्या तरी प्रवासाची दिशा बदललेली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे व एकेदिवशी माझ्या मुलांना ते समजेल, जर त्यांना योग्यप्रकारे जगायचे असेल. अर्थात, हा माझा दृष्टिकोन झाला, ते कदाचित माझ्या कल्पनेपेक्षाही खूप चांगल्याप्रकारे व मला ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्यावर विश्वास ठेवून जगतील व यशस्वी होतील. अर्थात त्यालाही काही हरकत नाही कारण एका वडिलांची त्यांच्या मुलाने त्यांना चूक ठरवावे व त्याच्या स्वतःच्या पद्धतीने यशस्वी होऊन दाखवावे याखेरीज मुलाकडून दुसरी काय अपेक्षा असू शकते, बरोबर? चला तर मग मी आत्तापर्यंत जे काही बडबडलो ते वाचल्यानंतर तुम्हाला अजूनही वाचण्याची इच्छा शिल्लक असेल, तर पुढे पत्र वाचा …

 

१२ मे २५

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

1."महिला व लहान मुले निष्काळजी होऊ शकतात, परंतु पुरुषाला ही मुभा नसते."…डॉन व्हिटो कॉर्लिऑन.

2."जो पुरुष त्याच्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नाही तो कधीच खरा पुरुष असू शकत नाही."… डॉन व्हिटो कॉर्लिऑन.

3.“तुमच्या शत्रुंचा कधीच तिरस्कार करू नका. त्यामुळे तुमच्या निवाड्यावर परिणाम होतो.”… डॉन व्हिटो कॉर्लिऑन.

प्रिय दादा,

आता मला सांग कोणता बाप त्याच्या मुलाच्या वाढदिवशी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी लिहीलेल्या पत्रात एका गँगस्टरचे  वाक्य सुरुवात म्हणुन वापरेल, परंतु सर्वप्रथम मी कधीच नॉर्मल बाप नव्हतो(😀) व दुसरे म्हणजे मी आता जे लिहीतो आहे ते मार्गदर्शनपर नाही तर केवळ आयुष्याची तथ्ये (facts) सांगतोय व ही तथ्ये अतिशय निर्दयी असतात. किंबहुना ज्या पुरुषांमध्ये सत्याला तोंड देण्याचे धाडस असते त्यांनीच ते जाणून घ्यावे असे मला नेहमी वाटते व मी म्हटल्याप्रमाणे माझा ज्यावर विश्वास आहे तेच मी सांगतो, म्हणूनच मी जे काही लिहीले आहे ते समजून घेण्यासाठी तुमचा आधी कशावरतरी दृढ विश्वास असला पाहिजे असा इशारा सुरुवातीलाच देतो!

हा तुझा ३०वा वाढदिवस आहे व आता तू समाजाच्या नजरेत एक तरुण purush आहेत, आता तू नवतरुणांमध्येही गणला जाणार नाहीस व  आता तर तुझा कौटुंबिक प्रवास सुद्धा सुरू केला आहेस. मला माहिती आहे की डॉन कॉर्लिऑनने सांगितलेली सर्व तथ्ये बरोबरच असतील असे नाही कारण प्रत्येकानेच स्वतःसाठी योग्य काय हे ठरवले पाहिजे. उदाहरणार्थ पहिले अवतरण, त्यामध्ये त्याला महिला व लहान मुलांचा अपमान करायचा नव्हता किंवा लैंगिक पक्षपात करायचाही उद्देश नव्हता. परंतु पुरुष हा घरातला कर्ता असतो व घरातली स्त्रीदेखील कर्ती असू शकते, तसेच अनेक कुटुंबात मुलांनाही लहानपणीच जगण्यासाठी कष्ट करून कमवावे लागू शकते, जे सुदैवाने तुला करावे लागले नाही. दादा, पहिली दोन अवतरणे कदाचित परस्पविरोधी वाटतील पण ती नाहीत किंबहुना ते म्हणजे खरेतर आयुष्यातील दोन घटक पूर्णपणे वेगळे राखणे आहे, व्यवसायामध्ये (म्हणजे कामाच्या ठिकाणी) तुम्ही कुणाचाही नवरा, मुलगा किंवा भाऊ नसता व कुटुंबात मात्र प्रत्येकाचे कुणी ना कुणीतरी असता व कधीही या दोन्ही गोष्टींची सरमिसळ होऊ देऊ नकोस असे डॉनला म्हणायचे होते. अलिकडच्या काळात आपले कार्यालय व घराबाहेरील जगामध्ये खुप गोष्टी बदलल्या आहेत व अनिश्चितता हेच भविष्य आहे व म्हणूनच प्रत्येक भूमिका अतिशय काळजीपूर्वक पार पाड. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या शारीरिक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा जर तू विचार केला नाहीस, तर इतर कुणीही करणार नाही ही जीवनातील एक वस्तुस्थिती आहे!

आता, मी तुला वाढदिवसाच्या काय भेटवस्तु देऊ, कारण तुझ्या वयाच्या पुरुषांच्या ज्या इच्छा असतात (बहुतांश पुरुषांच्या) ते शब्दशः सर्वकाही तुझ्याकडे आहे व मला माहितीय तुला लॅव्हिश प्रकारे जगायला आवडते, पण मला हेदेखील माहिती आहे की तो एक अभिशाप आहे, ते म्हणजे गोड खाण्याच्या सवयीप्रमाणे आहे. दादा, पुरुष कितीही चांगले कमवत असला तरीही खर्च करण्याच्या बाबतीत बहुतेक पुरुष चुका करतात आणि तिथेच घसरण सुरु होते. या बाबतीत तुझ्यात व माझ्यात ३६० अंशांचा फरक आहे, पण चालायचेच, तुझे धडे तू स्वतः च शिकशील अर्थात तू जे काही शिकला आहेत त्याचा अंगिकार करण्यासाठी टिकूनही राहिला पाहिजेस, हेदेखील महत्त्वाचे आहे. आता तुला भेट देण्याविषयी, तर मी तुला माझ्या निर्णयांच्या चुका, मी लोकांना योग्य रित्या ओळखण्यात केलेल्या चुका , माझ्या वाईट सवयी भेट देतोय. तू बुचकळ्यात पडला असशील मी कशाप्रकारचा बाप आहे जो तुला  चुका भेट म्हणुन देतोय!! माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की या सगळ्या गोष्टींमुळे मला स्वतःला व आयुष्याला अधिक चांगल्याप्रकारे समजून घ्यायला मदत झाली आहे. मी या भेटवस्तू मिळवण्यासाठी त्याची मोठी किंमत मोजली आहे व एक वडील म्हणून मला असे वाटते की माझ्या चुकांमधून त्यांच्यासाठी काही किंमत मोजावी न लागता तू शिकावेस. मी तुझ्यासाठी जी काही स्थावर मालमत्ता सोडून जाईन, जर तुझ्याकडे त्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची किंवा ती हाताळण्याची क्षमता नसेल, तर या ना त्या मार्गाने ती तुला सोडून जाईलच. तू एक समजदार जबाबदार पुरुष व्हावेस असे मला वाटते, ज्याचा त्याच्या श्रीमंतीपेक्षाही चारित्र्यासाठी आदर व्हावा, तेच माझे रिटर्न गिफ्ट असेल तर तुला मला काही द्यायचेच असेल तर!

डॉनच्या शेवटच्या अवतरणाविषयी सांगायचे झाले, तर मी म्हणेन की आधी कुणाशीही शत्रुत्व पत्करू नकोस व तू शत्रुत्व पत्करलेस तर ते तुझे शत्रू आहेत हे त्यांना कधीही जाणवू देऊ नकोस. चल तर मग, मित्र कमव, त्यांचे प्रेम व आदर मिळव कारण ते मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी  पैसे कमवण्यापेक्षाही खुप जास्त कष्ट पडतात. त्यासाठी कणखरपणा व बुद्धिमत्तेपेक्षाही दयाळूपणा, धाडस व योग्य गोष्टींमागे उभे राहण्याची दृढता हवी असते, जे तू करशीलच. 

आता शेवटचा परंतु महत्त्वाचा मुद्दा, तुझ्याभोवती असलेल्या प्रत्येकाशी कृतज्ञ राहा व तुझ्या आईच्या चांगल्या गोष्टींचा कधीही विसर पडू देऊ नकोस, त्याचा काय अर्थ होतो याचा विचार कर, मी तुझ्या मदतीसाठी नेहमी तयार आहेच!


बाबा, आजी, अब्बू, आत्या, किरण काका व समस्त तरुण मित्र मंडळी.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नीट (NEET), टीइटी (TET) आणि लोहगड

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे; प्रदूषण मुक्त पुणे??

मा.पोलिस महासंचालक सर आणि सामान्य माणसाच्या अपेक्षा..!